Tuesday 3 October 2017

दारयाघाट आणि डोणीदार - दमदार भटकंती





'ओ दादा' असा बेंबीच्या देठापासून आवाज किरणदादांनी दिला आणि दुर्ग ढाकोबा पठारावर चाललेल्या आँफलाईन गुगल मँपच्या भटकंतीला दुर्गवाडीची दिशा मिळाली.

मावळलेल्या दिवसासोबत आम्हा भटक्यांचा संयमही मावळतीच्या टोकाकडे चाललेला त्यात रानवाटा तुडवून निर्मनुष्य पठारावरच्या भटकंतीला चोहीकडे घनगर्द जंगलाने वाट अडवलेली! दुर्गवाडीतील एक आदिवासी कुटूंब पावसाच्या आगमनाबरोबर बाहेर येणाऱ्या चिंबोरयांना मशाली च्या प्रकाशात पकडण्यासाठी या आडरानात शिरलेले आणि दोन पोरांना सोबत देऊन शेवटची अर्ध्या तासाची चाल त्यांनी सुकर केली अन्यथा धुक्याच्या चादरीत पावसाच्या शक्यतेने आणि जंगली जनावरांच्या सानिध्यात रात्र जागवणे असाच या भटकंतीचा मुक्काम होणे आहे याची बहुसंख्य सवंगड्यांना तीव्र जाणीव निश्चित झालेली.
आज सकाळी ५ वाजता पुणे सोडून लोणावळा कर्जत म्हसा असा प्रवास करुन ८.३० ला जेव्हा हाँटेल गुरुप्रसाद समोर गाडी थांबली तेव्हा सर्व जण यथेच्छ पेटपुजेच्या तयारीत आणि नेमके पूर्ण गावच बंद! मग तसेच पुढे सिद्धगड, गोरखगड यांच्या पावसाळी नभांना कवेत घेणाऱ्या आणि गत भटकंतींची आठवण जागवणारया सह्यरांगेच्या सानिध्यात धसई गाठले.चौकात खमंग वडापाव, मिसळ, समोसा यावर तुटून पडत वरुन गरमागरम चहा घेतला आणि गाडी पळूच्या दिशेने वळली.पळूत नाशिककर ४ साथीदार आधीच पोहचलेले.त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा विदाऊट पासपोर्ट सिंगापूर!

वाहन एका घरासमोर पार्क करून सर्व जण ९.३० च्या आसपास पाठीवर सँक लादून तयार झाले.गावातील दोन पोर वरच्या ओढ्यापर्यंत वाट दाखवायला तयार झाले.
डावीकडे नानाचा अंगठा, जीवधन, वानरलिंगीचा सुळका नाणेघाटाच्या वैशाखरेतून केलेल्या भटकंतीची आठवण जागवत होते.समोर ढाकोबाचा पहाड छातीवर होता.ऊजवीकडे दुर्गपर्यंत पसरलेले पठार आणि खालच्या बाजूला पळूची लेणी डोकावत होती.एकंदर ऊंची बघता चांगला घाम काढणार याचा अंदाज करत पुढे सरकत होतो.

दोन टेकड्या पार करून वरच्या ओढ्याला लागलो आणि वाटाड्या पोरांना निरोप दिला आता ओढा ओलांडून वाट शोधत नाळेत पोहचलो.भल्यामोठ्या दगडांच्या राशी अन ऊभा चढ! लहान मोठ्या असंख्य शिळा वाट शोधत पार करत हळूहळू वर चढाई करताना वाटेत एक छोटा धबधबा लागला तिथ थोडी विश्रांती घेतली.
पुढ थोड्या सोप्या कातळचढाई नंतर नाळेच्या वरच्या टप्प्यात पोहचलो.आता चढाई अजून तीव्र होत होती आणि वर धुक्याची दुलई! नाळ संपली तशी वाट डावीकडे कड्याला चिटकून वर गेली.थोड्या पायरयांच्या टप्प्यावरून परत ऊजवीकडे वळाल्यावर नाळ संपली त्यावर पोहचलो.एक कारवीचा चढ चढून ढाकोबाच्या अंबोली खिंडीत पोहचलो.पलिकडे अंबोली गाव ता.जुन्नर! तिथ शेंदूर फासलेले ढाकोबाचे वनमंदिर ( मूळ मंदिर पुढे आहे)

दुपारचे १.३० वाजलेले मग सर्वांनी शिदोरया सोडून धुक्यात हरवलेल्या दरीशेजारी यथेच्छ मेजवानी झोडली.
खर तर काही काळ विश्रांती जेवणानंतर अशा पायपीट असणाऱ्या भटकंतीत आवश्यक आहे पण एकंदर दुर्गवाडीत पोहचायचे असल्याने तो विचार मनातून काढून टाकला आणि पाठपिशव्या लादून निघालो. मंदिरापासून पूर्वेस वर एक दरीच्या बाजूचा कडा चढण्यास सर्व सज्ज झाले.हा जरा अवघड श्रेणीचा याचे कारण दरीच्या बाजूस पूर्ण मोकळा आणि फक्त पाऊल बसेल एवढ्या खोबण्या! एका गावकरी दादाच्या प्रोत्साहनाने ही अवघड चढाई सर्वांनी सुरक्षित पार केली.थोडा ऊभा कडा चढून वर पठारावर पोहचलो.वाटेत एका झाडावर बांबू पीट वायपर गुंडाळून आराम करत होता.त्याला तसाच लांबून रामराम करून वर पोहचलो.
तेथून पुढ गाववाल्या दादांनी वाट दाखवली आणि सांगितले की सरळ वाट सोडायची नाय बरोबय दुर्गवाडीत पोहचाल.खर तर आमचा वाटाड्या दारयाघाट खिंडीत पोहचण अपेक्षित होत तसा निरोप त्याला दिला होता पण तो आला नसल्याने आणि अंधार आणि पावसाच्या आधी मुक्कामी पोहचावे या गरजेपोटी आम्ही वाटाड्या विना निघालो होतो.थोड पुढ रम्य वातावरणात एका ओढ्यापाशी पोहचून एक पाण्याचा थांबा घेतला.अजून पावसाचा पुर्ण जोर नसल्याने पाणी स्वच्छ आणि शांततेत खाली दरीकडे वाहत होते.अर्ध्या तासात ढाकोबा मंदिर आणि पुढे दिड तासात दुर्गवाडीत! एवढ साध गणित असल्याने मावळतीपूर्वी आम्ही सहज मुक्कामी पोहचू ही जवळजवळ खात्री होती.

