Thursday 1 June 2017

जावळीचे रत्न - कोळेश्वर!




           मे महिन्याच्या मध्यावर पाण्याचे बहुसंख्य स्रोत आटलेले असताना आणि तळपत्या आग ओकणारया सूर्याच्या धास्तीने बहुसंख्य सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्यासारख्या भटक्यांना सवंगडी मिळणे जिथे दुरापस्त तिथे एक दोन नव्हे १४ हौशी लोक जमा होणे यासारखे आश्चर्य नाही.पण सातत्याने नवीन वाटा पालथ्या घालताना असे साथीदार आता विश्वासाने जमा होऊ लागलेत.अनुभवी काही नवीन पण ऊत्साही सह्यमित्रांना घेऊन यावेळी भटकंती ठरली ती वाईपासून ३८ कि मी आत असणारया जोर या गावाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या ऊत्तरेला पसरलेले कोळेश्वर पठार आणि दुसरया दिवशी बहिरीच्या घुमटीवरून आँर्थर सीट ( मढीमहल) चढून क्षेत्र महाबळेश्वरच्या मागून जोरला ऊतरणारया गणेश घाटातून जोर परत असा वर्तुळाकार ( loop ) ट्रेल! विनीत दातेंनी नियोजनाची पूर्ण जबाबदारी ऊचलली, वाटाड्या ठरवून जेवणाची सोय करण्यापर्यंत!


शुक्रवारी रात्री १०.३० ला पुण्यातून निघून वाई नंतर बलकवडी धरणाच्या कडेने धोम धरणाच्या मागे असणाऱ्या जोरला रस्ता शोधत पोहचलो तेव्हा २.३० वाजलेले.महादेव मामा हे स्थानिक वाटाडे एवढ्या रात्री जोरच्या सीमेवर आमचे स्वागत करायला आले आणि त्यांनी कुंभळजाईच्या कौलारू मंदिरात झोपण्याची सोय लावून दिली. काही क्षणातच ऊद्याच्या आव्हानाचा विचार करत सर्वांच्या स्वारया गुडूप झाल्या.



पहाटे ५.४५ ला सर्वांना जागे करुन सकाळची आन्हिके ऊरकत मस्त गरमागरम पोहे आणि चहा घेऊन महादेव मामा आणि बाळू मामा ह्या वाटाड्यांच्या द्वयी समवेत १४ भिडू ऊंच आणि लांबलचक पसरलेल्या कोळेश्वर च्या पठारास भिडले.वाट तशी वनराजीने नटलेली पण छातीवर चढणारी. 




हळूहळू ऊगवतीच्या प्रकाशासह पहिल्या दोन टप्प्यात वर जाताना चांगली दमछाक होत होती.वाट तशी सोपी , कालच पडून गेलेल्या वळवाच्या पावसान रान भिजल होत त्यामुळे घसारा कमी जाणवणारा! 



साधारण तासभर चढाईनंतर वर पठारावरच्या घनगर्द जंगलात पोहचलो.हवा आल्हाददायक होती.कोळेश्वरची ऊंची जवळपास रायरेश्वर आणि महाबळेश्वर एवढीच!



आता आम्ही ठरवलेला बेत सुरुवातीला कोळेश्वराचे दर्शन घेऊन मग पश्चिम टोक गाठायचे आणि परत येताना पूर्व टोक पाहून खाली ऊतरायचे.पण बाळूमामा आमचा बेत शांतपणे ऐकून घेत म्हटले की आता आपण पूर्व टोकाच्या जवळ आहोत तर दर्शन घेऊन ते पाहून घ्या नंतर पश्चिम टोकाकडे जाऊ आणि वाटेत पाण्याच्या ठिकाणी जेवण ऊरकू.स्थानिक वाटाड्या ह्या दरयाखोरयात वाढलेला त्याच्या अंगाखांद्यावर खेळलेला त्यामुळे काही अपवाद वगळता त्याचा शब्द शक्यतो मोडू नये असा अनुभव गाठीशी असल्याने त्यांचा प्रस्ताव आनंदाने स्विकारला.येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते आपली शारीरिक क्षमता आणि अनुभव कितीही असूदे  पण  कायम आपल्याबरोबरचा सर्वात कमी क्षमतेच्या माणसाला बरोबर घेऊन सुरक्षित भटकंती करताना स्थानिक माणसाचे म्हणणे नक्की ऐकायला हवे.असो.


पूर्व क्षितीजावर केंजळगड आणि दूरवर कमळगड ऊजवीकडे म्हणजे दक्षिणेकडे पाचगणीपासून आँर्थरसीटपर्यंत पसरलेले महाबळेश्वर चे पठार आणि ऊत्तरेला अफाट रायरेश्वर! अशा संगतीने घनगर्द जंगलातून कोळेश्वर चे मंदीर हसतखेळत अर्ध्या तासात गाठले.



तिथे कोळेश्वर चे दर्शन घेत थोडा अल्पोपहार ऊरकला.तेवढ्यात जांभळाच्या झाडावर नजर गेली.आकाराने छोटी पण सुमधूर जांभळांनी सर्वांना बालपणाचे दिवस आठवले आणि जीभ ओठ रंगेपर्यंत ह्या रानमेव्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला.तेथून अगदी थोड्या म्हणजे २० मिनीटात आम्ही पूर्वेच्या टोकाजवळ असणाऱ्या आणि कोळेश्वर वर असणाऱ्या एकमेव मानवी वस्तीजवळ (तीही दोन घरांची) पोहचलो.



थोड पुढ जाताच धोमचा जलाशय मागे कमळगड ,एल्फिन्स्टन पाँईंट, रायरेश्वरची जांभळी कडची बाजू असा नयनरम्य नजारा पटलावर ऊभा ठाकला.




