Thursday 3 March 2016

कमळगड पांडवगड धोमच्या खोरयातील मनसोक्त भटकंती! भाग दुसरा



"Each fresh peak ascended teaches something!"




कमळगडाच्या पार्श्वभूमीवर सूर्यनारायणाला निरोप देऊन कालचा पांडवगडचा ट्रेक संपवून वाईला जेवण करून वाईच्या गणेशमंदीरात दर्शन घेतले आणि मंदीराशेजारूनच वाईची वेस ओलांडून मेणवली मार्गे कमळगडाच्या पायथ्याच्या तुपेवाडी वासाळेकडे निघालो.वाईपासून साधारण 30 कि मी अंतर पार केल्यावर धोमच्या बॅकवॉटरला वळसा घालत वासाळ्यात पोहचलो.गावात एक आजी आजोबा भेटले व गावाच्या मारूती मंदीरात मुक्काम करण्याची सूचना केली.पण पायथ्याला जावे का तुपेवाडीत असा विचार करून थोडे पुढे गेलो पण रस्ता न समजल्याने परत मारूती मंदीरात पथारया पसरल्या.




अर्णव काही त्रास देतो का अशी शंका आली कारण त्याचा पहिलाच मुक्कामी ट्रेक.दिवसभरच्या थकव्यानंतर पण तो एकटाच ऊत्साहाने परिपूर्ण होता आणि प्रशांतच्या आणि माझ्यामध्ये मस्त झोपला.आम्हालाच त्याची चिंता होती पण तो थंडी वारयाची अजिबात तक्रार न करता छान झोपला.

सकाळीच नैसर्गिक विधीस सूर्योदयाच्या आसपास गावची वेस ओलांडून धरणाच्या बाजूला गेलो.येताना एका टुमदार घरातील काकांनी चहाचे आमंत्रण दिले.आत खूप मोठे आधुनिक घर होते.चौकशी करता स्थानिक आमदारांचे ते बंधू असल्याचे समजले.त्यांचे आदरातिथ्य घेऊन आवराआवर करून नाष्ट्याची चौकशी केली पण एकही हॉटेल नव्हते.मग हिंगडे साहेबांच्या कृपेने एका आजीने चहा पाजला.




वासाळ्यातून साधारण चार पाच किमीवर ऊजव्या हाताला कमळगडाच्या पायथ्याला असणारया तुपेवाडीत जाताना छान मोर दिसले.पुढे गाडी रस्ता संपल्याठिकाणी एक घर बघून गाडी लावली.ते कोंढाळकरांचे घर!आत आवाज दिल्यावर आजी बाहेर आल्या.त्यांना वाट विचारली.हिंगडेंनी गमतीने आजीला म्हटले आम्ही आल्यावर जेवायला येतो.





घरापासून डावीकडे कमळगडाचा डोंगर व त्यावरील गोरखनाथाच्या मंदीराचा भगवा दिसला त्या दिशेने चढायला सुरूवात केली.पूर्ण वाटेवर खूप छान जंगल आहे.




सकाळच्या प्रहरातील या नयनरम्य आणि सुखद वातावरणात ऊत्साहाने आमचे मार्गाक्रमण वरच्या एका वृक्षाच्या दिशेने चालू होते.बरयाच गडवाटांवर असे वाट कुठून जाते ते दर्शवणारी खूण म्हणून गावकरी नवख्यांना अशा वृक्षांच्या सहाय्याने वाट ऊलगडतात असा जागोजागी अनुभव येतो.

सकाळच्या या वेळेत सूर्यनारायण कमळगडाच्या डोंगरापल्याडन वर येत होता व सोनेरी किरणांच्या खेळान परिसर न्हाऊन निघाला होता.



मागे केंजळगड दक्षिण बाजूने ऊभा ठाकला होता आणि त्यापल्याड जाणारी डोंगररांग पश्चिमेकडे रायरेश्वराचे दर्शन देत होती.नाखिंदीसाठी कधी येताय असा सवाल ती करत असावी.



वाटेत पक्षांच्या किलबिलाटान परिसर गजबजून गेला होता.वेगवेगळ्या प्रकारच्या खगांची प्रभातफेरी चालू होती.पोपटांचे तर थवेच्या थवे!



वर चढाई ऊभी अंगावर येणारी होत होती व सूर्य आपल्या ऊपस्थितीची जाणीव करून द्यायला लागला होता.पण आमचा ग्रुप लिडर अर्णव सगळ्यात ऊत्साहात पुढे! आपल्याला घाम फोडणारे हे सह्याद्रीचे कडे लहानगयांना मात्र अलगद खेळवतात असे वाटायला लागले.त्या मोठ्या वृक्षापाशी पोहचून थोडा टप्पा पार केला आणि विहंगम बघून डोळ्याचे पारणे फिटले.



