Friday 5 May 2017

कोयनेच्या खोरयात - चोरवणे नागेश्वर वासोटा!




" एक घोट पाणी देतो का?" नाही रे वर गेल्यानंतरच पाणी पिऊ - इति मुकूंद .

कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मध्ये असलेल्या नवीन वासोट्याच्या पायथ्याशी असा संवाद आणि घामाने डबडबलेले शरीर, रात्री ९ ते ६ चा मोठा स्वत: गाडी चालवून केलेला पुणे महाबळेश्वर पोलादपूर खेड चिपळून चोरवणे हा प्रवास आणि लगेच सकाळी ७५० मीटर ची ऊभी ४ तासाची नागेश्वरची चढाई! चढाईतच बहुतेकांचे संपलेले ३/४ लि.पाणी, नागेश्वरचा आटलेला पाण्याचा साठा ह्या सर्व गोष्टी मनाची आणि शरीराची पुरेपुर परिक्षा पाहणाऱ्या! नागेश्वरला पोहचताच परिस्थितीचा आढावा घेऊन ऊरलेले पाणी खाली ऊतरण्यासाठी पुरेल एवढे तरी ठेवावे हा निर्णय! माझ्याकडे ४ लि पैकी ३ लिटर शिल्लक असताना तसेच फक्त जेवण करून घोटभर पाणी पिऊन मग पाण्यासाठी सर्वांच्या बाटल्या घेऊन १९ पैकी १२ जण लगेच वासोट्याला रवाना झाले! माझे पाणी तिथेच ठेवले.सर्व मिळून संकटसमयी पाण्यावाचून परत फिरावे लागले तर २ लि.पाणी बरोबर घेतलेले.नागेश्वर वासोटा कड्याच्या अगदी खेटून जाणारी डोळे गरगर फिरावे अशी पहिल्या टप्प्यातील वाट! अंतर ५ कि मी.नागेश्वरपासून २५० मीटर ऊंची.नंतर घनगर्द जंगलातून डाव्या हाताला खाली ऊतरत परत गडाजवळची चढाई!

वरील प्रेमाचा संवाद ऐकून सुनील पाटलांनी ४ काकड्या १ फोड प्रत्येकी अशी १२ जणात वाटली आता त्या काकडीच्या फोडीच्या आधाराने शेवटची चढाई! एवढे कमी की काय वर सुनील, मुकूंद आणि मी गवा वाटेजवळच चरताना बघितला.१ लि पाण्यात चोरवणे ते वासोटा सकाळी ७ ते दुपारी ४ केलेले श्रम पाहता गव्याने वाट वाकडी केली तर घसारयाच्या वाटेवर थकलेल्या शरीराला बाजूला व्हायचे पण त्राण नव्हते हे निश्चित! पण हळूवार आवाज होऊ न देता वासोटयाच्या माथ्यावर राजमार्गाने प्रवेश केला आणि डावीकडची वाट थेट पाण्याच्या भल्या मोठ्या निर्मळ टाक्याकडे घेऊन गेली.स्वर्गसुखाची अनुभूती याहून वेगळी ती काय असणार!

ऊन्हात सह्याद्रीच्या कडे कपारी जवळ करताना असे अनुभव अनेकांना येत असतील पण हा अनुभव माझी कणखरता वाढवणारा होता.

एप्रिल संपताना घाटवाटांची भटकंती चालू ठेवायची तर कांदाटी ,कोयना हे पर्याय अनुभवी ट्रेकर आणि आमच्या सह्याद्री ट्रेकर ब्लाँगर च्या प्रिती पटेल यांनी सुचवले आणि माझी नजर महिमंडण वासोटा ह्या क्षेत्राकडे वळाली.सुरुवातीला पाळंदे सरांनी ऊल्लेख केलेल्या शिंदी महाळुंगे आडोशी नागेश्वर या मार्गाचा ट्रेक करावा असे मनात होते पण वनखाते याला परवानगी देत नसल्याने ( खर तर आम्ही ट्रेकिंग करणारे निरुपद्रवी प्राणी! पण प्राण्यांच्या जंगलात परवानगी नाही! ) तो मार्ग बदलून चोरवणेचा पर्याय निवडला.



