Saturday 19 March 2016

तेलबैला वाघजई घाट सुधागड सवाष्ण घाट तेलबैला - ऊन्हाळ्यातील कसदार भटकंती - भाग दुसरा.









“यूहीं नही लाखो हसते हसते सुलीं चढे यहॉं पे, 

तेरा जलवा ही कुछ और है !"


सह्याद्रीमध्ये भटकंती करताना येथल्या ऊजाड अवशेषांच्या रोमारोमात भरलेल्या ऐतिहासिक क्षणांची अशी प्रचिती खरया शिवप्रेमीला नक्की येते.सुधागडचा परिसर असाच अनेक रोमहर्षक आणि महत्वाच्या ईतिहासातील क्षणांनी संपन्न आहे.अकबराची पायथ्याची छावणी असो की अष्टप्रधान मंडळींच्या शंभूराजांच्या विरोधातील कारस्थाने असोत, गैरसमजातून त्यापैकी काहींचा देहदंड असो किंवा भोरच्या पंतसचिवांची संपन्न राजधानी म्हणून अनुभवलेले क्षण असो, राजांनी राजधानी म्हणून केलेली पाहणी असो की हिरोजी ईंदुलकरांनी केलेले महाद्वाराचे बांधकाम असो, भृगू ञूषींची समाधी असो अशा अनेक परिचित अपरिचित घटनांची साक्षीदार असलेली ही भूमी बारकाव्यासह भटकण्यासाठी माझ्या भटकंतीच्या कार्यक्रमात नोंदवून सुधागड निरोप घेण्याची वेळ झाली.




कालचा दिवस ईतर आम्ही आजमावलेल्या घाटवाटांच्या तुलनेत साधारण भासणारया पण ऊन्हामुळे आणि दमटपणामुळे कस बघणारया भटकंतीमुळे आज सर्व जण ऊन टाळण्याच्या मनस्थितीत असल्याने सुधागड गडफेरी रद्द करून लवकरात लवकर सवाष्णच्या मार्गाला लागण्याचे निश्चित करण्यात आले.सुधागडचा एकंदर ईतिहास बघता ईथे आमची पावले पुन्हा वळणारच यात शंका नाही.सर्व जण 7 वाजता तयार होऊन पुन्हा महादरवाजाची वाट जवळ केली.तत्पूर्वी सुधागडहून चौफेर दिसणारा नजारा मनात साठवला.एकीकडे घाटाच्या बाजूने तेलबैला नंतर घनगड ,केवणीचे पठार ,त्यामागे अंधारबन संपल्याठिकाणच्या नागशेत घाटवाटेपर्यंत पोहचलेली अजस्र डोंगररांग, दुसरीकडे खाली कोकण सरसगड पाली परिसर असा 360 डिग्रीचा भारीच असा पॅनेरमा!


ऊगवतीच्या प्रकाशात तेलबैला घनगड अतिशय सुंदर भासत होते.पण तोच सूर्यनारायण वर आल्यावर कसे रौद्र रूप धारण करतो याची चुणूक असल्याने लवकर पावले ऊचलली जावू लागली आणि थेट महादरवाजा ऊतरून खाली तानाजी टाक्यापाशी पावल पाणी भरण्यासाठी विसावली.पाण्याच्या बाटल्या भरताना थोडा पोटोबा ऊरकला पुन्हा पोटभर पाणी पिऊन एका बाटलीत जलजीरा लिंबू साखर यांचे मिश्रण टाकून झकास सरबत करून बाटली भरून घेतली.







परत मारूती मंदीरापासून आल्या वाटेन खाली ओढ्याच्या ठिकाणापर्यंत कालचीच वाट होती.वाटेत सकाळच्या आल्हाददायक वातावरणात संचार करणारे अनेक पक्षी दिसले.त्यात गोल्डन ओरीयल ( हळद्या), एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर ( स्वर्गीय नर्तक), कॉपरस्मिथ बार्बेट ( तांबट) असे वैविध्य होते.अनिकेतने त्यातले काही त्याच्या कॅमेरात टिपले. मग खालच्या ओढ्यात सर्व येईपर्यंत विसावलो.



आमचे वाटाडे काका आणि अर्जुन, मुकुंद थोडे पुढे गेले.मग सर्व आल्यावर पुन्हा ओढा ओलांडून ऊजव्या हाताच्या टेकडीला भिडलो.काल आलेल्या मार्गाच्या ऊजवीकडे सवाष्णला भिडणारी वाट चालू होते.





त्यात ओरिएंटेशच्या अंदाजाने काही भिडू जल्लोषात खाली जंगलात घुसले.आम्ही डोंगरधारेने आणि ते खालून मग आवाज देत देत थोडे थांबून वरच्या एका पठारावर ते येऊन मिळाले.




वाटेत सावरीचा कापूस पसरलेला.मग बालपणीची आठवण झाली आम्ही घरासमोरच्या सावरीच्या शेंगाना दगड मारून हवेत ऊडणारा कापूस पळत गोळा करायचो.ईश्वरकाकांना आणि मला नमुना म्हणून थोडा कापूस गोळा केला आणि पुढे निघालो.वर पठारावर ईश्वरकाकांची आणि माझी वाट पहात असणारे सर्व मग झाडाखाली विसावलो.




