Tuesday 26 July 2016

चावंड - एक भटकंती








मध्यंतरी फेसबुकवर एक फोटो बघितला पाण्यात निम्मा बुडालेला दरवाजा आणि सहज ऊत्सुकतेने विचारले पण त्यांनी स्थळ ऊघड करायला नकार दिला पण त्याच कॉमेंटमध्ये एकाने चावंड म्हटले आणि त्यादिवसापासून मनात चावंड घोळत होता,





जुन्नर विभागातले नारायणगड,शिवनेरी,हडसर, निमगिरी, जीवधन आणि नाणेघाट असे सर्व गड पालथे घातल्यावर शिल्लक राहिलेला एक चावंड करण्याचा योग 1 ऑगस्टला जुळून आला.
सकाळी आम्ही सहा वाजता पुणे सोडले .मध्ये नारायणगावला सर्जा हॉटेलमध्ये नाष्टा पाणी करून जुन्नर मध्ये शिवनेरी शेजारून दार्या घाट आटपाळे लिहीलेला रस्ता पकडला.आता रस्ता सुस्थितीत आहे.जाताना रस्त्यात पाण्याने भरलेल्या खाचरात शेतकरयांची भात लागवडीची लगबग चालू होती.त्याठिकाणी थोडे थांबून दोन चार फोटो घेतले.



पुढे चावंड त्याच्या कातळ भिंतींसह ऊभा ठाकला.वर जाण्याचा रस्ता मात्र वळसा घालून चावंड वाडीतून आहे.
गाडी चावंडमध्ये मंदीरापाशी लावली आणि पावसाची मोठी सर आली वाटले आज भिजत ट्रेक करायला लागणार मग प्लास्टीकच्या पिशवीत मोबाईल घेतला पाण्यासाठी एकच सॅक घेतली आणि गडावर  निघालो.
वनविभागाने खाली थोडी सिमाभिंत व निम्म्या अंतरापर्यंत पायरया करून मार्ग सोपा केलाय.वर एक रॉक पॅचही रिलींग लावून सुरक्षित केला आहे नाहीतर पावसाळ्यात जरा अवघड जागा आहे.



रॉक पॅच संपल्यावर वर तटबंदी आणि मुख्य दरवाजा खालील ओबडधोबड पायरया लागल्या.
थोड्या चढाईनंतर 90° च्या कोनात वळून प्रवेशद्वार आहे,थोडा लोखंडी आधार देऊन ऊभे ठेवलेय.त्यावर एक सुबक गणेशाची मुर्ती कोरलीय.




आत जाताच परत वर चढून ऊजवीकडे रस्ता सदरेकडे जातो तिथे दगडातले पाण्याचे मोठे भांडे दिसले.सदरेसमोर जुन्या वाड्याचे प्रशस्त जोते आहे. तिथून पुढे गेल्यावर ऊजवीकडे टेकडीवजा चढ चढून आपण चामुंडेच्या मंदीरात प्रवेश करतो.हे गडाचे सर्वोच्च टोक.तिथेही थोडे विखुरलेले अवशेष दिसतात.मंदीर नव्याने डागडुजी केलेले आहे.



 वरून पूर्ण गडाचे अवलोकन करता येते.गवत खूप असल्याने अवशेष दिसणे अवघड आहे पण पाट्या लावल्याने थोडे काम सोपे झालेय. पण चावंडच्या माथ्यावरून एकीकडे शंभु डोंगर जीवधन नाणेघाटापर्यंतचा परिसर, समोर हडसर, निमगिरी शिंदोळ्यापर्यंत एकीकडे जुन्नर शिवनेरी पर्यंत असा चौफेर नजारा दिसतो.पावसामुळे ढगात लपाछपी खेळणारे चावंडचे सवंगडी अधूनमधून डोकावत होते.




चामुंडेचे मंदीर जुन्नर कल्याण या जुन्या नाणेघाटातून असणारया व्यापारी मार्ग वापरणारया व्यापारयांनी बांधले असावे अथवा स्थापना केली असावी.दर्शन घेऊन टेकडी ऊतरून खाली आलो आणि ऊजवीकडे पुष्करणीकडे जाणारी गवताची वाट पकडली.थोड्या अंतरावर एक टाके लागले आणि त्यापुढे झुडुपात वेढलेली पुष्करणी.एवढे विलक्षण अवशेष हा गड संपन्न असावा याचेच पुरावे देणारे.खर सांगायच तर चांदोबाच्या गोष्टीतील किंवा परिकथेतील जंगलाने वेढलेले आणि आता राबता नसलेले राजवैभव ही पुष्करणी कथन करतेय असे वाटून गेले.पूर्वीच्या वैभवात अशी वास्तू ऊभी राहीली तर? पण ...