थोड पुढ जात असताना वाटा अनोळखी वाटायला लागल्या तासभराच्या जलद चालीनेही ढाकोबा मंदिर दिसेना! आता काहीतरी चुकतेय अस वाटत असताना दुरवर मंदिर डोकावले पण अजून अर्धा तास गेलाच.साधारण पाच वाजलेले.पण पुन्हा एक विसावा घेतला आता वाट चुकीची नाही म्हटल्यावर जरा गाफील झालो.पण निघाल्यावर सरळ दक्षिणेकडे जाताना ठळक पण खाली दरीकडे जाणारी वाट लागताच सावध झालो आणि ऊजवीकडे वळालो.

आता सर्व जण जरा चिंतित झाले.मी आणि मिलिंद दादू जरा पुढे खळग्यान पर्यंत गेलो पण बाकी लोक मागे थांबले.मग परत मागे फिरून एक चर्चा विनिमय झाला.साधारण ६ वाजलेले आणि वातावरण पाहता दुर्गवाडी गाठणे अवघड होईल असेच बहुसंख्य मतांचा कौल होता पण बरोबरचे सर्व जण अनुभवी असल्याने थोडे साहस करायला हरकत नाही म्हणून सर्वांना तयार केले.ढाकोबा मंदिरात परत गेलो तर उद्या जास्त अवघड होणार होते रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होताच कारण डबा दुपारचा आणला होता आणि रात्री वाटाड्या घरी जेवण देणार होता.नाही म्हणायला प्रत्येकाकडे काहीतरी खायला होतेच आणि ते असायलाही हवे.
खळगे पार करून पलीकडे डोंगर धारेला वर चढलो काही बाण दिसले पण एका ठिकाणी बाण खाली दरीकडे जाणारा होता आता सरळ वाट सोडून खाली जाणे म्हणजे अडचणीत जाणारे वाटले म्हणून सरळ चालू लागलो पण ही वाट ढोर वाट असावी कारण ती जंगलात शिरली.धुके आणि अंधार आता जास्त गूढ वाटू लागला.जंगलाच्या मध्ये एका मोकळ्या जागेत परत एक विचारविनिमय झाला आणि बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आलेला आमचा जुना सवंगडी समीर कदम म्हटला दादा माझ्याकडे ऑफलाईन जीपिस मॅप आहे तो चालू होतो का बघतो.

बघितले तर आम्ही कड्याच्या जवळ आणि वेगळ्या बाजूला आलो होतो.आता मनाचा हिय्या करून मॅप नुसार परत जंगलात शिरलो.थोडे अंतर पार केल्यावर एका डोंगरउतारावर लागलो.परत मॅप चालू आहे का खात्री केली आणि त्यानुसार चालू लागलो.वाट एका ओढ्यापाशी येऊन थांबली.पुढे गहन जंगल!
आता आमचा धीर सुटायला लागला.नशिबाने पाऊस नसल्याने तेवढा एक दिलासा! ओढ्याच्या कडेने बरेच आत गेलो पण आता वाट संपली.परत मघाशी जेथे होतो तिथे परत आलो.प्रशांतने उजवीकडे एक वाट दिसतेय म्हटल्यावर काही पर्याय नसल्याने परत एकसाथ त्याच्यामागे चढाई चालू केली.ओढ्यावर जागोजागी बांध दिसायला लागले पण वनखाते अशी काम करत त्यामुळे अजून किती चालावे लागेल याचा अंदाज बांधणे अवघड होते.आणि मग किरण दादांना अंधारात टॉर्च चमकल्याचे दिसले आणि आवाज ऐकू आला आणि त्यांनी बेंबीच्या देठापासून आवाज दिला ओ दादा.

सामान्य वाटणारी वाट आपली किती वाट लावू शकते याचा प्रत्यय आम्हाला आला होता.अर्थात असे साहस शक्यतो टाळावे पण टॉर्च, खाण्याचे पदार्थ, पाणी आणि योग्य शारीरिक आणि मानसिक स्थितीचे सवंगडी सोबत असल्याने यावर मात करून आपले ध्येय गाठणे आम्हाला शक्य झाले.
दूर्गवाडी पोहचल्यावर गरमागरम जेवण आणि संजय कुलकर्णी यांनी बनवलेला अप्रतिम शिरा खाऊन आजची सिंगापूर मधून सुरू झालेली दाऱ्या घाटाची मोहीम दुर्गवडीत विसावली.आता उद्या दुर्ग आणि मंदिर दर्शन घेऊन डोनिदार घाटाने खाली उतरायचे होते.

भाग एक समाप्त !