Thursday 8 June 2017

फडताळ नाळ - दुर्गम आणि दुर्लभ घाटवाट






थकल्या भागल्या मनाने आणि शरीराने दापोली गाठले तेव्हा दिवेलागणीची वेळ झालेली.एका टुमदार घराच्या ओसरीत शरिरावर सकाळी ७.३० पासून लादलेले सँक, पाऊच, कँमेरा ऊतरवले आणि न मागताच थंडगार पाण्याची बाटली मिळाली आणि चहासुद्धा! २/४ मिनीटात श्वास नैसर्गिक पातळीवर पोहचल्यावर मग बाहेर ठेवलेल्या ड्रममधले पाणी डोक्यावर थोडे ओतले आणि मग जरा तरतरी आली.

काल रात्री २ च्या सुमारास सिंगापूरला (विदाऊट पासपोर्ट) झालेले आगमन आणि पोटे मामांच्या ओसरीत लगेच निद्रीस्त होत बरोबर सकाळी ६ ला आलेली जाग! मामा पहाटेच बाहेर आले आणि आज तुम्ही आमच्याबरोबर दापोलीला यायचे आणि तेही फडताळ नाळेने अशी गळ घातली.७० वर्ष वय आणि २० एक वर्षापूर्वी ऊतरलेली नाळ करायला ते सुरुवातीला फार खुष नव्हते.लय लांब हाये, वाट मोडलीय, वय झालय अस नेहमीच्या कारणाने आम्ही बधणार नाही अस लक्षात येताच आम्हाला चहा सांगून ते आत आवरायला गेले.
ईतर गाववाले विचारायला लागले तिकड कशापायी? त्यांना शांतपणे सांगितले अहो राजगड आणि रायगड ह्यांना जोडणारया महाराजांच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या आणि कधीकाळी त्यांचे पाय लागलेल्या या वाटा कशा आहेत ते तर बघाव यासाठी हा सर्व ऊपद्व्याप!



सर्व तयार झाल्यानंतर गाडी कच्च्या रस्त्यावरुन सांभाळून चालवत एकलगाव गाठले.शाळेसमोर गाडी लावून फडताळच्या दुर्गमतेबद्दल आणि काठीण्याबद्दल थोडीशी सर्व भिडूंना कल्पना देऊन सकाळी ८ च्या सुमारास दुर्गाच्या डोंगराकडे कुच केले.



पावसाळ्या आधीचे ढग जमायला सुरुवात झालेली आणि ऊनसावलीच्या खेळात ही चाल लांबलचक असली तरी सुखकारक भासणारी. 



अगदी तासाभरात जननीचे ठाणे गाठले.वाटेत समोर बा रायगड , रौद्रभीषण लिंगाणा आणि घाटावरून कोकणात ऊतरणारया नाळा यांची सोबत होती.



जननी देवीला मनोमन सुरक्षित ट्रेक पार पडण्याची प्रार्थना केली.



खुरट्या झुडूपातून वाट धुंडाळत प्रथम फडताळ च्या वरच्या पठारावर आलो.



तेथून टोकाकडे जाऊन परत रायगड, दापोली, लिंगाणा आणि त्याच्या अंगाखांद्यावरून कोकणात सांडलेल्या विविध नाळा, घळा छायाचित्र बद्ध केल्या.





थोडक्यात आवरून नाष्टा थोडी सावली बघून करावा असे ठरले आणि ऊजवीकडे जात वर चढलो.पहिलाच एक अरूंद घसारा आणि तोही अगदी विनाआधार. 



पण मनाचा हिय्या करून वाटाड्या मागून शिरलो.सावकाश दोर न लावता हा घसारा सर्वांनी पार केला आणि मग नाळेच्या मुखात पोहचलो.




८० अंशाच्या कोनात धडकी भरवणारी वाट फडताळ बद्दल जे ऐकले होते त्याच्यापेक्षाही हे कठीण प्रकरण आहे त्याची साक्ष पटवणारी.तेथेच थोडी न्याहारी ऊरकली.




तोपर्यंत मामा ऊजवीकडे अजून खुल्या घसारयाच्या अवलोकनास गेले.मग आमचे आटोपताच तिकडे येण्यासाठी त्यांनी आवाज दिला.



आता खरी कसरत चालू झाली.विरागने आणि सुनीलने स्वत: अँकर होत डावीकडच्या भयानक दरीपासून बचाव करण्यासाठी दोर लावला.अशा वेळी दोर हा फक्त एक मानसिक आधार असतो आणि ही गोष्ट तो वापरणारयाने निश्चित लक्षात ठेवावी.जोरात हिसका बसला तर अँकर करणारयाला घेऊन खाली पडायला वेळ नाही लागणार.असो.