पुष्करणीचे वैभव न्याहाळल्यानंतर सप्तमातृका या सात टाक्यांचा समुह शोधण्यास निघालो.यावेळेलाही खूप गवत झुडुपे माजली आहेत त्यामुळे थोड्या शोधानंतर त्या ठिकाणी पोहचलो.अतिशय विस्तीर्ण पूर्णपणे खोदीव व एकमेकास जोडलेल्या सात टाक्यांचा समुह हा अतिशय वैशिष्टयपूर्ण रचनेचा आहे.त्यात पहिल्या टाक्यात ऊतरणारया चिरेबंदी पायरया ऊत्तम स्थितीतील गणेशपट्टी असलेल्या दरवाजाने व बांधकामाने बंदिस्त केल्या आहेत.आत पाण्यात त्या पायरया ऊतरतात.ईथे मला खूप दिवसापासून वाटत असलेली एक गोष्ट नमूद करावी असे वाटते.पाण्याची टाकी ही फक्त पाणी साठवण्याची जागा नसावी तर भूमिगत बांधकामाचा तो एक भाग असावा, काळाच्या ओघात त्यात पाणी जमा होऊन त्याला टाक्याचे स्वरूप आले असावे.कारण चावंडचा विचार केला तर चारही दिशेने जर तोफांचा मारा असला तर सुरक्षित लपायला दुसरी जागा कुठे आहे.यावर एखादा अभ्यासू प्रकाश टाकू शकेल.

सप्तमातृकांची प्रदक्षिणा घालून गुहेच्या शोधात निघालो.पण गुहा काही सापडली नाही.पुन्हा कधीतरी तिचा तपास करू असे ठरले व ऊत्तरेकडच्या बुरूजावरून कुकडी प्रकल्पाचे विहंगम डोळ्यात साठवत थोडा फराळ केला व परतीच्या मार्गास लागलो.

पुढे गड ऊतरून नाणेघाटाच्या दाराशी जाऊन दारूडे व पिकनीकसाठी आलेली जोडपी यांची संख्या पाहून लगेच परत फिरलो.येताना कुकडेश्वर मंदीर पाहण्याचा योग आला.कुकडेश्वर हे अतिशय संप्पन्न अप्रतिम कोरीव काम व अवशेषांनी परिपूर्ण मंदीर चावंडच्या खूपच जवळ आहे.न चुकता पहावे असे.

तिथून पुढे जुन्नरला हॉटेल अभिषेकला दोन माणसांनाही संपणार नाही अशी मर्यादित थाळी खाऊन सर्वांच्या ईच्छेने नारायणगडाची फेरी करायची ठरली.नारायणगड चहूअंगाने मोकळा आणि खूप भावलेला गड.तासाभरातच वर जाऊन मोकळी हवा फुफुस्सात भरून परत फिरलो.रात्री आठला घरी परतलो.
सर्व मोसमात प्रत्येक गड वेगळा भासतो त्यामुळे परत परत एखादा गड फिरलो तरी समाधान मिळते.
मित्रांनो परत भेटू अशाच मनसोक्त भटकंतीत!

गडी:  प्रशांत कोठावदे, मिलींद पाटील, अमोल चांदूरकर, समीर कदम आणि तुषार कोठावदे.
काठीण्य : सोपा.गाईड आवश्यकता नाही.
भोजन:  जुन्नर हॉटेल अभिषेक पण थाळी मर्यादितच घ्यावी.

Thursday 21 July 2016

सागरगड ऊर्फ खेडदुर्ग -मागोवा एक अज्ञाताचा!




                 मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना अलिबागचे नाव घेताच नजरेसमोर येतो तो फेसाळता समुद्रकिनारा, अलिबाग, किहीम, काशीद सारखे सागरकिनारे आणि अलिबाग जवळील कुलाबा, खांदेरी ,ऊंदेरी असे सागरी किल्ले ! माझीही स्थिती वेगळी नाही त्यामुळे या रविवारी सागरगड ट्रेक ठरला तेव्हा मनात विचार आला की अलिबागला लागून छोट्याश्या टेकडीवरील साधारण भटकंती असावी.पण सह्याद्रीत फिरताना येथे विखुरलेल्या कुठल्याही गडाला साधारण म्हणून समजण्याची चूक करायची नाही हा धडा मला आधीच मिळालाय त्यामुळे फारशा किंवा अजिबात ऐकिवात नसलेल्या सागरगडाकडे रविवारी पहाटे 5.45 ला निघालो तेव्हा नक्कीच काहीतरी वेगळे बघायला मिळेल या आशेने निघालो आणि या मंथनातून एक रत्न गवसले.



