Thursday 14 January 2016

सह्य संक्रमण

ट्रेकींगची आवड का निर्माण झाली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न केला असता मन मागोवा घेत  लहानपणीच्या रम्य आठवणींपर्यंत जाऊन पोहचले.माझे बालपण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी या निसर्गसुंदर आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्व असणारया गावात गेले.चहूकडून डोंगर, माळरान, पावसाळा सोडून संथपणे वाहणारी तानसा नदी असे निसर्गाने मुक्तहस्ताने ऊधळलेले सौंदर्य.वसईच्या लढाईत यश मिऴाले तर किल्ल्यासारखे तुझे मंदीर बांधीन अशा चिमाजी आप्पा पेशव्यांच्या साकड्याला पावलेली वज्रेश्वरी आई आणि तिचे किल्ल्यासारखे ऐटदार मंदीर.सर्वस्वाचा त्याग करून गोरगरिब आदिवासी यांच्यावर माया करणारया योगी महाराज स्वामी नित्यानंद यांच्या वास्तव्याने आणि समाधीने पुनीत झालेली ही भूमी.जगप्रसिद्ध स्वामी मुक्तानंद यांचा अवाढव्य आणि अतिभव्य पसारा असणारा आश्रम म्हणजेच “गुरूदेव सिद्धपीठ“ ही याच भूमीत.निसर्गाची किमया असणारे गरम पाण्याचे ज्वालामुखीतून ऊगम पावलेले झरे! असा हा सर्व परिसर बालपणावर काही घराच्या बाहेरचे निसर्गप्रेमाचे आणि अध्यात्माचे संस्कार करणारा.

अशा या छोट्या गावात शाळा आणि शिक्षकही विद्यार्थी आजही आपुलकीने आणि आदराने नाव घेतील असे.खर सांगतो वज्रेश्वरी सोडून केंब्रिज ऑफ ईस्ट असा  लौकीक असणारया पुण्यात त्याकाळात पुण्याच्या पारंपरिक वातावरणाला छेद देणारे वातावरण असणारया आणि आता सर्वत्र आदराने स्विकारलेल्या सिम्बायोसिस या महाविद्यालयात प्रवेश झाला पण कुठेही ग्रामीण भागातून आल्यानंतर होणारी घालमेल झाली नाही याचे श्रेय आमच्या शाळेला आणि शिक्षकांना निश्चित जाते.

आमचे घर म्हणजे चाळ ही शाळेच्या समोर ग्राऊंडलगतच.एका बाजूला मोठा डोंगर, मागे विस्तीर्ण जंगल,समोर खूप मोठा माळ, नंतर भातशेती, पलिकडे तानसा नदी आणि त्यामागे मंदाग्नी पर्वत.घरातून पुढे वज्रेश्वरी मंदीराचा कळस आणि त्यामागील गोधडेबाबांची टेकडी व त्यावरील मंदीर.बाहेर माळावर खेळताना पूर्वेकडे माहुलीचे सुळके स्वच्छ वातावरणात सुस्पष्ट दिसणारे.आणि घराच्या मागच्या जंगलानंतर गुमतारा किल्ल्याचे शिखर दिसे.

शाळा सुटली की मनसोक्त क्रिकेट खेळण्यासाठी गावातील तमाम मुले घराशेजारील माळावर हजर असत.दप्तर टाकायचे आणि आईचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधी ग्राऊंडवर धुम ठोकायची.मित्रमंडळीतील काही मित्र आदिवासी समाजातील पण ,मग त्यांच्याबरोबर रानोमाळ भटकंती करत रानमेवा चाखायला, मासे खेकडे पकडायला जंगलात कधीमधी जाणे व्हायचे.घराशेजारचा डोंगर बरयाचवेळा धावत पळत चढायचो आणि दिवेलागणीला परत यायचो.

क्रिकेटच्या मॅचेस दर रविवारी शेजारच्या गावातील मुलांबरोबर मग सायकली दामटत अनवानी पायाने भर ऊन्हात तहानभूक विसरून खेळ आणि जवळच्या विहीरींवर पाणी पिऊन तहान भागवायची बोरे चिंचा कैरया खायच्या.

अशा वातावरणात बालपण गेले असल्याने मनावर निसर्ग नकळत कोरला गेला.वडील शिक्षक असल्याने वाचनही भरपूर टारझनपासून नाथमाधव, शांतारामा, करहेचे पाणी असे वैविध्यपूर्ण वाचन.त्यात संघाची शाखा आणि शिबीरे यांनी आणखी राष्ट्रभक्ती जागवली.

पुण्यात आल्यावर रूळण्यात काही दिवस गेले पण हे संस्कार असल्याने मन कायम निसर्गाच्या ओढीने बाहेर.अशात कॉलेजच्या अनेक मित्रांपैकी एकाने राजगड ते तोरणा हा ट्रेक पावसाळ्यात ठरवला त्यासाठी प्रसिद्ध डोंगरयात्री आनंद पाळंदेंच्या एस एन डी टी समोरील कर्वे रोडच्या निवासस्थानी ह्या ट्रेकसंबंधी विचारणा  करण्यासाठी गेलो.जेव्हा मी हा ट्रेक केला आणि राजगडाच्या पद्मावती माचीवर पालीच्या बाजूने भर पावसात पांढरे शुभ्र ढग खालून वर येताना पहाटे पहाटे एकट्याने अनुभवले तिथेच सह्याद्रीची आणि माझी गट्टी जमली.

मी स्वत:ला भाग्यवान समजतो की ह्या सह्याद्रीच्या स्पर्शाने मला पावन केले आणि माझी भटकंती किंवा ट्रेकिंग चालू झाली.मनाला आणि शरीराला ताजेतवाना ठेवणारा यापेक्षा आणखी दुसरा छंद नाही.

भटकंती करताना येणारया अनुभवाची नोंद मन:पटलावर कोरली जातेय.ते अनुभव तुमच्याबरोबर वाटण्याचे काम चालू केले होते पण मध्यंतरी थोडा खंड पडला.हरकत नाही आता सातत्याने लिखाण होत रहावे हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना.

आपणास मकर संक्रमणाच्या खूप शुभेच्छा!