आता ते वळण पार करताच खाली जवळ जवळ सरळ घसारयाच्या वाटेने पार्श्वभागाचा आधार घेत खोल ऊतरायला सुरूवात केली.हा चांगला ६०० /७०० फुटाचा पँच फक्त बरयाच कालावधीत कोणी वापर केला नसल्याने दोर न लावता ऊतरता आला नाही तर गवत सरकून माती मोकळी झाली तर दोर अवश्य लावावा असा.




हा भाग ऊतरताच डावीकडे एक कातळाची भिंत ऊतरावी लागली.फडताळला श्वास न रोखता १ फूटही ऊतरणे अवघड!कसाबसा हा पँचही ऊतरलो.



ईथून पुन्हा नाळेत प्रवेश झाला.मग थोडा सह्यकर ऊतार म्हणजे आधार असणारा!






 काही अंतर पार केले आणि मग बघतो तर पोटे मामा दिसेनात. थोड पुढे झालो तर १००/१५० फूटाचा धबधबा! त्याच्या डाव्या बाजूला खाली २००/२५० फुटावर मामा एक टेकाड बघून वर बसलेले.



त्यांना विचारले मामा कुठून ऊतरायचे ? हे काय या अस तिरप तिरप! ८०/८५ अंशाच्या कोनात कुठलाही होल्ड नसणारा आणि ऊजवी कडे घसरलो तर सरळ ३०० फूट दगडांच्या नाळीत! घाम फुटला होताच, आता ठोके बंद पडतात अस वाटायला लागल.




फक्त म्हातारा समोर ऊतरलाय म्हणजे ऊतरता येईल या विश्वासाने एक एक पाऊल सावकाश ऊतरत डावीकडे सरकलो.आता खाली ऊलट होऊन ऊतराव तर सँकच्या वजनाने थोडा झटका बसला तरी विषय संपला आणि सरळ ऊतराव तर पुन्हा मागून सँकचा झटका बसला तरी सरळ खाली.शेवटी सावकाश खाली बसलो.मागे नामदेव दादा होते.बसल्यावर पाय खाली पोहचेनात.२ फूट खाली घसार्याचा ऊतार मग दादांना म्हटल तुम्ही माझी सँक मागून पकडून ठेवा म्हणजे मी घसरणार नाही.कसेबसे हळूहळू पाय टेकले आणि स्थिर झालो.मग पुन्हा १५ /२० फूटावरच्या कातळ ऊतारापर्यंत बसून घसरत सरकलो.मग कठीण दगड आल्यावर जरा हायसे वाटले.गवत माती आणि बारीक खड्यांचा घसारा वरुन एक्सपोजर असे समीकरण मला नेहमी त्रास देणारे वाटते त्यात केचूआची अशा ठिकाणी सुप्रसिद्ध ग्रिफ!(बोट दाबले जाणार नाहीत आणि पायही घसरणार नाहीत अस बनवा रे कोणीतरी एकाच वेळी!)मामांच्या जवळ पोहचून थांबलो पण तेथे ऊभ राहण पण कठीण! सँक ऊतरवली कोपरा बघून ऊभी केली कशीबशी! 



मागच्या लोकांच्या चेहरयावर तेच प्रश्नचिन्ह! मग सुनीलला दोर लावण्याची विनंती केली .त्याने अवघड जागी स्वतः अँकर होत दोर लावला.वरून दगड सरकून सरळ अंगावर येत होते पण सरकायला पण जागा नाही. कसे बसे सर्व खाली आले.अपघात होण्याची दाट शक्यता असणारी ही जागा! पण यात जवळजवळ २ तास गेले.परत ट्रँव्हर्स घेऊन नाळेत जाण्याचा मार्गही भयंकर! कड्याच्या दगडांचा आधार घेत हळूहळू घसरणारी पावल सांभाळत सर्व नाळेत पोहचले.




मग खाली काही ऊतार ऊतरल्यावर शेवटचा कातळाचा धबधबा तेथेही सांभाळून ऊतरलो.




परत सर्वांच्या सँक दोराने ऊतरवत बाकी लोकही आले.तेथे जेवण ऊरकले.एकंदर दमछाकीने जेवणही जाईना.त्यात पुढे आलेले भिडू एवढा वेळ लागला म्हणून आवाज देऊन थकल्यावर एक झोप काढूनही वैतागलेले.पण ट्रेक म्हटला की सर्व जण एकत्र आणि सुरक्षित येण महत्वाच.कोणी घसारयाच्या वाटेला, कोणी ऊंचीला, कोणी तंगडतोडीला घाबरत पण एकमेकांना आधार देत ट्रेक करण हे तुम्हाला एक चांगला ट्रेकर बनवत नाही का? 