                एक्सप्रेस मार्गाने लोणावळ्यापर्यंत. नंतर खोपोली एक्झीट वरून बाहेर पडून पेणवरून वडखळनाका ( ऊंटाच्या पाठीवरच्या सफरीचा आनंद) आणि अलिबागच्या 4 कि मी आधी सागरगडाच्या पायथ्याच्या खंडाळा गावी पोहचलो.आत विचारून गाडी डांबरी सडकेच्या शेवटी कडेला लावली.जाताना पावसात भिजण्याच्या पूर्ण तयारीने गेलो म्हणजे बदलायला कपडे आणि टॉवेल घेऊन.गाडीतून खाली ऊतरून जोडीदार त्यांची तयारी करेपर्यंत आजूबाजूचा परिसर न्याहाळला आणि दूरवर एक मोठा धबधबा कोसळताना बघून ऊत्साह वाढला.पावसान आल्या आल्या स्वागत केल पाठीवर सॅक टाकली आणि कच्च्या रस्त्यान मस्त सफर चालू झाली.



               कोकणातला ट्रेक म्हणजे पाण्यान भरलेली भात खाचर आणि त्यात भात लावणीसाठी चाललेली शेतकरयांची लगबग ही बघून लहानपणातील अनुभवलेली ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथील आठवण जिवंत झाली.कोकणी माणस तशी निवांत म्हणजे जगात कितीही ऊलथापालथ झाली तरी घराच्या ओसरीत अथवा मंदीराच्या समोरील पारावर गप्पा मारत त्यांच्या मस्तीत जगणारी! कसलीच घाई नाही ( अर्थात काऴानुरूप अपवाद आहेत). धावपळ फक्त भातशेतीची पावसाची वेळ, होळी ( शिमगा) आणि गणपती!
  



               थोड पुढ गेल्यावर डावीकडचा रस्ता सोडून धबधब्याच्या दिशेने एक ओढा ओलांडून सिद्धेश्वर मंदीराची जंगलात घुसणारी पायवाट पकडली.पाणी चिखल चुकवत कुठे तरी अवचित पाय बुडवत दगडी पायरयापाशी पोहचलो.येथून शेवाळलेल्या पायरयांसोबत डोंगरधार चढायला सुरूवात केली.
धबधबा ऊजव्या हाताला मनोहारी दर्शन देत होता.अर्ध्या चढानंतर धबधब्याकडे जाणारी अरूंद वाट लागते.तिथे धबधब्याच्या मागच्या गुहा पण स्पष्ट दिसतात पण गडावर जायचे असल्याने तिकडे जाण्याचा मोह आवरला!






रविवारच्या पिकनीकसाठी आलेल्या तुरळक लोकांची धबधब्याखाली मौज चालली होती.पण  लोक बिनधास्त थेट धबधब्याखाली आणि कड्याच्या टोकावर बघितले तर काही मद्यप्राशन करत होते.कितीही जीव गेले तरी जोपर्यंत स्वत: पर्यंत काही येत नाही तोपर्यंतची ही बेफिकीर वृत्ती मनाला अस्वस्थ करून गेली.




पुढे डोंगरधार संपल्यावर धबधबा कोसळतो त्या ऊगमापाशी सिद्धेश्वराचे मंदीर व मठ आहे तिथे थोडा फराळ करायला थांबलो.छान विहीरीचे ताजे पाणी हापसून हात आणि तोंडावर मारले.कोकणात पावसात पण घामच निघतो राव! वानरसेनेच्या ऊपस्थितीने सावधानता म्हणून मंदीराचे दोर लावून बंद केलेले दार ऊघडून प्रशस्त मंडपात न्याहारी ऊरकली.




पुन्हा दहा मिनीटात बिर्हाड पाठीवर टाकून सागरगडाकडे मार्गस्थ झालो.
पठारावरची सामान्य चाल करून अर्ध्या तासात सागरगडमाची गाठली.पंधरा वीस घरांची वस्ती!
माची ओलांडून छोटी टेकडी ओलांडली की आपण सागरगडाच्या घेरयात पोहचतो.तिथे एक वनदेवतांचे ठाणे ऊनपाऊस झेलत वसलेले आहे.



पुढे थोडा चढ चढलो आणि धुक्याच्या दुलईने पुर्ण हिरवा आसमंत वेढला गेला.एक अनामिकतेकडे, गूढरम्य प्रवास करतोय अस वाटायला लागाव अस वातावरण! 