नानांच्या नेतृत्वाखाली १२ नाशिककर आणि पुण्याचे आम्ही ७ जण २९/३० एप्रिल चा हा ट्रेक निश्चित केला आणि २९ ला सकाळी ७ वाजता चोरवण्यातून चढाईला सुरुवात केली.हे गाव काही दुर्गम समजता येतील अशा जागेवरचे.एका बाजूला डावीकडे नागेश्वर आणि ऊजवीकडे नवीन आणि जुना वासोटा ७५० ते १००० मीटर ऊंचच ऊंच कातळभिंतींनी ऊठावलेले. गाडी जाधव यांच्या अंगणात लावून पहिली टेकडी चढताना च सर्वांची बोलती बंद! नंतर साधारण १.३० कि मी सरळ कच्चा रस्ता आपल्याला जांभ्या दगडातील पायरयांच्या दुसरया टेकडीवरच्या दांडावर घेऊन जातो.



ईथे बरयापैकी झाडी ओलांडत मध्ये एक पाण्याचा डोह ( डिसेंबर पर्यतच पाणी असते) असणारी जागा डावीकडे ठेवत एका सपाटीला पोहचतो.



लगेच दुसरया टेकडीचा दांड समोर ऊभा! 



नागेश्वर हे स्थानिक देवस्थान म्हणून नवस फेडणारया आणि यात्रेला जाणारयांसाठी पायरया आणि रिलींग जागोजागी दिसते.



खालून तीन टेकड्या चढून साधारण ४५० मीटर चढाई झाल्यावर ट्रँव्हर्सची ५० एक मीटरची सावकाश चढणारी वाट आणि मग थेट कातळकड्याची २५० मीटर चढाई! 



पूर्वी अवघड अशी ही चढाई रिलींग, साखळ्या, शिड्या यांनी बरयापैकी सोपी केलेली!





३.३० ते ४ तासात वरच्या नागेश्वर च्या गुहेपाशी पोहचलो.वळून पाहता तिच ती सह्याद्रीची कोकणकडची परिचित क्षितीजावर भिडणारी खोली, छोट्या मोठ्या डोंगरधारा , चिमुकली गावे वाड्या वस्त्या! 



नागेश्वर ची गुहा पश्चिमाभिमुख! चांगली प्रशस्त!



वर पथारया पसरुन आराम करावा म्हणून पहुडलो.तासाभरात सर्व भिडू दाखल झाले, येताना पाण्याची विहीर रिकामी असल्याची वार्ता घेऊन! त्यातच काहींचे पाणी वर चढतानाच संपत आलेले.सर्व स्थिरस्थावर झाल्यावर घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला पण आता आपण आणलेले पाणी आपल्याला नाही तर ईतरांना संकटसमयी देता येईल या विचारानं घोटभर पाण्यात जेवण संपवले.आता मुक्काम करायचा तर वासोटा गाठून पाणी आणायचे आणि तेही अंधाराच्या आत कारण संध्याकाळी प्राण्यांचा दिवस चालू होतो! मग १९ पैकी १२ ऊत्साही तयार झाले सर्व रिकाम्या बाटल्या दोन सँकमध्ये भरल्या आणि निघालो.



नागेश्वरच्या पायरया ऊतरुन जिथे वर आलो तिथूनच कड्याला खेटून वासोट्याला जाणारी वाट स्पष्ट दिसते.प्रत्यक्षात जंगलात घुसेपर्यंत ऊघडी बोडकी आणि घसारयाच्या या वाटेवर जरा जपूनच चालावे लागते.दोन टेकड्या चढ ऊतार करून वाट जंगलात शिरते.मग खाली २ कि मी तरी ऊतरावे लागते.वासोट्याच्या पूर्वेला राजमार्गाजवळ ही वाट बामणोलीहून बोटीने येणाऱ्या मार्गाला मिळते. येथून शिवसागराचे छान रुप पहायला मिळते.



मुख्य दरवाजा पर्यंत ऊभी वळणावळणाची दगड टाकून बांधलेली तर काही ठिकाणी घसारा!





 गव्याकडे एक नजर ठेवून माथ्यावर प्रवेश केला.समोरच मारूतीरायाचे मंदीर आणि शेंदूराने चकाचक चमकवलेली मोठी मूर्ती झाडाच्या सावलीत छान विसावलेली! 



डावीकडे वळून १०० पावलावर सुमधूर पाण्याचे ५० फूट x १५० फूटाचे टाके.



शेजारी एक पडीक टाके जनावरांना पाणी मिळावे असे.गव्याचे पायाचे ताजे ठसे बघून अगदी काही क्षण आधी तो ईथून पाणी पिऊन ऊतरल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते.आम्ही नशीबवान म्हणून वाटेवर भेटला नाही. नाहीतर १ टनाच्या वजनाने ८० अंशाच्या ऊतारावर आमची चटणी निश्चित होती.




