Tuesday 14 March 2017

रडतोंडी, निसणी - जावळी खोरयातील ऐतिहासिक वाटा!



"तेजतम अंसपर , कन्हजिमि कंसपर |
तो म्लेंछ बंसपर, शेर सिवराज है ||
-कवी भूषण


ऐतिहासिक महत्व -

जावळी - आधुनिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरच्या पश्चिमेस पसरलेला सदाहरित वनराजीने नटलेला प्रदेश!निसर्गाच्या सौंदर्याबरोबरच अनेक ज्ञात अज्ञात ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार! १६४८ नंतर छत्रपती शिवरायांची सार्वभौम राजा म्हणून ईतिहासाने नोंद घ्यावी अशा ज्ञात दोन ठळक घटना म्हणजे जावळीचे तत्कालिन राज्यकर्ते चंद्रराव मोरेंवर महाराजांनी केलेली कारवाई व त्यात जावळीचा स्वराज्यात केलेला समावेश आणि आदिलशाहीचा बलदंड सरदार आणि वाईचा सुभेदार अफजलखानाचा महाराजांनी केलेला कायमचा बंदोबस्त!




यात अफजलखानाने जावळीच्या चक्रव्यूहात  ज्या वाटेने प्रवेश केला ती वाट म्हणजे रडतोंडी घाट! आणि चंद्रराव मोरेंना जावळीत धडा शिकवताना महाराजांनी वापरली ती निसणीची वाट!

ईतीहासाचा धांडोळा घेण्याकरता यावेळी आम्ही निघालो याच वाटांच्या शोधात! शनिवारी सकाळी ६ वाजता महाबळेश्वरकडे प्रस्थान केले. वाईला पोटभर न्याहारी ऊरकून पसरणीच्या वळणदार वाटेने पाचगणी व नंतर महाबळेश्वरच्या मुंबई पाँईंटच्या अलिकडे राजभवनच्या आत गाडी सुरक्षित पार्क केली. (रखवालदारास कल्पना देऊन) सर्व जण मोहीमेसाठी तयार झाले.


राजभवनापासून साधारण १.३० ते २ कि.मी.वर महाबळेश्वरचा सुप्रसिद्ध मुंबई पाँईंट पर्यटकांचे मोठे आकर्षण.याच मुंबई पाँईंटच्या आधी डावीकडे जंगलात एक ठळक वाट दक्षिणेकडे जाते. ५ मिनीटे चालल्यावर ऊजवीकडे ती वाट खाली ऊतरली.मस्त दाट झाडीतून थोडे ऊतरल्यावर डांबरी सडक ओलांडून हीच वाट एका फार्महाऊसला लागून मेटतळे या गावात ऊतरते.हनुमान मंदीराच्या पुढे बसस्थानकाच्या शेजारून ओंकार हाँटेल समोरून डावीकडे रडतोंडी घाट पारसोंडसाठी ऊतरतो.



थोडं पुढं गेल्यावर समोर मधुमकरंदडापासून प्रतापगडापर्यंत पसरलेल सदाहरित रान डोळ्याच पारण फेडणारं! आजही दुर्गमता जपणारा हा प्रदेश! ३६० वर्षापूर्वी अफजलखानाला या प्रदेशात वाईतून महाराजांनी काय विचाराने आणि किती अफलातून नियोजनाने खेचून आणले असावे!



समोरच्या सुखद नजारयाच्या साथीने हिरव्यागर्द वनराजीतून खाली ऊतरताना सगळे खुशीत होते.साधारण तासाभरात मधुमकरंद जास्तच जवळ वाटायला लागला आणि काहीतरी चुकतेय अस वाटत असतानाच एक गावकरी दादा त्यांच्या सहचारिणीसोबत वर येताना दिसले.त्यांच्याशी बोलताना चूक लक्षात आली आम्ही सरळ ऊजव्या वाटेऐवजी डावीकडची वाट धरली होती.ही वाट शिरवली गावात ऊतरते.आता परत फिरण्याऐवजी आम्ही खाली असणारया गावातून जननी मातेचे मंदीर पाहून पारकडे जाण्याचा निर्णय घेतला.गावातल्या मूळच्या उमरठच्या मालुसरे दादांनी मंदीर दाखवून रस्ता समजवला.



हे जननी आणि कुंभळजाईचे  संयुक्त पुरातन पण नव्याने बांधकाम केलेले मंदीर त्याच्या आतल्या विहीरीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.आवारात सुस्थितील वीरगळ आणि बाहेर ठेवलेल्या रेखीव मूर्तीही बघण्यासारख्या!