मध्येच अलिबागचा एक ट्रेक ग्रुप भेटला.त्यांना सह्यांकन 2016 चा आमच्या तरूण मित्राच्या वडिलांची श्री.नंदकिशोर वडेर यांची ओळख सांगितली.काही जुजबी बोलण झाल्यावर त्यांचा निरोप घेऊन पुढे गेलो तर धुक्यात बुरूज आणि तटबंदी दिसली.मला वाटले की ईथे गड संपतोय.मग तटबंदीच्या कडेने वर जाऊन पलिकडे काय दिसते याचा प्रयत्न म्हणून तटबंदीच्या शेजारील ओढ्यातून डावीकडे सरकलो बघतो तर एका ठिकाणी तळ्यासारख पाणी साठलेल आणि झुडप माजलेली! नीट निरखून बघितल्यावर एक खिडकीवजा कमानी झरोका दिसला पण वर जायचे कसे.थोडा शोध घेतला असता त्याशेजारीच पडक्या तटबंदीत वर जायची पायवाट असल्यासारख जाणवल.






मग वर चढलो तर समोर झाडीबाहेर बरयापैकी मोकळे पठार! थोडी तटबंदी बांधकामाचे अवशेष ओलांडताना मंदीराची पत्र्याची शेड दिसली आणि त्याखाली गोमुख असलेल दगडी कुंड! त्यातून निर्मळ पाण्याचा झरा चालू.हे कुंड चार पाच फूट खोल व तेवढ्याच लांबी रूंदीच आहे.



प्रथम गडफेरी करून मग मंदीरात यायचे ठरले.समोर डोंगराच्या दोन सोंडा दिसल्या.वरूणराजाच्या कृपेन धुक्याची दुलई दूर झाली आणि हिरवाकंच गवताचा गालिचा त्यापलिकडे एका सोंडेच्या पुढ असलेला वानरटोक सुळका दृष्टीस पडला.



वा! हेच ते क्षण असतात त्यासाठी जे कुठल्याही छायाचित्रकाराला आणि ट्रेकरला वेड लावतात.काय आणि किती फोटो घ्यावे अस झाल.प्रशांतने तर ऊड्याच मारायला लावल्या.पण वय विसरून फोटोग्राफरसाठी अस करण्यात पण एक वेगळीच मजा येते.



 पुढे एका सोंडेला एक समाधी आणि एक दारूखाना वा तत्सम पडक् बांधकाम आहे.दोन सोंडेच्या मध्ये घळीत थोडी तटबंदी आहे.खाली विस्तीर्ण समुद्रापर्यंतचा परिसर क्षण दोन क्षण दिसला.मग दुसरया सोंडेवर जाऊन वानरटोक सुळका जवळून बघितला.( वानरपाशी असही म्हणतात बहुतेक याला.हा क्लाईंबिंग करतात अस ऐकलय कुठेतरी).



एव्हाना दोन वाजत आले होते मग लगबगीने परत फिरलो.पावसाचीही लक्षण दिसायला लागली.ऊंचवट्यावर मंदीराच्याही वर वाड्यासारखे मोठे अवशेष आहेत व ध्वजस्तंभ आहे.तिथे खाली एक तलावही आहे




.तिथे पोहचून अजून दोन चार क्लिक करेपर्यंत आतापर्यंत आम्हाला सहकार्य करणारया वरूणराजान ताडताड करत आक्रमण केल आणि मग धावतपऴत मंदीराच्या पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला.मग थोडा पोटोबा आणि सोबत विठोबा करून परतीच्या मार्गी लागलो.




परतीच्या वाटेला तटबंदी शेवटच्या टोकापर्यंत चिखल तुडवत चाचपून आलो.सागरगडमाचीपर्यंत त्याच वाटेने झपझप ऊतरलो.तिथे कातकरयांची पोर विहीरीत पोहत होती त्यांनाही प्रशांतने पोझ म्हणून वरून ऊडी मारायला लावली.तिथून मग सिद्धेश्वर मठाकडे न जाता कच्च्या रस्त्यान खाली जिथ जंगलात ओढ्यापाशी धबधब्याकड वळलो होतो तिथ अर्ध्या पाऊण तासात पोहचलो.तिथून गाडीपर्यंत जाईस्तोवर पाच वाजले होते.मग शूज बदलून मुख्य रस्त्याला कोकणकट्टा नामक हॉटेलात सुरमई थाळी सोलकडी पोट फुगेस्तोवर हाणली ( कॅलरीज बॅलन्स करायला) आणि तशा सह्याद्रीच्या डोंगररांगेपासून बाजूला सागराजवळील एका कमी माहीती असलेल्या पण कधीकाळी नक्कीच महत्वाची भूमिका बजावलेल्या गडाचा निरोप घेतला.आजचा दिवस एका अनामिक समाधानाने भरलेला होता.




