Wednesday 9 March 2016

"तेलबैला - वाघजाई घाट - सुधागड - सवाष्ण घाट- तेलबैला" उन्हाळ्यातील कसदार भटकंती : भाग 1









मागच्या वेळी कधीतरी घनगड आणी तेलबैला ट्रेक करताना रोकडे यांच्या घरी पडवीत रात्री पथारी पसरून विसावताना सहज प्रशांतशी चर्चा करताना सुधागाडचा विषय निघाला होता.त्याने आधी एकदा सुधागड केला असल्याने परत नुसता सुधागड करण्यापेक्षा आपण घाट वाटेने सुधागड करूयात अशी चर्चा झाली होती.पण आमची भटकंती आता थोडी पुढच्या पायरीवर गेली असल्याने नुसता एखादा गड किंवा घाट वाट करून मन भरत नाही तर ऐतिहासिक संदर्भ आणी त्या भागाचे महत्व लक्षात घेऊन कधी जुन्नर  भाग, कधी जावली, तर कधी भोर अशी त्या त्या ठिकाणचा पूर्ण कॅलिडोस्कोप उलगडत  भटकंती चालू आहे.गुरुवर्य नानांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री मधील  अनेक सुंदर पण रौद्र  घाट धुंडाळून ते पादाक्रांत करण्याचा मानस आम्ही ठेवलाय.



अशातच ऊन्हाळी ट्रेक आणि कोकणातून वर येणारया घाटवाटा कशा कसदार असतात आणि अशा वातावरणात सह्याद्रीच्या बेलाग कडेकपारी सर करण्याचा आणि थकलेल्या शरिराला घाटावरच्या वारयाचा स्पर्श होताना काय अवर्णनीय आनंद असतो तो असा सुखाचा जीव दुखा:त टाकायला एका पायावर तयार असणारया थोड्या वेड्यांनाच विचारा!



मग असाच बरेच दिवस पुढे ढकलत असलेला तेलबैला सुधागड ट्रेक करायचा ठरले आणि नाशिक पुणे सह्य मित्रमंडळाचे 15 वेडे आणि असाध्य आजाराशी दोन हात करून विजयी होत परत सह्याद्रीच्या सेवेत रूजू होणारे चिरतरूण ईश्वरकाका गायकवाड यांच्या सहभागाने मोहीमेचे बिगुल वाजले.



तारीख ठरली 27 / 28 फेब्रुवारी.तेलबैल्याच्या पायथ्याशी मुक्काम करायचा आणि शनिवारी सकाळी लवकर तेलबैला पाहून वाघजई घाटाने ठाणाळे येथे ऊतरून घोणसेकडून महादरवाजाने सुधागड गाठायचा, गडफेरी करून मुक्काम करायचा आणि दुसरया दिवशी सुधागड ऊतरून, सवाष्ण घाट चढून तेलबैला परत येऊन ट्रेक संपवायचा असा कार्यक्रम पटलावर होता.
अर्थात आता कुठलाही गड किंवा कुठलीही वाट कशी वाट लावू शकते याचा बराच अनुभव जमा होतोय .
त्यामुळे जरी आम्ही पुणेकर आणि ईश्वरकाका रात्री तेलबैलाला पोहचून आराम करून शनिवारी जागे झालो तरी नाशिककर पोहचले नव्हते त्यावेळीच आता ऊन्हामुळे त्रास होतोय का याची शंका मनात आली आणि म्हणून नाशिककर पोहचल्यावर नाष्टा चहा करून तयार झाल्यावर तेलबैला आल्यावर करू असा प्रस्ताव मांडला व तो मान्य झाला.
स्थानिक वाटाड्या म्हणून तेलबैलाच्या एका 65 वयाच्या काकांना रोकडेंनी बरोबर दिले.सगळे तेलबैल्याच्या कातळभिंतींना डावीकडे ठेवत साधारण 8.30 वाजता वाघजई घाटाकडे मार्गस्थ झालो.साधारण अर्ध्या तासातच कोकणाच्या पाली बाजूकडून खाली ऊतरणारया वाघजई घाटाच्या तोंडाला पोहचलो.



ऊतरणारी वाट ईतर घाटांच्या तुलनेत फार सोपी वाटली म्हणजे एकदम कड्यातून 80 डिग्री ऊतरणारी कोंडनाळ असो की ठिपठिप्याचा प्रवेश असो त्या तुलनेत सामान्य म्हणता यावी अशी! थोडा टप्पा ऊतरल्यावर वाघजईचे ठाणे लागले.



घाट सोडून डावीकडे मंदीर आहे.मंदीरात दर्शन घेऊन परत वाटेवर आलो.



परत टप्प्या टप्प्याने ती खालच्या डोंगरधारेला ऊत्तरेकडे थोडे घेऊन गेली मग यु टर्नने परत दक्षिणेकडे वळली.



 तेथे खडकातील कोरलेले पाण्याचे टाके लागले.कुठल्याही घाटवाटेच्या पुरातन वापराची खूण म्हणजे असे पाणवठे!




