Friday 31 March 2017

राजधानीच्या दक्षिणटोकाच्या सर्वांगसुंदर वाटा - सुपेनाळ - गोप्याघाट!


मी झुले मस्तीत माझ्या! भोवती आभाळ नाचे!
संपला अंधार येथे...तेजही येथे निमाले
 - सुरेश भट


 सुरेश भटांच्या ह्या ओळींची अनुभूती सह्याद्रीच्या ऊंचच ऊंच कड्यांमध्ये अन दुर्गम दरयाखोरयात स्वच्छंद भटकंती करणारया प्रत्येक भटक्यास येते.अशाच ह्या सह्याद्रीतील असंख्य लपलेल्या घाटवाटांपैकी अजून दोन धमाल घाटवाटांच्या भटकंतीचा अनुभव आपल्यासाठी!

राजगड आणि रायगड ह्या स्वराज्याच्या दोन बुलंद राजधान्या जोडणारया अनेक वाटांपैकी घाटमाथ्यावरून सर्वात दक्षिणेच्या टोकाच्या वेळवंड खोरे आणि शिवथर खोरे यांना जोडणारया दोन  वाटांची भटकंती करण्याचे नियोजन होते त्याला निमित्त झाले ते सह्यमित्र आणि प्रसिद्ध ब्लॉगर साईप्रकाश बेलसरेच्या नुकत्याच प्रसिद्द झालेल्या सुंदर ब्लॉगचे! तसेही भटकंतीचे वेड स्वस्थ बसू देत नाही पण कडक ऊन, पाण्याची कमतरता ह्या बाबी लक्षात घेता अशा दुर्गम वाटांच्या नादाला लागताना थोडी अनामिक भितीही असते.अर्थात जबाबदारीने ट्रेक करण्यासाठी तीही आवश्यकच आहे.पण काटेकोर नियोजनाने आता कठीणतेकडे झुकणारे अनेक ट्रेक सहजसाध्य होत आहेत अर्थात आमच्या सवंगड्यांच्या  ऊत्सुकतेला सकारात्मक आत्मविश्वासाची ( अति नव्हे) जोडही यासाठी कारणीभूत आहे.असो!



शनिवारी दुपारी पुण्यातून निघून कापूरहोळ भोर वरुन वरंध घाटाच्या सुरूवातीला ऊजवीकडे सांगवीकडे गाडी एकेरी आणि खडबडीत रस्त्यावर वळवली तेव्हा जवळजवळ ३.३० वाजलेले.साधारण २० कि मी चे अंतर कापायला तासभर लागला.डावीकडे कोकण आणि ऊजवीकडे डोंगररांग अशा ट्रॅव्हर्सचा असा हा वाहतूक तुरळक असणारा मार्ग! ४.३० ला सांगवी गावात शाळेसमोर गाडी लावली आणि गावकरयांना ऊद्या येतो ही कल्पना देऊन ,परत गावाच्या अलिकडे असणारया पोल्ट्री ब्रिडींग फार्मच्या गेटसमोरून पश्चिमेला सुपेनाळेच्या वाटेला लागलो.यावेळी निलेश वाघ ह्याने जानेवारीतच गोप्या सुपेनाळ असा ट्रेक केला असल्याने स्थानिक वाटाड्याची आवश्यकता भासली नाही.



ऊन्ह आता मावळतीला होती.थोडा ऊशीरच झालेला.साधारण अर्ध्या तासात कोकणाच्या दऱ्या खोऱ्याला  भिडणारया कड्यापाशी पोहचलो.खाली मावळतीच्या ऊन्हात शिवथर परिसर एका गुढ अशा सांजप्रकाशात वेढला गेला होता.



दरीला अगदी खेटून एक दगडाची भलीमोठी रास दिसली.घाट ऊतरण्याआधी गावकरी १ दगड घाटदेवतेला वाहतात.ईथूनच थेट ८० अंश कातळाचा आणि नंतर घसारयाचा वळसा पार करून आपण नाळेच्या मुखाशी पोहचतो.बहुतांशी घाटवाटांच्या मार्गावर ऊतरण्यासाठी हे जिगसाँ पझल सोडवणे गरजेचे आहे मग तुम्ही मुख्य वाटेला पोहचता.