थोडे पाणी पिऊन ताजेतवाने होऊन पारचा मार्ग धरला.डांबरी पण वळणदार मार्ग पूर्ण जंगलाने वेढलेला.मागे काही वेळेला हातलोटच्या फेरया केल्या असल्याने तसा परिचीत आणि मनात घर करून राहीलेला.३ कि मी गेलो आणि एक सिमेंटचा ट्रक आला त्याला हात करुन मागे बसून पारफाटा गाठला.वाटेत एक शिवकालीन पुल लागतो.परत आत २ कि मी पारमध्ये प्रसिद्ध रामवरदायिनीच्या अतिसुंदर राऊळात भोजन, वामकुक्षी असा कार्यक्रम पार पडला.याचे मूळस्थान पश्चिमेकडील प्रतापगडाच्या पलिकडे पारघाटात आहे.
अफजलखानाची छावणी ईथे पारमध्येच होती.आता दुपारचे २ वाजलेले!




परत सामान आवरून समोर दिसणारया प्रतापगडाकडे कूच केली.मार्ग ऊभ्या चढाचा!



सरळ सध्या प्रतिबंधित अफजलखानाच्या कबरीकडे घेऊन जाणारा.कबरीपाशी पोहचलो आणि प्रतापगड स्वच्छ आणि संपूर्ण ऊभा ठाकला पण पार गाव दिसेना.ईथेही महाराजांचे नियोजन ध्यानात आले.शामियानाची जागा आपल्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात रहावी पण खालून पारमधून अफजलसेनेच्या नजरेतून दूर!!



पोलिसांनी निरूपद्रवी भटक्यांना प्रेमाने आतून बाहेरचा रस्ता दाखवला.मग प्रतापगडाचा बुरूज गाठून जावळीचे रुप डोळ्यात साठवले.खाली पार्कींगपाशी येऊन कोकम सरबत ,जलजीरा यांनी शरिरातील पाण्याची पातळी संतुलित केली आणि प्रतापगड म.श्वर एस टी ने जावळी फाटा गाठला.६ वाजलेले.



आम्हाला मुक्कामास दरे गाव गाठायचे असल्याने लगेच चालायला सुरूवात केली.साधारण २ कि मी वर जावळीतील मंदीर लागले. त्याशेजारीच जावळीचे राज्यकर्ते चंद्रराव मोरेंचा वाडा होता.आता मात्र झुडूपांचे माजलेले रान आणि शेतावरल्या बांधास्वरूप चौथरा ईतकेच त्याचे अस्तित्व ऊरलेय.काळाचा महिमा अगाध आहे ज्या चंद्रराव मोरेंच्या अधिपत्याखाली जावळीचा तत्कालिन एवढा महत्वाचा प्रदेश आणि रायगड, चंद्रगडसारखे गड होते त्यांची साधी पाऊलखूणही शिल्लक नाही!! आणि ज्या महाराजांना त्यांनी राजा मानायला नकार दिला त्या छत्रपतींच्या नावावर आजही ३७० वर्षांनंतर राज्यकर्ते गादीवर बसतात.(शिवछत्रपती का आशिर्वाद).असो.



जावळीच्या  दोन तीन वाड्या ओलांडून रस्त्याच्या शेवटी असणारे दरे गाठेपर्यंत अंधार दाटला होता.मुक्कामासाठी शाळेच्या आवारात पथारया पसरल्या.शेजारील काकांनी जेवणाचे विचारले आणि झणझणीत पिठल भातावर ताव मारुन ९ च्या सुमारास स्लिपींग बँगमध्ये शिरलो.आजचा मोठा दिवस संपला होता.



दुर्गम गावातील पहाटही तेवढीच नयनरम्य! पहिला गजर गावातील कोंबड्यांचा.आश्चर्य म्हणजे एकाच वेळी रानकोंबड्या आणि गावातील कोंबड्याचा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता.रात्री झोपायच्या वेळी जोर गावात क्रिकेटची मँच खेळायला गेलेली पोर निसणीच्या वाटेन ऊतरली होती.वरून येताना पडणारया टाँर्चच्या प्रकाशझोतात वाटेचा अंदाज येत होता.सर्व सकाळचे विधी ऊरकून चहा घेऊन बरोबर ७ वाजता मोरे मामांचा निरोप घेतला.



गावच्या शेजारचे कोरडे सावित्री नदीचे पात्र ओलांडून सरळ वर ऊत्तरेला निसणीची वाट आहे.एक छोटी टेकडी चढून एक टप्पा पार करताना मागे वळून टुमदार दरे गाव मागे लोडविक पाँईंट आणि जावळीच्या वाड्या पूर्ण घनदाट जंगलात ऊठून दिसत होत्या.



परत एक टेकडी मागे टाकून वरच्या निसणीच्या दांडाला लागलो.आता चढ अतितीव्र होत होता.



थोड्या अवघड प्रकारच्या घसारयाचा टप्पा पार करताना एक जीर्ण घाटदेवतीची घुमटी ऊनंपावसाचा मारा सहन करत ऊभी होती.



सर्व सुरक्षित वर आल्यावर पुढे एक अरुंद ट्रँव्हर्सवरुन वरच्या पठारावर जोडणारया जंगलाच्या वाटेला लागलो.