ऐतिहासिक आणि भौगोलिक माहीती
गडप्रकार  : गिरीदुर्ग
ऊंची  : 1357 मीटर्स
पायथ्याचे गाव:  अलिबागच्या 4 कि मी आधी खंडाळा, जि.रायगड
अंतर:  पुण्यातून खोपोली पेणमार्गे साधारण 150 कि मी.
ऊपयोग:  अलिबाग व धरमतर खाडीवर नजर ठेवण्यासाठी

ईतीहास:  

1660  : आदिलशहाकडून स्वराज्यात.
1665  : पुरंदर तहात महाराजांनी दिलेल्या 23 गडांपैकी एक!
महाराजांच्या आग्रा सुटकेनंतर परत स्वराज्यात दाखल.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सिद्धीने जिंकला.
1698 सरखेल कान्होजी आंग्रेंनी परत ताबा घेतला.
1713 सरखेल कान्होजी आंग्रेंना जहागिरी दिलेल्या 16 गडांपैकी एक.
1818 ईंग्रजांच्या ताब्यात.

स्थळ विशेष:

1.धोंदाणे धबधबा
2.सिद्धेश्वर मंदीर व मठ
3.वानरटोक सुळका
4.तटबंदी व पाच बुरूज असलेला बालेकिल्ला
5.गोमुख असलेले कुंड
6.वाड्यांच्या बांधकामाचे अनेक अवशेष
7.समाधी ( अनामिक)

निरीक्षण :

छत्रपतीं शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला ,  अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला ,
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दीर्घकाळ असलेला हा दुर्ग जरी थोडा अपरिचित असला तरी अनेक 
स्मृती आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे. तटबंदी दगडी बांधकामात असली तरी इतर गडांप्रमाणे 
दगड काढल्यामुळे तयार झालेली   पाण्याची टाकं काही नजरेस पडली नाहीत. जांभ्या दगडातील काही 
बांधकाम अवशेष बहुतेक अठराव्या शतकातील व त्यानंतरचे असावेत. 

ट्रेक सवंगडी:  




.








.
.









दिनांक:  17 जुलै 2016, रविवार.

धन्यवाद परत भेटू नवीन भटकंतीसह!

Wednesday 6 July 2016

सह्याद्री ते हिमालय - एक प्रवास!

   



    सह्याद्रीत भटकंती पूर्ण रूजू लागली की बहुसंख्य भटक्यांना हिमालयातील भटकंतीची ओढ लागायला सुरूवात होते.कुठल्यातरी वेड्या मित्राच्या नादाला लागून चालू झालेला हा प्रवास मोठा विस्मयकारी आहे.

          कॉलेजात प्रवेश होऊन स्थिरावू लागत असताना काही मित्रांच्या संवादात सिंहगड, लोहगड,तिकोना, राजगड ,तोरणा अशी नावे ऐकून ईतिहासाच्या पुस्तकातील तोकड्या माहितीच्या पलिकडे काही अद्ण्यात आहे याची ऊत्सुकता चाळवणारी जाणीव व्हायला सुरूवात होते.खर तर तोपर्यंत राजगड आणि रायगड यातला फरकही बहुतेक माहीती नसतो.मग ऊत्साहाने कॅनव्हासचे शूज खरेदी करून एखाद्या सुट्टीच्या दिवशी आसपासच्या एखाद्या " किल्ल्याचा" पिकनीकवजा ट्रेक आयोजीत होतो.हा ट्रेक पावसाळ्यात असला तर मग सह्याद्रीचे रूप पाहून प्रथमदर्शनी प्रेमात पडण्याची शक्यता जास्त! नाहीतर मित्राला पायपीट करताना शिव्यांची लाखोली वाहत 50% जणांचा हा प्रवास ईथेच संपतो.

जे यातून पुढे जातात ते थोडे वेडे असल्याची खात्री दोन तीन ट्रेक झाल्यावर कॉलेजच्या मित्रांची होते.मग हळूहळू ऐकणारयांच्या भूमिकेतून सांगणारयांच्या भूमिकेत जाणे सुरू होते.सुट्टीच्या दिवशी भूषी डॅमची पिकनीक सोडून तोरण्याला छातीचा भाता फुलवणारया मित्राला पार कामातून गेला, सरळ रस्ता सोडून काय डोंगर चढतो असे कौतुक मित्रमंडळीकडून सुरू होते.बरयाच जणांच्या पालकांना थोडी हौस फिटली की पोरग येईल जागेवर अशी खात्रीच असते.