पाण्याची कमतरता भरून काढत सर्व बाटल्या काठोकाठ भरल्या.थोडे थंडगार पाणी मस्तकावर ओतले.ताजेतवाने होऊन दक्षिणेकडे जूना वासोटा त्याचा अभेद्य अजस्र बाबू कडा पलिकडे अस्वल खिंड याचे दर्शन घ्यायला गेलो.रतनगडाच्या कात्राबाई समोरच्या बुरूजावर जशी धडकी भरावी अशी ऊंची आहे त्यातलाच हा प्रकार! 




मावळतीच्या सुवर्णप्रकाशात जुना वासोटा त्याच्या अवशेषांसह झळाळून निघाला होता.ज्यांना तिथे जाण्याचे भाग्य मिळाले त्यांचा हेवा वाटला.पूर्वेस कोयनेच्या शिवसागराचे रोडावलेले रूप!



 बामणोलीतून बोटीने ईथे येताना शिवसागराच्या पाण्याची सफर आणि मग घनदाटातून वासोटा हा अनुभव लवकरच ईतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.पुढची पिढी नागेश्वरातून नवीन वासोटा पाहून आमचा हेवा करतील बहुतेक!

आता शेवटच्या काही वेळात ताई तेलीणीच्या वाड्याचे सुंदर अवशेष,



 सुंदर दगडी छताचे मंदीर, 



ऊत्तर दिशेचा बुरूज आणि महिमंडण सुमारपर्यंत पोहचणारया रांगांचे लोभस रुप पूर्वेकडील सांजप्रकाशात न्हालेली दरी छोट्या वाड्या वस्त्या या नजारयाला मनाच्या आत साठवत परतीच्या प्रवासाला निघालो.



 खाली गवा अजून चरत होता.बहुतेक आमच्या जाण्याची वाट पाहत असावा.त्याची काही छायाचित्रे घेतली.मग झपझप निघालो.अंधाराच्या आत निदान ट्रँव्हर्स गाठावा लागणार होता.पण आता शरीर ताजेतवाने होते त्यामुळे आनंदात मावळतीच्या सूर्यनारायणाचे रुप नागेश्वरला पोहचून घेतले.वाटेत अस्वलाच्या ड्राँपिंग्ज जागोजागी होत्या.



कुलकर्णी काकांनी बनवलेली चविष्ट खिचडी आणि नानांची मलई बर्फी असा सुग्रास बेत होता.मग जेवण ऊरकून वासोट्याचा ईतिहास आमच्या तुषार पोमण ह्या अभ्यासू जोडीदाराकडून समजून घेत २.३० तासात चोरवणे गाठले.दुसरया दिवशी धामणंद मार्गे चिपळूण गाठून हाँटेल अभिषेकमध्ये जेवणाची मेजवानी झाडली.कुंभार्ली तून वर येताना जंगली जयगडाची रेकी करत आरामात ६ वाजता पुणे गाठले.

धन्यवाद! भेटू परत अशाच भटकंतीसह!

सुचना : ऊन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेने असे ट्रेक विचारपूर्वक करावेत.कमीत कमी ४/५ लि पाणी त्यातले १ लि सँकच्या आत फक्त आणि फक्त अतिसंकटसमयी आधारासाठी.

सवंगडी :
संजय अम्रुतकर, बापू पगार, किरण काळे, विपीन चौधरी, अश्विन अलई, रत्नाकर भामरे, जयंत धामणे, शेखर कावळे, दिपक शिर्के, घुमरे, संजय कुलकर्णी ,
मोहिमेचे मेडीकल आँफीसर - डॉ. अतुल साठ्ये ( नाशिक)
आदित्य वाणी, तुषार पोमण, मुकूंद पाटे, चिन्मय किर्तने, शलभ पारिक, सुनील पाटील आणि तुषार कोठावदे ( पुणे)



पायथ्याचे गाव : चोरवणे
माथा : नागेश्वर ( ७५० मी) ; वासोटा ( १००० मी)
अंतर : चोरवणे नागेश्वर ४ तास
नागेश्वर वासोटा नागेश्वर ५ तास.

श्रेणी : मध्यम अवघड

पाणी : डिसेंबर ते जून चोरवणे आणि वासोटा. मध्ये पाणी नाही.नागेश्वरची विहीर मातीने बुजली आहे.

सह्याद्री हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश असून आपण तो जपला पाहिजे.