Sunday 12 April 2015

किल्ले रोहीडा



We live in a wonderful world that is full of beauty, charm and adventure.
There is no end to the adventures we can have if only we seek them with our eyes open.

Jawaharlal Nehru



2015 चा क्रिकेट वर्ल्ड कप नुकताच सुरू झालाय! आणि रविवारी भारताची पहिली मॅच पाकीस्तानशी! अशा दिवशी ट्रेकमध्ये असतील असे निवडकच.त्यात ऊन वाढलेय म्हणजे आणखी त्रास.यावर प्रशांतच्या डोक्यातून सुपीक ऊपाय निघाला.ऊन टाळायचे आणि मॅच पण नाय बुडवायची.मग जवळचा किल्ला करू असे ठरले मग त्याने आधी केलेला रोहीडा निवडला.शनिवारी दुपारी 2.30 वाजता निघायचे आणि किल्ला पायथा बाजारवाडी 4.30 पर्यंत पोहचून वर जाऊन रविराजाला निरोप द्यायचा आणि दुसर्या दिवशी सकाळी ऊठून गडफेरी करून सूर्योदय टिपून 10 वाजेपर्यंत पुण्यात मॅचसाठी परत यायचे असा बेत ठरला.

यावेळी पोटापाण्याचा ऊद्योग म्हणून वकीली करणारे संदीपक फडके आणि अजय देशपांडे, नेहमीचा जोडीदार चिन्मय किर्तने, प्रशांत आणि मी असे पाच मेंबर्स तयार झालो.ठरल्याप्रमाणे दुपारी थोडे ऊशीराने पण सगळे सूस रोडला डेरेदाखल झाले.पटापट बॅगा गाडीत टाकत मंडळी भोरच्या दिशेने रवाना झाली.

वाटेत भोरला हॉटेल समाधानमध्ये चहापाणी झाले व बाजारवाडीच्या अलिकडेच मानकरवाडीच्या मंदीरासमोर गाडी पार्क करून सर्व जण रोहीड्याच्या स्वारीस निघालो.साधारण 4.30 ची वेळ होती ऊन अजून तापलेलेच.रोहीडा सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातील गडांप्रमाणेच ऊभ्या चढणीचा आणि त्यात भर म्हणून घसारा असणारा.




सुरूवातीलाच श्री शिवदुर्ग संवर्धन ची पाटी लागली आणि रस्ता पायवाट करून सोपा करायचा प्रयत्न दिसला.साधारण दोन टप्प्यांनंतर अंग घामाने ओलेचिंब झाल्यावर पहिला दरवाजा दृष्टीक्षेपात आला.मी सवयीप्रमाणे जुन्या वाटेने रॉकपॅच चढून दरवाजात पोहचलो.


तिथून सायंकाळच्या प्रकाशात पूर्ण परीसर चकाकत होता आणि गडाच्या ऊत्तरेकडे असणारा 'सर्जा'बुरूज सोनेरी रंगात झळाळत होता.



अलिकडे 'फत्ते' बुरूजावर 'भगवा 'गड राबता असणारया काऴाप्रमाणे डौलाने फडकत होता.






दरवाजात खाली ऊतरणारया गाववाल्याने स्वागत केले आणि सूचनावजा माहीती दिली की गडावर मुक्काम करताय तर अभक्ष खाऊ नका आणि अपेय पिवू नका कारण वर महाराज राहतात.गड स्वच्छ आहे कचरा करू नका.त्याला खात्री दिली की आम्ही ही सर्व जाणीव ठेवून फिरणारे आहोत मौजमजावाले नाहीत.मग थोडी फोटोग्राफी केली तोपर्यंत भिडू पोहचले मग दुसरा दरवाजा गाठला

.तिथे खोदीव व बांधीव पिण्याच्या पाण्याचे टाके आहे पण आमावस्येचा नैवेद्य पाण्यात सोडल्याने सध्या थोडे दुषीत झालेय.त्यानंतर महादरवाजा सोनेरी रंगात खूप ऊठावदार दिसत होता त्यावरच्या हत्तींच्या शिल्पाचे आणि शिलालेखाचे फोटो घेतले.




महादरवाजातून गडावर पोहचून सदरेवर हजेरी लावत रोहीडमल्लाच्या मंदिराकडे डावीकडे प्रस्थान केले.