 


आता चांगले ३.३० वाजलेले.४ लि पाण्यापैकी २ ते २.३० ली.पाणी संपलेले.त्यामुळे अजून वेळ दवडणे म्हणजे संकटाला निमंत्रण.त्यात खाली वापर नसल्याने कुठलीही पाऊलवाट नाही ना पाण्याचा कुठला झरा.मग रेंगाळलेल्या साथीदारांना थोडी परिस्थितीची जाणीव करुन देत पहिले लक्ष्य म्हणजे जंगलातून बाहेर पडणे हे पटवून दिले.नाहीतर तुमचे पाणी संपले तर ते या ठिकाणी आणणे शक्य नाही याची ही जाणीव करुन दिली.मग मात्र चालू झाली तंगडतोड.आपली ईच्छाशक्ती जागवत सर्व एकसाथ चालू लागलो.





पूर्ण डोंगराला वळसा घालून वरच्या धारेने पणदेरेची वाट सोडून दापोलीकडे निघालो.



शेवटी दापोली नजरेस पडल्यावर थोडे विसावलो.



भयंकर जळालेल्या आणि ८० अंशाच्या घसरड्या ऊतारावरून आग्या नाळीकडे जाणाऱ्या ओढ्यात ऊतरलो तेव्हा सूर्य मावळला होता.



आणखी काही मिनीटात दापोलीत पोहचलो.मंदिरासमोरच्या घरात पसारा टाकून विहीरीवर स्नान केले.पोटभर जेवण केले आणि झोपलो.फणशी चा आग्रह सोडून तुलनेने सोप्या अशा सिंगापूर नाळीतून सकाळी सिंगापूरला वर येत परत विहीरीवर स्नान करत एकलगाव गाठले.गाड्यात सर्व सामावल्यावर वेल्ह्यात हाँटेल स्वप्नीलमध्ये जेवणावर तुटून पडलो आणि नसरापूर मार्गे पुण्यात ६ वाजता परतलो.



आजपर्यंत केलेल्या सर्व घाटवाटांमधील सर्वात अवघड श्रेणीतील एक घाटवाट हि फडताळची ओळख कायम मनावर अधिराज्य गाजवेल.ट्रेक करत असताना अशा वाटा करण्याचे स्वप्न प्रत्येकाने बघावे पण ते प्रत्यक्षात आणताना आपली मानसिक, शारीरिक क्षमता आपण ओलांडत नाही ना ह्याचाही विचार करावा.सक्षम साथीदार, टेक्नीकल सपोर्ट, पाणी पुरवून जास्तीत जास्त चाल करण्याची क्षमता, योग्य माहिती, स्थानिक वाटाड्या आणि नशीबावरचा भरोसाही यासाठी आवश्यक आहे.तर मित्रांनो फडताळचे स्वप्न जरूर बघा आणि ते प्रत्यक्षात ऊतरवताना मला आलेल्या अनुभवाचीही ठळक जाणीव ठेवा हि विनंती.काही देण्यायोग्य माहिती सक्षम लोकांना देण्यास मला आनंद वाटेल.धन्यवाद!

भेटू परत अशाच अनवट भटकंतीसह!

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे.






दिनांक : २७/२८ मे

घाटवाट : फडताळ
माथ्याचे गाव : एकलगाव
कोकणातले गाव : पणदेरे आणि दापोली.
योग्य वेळ : नोव्हेंबर, डिसेंबर
श्रेणी : अवघड ( दुर्गम, पाण्याचा अभाव, ठिसूळ दगड, भयंकर ऊतार आणि त्याचा खुलेपणा, जंगलात नसलेली पाऊलवाट)

साथीदार : मिलिंद कुलकर्णी, एन डी गवारे, सुजाता रायगडे, देवा घाणेकर, सुनील पाटील, विराग रोकडे, क्रांतीवीर, प्रशांत कोठावदे आणि तुषार कोठावदे.





7 comments:

  1. तुषार भाऊ एकदम मस्त ब्लॉग! या घाटवाटेवर असणारे धोके तपशीलवार लिहले त्याबद्दल आभार.

    ReplyDelete
  2. छान ब्लाॅग तुषार.

    ReplyDelete
  3. तुषार, अगदी धडाकेबाज बरं!

    ReplyDelete
  4. तुषारदादा,
    खूप मस्त आणि तपशीलवार लिखाण ....

    ReplyDelete
  5. फडताळ नाळ काय प्रकरण आहे ? हे पाहण्यास उद्युक्त करणारा अप्रतिम लेख

    ReplyDelete