किती पहावे आणि किती छायाचित्र बद्ध करावे? तिथूनच खाली जांभळीला कोळेश्वराशी जोडणारे कोळीयाचे दार ही सुंदर वाट ऊतरते.


बराच वेळ झाला मग ऊरलेल्या ट्रेकचा अंदाज बघून जड पावलाने पश्चिम टोकाकडे निघालो. धनगरांच्या घराजवळ एक पाण्याचा झरा असून त्याला मे महिन्यात ही पाणी असते.


आता वाट रायरेश्वर च्या बाजूने कधी मोकळी तर कधी जंगलान वेढलेली.साधारण १ च्या सुमारास पाण्याचा दुसरा झरा लागला आणि आम्ही वनभोजनास विसावलो.


एकमेकांना घरचा डबा शेअर करत निवांत भोजन ऊरकले.जरा पोट जास्तच भरले म्हणून सगळे तिथेच जागा पाहून वामकुक्षीसाठी पसरले.( एवढे श्रम करूनही ट्रेक करताना वजन वाढतेय त्याला बहुतेक हेही कारण असावे).


आकाशात ढग जमा व्हायला लागले आणि मग आवरते घेतले.आता २.३० वाजलेले.सगळे बरयापैकी वेगाने पश्चिमेकडे सुटले.



तरीही वाटेत संधी मिळताच शिंदीच्या मधुर रानमेव्याचा मोह काही सुटला नाही.


 सर्व भिडू दमदार असल्याने आणि सर्व प्रकारची तयारी असल्याने अशा विरंगुळ्याची फारशी चिंता नव्हती.थोड पुढ गेल्यावर बाळूमामांनी आमचे लक्ष डावीकडे टेकडीकडे वेधले.ब्रिटीश काळापर्यंत येथे लोखंडाची खाण होती आणि धावड लोकांची वस्ती होती ही महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.परत जाताना वस्तीचे अवशेष आणि खाणीचे अवशेषही निरखले.पूर्वी धातू मिळवण्यासाठी असणाऱ्या ह्या खाणी दुर्मिळ अवशेषांसारख्या आणि आपल्या पूर्वजांच्या पुढारलेल्या बुद्धिमत्तेची साक्ष देणारया !


४.३० च्या आसपास पठाराचे पश्चिम टोक गाठले आणि समोरचे रौद्र तितकेच मंत्रमुग्ध करणारे सह्याद्रीचे रूप पाहून विस्मयचकित होत सारे स्तब्ध झाले.कुठल्याही शब्दात किंवा छायाचित्रात ते ऊतरवण्याची क्षमता माणसात नाही.एवढा ऊपद्व्याप करून ईथपर्यंत पोहचल्याचे सार्थक झाले.समोर रायरेश्वर आणि त्याचे नाखिंद टोक, कामथे घाट, जननीचा डोंगर किंवा मोहनगड, कांगोरीगड ऊर्फ मंगळगड, महादेव मुर्हा, चंद्रगड आणि ढवळे खोरे क्षितीजापर्यंत पसरलेल्या अजस्र सह्याद्रीसमोर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे असे हे सर्व काही! कितीतरी क्षण स्वत:ला विसरून आम्ही त्या नजारयाला आत ह्रदयाच्या कुपीत जतन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.पण पावसाची शक्यता असल्याने महादेव मामांनी भानावर आणले आणि अनिच्छेने परत निघालो.




आता जोरच्या बाजूला तासभर चालत एका नवीन पण थेट कुंभळजाई मंदिराच्या शेजारी ऊतरणारया अवघड घसारयाच्या वाटेवर आलो.अतिशय काळजीपूर्वक ऊतरत एकदाचे कठीण आणि विनाआधार दरीला खेटून ऊतरणारया टप्प्याला ओलांडत खालच्या दांडाला लागलो.



वाईच्या बाजूने पाऊस कोळेश्वर पठारावर पोहचत होता आणि आम्ही त्याला हुलकावणी देत त्याने गाठायच्या आत मंदिर गाठले.

कोळेश्वरची आजची सफर माझ्या सर्वोत्तम भटकंत्यापैकी एक म्हणून कायम लक्षात राहील.जोरपासूनच्या दोन वाटा, पुर्व ते पश्चिम पूर्ण पठाराची चाल, वरचे घनगर्द कमी हस्तक्षेप असणार रान, मे महिन्यात पाझरणारे झरे, पूर्व आणि पश्चिम टोकावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा हे सर्व एका दिवसात खात्यावर जमा झाले.या आनंदात मस्त भोजन करुन आणि ऊद्याच्या बहिरी, आँर्थर, गणेश घाट या अजून एका जबरदस्त पायपीटीची स्वप्ने बघत झोपी गेलो!

धन्यवाद!

साथीदार : 



सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे .





9 comments:

  1. मस्त भटकंती व लेख. फोटोही मस्त आहेत!

    ReplyDelete
  2. मस्त भटकंती व लेख. फोटोही मस्त आहेत!

    ReplyDelete
  3. तुषार,
    सुरेख झालाय ब्लॉग.. नेहेमीप्रमाणे! 👏🏻👍🏻😊
    दमदार टीम, फोटू छान..
    कोळेश्वर पठाराचे पूर्व टोक - कमळगडाला म्हणता येईल, असे वाटते..

    ReplyDelete
  4. अप्रतिम, सुंदर आणि मुर्तीमंत सह्याद्रीचा आरसा उभा केला आहे...अभिनंदन

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर लेख । वाचुनच सह्याद्रिस नमन ।

    ReplyDelete
  6. Farach bhari suruvat keli ahat.

    ReplyDelete