पण या सह्याद्रीचे अफाट रूप कुठेतरी धुक्यात वेढलेल्या पद्मावतीवर मुक्कामी असताना किंवा भर पावसात बुधला चढताना मोहपाशात खेचते आणि मग एका गिर्यारोहकाचा जन्म होतो.
मग कॉलेजचे वेळापत्रक सांभाळत, घरच्यांना कळत नकळत ट्रेकची संख्या वाढायला लागते.मग हळूहळू हरिश्चंद्रगड, रायरेश्वर असे थोडे लांबचे ट्रेक तसेच राजमाची, भिमाशंकर असे ट्रेल खूप प्रयत्नाने पूर्णत्वास नेले जातात.हऴूहळू मित्रांची लिस्ट बदलते म्हणजे वेडे मित्र वाढू लागतात आणि शहाणे मित्र चांगला होता पार कामातून गेला या भावनेन् सहानुभूतीपूर्वक कमी होतात.

कॅनव्हास शूजची जागा आता अॅक्शन ट्रेकींग घेऊ लागते.आता अनुभवाबरोबर हऴूहळू ईतिहासाच आणि भूगोलाचा मेळ लागू लागतो.स्वारगेटच्या एस टीची वेळापत्रके माहीती होऊ लागतात.अशातच गोनीदा, आनंद पाळंदे, बाबासाहेब पुरंदरे, आप्पा परब अशा दिग्गजांचे दुर्गसाहीत्य वाचनात येऊ लागते.गोनीदांची एखादी वाघरू वाचून राजगड परत बघावा अस वाटायला सुरूवात होते आणि आप्पा परबांच्या भेटीनंतर वर्ष दोन वर्षात पण राजगड समजणार नाही याची जाणीव होते.निनाद बेडेकरांचे एखादे व्याख्यान ऐकण्यात आले की महाराजांबद्दल आपणाला काहीच माहीती नाही असे वाटायला सुरूवात होते.

        आता गिर्यारोहक म्हणून तरूण होण्यास सुरूवात झालेली असते.मग वासोटा, पन्हाळगड, विशाळगड, भैरवगड, अलंग, मदन साल्हेर मुल्हेर असे गड असोत की कळसूबाईसारख शिखर असो वा रायलिंग मोहरीचे पठार असो आवाका वाढलेेला असतो.अशात मग दिग्गज भटक्यांची कुठेकुठे गडमाथ्यांवर कडे कपारीत भेट होत राहते आणि माहीतीचा मोठा खजिना ऊलगडत जातो.यातच मग कोणीतरी विचारते अरे तुझा लिंगाणा झाला का? भोरगिरी भिमाशंकर मस्त आहे.ढाकला शिडीवरून चढायला लागते, नळीच्या वाटेन हरिश्चंद्र चढला का? मग असे प्रश्न डोक्यात घुसले की एक महत्वाची जाणीव होते अरे आपली तर अजून सुरूवातच आहे.

   मग एखादा अवलिया म्हणतो अरे परवा मी आग्या नाळीतून तोरणा रायगड केला.आहुपे घाटातून गोरखगड भारी दिसतो .साल्हेरहून सालोटा आणि मदनवरून अलंगचे फोटो बघण्यात येतात.कळसूबाईवरून दुर्गरत्नांची रांग बघून मन अस्वस्थ होते आणि अलंग मदनचा पॅच काळजाचा ठोका चुकवतो.

हळूहळू मग या वाटा गिर्यारोहकाचे एका जबाबदार गिर्यारोहकात रूपांतर करायला सुरूवात करतात.मित्रांचे चेष्टेचे सूर बदलून कौतुक नजरेत भरायला सुरूवात होते.घरचे लोक कंटाळून जाऊ दे येतो ना परत अशा भूमिकेला पोहचतात.

आणि हळूच मग मनात दडलेल् हिमालयाचे स्वप्न सत्यात ऊतरवण्याची ईच्छा जोर धरू लागते.पण आता प्रापंचिक जबाबदारया, नोकरी धंदा आणि आर्थिक जुळवाजुळव आणि वेळेचे नियोजन असे सर्व अवघड गणित समोर ऊभे राहते.पण तरीही गिर्यारोहकाचे गुण अंगी रूजल्याने कठीणातल्या कठीण अडचणींचा सामना करत हिमालयाचे प्लॅनिंग आकार घेऊ लागते.त्यात गाईड शोधणे, प्रवासाचे नियोजन, आरक्षण, योग्य सिझन ठरवणे असे टप्प्याटप्याने पार पडायला लागते आणि मग एक दिवस सह्याद्रीचा गिर्यारोहक हिमालयातील स्वप्नांच्या प्रवासाला सुरूवात करतो.........

धन्यवाद!






Saturday 19 March 2016

तेलबैला वाघजई घाट सुधागड सवाष्ण घाट तेलबैला - ऊन्हाळ्यातील कसदार भटकंती - भाग दुसरा.