तिथे सॅक टाकल्या व कॅमेरा घेऊन सूर्यास्त टिपायला निघणार तेवढ्यात सायंकाळच्या पूजाअर्चनेसाठी शुचिर्भुत होऊन तयार होत असणारया महाराजांनी  अंधार होण्याआधी पाण्याच्या टाक्यातून तुम्हाला पिण्यासाठी पाणी भरून आणा अशी सूचना केली




.मग स्टीलची बादली आणि दोर घेऊन महाराजांनी सांगितलेल्या पश्चिमेकडील टाक्यांच्या समुहातील पाणी घेऊन येऊ असे ठरले.तसेच पुढे सूर्यास्त टिपून येताना बादली आणायची ठरवली.महाराज स्वत: मार्ग दाखवण्यास आले मी सहज नेहमी करतो तशी चौकशी म्हणून विचारले, ' महाराज कोणत्या गावचे?' " पृथ्वी" ऊत्तर आले.मी मनाशी विचार करत असताना प्रशांत म्हटला अरे ते पृथ्वीच म्हटले.हे काहीतरी वेगळेच प्रकरण दिसते याची नोंद घेत पुढे निघालो.सर्व गड चकाचक स्वच्छ, जागोजागी दगड व्यवस्थित रचलेले, पायवाट मळलेली आखीव बघून ह्या दुर्गाला तरी कोणी तरी काम करतय हे दिसत होते.

'दामगुडे 'आणि' पाटणे 'बुरूजांच्या मध्ये पाण्याच्या टाक्यांच्या समुहाशेजारी एका गुहेसारख्या खोदीव आणि छत असणारया टाक्यातील पाणी बाहेरून दोर बांधून बादलीने भरले व चव घेतली, पाणी स्वच्छ आणि मधुर होते.बादली ठरल्याप्रमाणे ठेवून वाघजाई मंदीराच्या निटनेटक्या आणि डौलाने भगवा फडकणारया बुरूजावरून रविराजाला निरोप देण्यासाठी निघालो.

गडावरून दिसणारया सूर्यास्त आणि सूर्योदय यांची मजा काही औरच! एकतर कुठल्याही कॅमेरयातून सर्वांगसुंदर पॅनोरमा सहजरित्या बंदिस्त होतो.आणि आणखी एक म्हणजे सांजसावल्यांमध्ये 'गडप 'होणारया दरयाखोरयांमधील वाड्या वस्त्या तशाच अरूणोदयाबरोबर 'प्रकट' होतात.घोंघावणारया वारयाच्या आवाजात शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाने न्हालेले विविध बुरूज, तटबंद्या, दरवाजे आणि वास्तूंचे अवशेष सायंकाळच्या व पहाटेच्या गुढरम्य वातावरणात आपल्याशी हितगुज करतात आणि काही काळ का होईना मनाला एक वेगळीच शांतता लाभते.हा अनुभव अनेक भटक्यांना येतो ,तो मला प्रथम माझ्या पहिल्या ट्रेकमध्येच राजगडावर पावसाळ्यात भल्या पहाटे एकट्याने पद्मावतीच्या बुरूजावरून पांढरया स्वच्छ ढगांनी वेढलेल्या दरयाखोरयातून घोंगावणारया वारयात डोकावताना आला किंबहुना मला सह्याद्रीचे प्रेम तिथेच जडले असावे.असो


.

काही छान फ्रेम मिळाल्या, प्रशांतचेही सध्या नव्या डी.एस.एल.आरवर छायाचित्रणाचे बरेच प्रयोग चालू आहेत त्यातील निवडक त्याच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच.सूर्यास्ताबरोबर सांजप्रकाशात पुन्हा टाक्यांकडे जाऊन बादली घेऊन मंदिराकडे गप्पाटप्पा करत सर्व मार्गस्थ झालो.