तशी ही नाळ पूर्णपणे झाकली गेलेली आहे.गुगलवर तर हिचा अंदाज लावणे कठीणच!



नाळेला लागल्यावर तीव्र ऊतार आणि दगडगोटे पार करत एका टप्प्याला डावीकडे घसारयाची पायवाट लागते.




ती पार करत आपण दुसरया टप्प्याला लागतो.ईथे दगड रचून वाट सुकर करण्याचे प्रयत्न केलेले दिसतात.



मग थोडा अजून दगडधोंड्यांचा मार्ग पार करून खाली एका जंगलात पायवाटेला लागता येते.तस अशा आडवाटेवरचे निवांत पहुडलेले दगडधोंडे ,     पालापाचोळा एखादा धनगर किंवा आमच्यासारखे भटके यांचा पदस्पर्श झाल्यावरच कुस बदलतात पण कधीतरी जाग केल्याचा राग म्हणून चितपटही करु शकतात.



आम्ही साधारण पाऊण तासात ह्या ठिकाणापर्यंत पोहचलो.जंगल पार करताना नाळेचा अंदाज यावा म्हणून एक छायाचित्र घेतले.



ईथून सरळ चाल आम्हास सह्याद्रीच्या वाडीत घेऊन गेली.



ईथे एक लग्नसमारंभाचे जेवण करुन मग शिवथरच्या लोकांसोबत जा असे आग्रहाचे निमंत्रण घळीपर्यंत पोहचायचे असल्याने टाळले.सरळ वाडी पार करुन पुढे निघालो.पण कुठेतरी गफलत झाली आणि वापरती वाट पकडून आम्ही गोप्याची वाट पार करुन जंगलातील आंबे शिवथरच्या वाटेला लागलो.



सूर्य मावळला होता आणि खाली ऊतरायची चिन्हे दिसेनात म्हणून चर्चा करून परत आल्या वाटेने माघारी निघालो.नशीब चांगले म्हणून बरोबर जिथे गोप्यातून खाली शिवथरला ऊतरतो तिथेच वर बोपे गावातील दादा भेटले आणि त्यांनी वाट समजवली.या गोंधळात अंधार दाटू लागला.मग भरभर खाली ऊतरत दोन टेकड्या ऊतरून एका वाडीपाशी पोहचलो.पाणी पिऊन तिथून कसबे शिवथरच्या प्रकाशाच्या दिशेने टाँर्च लावून वेग पकडला.अंधारातच पूल पार करून कसबे शिवथरमध्ये पोहचलो.ईथे समर्थ शिवथरमधील बाबू कदम यांनी घळीच्या डांबरी रस्त्याला लावले.

पाऊण तास अजून चालून शिवथर घळीला पोहचलो तेव्हा रात्रीचे ८.३० वाजलेले.शिवथर घळ म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी.छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींचे नाते विशद करणारे काही पुरावे आहेत की नाही कल्पना नाही पण दोन्ही पुरूषांचे कार्य मात्र असामान्यच!किंबहुना राजाला जेव्हा धर्माचा पाठिंबा असतो तेव्हा त्याचे कार्य अधिक सुकर होते.असो.


पावसाळ्यात ह्या जागेचे सौंदर्य बावनकशी! मोठा कोसळणारा धबधबा आणि धीरगंभीर असे वातावरण असणारी घळ! एकमताने खाली साळुंके काकांना झुणका भाकर जेवणासाठी बनवण्याची विनंती केली.मग तडक सुंदर मठात मुक्कामासाठी जागा मिळते का म्हणून विचारायला गेलो.तेथील काकांनी स्वागत करून मामा काणे हाँलची चावी दिली आणि सकाळी निघण्यापूर्वी चहा प्यायला याच असा प्रेमळ आदेश दिला.टाँयलेट, बाथरूम लाईट ,फँन अशा सर्व अनपेक्षित  सुविधांनी सज्ज अशा दालनात  सुखावत पथारया पसरुन ताजेतवाने झालो.नंतर जेवण करण्यासाठी गेलो.ताक, कोकम सरबत यांनी पाण्याची भरपाई करत यथेच्छ भोजन करून परत आलो. थोडक्या गप्पा करत निद्रीस्त झालो.आजचा दिवस संपूर्ण झाला होता आता ऊद्या गोप्या करून परत सांगवी!

