Friday 3 March 2017

स्वराज्याच्या राजधानीच्या नाळा - सिंगापूर आणि आग्या!



सह्याद्रीच्या ऊत्तर दक्षिण अशा पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये कोकण आणि पठार यांना जोडणारया वाटांना अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक घाटवाटा, नाळा, दारं, घळा यांनी सह्याद्री माथा आणि पायथा जोडलेला आहे. व्यापार, ऊद्यम, सैनिकी महत्व किंवा दैनंदिन कामकाज या वेगवेगळ्या हेतूकरिता वापरात असणारया ह्या वाटा अगदी आजही वापरात आहेत.दुर्दैवाने काही वाटा मात्र बदलत्या काळानुरुप लयास जाण्याच्या मार्गावर आहेत.पण ईतीहासात पुरातन काळापासून नोंद असणार्या बहुसंख्य वाटांची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या ईराद्याने आणि नवीन पिढीने त्याची किमान नोंद ठेवावी म्हणून आमच्यासारखे काही सातत्याने त्या धुंडाळायचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी आमची मोहीम निघाली ती थेट दुर्गदुर्गेश्वर बा रायगडाच्या कुशीत ऊतरणार्या सिंगापूर नाळ आणि आग्या नाळ यांच्या शोधात! सह्याद्री पठारावर अतिदुर्गम अशा परिसरात वसलेले सिंगापूर ( त्यांना या नावाचा प्रगत देश आहे हे बहुदा नुकतेच समजले असावे ).ह्या गावातून थोड्या कमी अवघड श्रेणीत समजली जाणारी सिंगापूर नाळ! कोकणातल्या रायगडाच्या मागच्या दापोली या छोठ्या गावाला जोडणारी.आणि ह्याच दापोलीतून परत घाटमाथ्यावरच्या एकलगावला जोडणारी थोडी अवघड, कमी किंवा वापर बंद झालेली दुर्गम अशी आग्या नाळ!

शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही मोहीम निश्चित झाली.यावेळी फक्त ४ एवढीच गणसंख्या! शनिवारी दुपारी १२.३० ला पुणे सोडून खानापूर, पाबे, वेल्हा, भट्टी, केळद खिंड असे मार्गाक्रमण करत मोहरीच्या दिशेने जात त्याअलिकडच्या सिंगापूरला गाडी पोटेंच्या घरासमोर पार्क केली तेव्हा दुपार टळली होती आणि ४ वाजले होते.घरच्या आजींकडे वाटाड्यासाठी विचारणा केली तेव्हा कोणीही नसल्याचे समजले.मग  अंधाराच्या आत दापोली गाठण्यासाठी नाईलाजाने आमचा स्थानिक माणूस नेण्याचा नियम बाजूला ठेवून सँक पाठीला लावल्या आणि थोडा वाटेचा अंदाज आजींकडून घेत निघालो.अभ्यासानुसार २ ते २.३० तास पुरेसे होते.



सुरूवातीला गावाच्या मागून ऊत्तरेला एक ओढा आणि त्याशेजारची नवीन खाचरं यांना वळसा घालत पुढे जात असताना वाट पुसट होत चालली.



पण पश्चिमेकडे जात राहीलो तर घळीशी पोहचू या अंदाजाने जंगलातील वाटा तुडवत चाल सुरु ठेवली.कधी वर तर कधी खाली असे जात असताना हळूहळू ३ ते ४ कि मी चालून वाट खाली एका मोठ्या ओढ्यात ऊतरली.



ओढा ओलांडून एका कड्याच्या दिशेने जाणारया छोट्या ट्रँव्हर्सवरून जाताना एकदम कड्याच्या टोकाला ऊजवीकडे वळत असताना लिंगाण्याच्या दक्षिणेच्या टोकाचे दर्शन झाले.



रायलिंगच्या पठाराच्या अलिकडे खाली असल्याची खात्री झाली.ईथे एक अवघड किंवा जपून ऊतरावा असा कातळ आहे त्यावरून खाली जंगलात ऊतरलो.





दाट झाडीतून १ ते १.३० कि मी गेल्यावर अचानक समोर बोजा घेऊन वर येत असणारया दगडू मोरेंची भेट झाली आणि वाट बरोबर असल्याची खात्री झाली.



त्यांनी आपुलकीने चौकशी करत परत ऊलटे १ कि मी येत रस्ता खालपर्यंत समजावला आणि आम्ही नाळेला लागेपर्यंत वरून मार्गदर्शन केले. नाळेला लागण्याच्या आधी थोडी घसारा आणि कातळाची वाट आहे.



नाळ लागल्यावर सरळ खाली वेगात ऊतरत असताना मनात वेळेचे गणित चालू होते.नाळ संपताना जंगल लागले आणि पुढे एक पठार.