“यूहीं नही लाखो हसते हसते सुलीं चढे यहॉं पे, 

तेरा जलवा ही कुछ और है !"


सह्याद्रीमध्ये भटकंती करताना येथल्या ऊजाड अवशेषांच्या रोमारोमात भरलेल्या ऐतिहासिक क्षणांची अशी प्रचिती खरया शिवप्रेमीला नक्की येते.सुधागडचा परिसर असाच अनेक रोमहर्षक आणि महत्वाच्या ईतिहासातील क्षणांनी संपन्न आहे.अकबराची पायथ्याची छावणी असो की अष्टप्रधान मंडळींच्या शंभूराजांच्या विरोधातील कारस्थाने असोत, गैरसमजातून त्यापैकी काहींचा देहदंड असो किंवा भोरच्या पंतसचिवांची संपन्न राजधानी म्हणून अनुभवलेले क्षण असो, राजांनी राजधानी म्हणून केलेली पाहणी असो की हिरोजी ईंदुलकरांनी केलेले महाद्वाराचे बांधकाम असो, भृगू ञूषींची समाधी असो अशा अनेक परिचित अपरिचित घटनांची साक्षीदार असलेली ही भूमी बारकाव्यासह भटकण्यासाठी माझ्या भटकंतीच्या कार्यक्रमात नोंदवून सुधागड निरोप घेण्याची वेळ झाली.




कालचा दिवस ईतर आम्ही आजमावलेल्या घाटवाटांच्या तुलनेत साधारण भासणारया पण ऊन्हामुळे आणि दमटपणामुळे कस बघणारया भटकंतीमुळे आज सर्व जण ऊन टाळण्याच्या मनस्थितीत असल्याने सुधागड गडफेरी रद्द करून लवकरात लवकर सवाष्णच्या मार्गाला लागण्याचे निश्चित करण्यात आले.सुधागडचा एकंदर ईतिहास बघता ईथे आमची पावले पुन्हा वळणारच यात शंका नाही.सर्व जण 7 वाजता तयार होऊन पुन्हा महादरवाजाची वाट जवळ केली.तत्पूर्वी सुधागडहून चौफेर दिसणारा नजारा मनात साठवला.एकीकडे घाटाच्या बाजूने तेलबैला नंतर घनगड ,केवणीचे पठार ,त्यामागे अंधारबन संपल्याठिकाणच्या नागशेत घाटवाटेपर्यंत पोहचलेली अजस्र डोंगररांग, दुसरीकडे खाली कोकण सरसगड पाली परिसर असा 360 डिग्रीचा भारीच असा पॅनेरमा!


ऊगवतीच्या प्रकाशात तेलबैला घनगड अतिशय सुंदर भासत होते.पण तोच सूर्यनारायण वर आल्यावर कसे रौद्र रूप धारण करतो याची चुणूक असल्याने लवकर पावले ऊचलली जावू लागली आणि थेट महादरवाजा ऊतरून खाली तानाजी टाक्यापाशी पावल पाणी भरण्यासाठी विसावली.पाण्याच्या बाटल्या भरताना थोडा पोटोबा ऊरकला पुन्हा पोटभर पाणी पिऊन एका बाटलीत जलजीरा लिंबू साखर यांचे मिश्रण टाकून झकास सरबत करून बाटली भरून घेतली.







परत मारूती मंदीरापासून आल्या वाटेन खाली ओढ्याच्या ठिकाणापर्यंत कालचीच वाट होती.वाटेत सकाळच्या आल्हाददायक वातावरणात संचार करणारे अनेक पक्षी दिसले.त्यात गोल्डन ओरीयल ( हळद्या), एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर ( स्वर्गीय नर्तक), कॉपरस्मिथ बार्बेट ( तांबट) असे वैविध्य होते.अनिकेतने त्यातले काही त्याच्या कॅमेरात टिपले. मग खालच्या ओढ्यात सर्व येईपर्यंत विसावलो.



आमचे वाटाडे काका आणि अर्जुन, मुकुंद थोडे पुढे गेले.मग सर्व आल्यावर पुन्हा ओढा ओलांडून ऊजव्या हाताच्या टेकडीला भिडलो.काल आलेल्या मार्गाच्या ऊजवीकडे सवाष्णला भिडणारी वाट चालू होते.





त्यात ओरिएंटेशच्या अंदाजाने काही भिडू जल्लोषात खाली जंगलात घुसले.आम्ही डोंगरधारेने आणि ते खालून मग आवाज देत देत थोडे थांबून वरच्या एका पठारावर ते येऊन मिळाले.