दिवस २ :

रात्री लवकर झोप लागली नाही कदाचित आता एवढ्या सुविधा ट्रेकमध्ये शरिराला मानवत नसाव्यात पण सकाळी लवकर म्हणजे ६ ला ऊठून सर्वांनी आवराआवर केली.ऊशीर झाल्यास तळपत्या ऊन्हात तासाभराच्या चालीला ४ तासही लागू शकतात ह्याची कल्पना असल्यानं सर्व गपगुमान कुरकूर न करता चाललेलं.सर्व तयार झाले अनं चावी देण्यासाठी आणि दर्शनासाठी वर मठात गेलो.



दर्शन घेऊन मग चहा घेतला.व्यवस्थापक काकांचे आभार मानून मठ सोडला.खाली साळुंके काकांनी बनवलेल्या पोह्यांनी दुपारी ऊशीरा जेवलो तरी चालेल एवढे पोट भरले.काल आम्ही आलेली डांबरी सडक सोडून सरळ जवळचा शेतातला मार्ग पकडला.जवळच खडकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.अनेक पुरातन समाध्या आणि दगडी बांधकामाचे अवशेष नवीन बांधकामात जागा नसल्याने अडगळीत पडलेले बघून वाईट वाटले.



आता सकाळच्या सोनेरी प्रकाशात कसबे शिवथर



नंतर नदीचा पूल पार करत कालच्याच गोप्या घाटेच्या वाटेला लागलो.



सकाळच्या कोवळ्या ऊन्हात सोनेरी धुलीकण ऊडवत झपझप गोप्या घाटाच्या अलिकडे टेकडीला कधी पोहचलो समजलेच नाही.काल अंधारात चाचपडणारी पावले आज सराईतासारखी कदमताल करत होती.



तसा गोप्याघाट हा स्थानिकांच्या रोजच्या वहिवाटीचा! चांगली मळलेली प्रशस्त पायवाट घाटाच्या मुख्यवाटेपर्यंत असून मुख्य वाटही तशी वळणावळणानी सावकाश वर घेऊन जाणारी.एखादा गावकरी बोजा घेऊन आरामात ये जा करु शकेल अशी.



दगडधोंडे आणि दाट सावलीतून वर जाताना एका टप्प्यावर दगडाच्या दोन पायरयाही अस्तित्वात आहेत.





शेवटचा टप्पा मोजून पाऊण तासात सहज गाठला.येथे झाडांची शानदार कमान घाटावर आपले स्वागत करते.
ह्या कमानीआधी ऊजवीकडे थोडा कातळाचा १५ २० फूटाचा चढ चढला की बांधीव थंडगार पाण्याचे टाके आहे.



मनसोक्त पाणी पिऊन मग त्याच थंडगार पाण्याने लिंबू जलजीरा सरबत प्रत्येकाने बाटलीभर बनवून प्यालो.कमानीत शिरताच डावीकडे एक गधेगळ आहे.



( गधेगळ म्हणजे दिलेला शब्द मोडला तर त्याचे परिणाम म्हणून .....स्री वर अत्याचार करणारे गाढव कोरले जाते.) अशी विचित्र आणि अपमानास्पद शिळा कोरण्याची प्रथा का आणि कोणी चालू केली याचे ऊत्तर ईतीहास संशोधकच देऊ शकतील.

गोप्याच्या रोजच्या वापरासंदर्भातील प्रचिती यावी असा अनुभव आम्हाला आला.काल सह्याद्रीच्या वाडीत लागलेल्या लग्नातील नवपरिणीत दांपत्य वर्हाडासोबत आणि आहेराच्या सामानासकट वर प्रकटले.विशेष म्हणजे नवरदेव सुटाबुटात आणि नवरी साडी नेसून!गधेगळीला नारळ वाढवून त्यांनी घाटमाथ्यावर प्रवेश केला..आता जावयाला जेवायला बोलावले तरी वर जेवणाचे पार्सल आणा म्हणून अडून बसायचा असा विनोदी विचार वर्हाड्यांना सांगितला आणि हसत हसत ते बोपे गावाकडे रवाना झाले.