थोडे पुढे ऊतरताना दगडात कोरलेल्या रूंद पायरयांचे दोन तीन टप्पे आहेत.



तिथे एका खडकावर थोडे विसावलो.



ठाणाळे लेणींची चौकशी करताना त्याची वाट वर मंदीरापासून जाते अशी ऊपयुक्त माहीती आमच्या वाटाड्यान दिली पण आता खाली ऊतरल्यान थोड नाराज होण्यापलिकडे काही करू शकत नव्हतो.




आणखी काही वेळाच्या चालीनंतर आम्ही ठाणाळे गावात पोहचलो.



तेथे पाणी थांबा घेतला व स्थानिकांनी जंगलातून सुधागडकडे जाणारी वाट समजावली.त्यामुळे बहिरामपाडा न जाता आम्ही महादरवाजाच्या वाटेला पोहचू अस सांगितल.सकाळचे 11 वाजले होते आणि कितीही टाईमपास झाला तरी साधारण 4 तासात गडावर पोहचू असा माझा कयास होता.त्याप्रमाणे जंगलात शिरलो.



पण थोडे अंतर गेल्यावर कुठलीही मळलेली वाट दिसेना मग अंदाजाने गडाच्या दिशेने चालणे चालू ठेवले.पण ऊन वाढताच पाण्यासाठी थांबे वाढले.आणि वाट ठळक नसल्याने सर्वांचा वेग मंदावला.साधारण 40 डिग्री तापमान आणि भयंकर ऊकाडा याने आता आम्हा घाटावरच्या लोकांना जेरीस आणायचे ठरवले असावे बहुतेक.जोर लावून दोन टेकड्या पार केल्या.



 पण सगळे एका चालीने चालणे बंद झाले आणि तळपत्या ऊन्हात वाट बघण्यापेक्षा दुसरा ऊपाय ऊरला नाही.अशावेळी पाण्याचा मोठा आधार असतो पण यावर्षी पाऊस नसल्याने सगळे ओढे नाले कोरडे खट्ट! तरी मागचे नजरेच्या टप्प्यात आल्यावर थोडे पुढे सरकत होतो.तरी गडपायथा अजून किती वेळ लागेल समजेना.आता मला चिंता लागली की पाणी संपले तर अशा ऊकाड्यात फारच कठीण परिस्थिती होईल कारण पाणी थेट गडाच्या तानाजी टाक्यावर! पण आमच्यातल्या दोघांची परिस्थिती अवघड झाली ते बसल्यावर ऊठायला तयार होईनात.अशा निष्पर्ण जागी बसण्यापेक्षा थोडे पुढे गडाच्या घेरयात सावलीत बसू हा माझा आग्रह पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्यात ऊरली नव्हती.




डॉ.साठ्येनी पल्स चेक केली ती 140 दोघांची! ते म्हटले की हे सनस्ट्रोक किंवा सिवीयर डीहायड्रेशनचे लक्षण आहे.ऊपाय पाणी पिणे आराम करणे मग एकमेव हिरव्या झाडाखाली जेमतेम 7/8 लोक बसतील अशी सावली मग त्यांना बसवून पुढे काही लोक सावलीच्या शोधार्थ निघालो.एक टेकडी ऊतरून नदी पात्र ओलांडून सावलीची झाड होती खरतर 15 मिनीटांवर पण ते लोक आवाजाला ऊत्र देईनात मग आम्ही त्या झाडांखाली विसावलो.जेवणाचे डबे काढले व भोजन केले. थोडी वामकुक्षी घेतली.




आता 4.15 वाजलेले तरी मागचे लोक येईनात.मग ऊन्हाची चिंता न करता मागे गेलो तर ते तिथेच पहुडलेले मग विनवणी करून तयार झाले व थोडे पुढे थांबू अशा आश्वासनावर निघालो.माझ्याजवळ तसेच ईतरांजवळ पाणी संपत आले होते.आणखी जड पावलांनी सर्व मार्गस्थ झाले.थोडे चढून दोन ओढ्यांचे मार्ग ओलांडल्यावर घेरयाचे जंगल चालू झाले.




आता तंदुरूस्त असणारया जल्लोष ग्रुपच्या संदीप काकड व कंपनीला विनंती केली की तुम्ही वर जा गरज पडली तर पाणी घेऊन खाली यावे लागेल.थोड्या अंतरावर रस्त्यातच एक विरगळ लागली.



पुढे 10 मिनीटात मारूती मंदीरापाशी पोहचलो.



तिथे वरून आवाज आला की येथे पाणी आहे.खर सांगतो खूप टेंशन कमी झाले कारण आता हे अंतर खूप कमी होते आणि प्रोत्साहित करून वर आणलेल्या एकाला आता तेथे पोहचणे सोपे होते.मारूती मंदीरासमोर पायरयांचा मार्ग होता.



थोडे वर गेल्यावर थंडगार आणि निर्मळ पाण्याचे सह्याद्री मिनरल वॉटरचे तानाजी टाके लागले.हाततोंड धुवून दोन लि पाणी प्यालो थांबून.सर्व एकदम परत नॉर्मल झाले.पाण्याचे महत्व लक्षात आणून देणारा अजून एक अनुभव गाठीशी जमा झाला.