वाटेत सावरीचा कापूस पसरलेला.मग बालपणीची आठवण झाली आम्ही घरासमोरच्या सावरीच्या शेंगाना दगड मारून हवेत ऊडणारा कापूस पळत गोळा करायचो.ईश्वरकाकांना आणि मला नमुना म्हणून थोडा कापूस गोळा केला आणि पुढे निघालो.वर पठारावर ईश्वरकाकांची आणि माझी वाट पहात असणारे सर्व मग झाडाखाली विसावलो.




आता पुढे जंगलात घुसणारा रस्ता बघून थोडे जवळ आले असे वाटले.पण आता तर खरी ऊभी चढण सुरू झाली.पण जंगल असल्याने ऊन कमी लागत होते.मग आणखी एक टप्पा पार केला तर पुढे अजून एक मोठा टप्पा दिसला.अशा खड्या चढाईचा एक फायदा असा असतो की प्रत्येक पाऊल तुम्हाला एक फूट तरी वर घेऊन जाते त्यामुळे थोडा दम लावला तर कमी वेळात आपण वर सरकतो.अर्थात ऊन कमी असले तर जास्त दम नाही लागत पण कोकणाकडून वर चढताना ऊंचीमुळे वातावरणात होणारा बदल जाणवणारा असतो.



शेवटच्या कातळटप्प्याला लागल्यानंतर सुधागड आणि मागे केवणीचे पठार सुंदर दिसत होते.



खाली जंगलही घनगर्द भासत होते.



मग वर एका झाडाखाली विसावलो.पाणी प्यालो.कालपासून आम्हाला साथ करणार्या खंड्यालाही आमच्या ऩाशिककर साथीदाराने पानाच्या द्रोणातून पाणी पाजले.हा खंड्या बिस्कीटांकडे ढूंकूनही न पाहणारा पण सकाळी मुकुंदने दिलेल्या पोळ्या त्याने खाल्ल्या आणि आता पाणी प्याला.



हळूहळू सर्व भिडू कातळटप्पा पार करत पठाराला आले.





आमचीही बरयापैकी विश्रांती झाली होती.मग सॅकऊचलून वरच्या पठारावरची तेलबैलाच्या मागची वाट चालायला सुरूवात केली.मध्येच फोटोग्राफी चालू होती.तेलबैलाच्या कातळभिंतींचे अजस्र रूप डोळ्यात साठवत मार्गाक्रमण चालू होते.



कॅमेराने बॅटरी एक्झॉस्टचा मेसेज दिला आणि वरच्या तळपत्या सूर्यनारायणाने माझी बॅटरी एक्झॉस्ट करण्याच्या आत तेलबैला गाठण्यासाठी कॅमेरा सॅकमध्ये कोंबला आणि सुटलो ते थेट रोकडेंच्या अंगणातच थांबलो.तिथे फ्रेश होऊन कपडे बदलेपर्यंत अर्जुन आणि मुकुंद पण पोहचले.मग आणखीकाही भिडू पोहचल्यावर जेवण तयार असल्यानेआणि एकदम 16 जणांना वाढावे लागू नये म्हणून भोजन ऊरकले.मग आरामात ताणून दिली.एवढ्या श्रमानंतर पण संदीप काकड आणि एक भिडू तेलबैला मंदीरात जाऊन आले.मग सगळ्यांची जेवण आटोपेपर्यंत मस्क पातेलेभर जलजीरा, लिंबू, साखर यांचे सरबत बनवले व सर्वांना मनसोक्त पाजले.


मग आवराआवरी करून नाशिककरांचा आणि ईश्वरकाकांचा निरोप घेऊन समाधानाने गाडी लोणावळामार्गे पुण्याकडे दामटली.

मागे वळून बघताना माझ्या घाटवाटांच्या अविस्मरणीय प्रवासात अजून दोन कसदार घाटवाटा जोडल्याचे समाधान होते.असे धाडस  ऊन्हाळ्यात करणारे जे काही मोजके आहेत  त्यांना माझ्या समाधानाचा अर्थ लवकर समजेल.

ट्रेक दिनांक :   फेब्रुवारी 2016

साथीदार : संजय अमृतकर, डॉ.अतुल साठ्ये, संदीप काकड आणि जल्लोष ग्रुप नाशिक
ईश्वरकाका गायकवाड, प्रशांत कोठावदे, मल्लिकार्जन श्रीशेट्टी, अनिकेत नेमाडे, मुकुंद पाटे आणि मी पुणे.

श्रेणी : मध्यम, ऊन्हाळ्यात कठीण.

पाणी : सुधागड तानाजी टाक्यानंतर थेट तेलबैला गाव.मध्ये पाणी नाही.सवाष्ण घाटात पाणी नाही.

धन्यवाद मित्रांनो भेटू लवकर नवीन आडवाटेसह!