आता पुढे जंगलात घुसणारा रस्ता बघून थोडे जवळ आले असे वाटले.पण आता तर खरी ऊभी चढण सुरू झाली.पण जंगल असल्याने ऊन कमी लागत होते.मग आणखी एक टप्पा पार केला तर पुढे अजून एक मोठा टप्पा दिसला.अशा खड्या चढाईचा एक फायदा असा असतो की प्रत्येक पाऊल तुम्हाला एक फूट तरी वर घेऊन जाते त्यामुळे थोडा दम लावला तर कमी वेळात आपण वर सरकतो.अर्थात ऊन कमी असले तर जास्त दम नाही लागत पण कोकणाकडून वर चढताना ऊंचीमुळे वातावरणात होणारा बदल जाणवणारा असतो.



शेवटच्या कातळटप्प्याला लागल्यानंतर सुधागड आणि मागे केवणीचे पठार सुंदर दिसत होते.



खाली जंगलही घनगर्द भासत होते.



मग वर एका झाडाखाली विसावलो.पाणी प्यालो.कालपासून आम्हाला साथ करणार्या खंड्यालाही आमच्या ऩाशिककर साथीदाराने पानाच्या द्रोणातून पाणी पाजले.हा खंड्या बिस्कीटांकडे ढूंकूनही न पाहणारा पण सकाळी मुकुंदने दिलेल्या पोळ्या त्याने खाल्ल्या आणि आता पाणी प्याला.



हळूहळू सर्व भिडू कातळटप्पा पार करत पठाराला आले.





आमचीही बरयापैकी विश्रांती झाली होती.मग सॅकऊचलून वरच्या पठारावरची तेलबैलाच्या मागची वाट चालायला सुरूवात केली.मध्येच फोटोग्राफी चालू होती.तेलबैलाच्या कातळभिंतींचे अजस्र रूप डोळ्यात साठवत मार्गाक्रमण चालू होते.



कॅमेराने बॅटरी एक्झॉस्टचा मेसेज दिला आणि वरच्या तळपत्या सूर्यनारायणाने माझी बॅटरी एक्झॉस्ट करण्याच्या आत तेलबैला गाठण्यासाठी कॅमेरा सॅकमध्ये कोंबला आणि सुटलो ते थेट रोकडेंच्या अंगणातच थांबलो.तिथे फ्रेश होऊन कपडे बदलेपर्यंत अर्जुन आणि मुकुंद पण पोहचले.मग आणखीकाही भिडू पोहचल्यावर जेवण तयार असल्यानेआणि एकदम 16 जणांना वाढावे लागू नये म्हणून भोजन ऊरकले.मग आरामात ताणून दिली.एवढ्या श्रमानंतर पण संदीप काकड आणि एक भिडू तेलबैला मंदीरात जाऊन आले.मग सगळ्यांची जेवण आटोपेपर्यंत मस्क पातेलेभर जलजीरा, लिंबू, साखर यांचे सरबत बनवले व सर्वांना मनसोक्त पाजले.


मग आवराआवरी करून नाशिककरांचा आणि ईश्वरकाकांचा निरोप घेऊन समाधानाने गाडी लोणावळामार्गे पुण्याकडे दामटली.

मागे वळून बघताना माझ्या घाटवाटांच्या अविस्मरणीय प्रवासात अजून दोन कसदार घाटवाटा जोडल्याचे समाधान होते.असे धाडस  ऊन्हाळ्यात करणारे जे काही मोजके आहेत  त्यांना माझ्या समाधानाचा अर्थ लवकर समजेल.

ट्रेक दिनांक :   फेब्रुवारी 2016

साथीदार : संजय अमृतकर, डॉ.अतुल साठ्ये, संदीप काकड आणि जल्लोष ग्रुप नाशिक
ईश्वरकाका गायकवाड, प्रशांत कोठावदे, मल्लिकार्जन श्रीशेट्टी, अनिकेत नेमाडे, मुकुंद पाटे आणि मी पुणे.

श्रेणी : मध्यम, ऊन्हाळ्यात कठीण.

पाणी : सुधागड तानाजी टाक्यानंतर थेट तेलबैला गाव.मध्ये पाणी नाही.सवाष्ण घाटात पाणी नाही.

धन्यवाद मित्रांनो भेटू लवकर नवीन आडवाटेसह!

7 comments:

  1. कडक रे तुषार...अब मजा आ रहा है ...!

    ReplyDelete
  2. वाह तैलबैलाची छबी सगळ्यात भारीच.
    खंड्या आणि ईश्वर काका असे आपल्याला वाटेत येणे आपले अहोभाग्यच..

    ReplyDelete
    Replies
    1. जयू, नक्की ही भाग्याची गोष्ट आहे.धन्यवाद!

      Delete
  3. Very nice. One of my one favorite region

    ReplyDelete
  4. ट्रेक मस्त..
    दोन्ही ब्लॉग भाग बघितले.
    फोटू आणि वर्णनही मस्त!
    सातत्याने ट्रेक्स आणि ब्लॉग्ज घडूदे, अश्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. जबरदस्त अनुभव

    ReplyDelete