रात्रीचे तयार जेवण आणले होते त्यामुळे खूप वेळ हाताशी होता.मंदिराच्या आत महाराज व त्यांचा एक अऩुयायी पूजा आटोपून स्वयंपाक करत होते.प्रथम आम्ही थोडे ताजेतवाने होऊन ओसरीत चर्चा करत बसलो मग हळूच मंदिरात डोकावलो बहुतेक आमची चर्चा ऐकून यांच्याशी बोलायला काही हरकत नाही अशी महाराजांची खात्री पटली असावी.मग त्यांच्याशी विविध विषयांवर बोलताना त्यांच्या विशेष व्यक्तीत्वाचा परिचय झाला.मुंबईतील महाविद्यालयातून बी.ई.सिव्हील ची पदवी घेतलेला तरूण अध्यात्माच्या मार्गाला लागून हिमालयात 8 वर्ष वेदविद्यांचा अभ्यास काय करतो आणि संन्यस्त जीवनाचे आचरण करताना एका जागेच्या मोहात न पडता देहू आळंदी पंढरपूरपासून वासोट्यासारख्या वनदुर्गावर काही महिने वास्तव्य करतो, रोहीड्यावर पुन्हा परत कधीही न येण्याआधी 5 ते 6 महिने राहतो.ईथे श्री शिवदुर्ग संवर्धन सारख्या संस्थांच्या संपर्कात आल्यावर त्याच्या मदतीने किल्ल्याचा कायापालट करण्याचे स्वप्न जागवतो आणि कंट्रू सर्वे पासून दगडांच्या कार्बन डेटींग पर्यंत विचार करून ईतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करतो.विलक्षण! सह्याद्रीने माणूस म्हणून आमचे खुजेपण अनेकदा दाखवले पण या माणसाच्या भेटीनंतर आमची बुद्धीही त्यांच्या विचारांपुढे खुजी वाटू लागली.

विचारात मग्न होत सहभोजन ऊरकले बाहेर काही प्राण्यांची चाहूल लागते का म्हणून जवळच्या टाक्यापर्यंत सर्चलाईटच्या प्रकाशात कानोसा घेतला पण प्राणी बहुतेक माणसांचा दिवस संपायची वाट पाहत असावेत.आत येऊन स्लिपींग बॅगमध्ये शिरलो आणि लवकरच गाढ झोप लागली.

पहाटे ऊठून तयारी करून कॅमेरा घेतला व पूर्वेला अरूणोदय होण्याची वाट बघत कॅमेरा सेट केला.ऊत्तरेच्या 'सर्जा' बुरूजावरून  खालील दरयाखोरया दूरवर पुरंदर ,ऊजवीकडे मांढरदेवीचा डोंगर,डावीकडे वाघजाई मंदीरापर्यंत ऊतरणारी डोंगरधार असा सुंदर भूभाग फ्रेममध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.सूर्योदय होतानाचे काही फोटो घेतले व गडफेरी करण्यासाठी डावीकडून वाघजाई बुरूज ,पाटणे बुरूज,दामगुडे बुरूज , टाक्यांचा समुह समोर डोकावणारा राजांच्या राजगडाचा बालेकिल्ला, पश्चिमेचा शिरवले बुरूज  व तेथून दूरवरचे रायरेश्वर पठार असा landscape डोऴ्यात आणि कॅमेरयात टिपत पुन: मंदिराकडे आलो.



सॅक आवरून प्रशांतने आणलेले लाडू खाऊन रोहीड्याच्या स्मृती डोक्यात जतन करत आल्या मार्गाने खाली ऊतरायला सुरूवात केली.गडपायथ्याशी आल्यावर गाडीजवळ येऊन पोहचलो.गाववाल्यांची सकाळची लगबग बघत सर्वांनी बॅगा गाडीत टाकल्या व परत पुण्याकडे निघालो.

वाटेत पुन्हा हॉटेल समाधानमध्ये नाष्टा केला, मॅच सुरू झाली होती .तसेच पुण्याकडे गाडी दामटली व 11 वाजता घरी पोहचलो.

महाराजांच्या स्वराज्याच्या सुरूवातीच्या काळातील साक्षीदार गड रोहीडा एकदा आवर्जुन भेट द्यावा असाच आहे.

ट्रेक मेटस्:  प्रशांत कोठावदे, संदिपक फडके, अजय देशपांडे, चिन्मय किर्तने आणि तुषार कोठावदे
ट्रेक कठीणता: सोपा
अंतर:  पुण्यापासून साधारण 2 तास
गडफेरी : 3 ते 4 तास.वाघजाई मंदीर केले तर अजून 3 तास.
पाणी: गडावर आहे.दामगुडे व पाटणे बुरूजाजवळ व दुसरया दरवाजाजवळ.वर चढताना 2 लिटर पुरेसे.
आभार: गडावर मेहनत करणारया श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या मावळ्यांचे.
पुन्हा भेटू नवीन गडावर नवीन अनुभवासाठी अल्पविश्रांतीनंतर!