आता ताजेतवाने शरीर घेऊन सांगवीकडे परत निघालो.वाटेत बोपे समाजमंदीरातील असंख्य वीरगळी पाहून आणि खालून सोबत आलेल्या एका नाथपंथीय साधूला बोपे बनेश्वरच्या रस्त्याची दिशा समजावून निघालो.











ऊन तापले होते आणि ५/६ कि मीचा खाली वर तंगडतोड रस्ता पार करताना चांगला घाम निघाला.



शेवटी एकदाचे सांगवी गाठले.शाळेच्या हौदावर मिनी अंघोळ करून परत आल्या वाटेने पुण्याकडे निघालो.दुपारी २ च्या सुमारास हायवेवर कापूरहोळला मनसोक्त भोजन ऊरकून ४ पर्यंत घरी सुखरूप पोहचलो.

स्वराज्याच्या मध्यवर्ती भागात असणारया ह्या वाटा खरोखर शानदार आहेत.जावळीच्या मोरेंच्या ताब्यात असा सुफल आणि अफाट प्रदेश असल्यानेच ते 
छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली यायला नकार देत असावेत यात शंकाच नाही.एक मात्र नक्की पुस्तकाबाहेरचा ईतीहास समजायचा असेल तर अशा वाटा आणि प्रदेश वारंवार पालथा घालावा लागेल.

धन्यवाद! भेटू लवकरच नवीन वाटांसह!

ट्रेक दिनांक : 18/19 मार्च

सुपेनाळ : 
घाटमाथ्याचे गाव : सांगवी
कोकणातील गाव : सह्याद्रीची वाडी, शिवथर
लागणारा वेळ : ऊतरायला ३.५०/४ तास शिवथर घळीपर्यंत.
पाणी : सांगवी खाली सह्याद्रीची वाडी.
श्रेणी : मध्यम सोपी.

गोप्याघाट :
घाटमाथ्याचे गाव : बोपे
कोकणातले गाव : कसबे शिवथर
लागणारा वेळ : शिवथरपासून बोपे ४ तास.सांगवी ५ तास.
पाणी: शिवथर ,घाटमाथा.
श्रेणी : सोपी.

सवंगडी : प्रशांत कोठावदे, मुकूंद पाटे, देवा घाणेकर, तुषार पोमण, शलभ पारिक आणि निलेश वाघ.

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे.










13 comments:

  1. अवघड वाटेचे
    सहज सुंदर शब्दांकन!

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन. ८०/८५ साली ह्या परिसरांत केलेल्या भटकंतीची आठवण ताजी झाली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! आपल्या आठवणी जाग्या झाल्या याचा मला आनंद वाटतो.आधुनिकीकरण होत असताना ह्या वाटांची सध्या ची स्थितीही नोंदली जावी हा ऊद्देशही आहे.

      Delete
  3. Sahyadriche Atishay sundar varnan, aprateem chaayaachitran, vachtana dole ghaat mathyawar bhirbhirtat .. ek mahina trek la gele nahi tar ase watate yuganyuge trekking band aahe ..sahyadriche Wed wede sahyadrichi odh nirantar. .. chhan lihilas ..sahhyadricha koparankopara pinjun kadhta ni amhalahi ashi odh laawun thewta... Ek ch number..👌👌

    ReplyDelete
  4. Replies
    1. धन्यवाद काका! काही ऊणीव असल्यास नक्की सांगा!

      Delete
  5. तुषार, अप्रतिम घाटांची यात्रा करून आलात.. आनंद वाटला.
    सुंदरमठाच्या दर्शनाने वेगळा पैलू उलगडलात. मस्त फोटू आणि वर्णन!
    घाटवाटांची गोडी अशीच वाढो.. लगे रहो..

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you sai! Your encouragement is valuable for me!

      Delete
  6. पुस्तकाबाहेरचा ईतीहास समजायचा असेल तर अशा वाटा आणि प्रदेश वारंवार पालथा घालावा लागेल.
    ह्या ओळी दमदार.
    सर्वांच्या नकळत फोटो काढण्याची कला अप्रतिम.
    आपले फारच विचार जुळतात,😂😂

    ReplyDelete
    Replies
    1. deva Thank you! Doing treks together also responsible for similar thoughts! Looking forward to do some more with you!

      Delete