फ्रेश होऊन वर जाताना दगडगोट्यांनी ढासळलेली वाट व भग्न दरवाजाचे दोन टप्पे लागले.




चढाई ऊभी आहे.वर जाऊन सूर्यास्त अनुभवण्याचा प्रयत्न म्हणून एका दमात दुसरया दरवाजापाशी पोहचलो.वर डाव्या हाताला अजून एक टाके आहे.



पण अजून किती चढावे लागेल याचा अंदाज नव्हता.मग बसलो आणि थोडे खाल्ले पाणी प्यालो.सायंछायेत असा एकांत फार गुढरम्य होता.




15 मि नंतरही खालचे भिडू येईनात मग परत वर निघालो.आणि पाच मिनीटात महादाराचा बुरूज दिसला.



अप्रतिम! राजगड रायगड यांचा महादरवाजा बांधणारया हिरोजी ईंदुलकरांची कमाल कारागिरी पहावी अशीच.महादरवाजा पाहून सुधागड हा महत्वाचा गड होता आणि सुरूवातीला महाराजांनी राजधानीसाठी याचा विचार केला होता आणि नंतर भोरच्या पंतसचिवांची ही राजधानी होती हे पटते.



तेथे सर्व पोहचेपर्यंत आराम केला आता 6.30 वाजले होते.मग पंधरा मिनीटात सर्व आल्यावर अंधाराच्या समयी सुधागड पठाराच्या मंदीरात पोहचलो.



मग पंतसचिवांच्या वाड्यात जाऊन स्वयंपाकाची तयारी केली.संदीपभाऊ आणि जल्लोष ग्रुपने मुकुंद आणि अर्जुनच्या साथीसह अर्ध्या तासात चविष्ट खिचडी चुलीवर बनवली ती सर्वांनी भरपेट हाणली आणि मुंबईच्या ईतर ग्रुपची वर्दळ टाळण्यासाठी मुक्कामी परत भोराईच्या मंदिरात पोहचलो.डॉ.साठ्येंनी गडाविषयी ऊपयुक्त ऐतिहासिक माहीती दिली.आणि पावसाळ्यातला त्यांचा गडावरचा अनुभव कथन केला.मग सर्व शांत झोपी गेले.मला झोप येईना मग बाहेर गडपुजनासाठी खालून आलेल्या सह्यमित्रांशी हितगुज करून 1 च्या सुमारास भोराई मातेच्या छत्रछायेत निद्राधीन झालो.



भाग एक समाप्त.

भेटू दुसरया सुधागड ते तेलबैला  सवाष्ण घाटाच्या भटकंतीत.

सह्य साथीदार:  

 प्रशांत कोठावदे, मुकुंद पाटे, अनिकेत नेमाडे, मल्लिकार्जुन आणि ईश्वर काका गायकवाड पुणे टीम.

संजय अमृतकर, डॉ.अतुल साठ्ये, संदीप काकड आणि जल्लोष टीम, नाशिक.

भाग एक:  पुणे ते तेलबैला आणि तेलबैला ते सुधागड वाघजई घाटमार्गे.

श्रेणी:  ऊन्हाळ्यात खडतर.पावसाळ्यात मध्यम.पाणी 3/4 लिटर स्टॉक ऊन्हाळ्यात जरूरी.

वेळ:  7/8 तास पावसाळ्यात.ऊन्हात 10 तास.

पाणी:  पिण्यायोग्य तेलबैलानंतर ठाणाळे गावात.नंतर बहिरामपाड्यात खाली किंवा गडावर तानाजी टाके.मध्ये पाणी नाही.

6 comments:

  1. इतका आटाेपशीर ब्लाॅग असावा..मस्त

    ReplyDelete
  2. mast ! Awadale !
    Gadachya itihasabaddal ji kahi mahiti ahe ti pan yethe lihavi hee vinanti.

    ReplyDelete
    Replies
    1. giving some of it in second blog! Thank you for suggestion!

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  3. आम्ही सुधागड घोणसेच्या बाजूने उतरलो होतो. अचानक झालेल्या पावसाने खूपदा घसरून पडले होतो.त्यावेळी हनूमानाच्या रूपातली तानाजी मालुसरेंची मूर्तीची छबी टिपता आली नव्हती ती आज मीिमिळालीच.थँक्स ..आणि उत्तम लिहिलंयस.उत्तम छायाचित्रण..वाह...

    ReplyDelete
  4. आम्ही सुधागड घोणसेच्या बाजूने उतरलो होतो. अचानक झालेल्या पावसाने खूपदा घसरून पडले होतो.त्यावेळी हनूमानाच्या रूपातली तानाजी मालुसरेंची मूर्तीची छबी टिपता आली नव्हती ती आज मीिमिळालीच.थँक्स ..आणि उत्तम लिहिलंयस.उत्तम छायाचित्रण..वाह...

    ReplyDelete