लिंगाण्याची अजस्र दक्षिण कातळभिंत मावळतीच्या ऊन्हात सोनेरी झाली होती.त्याशेजारी बोराट्याची नाळ अगदी जवळ भासत होती.एका पठारावरून लिंगाणा पूर्ण पूर्व पश्चिम पसरलेला पाहून डोळे सुखावले.ऊंचच ऊंच कातळभिंतींनी सजलेला लिंगाणा प्रत्येक गिर्यारोहकाच्या यादीतील माथा गाठावा असा अतिकठीण श्रेणीतील गड! पण प्रस्तरारोहण करणार्या मोजक्या सह्यसवंगड्यांशिवाय त्याच्या कडे दुरून डोंगर साजरे म्हणूनच पहावे असा.



आता मात्र सुर्यास्त झाला होता आणि संधीप्रकाशाचा फायदा ऊठवत दापोली गाठणे अनिवार्य असल्याने अजून रेंगाळण्याचा मोह टाळून टेकडीचा ऊतार ऊतरण्यास सुरूवात केली.



साधारण १/२ तासात खाली एक ओढा लागला.



येथून पश्चिमेकडे ओढ्याच्या शेजारून पायवाट आहे.अंधाराने पूर्ण वेढण्याच्या आत आम्ही दापोली या रायगडाच्या कुशीतील टुमदार गावात प्रवेश केला.गावात शिरताच छत्रपती शिवरायांचा पुतळा दिमाखात ऊभा.त्याशेजारील मोरेंच्या ऊभ्या गल्लीत काही वयस्कर मंडळी विरंगुळा म्हणून गप्पांचा अड्डा जमवून बसलेली.रामराम करून मुक्कामाची आणि जेवणाची सोय लावली.मोरे मामांच्या ओसरीतच पथारया पसरल्या.जेवण तयार होईस्तोवर आम्ही गावकरयांबरोबर गप्पांचा अड्डा जमवला आणि मग आधी ठरवलेल्या निसणीच्या वाटेवर माहीतीअभावी कोणी येणार नाही याची जाणीव झाली .आता गावकरयांनी सुचवले की आग्या नाळ समोरच आहे त्याने जाता येईल.मग वाटाड्या म्हणून कोणी येत का? नाळेला लावून द्यायला तरी कोणीतरी येईल हे आश्वासन घेऊन जेवण करून थोडी शतपावली करून निद्राधीन झालो.आजचा दिवस पूर्ण झाला होता आता ऊद्याच्या आग्या नाळीच्या स्वप्नांनी वेढले!



पहाटे ६ वाजता उठून तयार होऊन १/२ तासात चहा झाल्यावर निघालो. आज दुर्गम आणि वापर बंद झाल्यात जमा असलेली आग्या नाळ चढून घाटमाथ्यावरच्या एकलगावला पोहचायचे होते. मोरे मामा आमच्याबरोबर येण्यास निघाले तेही जवळ जवळ २२ वर्षांनी आग्या नाळेतून येणार होते. बहुदा आम्ही  वाट चुकणार याची त्यांना खात्री असावी! 



कमरेला कोयता खोचून आणि जनावरांना रानात लावून मग आम्ही दापोलीच्या पूर्वेस दुर्गाच्या डोंगराच्या आणि सिंगापूर नाळेच्या मधल्या आग्या नाळेत जाण्यास निघालो.



सुरुवातीला काही खाचरं पार करीत नदीच्या कोरड्या पात्रास ओलांडत एका तिन्ही  बाजूनी बंद अशा  नदीपात्रात पोहचलो.



येथून अनेक लहान मोठ्या मधून शिळांमधून मार्गक्रमण करत हळूहळू कड्याच्या जवळ पोहचत होतो.  नदीपात्र पूर्णपणे कोरडे होते पण शिळांचा आकार पाहता पावसात किती वेगाने हि नदी प्रवाहित असेल याचा अंदाज येत होता. पुढे हे पात्र थोडे उत्तरेला वळते. मग एका ठिकाणी छोटा डोह आणि त्यातून खाली वाहणारे पाणी लागले. ह्या पाण्याच्या डोहात आमच्या उरलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पोटभर पाणीही प्यालो. 



अजून काही अंतर वर चढल्यावर एक मोठा पण कोरडा  धबधबा समोर उभा ठाकला.



 त्याशेजारून डावीकडे वर एक घसारा आणि कातळकडा चढून वाट आग्या नाळीकडे जाते.



वरून  धबधबा आणि  त्यामुळे तयार झालेला डोह एकदम झक्कास दिसत होता. आता त्याच धबधब्यावर असणाऱ्या पात्रातून जाण्यास मार्ग  आहे.