अगदी काही मिनीटात वरच्या पठारावर पोहचलो.वरुन खाली जावळीचे खोरे, मागे महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर निर्मीत प्रतापगड आणि पलिकडे मधुमकरंदगडपर्यंतचा परिसर! काही नजारे ह्रदयाच्या कोपरयात कायमचे कोरले जातात त्यापैकीच हा एक!

क्षणभर विश्रांतीनंतर क्षेत्र महाबळेश्वरची वाट पकडली पण ही वाट घनदाट अरण्यात जाऊन हरवली.आता काय करावे? मागे जावे? पण एकमताने पुढे जायचा निर्णय घेतला.आता थोडाफार अनुभव आणि सक्षम सवंगडी असताना कठीण प्रसंगावर मात करण्यास फार वेळ लागत नाही.जंगलात कुठे चाललोय हे समजेना अधूनमधून जंगली जनावरांच्या पायवाटा ओलांडत, कुठे वाकून, कुठे काटेरी झुडूपं चुकवत पूर्वेच्या दिशेन चालत राहीलो आणि अचानक वाहनाचा आवाज आला.जल्लोषात सर्व जवळजवळ पळत आर्थर सीट क्षेत्र महाबळेश्वर या डांबरी सडकेला लागलो.४ कि मी चालत मंदीरापाशी पोहचलो.तिथून एका जीपने राजभवन आणि कपडे बदलून वाईकडे प्रस्थान ठेवले.वाईत शिवशाहीमध्ये सुग्रास भोजन करून दुपारी ३ ला पुणे गाठले.

अनेक घाटवाटा पालथ्या घातल्या पण ह्या भटकंतीने छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटा आणि ह्या लोकातित राजाच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली भूमी अनुभवायला मिळाली ही फार मोठी जमेची बाजू!

धन्यवाद मित्रांनो! भेटू परत एखाद्या भन्नाट घाटवाटेसह!



भौगोलिक स्थान आणि अंतर :

पुण्यापासून महाबळेश्वर १२० कि मी अंदाजे.

सुरूवात : बाँबे पाँईंट  ; शेवट : क्षेत्र महाबळेश्वर.

गड : प्रतापगड

घाटवाटा : रडतोंडी आणि निसणी

श्रेणी : मध्यम 

काय पहाल : शिरवली मंदीर, जुना शिवकालीन पुल, रामवरदायिनी मंदीर पार, प्रतापगड, जावळीचे चंद्रराव मोरेंच्या वाड्याचा चौथरा आणि जुने महाबळेश्वर मंदीर.

मुक्काम : दरे गावातील प्राथमिक शाळा.

Link for article published in saptahik sakal.

http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20170227/4855103307649065500.htm

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून ते आपण जपले पाहीजे.



23 comments:

  1. Replies
    1. हीच वाटेच्या शोधात होतो , म्हणतात ना काखेत कळसा गावाला वळसा

      Delete
  2. सरळ भाषेतला आेघवता सुर...वा...! तुषार ..सुरेख

    ReplyDelete
  3. एका नावाची अनेक गावे शहरे जगात आढळतात. तसेच महाराष्ट्रात देखील आढळतात.. जसे सिंगापोर..शिरवली..
    लेख आणि छायाचित्रण अप्रतिम..

    ReplyDelete
  4. अप्रतिम वर्णन ,जावळी चं खोरं आणि या दोन घाट वाटा मला ही पाहण्याची इच्छा झाली तुम्ही लिहलेले वर्णन वाचुन.....परिसराचे निरिक्षण खुप छान करता .....अभिनंदन

    ReplyDelete
  5. छान लेख आहे. पहावे एकदा करून.

    ReplyDelete
  6. शिरवली गावातली वीरगळ झकास...
    सुटसुटीत आणि आटोपशीर वृत्तांत...
    मस्त...

    ReplyDelete
    Replies
    1. jitubhai thank you so much! actually we lost the road but it turns into surprise!

      Delete
  7. रडतोंडी घाट चा विडिओ टाकणार का youtub वर

    ReplyDelete
  8. रडतोंडी घाट चा विडिओ टाकणार का youtub वर

    ReplyDelete
  9. खूप छान सर..आम्हाला पण करायचा आहे पण कधी करावा तुमच्या मते.

    ReplyDelete
    Replies
    1. 9769636595 आपण एकत्र येऊन काही करू शकतो?

      Delete
  10. आम्ही याच ट्रेक साठी काही मित्र शोधत आहोत. जर तुम्हाला या ट्रेकला जॉईन व्हावे असे वाटत असेल तर 9769636595 या क्रमांकावर संपर्क साधावा.

    ReplyDelete
  11. दादा , नेहमीप्रमाणे छान ब्लॉग, भटकंतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर वेगळी अनुभूती येते,त्यात शिवकाळातील संदर्भ असेल तर मावळे होऊन जातात.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खर! धन्यवाद दिलीपभाऊ!

      Delete
  12. सहजसुंदर.. आणि छानच, तुषार!ऐतिहासिक वाटांची खुमासदार भटकंती!
    😊👍

    ReplyDelete