दक्षिणेकडे बलकवडीचा जलाशय त्यापलिकडचे जोर खोरे, पाचगणी, महाबळेश्वरचे विस्तीर्ण पठार अन बेलाग कडे! पश्चिमेकडे कोळेश्वर, रायरेश्वर, ऊत्तरेकडे केंजळगड, पूर्वेकडे धोम जलाशय आणि मागे पांडवगड! अशा विहंगमाच्या लालसेने आमच्या डोंगरभटक्यांचे पाय कितीही त्रास सहन करायला तयार असतात.अप्रतिम!

थोडे ऊजाड टेकाड डोंगरधारेने चढलो आणि पलिकडे जंगलात शिरलो पाच मिनीटात गोरखनाथ मंदीरापाशी विसावलो.ऊंचीवर आल्याने गार हवेच्या झुळूकेन घामाजलेल अंग शांत झाल.पूर्ण सारवलेल्या पडवीत बाकी येईपर्यंत आडवा झालो.आत मंदीरात वरच्या धनगरवाडीच्या काकांनी कसली तरी पूजा घातली होती.जंगम पुजार्याच्या ऊपस्थितीत पूजा चालू असताना गोरखनाथाच दर्शन घेतल.बाकी सर्व येऊन थंडगार पाण्यान फ्रेश झाल्यावर आरती झाली आणि सकाळच्या नाष्ट्यासाठी भाताची खिर पानांवर घेतली.ईश्वर एवढ्या कोपरयात देखील तुम्हाला ऊपाशी नाही ठेवत याची खात्री पटली!

प्रसादानंतर त्या काकांनी त्यांच्या बरोबरच्या मुलाला आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून दिले व थोडी जंगलवाट चालल्यावर कमळगड समोर ऊभा होता.पूर्ण गर्द वनराजीने वेढलेला! धनगरवाडा त्यासमोरील पठार मागे गर्द जंगल आणि त्यात कमळगड फार छान चौकट होती.



काकांच्या घरासमोरन जंगलात शिरलो आणि थोड्या चढाईनंतर कमळगडाचा कातळातून जाणारा छोटा दरवाजा किंवा वाट नजरेस पडली.



आत थोडी कसरत करून वर चढलो.



वर पूर्ण लाल माती आणि कमळगडाची प्रसिद्ध कावेची विहीर समोरच होती.






पन्नास एक पायरया खाली थोड्या चिकट निसरड्या होत्या ओलाव्याने पण हळूहळू ऊतरलो.अशा गडावर ईतका सुंदर अवशेष असू शकतो हे गेल्याशिवाय नाही समजत खरच! सगळे जण खाली ऊतरले छान फोटो घेतले व वर निघालो.आमचे सह्यमित्र विनीत दाते, अभिषेक आणि बालवडकर कमळगडाच्या भेटीला आले होते.त्यांच्याशी थोडी गप्पाष्टक करून पाच मिनीटात गडावरून चौफेर परिसर न्याहाळला भगव्या ध्वजाच्या पश्चिम टोकावर जाऊन परतीला निघालो.





खाली धनगरवाड्याला पाणी भरून घेतले.त्यांनी अर्णवला काठी दिली.



त्यांचा निरोप घेऊन गोरखनाथाच्या मंदीरापाशी आजूबाजूच्या गावचे थोडे पुढारी पार्टीसाठी चढून आल्याने वैतागले होते.संधी पाहून थोडे प्रबोधन केले.( काही ऊपयोग होणार नाही हे गृहीत धरून) आणि परतीच्या मार्गाला लागलो.ऊजाड डोंगररांगेच्या टेकाडावर खालून शाळेच्या लहानग्यांचा मोठा ग्रुप भेटला.ऊन्हामुळे कासावीस झालेल्या लहानग्यांना मंदीर पाच मिनीटावर आहे अस सांगून धीर दिला.आणि खाली तुपेवाडीच्या वाटेवर लागलो.जाताना न जाणवणारा घसारा आता कस बघत होता पण तासाभरात खाली ऊतरलो.






थोड फ्रेश व्हायला कोंढाळकरांच्या घरात गेलो तर आम्हाला आजी म्हटल्या बाळांनो जेवण बनवलय.बसा. पुढे थोड्या गप्पा करत ताट आल्यावर अजून धक्का बसला.आजी आणि त्यांच्या सुनेने पुरणपोळी, सार, दूध आणि भात बरोबर मिरचीचे लोणचे वाढले.खरच गावातील शेतकरी किती श्रीमंत मनाचे असतात ते समजले.पोटभर जेवून आजीच्या नातवाच्या हातात बळजबरी थोडे पैसे कोंबले त्यांच्या विरोधाला न जुमानता! पण कायमस्वरूपी मनात कोराव असा माणुसकीचा धडा घेऊन परत पुण्याकडे निघालो.

संपूर्ण!

साथीदार: अर्णव कोठावदे, प्रशांत कोठावदे, मुकूंद पाटे, अनिकेत नेमाडे,मोहन हिंगडे  आणि मी.

श्रेणी:  सोपी.ऊतरतानाचा घसारा सोडला तर.

दिनांक:  14 फेब्रुवारी 2016

1 comment: