Wednesday 21 February 2018

सह्यांकन २०१७ - अनवट वाटांचा सोहळा







प्रस्तावना !

"Life is an adventure, it's not a package tour!"

सह्यांकन २०१५ च्या भन्नाट अनुभूतीनंतर सह्याद्रीच्या वाटांची नव्याने ओळख झाली आणि सातत्याने अशा वाटांवर जुन्या जाणत्यांबरोबर नवीन ऊत्साही भटक्यांना फिरवताना जबाबदार गिर्यारोहणाचा वस्तुपाठ चक्रम हायकर्स, मुलूंडने सर्वांसमोर ठेवलाय.१९८३ साली काही मंडळी एकत्र येऊन चालू झालेला हा चक्रमचा कारवा वाटेत ईतरांना सामील करून वाटचाल करतोय.त्यामुळे अनिकेत रहाळकरने जेव्हा मला डिसेंबर २०१६ मध्ये सह्यांकन पायलट विषयी विचारले तेव्हा मी क्षणार्धात त्याला होकार दिला.

मग हळूहळू चक्रमांचा प्रवास जवळून अनुभवताना त्यांच्या टिमचा सभासद कधी झालो कळलेच नाही.डिसेंबर २०१६ ला केलेला पायलट रूट हा सह्यांकन २०१७ चा रूट असेल असे तेव्हा वाटले नाही. मार्ग निश्चितीची ही प्रक्रिया म्हणजे ऊसापासून साखर बनण्यासाठी त्यावर जितके सोपस्कार केले जातात तेवढी मोठी!☺️त्यावर पायलट रिपोर्ट बनवून त्याचे पुर्ण पोस्ट मार्टम करुन मगच तो मार्ग निश्चित केला जातो.

 अर्थात ते जरूरीचे आहे कारण जेव्हा १५० नव्या जुन्या सहभागी भटक्यांना आपण डोंगरात नेतो तेव्हा त्यांची क्षमता, त्यांची सुरक्षितता, पर्यावरणाला बाधा पोहचणार नाही अशा छावण्या असे बारीकसारीक अनेक घटक तपासले जातात.दोन छावण्यांमधील अंतर, त्याला लागणारा वेळ, पाण्याची ऊपलब्धता, मार्गातील सुरक्षित करण्याची गरज असलेले अडथळे! बापरे!

 मीही आमच्या सवंगड्यांसह अनेक दुर्गम वाटा गेल्या काही काळात भटकतोय पण व्यवस्थापन कसे असावे हे शिकायचे तर डोंगरातील व्यवस्थापन या विषयात आय आय एम ला चक्रमचा कोणताही नेता मानद प्राध्यापक होऊ शकतो!
असो!

यावेळीचा मार्ग होता,

दिवस १ : गुंडे वालशेत पाथरा घाट कुमशेत पठार!
दिवस २: आजोबा माथा, गुहिरीचा दरा आणि देहने!
दिवस ३ : करोली घाट, सामरद, घाटघर!
दिवस ४ : अलंग मदन खिंड, मदन, कुलंग ट्रँव्हर्स, कुलंग!
दिवस ५ : छोटा कुलंग माथा, ट्रँव्हर्स, गाढवघाट, लादेवाडी!

एकूण छावण्या ५ : १.गुंडे
२.कुमशेत पठार
३.देहने
४.घाटघर
५.कुलंग माथा.

एकूण घाटवाटा ४ : १.पाथरा
२.गुहिरी
३.करोली
४.गाढवघाट

एकूण गड व पर्वत माथे ३ :
१.आजोबा
२.कुलंग
३.छोटा कुलंग.

असा भरगच्च शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासणारा कार्यक्रम! त्यातच महेश भालेराव, भाऊ वैंशंपायन, पिनाक पुराणिक यांच्यासोबत दुसरयांदा मार्गाचे अवलोकन आणि वाटेवर बाण मारण्यासाठी आँक्टोबर मध्ये गुंडे ते देहने असा ट्रेक केला.यावेळी चक्रमचा गटनेता म्हणून अनिकेत मिरवणकरसोबत पहिला ३० लोकांचा गट नेण्याचा बहुमान मिळाला.ईतक्या मेहनतीनंतर प्रत्यक्षात आपली योजना काम करतेय की नाही हे तपासण्याचे काम पहिला गट करत असतो ( गिनी पिग) !☺️ त्याचे नेतृत्व करायचे अवघड काम कसे पार पडणार याची चिंता कधी नव्हे ती लागली.पायलट, रुट मार्किंग केलेले असल्यामुळे खरतर सोप वाटायला पाहिजे पण जबाबदारी आल्याने थोड टेंशन होतच! अर्थात चक्रमचा पाठिंबा आणि अनिकेतसारखा सक्षम नेता सोबत असल्याने आणि गटातील बहुसंख्य सदस्य माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे आणि सोबत अनेक ट्रेक केलेले असल्याने सगळे व्यवस्थित पार पडेल याची शाश्वतीही होती.

अखेर २१ डिसेंबर २०१७ ला सर्व तयारी पुर्ण करून काही पुण्यातील सहकारयांसह चक्रमचे मुलूंड आँफीस गाठले आणि रात्री १० च्या सुमारास बसने मुलूंडहून गुंडे प्रवास सुरु झाला.निरोप द्यायला चक्रमचे अध्यक्ष किरणदादा देशमुख, माधव फडके आणि ईतर सदस्य ऊपस्थित होते.किरणदादा आणि माफा ( माधव फडके) यावेळी वाँर रूम सांभाळणार होते मुलूंडहून!


रात्री १२.३० च्या सुमारास गुंडे गाठले आणि लगेच झोपायची तयारी केली.येथे विनय नाफडे ( लांबा)  आणि प्रणव नाफडे ( पंकू) हे छावणी प्रमुख! ऊद्या पहाटे प्रत्यक्ष ट्रेकला सुरूवात होणार होती त्याचा विचार करत निद्राधीन झालो!

भाग १ .....