थोड्या अंतरावरच हा मार्ग दाट झुडुपात शिरला. मोरे मामा झुडूप वेली  साफ करत मोठ्या कष्टाने वाट  बनवत पुढे आणि आम्ही काटेकुटे टाळण्याचा प्रयत्न करत मागे अशी बरीच कसरत केली. शेवटी एकदाचे मुख्य  नाळीच्या मुखात प्रवेश झाला. 





बऱ्याच वेगात चालूनही साधारण २  लागले होते. येथून एकदम छातीवर येणारी चढाई होती. दोन्ही बाजूला आकाशात भिडणारे कडे, अस्थिर दगडगोट्यांचा साधारण ८० अं. तला उभा चढ आणि आम्ही ४ जण. तेथील रौद्रभीषण शांतता थकलेल्या आणि वाट चुकलेल्या भटक्यांची परीक्षा बघू शकते. आज मोरे मामा स्वतःहून यायला तयार झाले ते किती बरे झाले याची प्रचिती आली.     




 उभा चढ संपत आल्यावर आम्ही न्याहारीसाठी विश्रांती घेतली. साधारण ३  तास अथकपणे आम्ही चालत होतो.





थोडे ताजेतवाने झाल्यावर उजवीकडून नाळ सोडून घसाऱ्यावरून साधारण १५ मिनिटे चालल्यावर वाट कड्याच्या पोटातून पण झाडीतून उजवीकडे वळाली. अतिशय जपून चालावे एवढीच वाट त्यात कारवी, काटेरी झुडूप अतिक्रमण करत अडथळा निर्माण करत होती. परत मामानी कोयता काढला आणि साफ सफाई करत वाट मोकळी केली. 



काही क्षणात आम्ही वर पोहचलो. १० मी. दम खाऊन अजून ३०० मीटर उंचावर असणाऱ्या एकलगावच्या शाळेच्या प्रांगणात पोहचायला १/२ तास लागला.उन्हाचे चटके आता जाणवू लागले होते.



बाकी भिडूना तेथेच वर वाट बघायला सांगून मोरे मामा आणि मी वाहन घेण्यासाठी रणरणत्या उन्हात गाडी  रस्त्याने सिंगापूरकडे निघालो. ५ किमी  टेकडीपलीकडे सिंगापूरला पोहचलो. 





तेथे काल  सिंगापूर नाळीत मार्ग दाखवणाऱ्या दगडू मोरे दादांना  भेटून आणि आमच्या वाटाड्या मोरे दादाचे आभार मानून  गाडी काढली आणि मुख्य रस्त्यावर येऊन विसावलेल्या सवंगड्याना घेऊन तासाभरात वेल्हे गाठले. हॉटेल स्वप्नील मध्ये रुचकर मेजवानी उरकून पाबे खिंडीतून पुणे गाठले. 



घाटवाटांच्या वेडात असणाऱ्या माझ्यासारख्या भटक्यांच्या यादीत अग्रक्रमाने असाव्या अशा ह्या दोन नाळा पालथ्या घातल्याचे समाधान पुढे खूप काळ टिकणारे आहे. 

धन्यवाद मित्रानो! 
भेटू परत  अशाच भन्नाट वाटांसह!

दिनांक : २५/२६ फेब्रुवारी. 

मार्ग : 

सिंगापूर नाळ  :  पुणे -खानापूर-पाबे -वेल्हे- केळद खिंड - सिंगापूर [घाटमाथ्याचे गाव] 
लागणारा  वेळ : उतरण्यास ३ ते ३ १/२ तास . 
पायथ्याचे गाव : दापोली . 
श्रेणी : मध्यम 

आग्या नाळ : दापोली - एकलगाव [ घाटमाथ्याचे गाव]
लागणारा  वेळ : चढाई ४ ते ५ तास. 
श्रेणी : मध्यम कठिण. 

विशेष सूचना : वाटाड्या आवश्यक. कालावधी : पावसाळा सोडून इतर वेळी.. 

CARRY 3 LTRS WATER AS A PRACTICE IN SUMMER WITH SOME INDIVIDUAL SNACKS.

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपायला हवे. 






12 comments:

  1. एक नंबर लेख... सुरेख छायाचित्रण....आपले सिंगापूर मस्तच....लिहीत रहा....आम्हा गरीब वाचकांंसाठी

    ReplyDelete
  2. सुरेख लेख व सुरेख फोटो!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u hemantji! Your appreciation is valuable for me!

      Delete
  3. सुरेख लेख व सुरेख फोटो!

    ReplyDelete
  4. Great experience for readers...

    ReplyDelete
  5. Very nice while reading actually get the feel of trek! Superb! way to go Brother!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you! My view while writing is to give as much correct info as i can.I am happy that my objective is fulfilled.

      Delete
    2. सुरेख लेख लिहीत जा आमच्या गरीब वाचकांसाठी

      Delete
  6. मस्त ब्लॉग आहे आम्ही पुढच्या आठवड्यात आग्याची नाळ जाणार आहोत

    ReplyDelete