Thursday 25 February 2016

पांडवगड कमळगड धोमच्या खोरयातील मनसोक्त भटकंती : भाग एक

“The real voyage of discovery consists not in seeking new landscapes, but in having new eyes.”

मागच्या काही दिवसापासून कमळगडचा ट्रेक ठरला होता.पण बेंगलोर महामार्गाच्या कोंडीमुळे हुकला होता त्याऐवजी पुरंदरचा ट्रेक करून समाधान मानले होते.पण एखादी राहिलेली भटकंती अजून काही तरी चांगल्या प्रकारे होते असा मला अनुभव येतोय.त्यामुळे यावेळी कमळगडाबरोबर वाईजवळच्या मांढरदेवी रस्त्यावरील पांडवगड हा छोटा गड करण्याचे ठरवले तेव्हा काहीतरी चांगलेच बघायला मिळेल अशी मनात आशा होती आणि खर सांगायच तर खरोखर हा अनुभव आनंददायी होता.

सुरूवातीला प्रशांत आणि मी दोघच तयार होतो पण अनपेक्षितपणे अनिकेत नेमाडेचा मेसेज आला की या शनिवारी रविवारी कोठे ट्रेक आहे का? मग प्रशांतने आमच्याबरोबर कॉलेज जीवनात राजमाचीच्या भटकंतीला आलेेल्या मुकुंद पाटेला विचारले तोही तयार झाला.अजून गाडीत एक सीट रिकामी आहे म्हटल्यावर आमच्या येथील पाषाण टेकडीवर वृक्षसंवर्धन करणारे मोहन हिंगडेना विचारले तेही एकदोन वेळेला ट्रेक असला तर सांगा म्हटले होते.तेही लगेच तयार झाले.

दुपारी लवकर ब्रंच करून 12 ला वाईकडे रवाना झालो.प्रशांतने अर्णवलाही (प्रशांतचा मुलगा वय वर्ष 7) बरोबर घेतले.त्याचा पहिला मुक्कामी ट्रेक होता.साधारण तीनच्या आसपास वाईत पोहचून वाट विचारून मांढरदेवी रस्त्यावरच्या पांडवगडाच्या पायथ्याच्या वाडीतील कोंडकेंच्या घरासमोर गाडी लावली व साडेतीनच्या आसपास पांडवगडाची चढाई चालू केली.ऊन ऊतरतीला लागल्यामुळे चढाई सुखकर होती.




वरच्या पठाराच्या आधी काही दगडातील पायरयांचे अवशेष आहेत.


तेथून पठारावर पोहचलो.तेथे मॅप्रो फूडसच्या खाजगी मालकीची पाटी वाचून आश्चर्याचा धक्का बसला.गडाच्या पायथ्याला फार्म हाऊसचे प्लॉट बघितले होते पण ईथे तर गडच खाजगी मालकीचा विकत घेतलेला.आपल्या लोकशाहीत धनाच्या जोरावर ऐतिहासिक वास्तूच विकत घेतल्य़ाचे हे ऊदाहरण क्लेषदायक होते.पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांनी याला परवानगी दिली कशी? हा सहाजिक प्रश्न कुठल्याही दुर्गप्रेमीला पडावा असाच आहे.
कंपनीने वर एका बंगलीवजा घरात चार रखवालदार नेमलेत त्यातला एक पायथ्याच्या कोंडके परिवारातील आहे, हे ऐकून महाराजांनी स्वराज्य स्थापनेला केलेल्या खटाटोपीचा विसर पोटापाण्याच्या प्रश्नापायी मावळ्यांना पडला काय असा विचार मनात चमकून गेला.असो.


पठारावरून पांडवगड मावळतीच्या सोनेरी प्रकाशात ऊजळून गेला होता.गड म्हणून त्याच्या दिमाखदार  अस्तित्वाच्या शेवटच्या घटका तो मोजतोय याची सल मनात राहीलच.

ऊजवीकडून म्हणजे पश्चिमेकडून गडफेरी चालू केली.छोट्या गडांवर अवशेष श्रीमंत असू शकतात याची प्रचिती अवचितगडासारख्या कोकणातल्या गडाने दिलीय म्हणून अशा वेळी शक्यतो पूर्ण गडाचा कानाकोपरा धुंडाळण्याचा आमचा प्रयत्न असतो.


ईथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की डोंगरयात्रा किंवा तत्सम साहीत्याचा वापर मी जाणूनबूजून टाळतोय आणि आपल्याला काय दिसतेय याचा विचार करतो म्हणजे ऊत्सुकता पण राहते आणि साचेबद्ध भटकंती पलिकडील दुर्लक्षित एखादी गोष्ट नजरेस पडू शकते का? असा विचार असतो.अर्थात पाळंदे सर, गोनीदा, बाबासाहेब ज्या काळात अशा कानाकोपरयात पोहचले आणि त्याचा एवढा सखोल अभ्यास व नोंदी केल्या त्या ईतिहासाचा भाग बनून गेल्यात ज्याचा वापर प्रत्येक डोंगर भटका कधीतरी करतोच.

गडाच्या पश्चिम दक्षिणबाजूने पुढे जाताना प्रथम एक मोठे टाके  (किंवा विहीर म्हणता येईल)  लागते त्यापुढे एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.हे खांब टाके आहे.


तेथून पुढे गडाच्या कातळाला लागून एक मोठे टाके आहे.




त्यापुढे कातळाच्या पोटात एक निमुळते तोंड असलेली गुहा.



ऊजवीकडे वैराटगडापासून कमळगडापर्यंतचा पॅनोरॅमिक व्ह्यू एकदम झकास! असच कातळभिंतीला लागून पुढे गेल्यावर मेणवलीच्या बाजूने वर येणारी डोंगरधारेवरची वाट आणि वाई एम आय डी सी व शहर यांचे मनोहरी दर्शन होते.




मग डावीकडे गडाला वळसा घालून जाताना कातळात एक मंदीर लागते.


 त्यापुढे काही छोट्या गुहा आणि कोरडी पाण्याची टाकी होती.



झुडूपांनी वेढलेल्या या वाटेवरून बाहेर येताना मांढरदेवी डोंगर बारकाव्यासह नजरेस पडला.मावळतीच्या ऊन्हात प्रत्येक बारकावे न्याहाळता येतील असे.


पुन्हा गडफेरी पूर्ण होत असताना कातळाच्या मधल्या काही चढाई करता येण्यासारख्या जागांना तटबंदीने बांधून सुरक्षित केलेय.


एका नांदत्या गडाची सर्व लक्षणे असलेला असा हा गड आहे.पुन्हा ऊत्तरेला कातळाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी वर जाणारी वाट महादरवाजाकडे घेऊन गेली.

               अर्णवची ऊत्सुकता आणि ऊत्साह

महादरवाजातून आत गेल्यावर एका वळणानंतर आणखी वर गडमाथ्यावर आम्ही पोहचलो.वर एका अवशेषमय पण छप्पर असलेले मारूतीरायाचे मंदीर बघितले.त्याशेजारी चुन्याची घानी.





पुढे ऊजवीकडे झुडूपांनी आच्छादलेले वाड्याचे अवशेष! दोन पायरया चढून वाटेने जाताना जिर्णोद्धार केलेले देवीचे ठाणे!

देवीला नमस्कार करून गडमाथा पालथा घालताना अजून ऊंचीवरून चौफेर खूप सुंदर नजारा दृष्टीस पडतो.


पुढे परतीच्या मार्गावर एका झाडाखाली पिंड!


 आणि पुढे एक छोटा तलाव बघून परत महादरवाजातून खाली बंगल्याजवळ आलो.रखवालदारांनी चहा दिला.कमळगडाच्या पार्श्वभूमीवर आणि धोम खोर्याची सोबत ठेवणारा सूर्यास्त कॅमेरात बंदिस्त केला आणि अंधाराच्या आधी परतीला लागलो.


एक खूप समाधान देणारी ही सफर होती.आता वेध कमळगडाचे लागले होते.परत वाईकडे निघालो बंडू गोरेच्या खानावळीत गरमागरम पंचपक्वान्न हाणले आणि वासाऴ्याकडे कमळगडाच्या पायथ्याला मुक्कामी निघालो.

भाग एक : पांडवगड संपूर्ण.

भटकंती साथीदार : अर्णव कोठावदे, प्रशांत कोठावदे, अनिकेत नेमाडे, मुकुंद पाटे आणि मोहन हिंगडे.

श्रेणी : सोपी.

अंतर : वाईपासून 6 कि मी, पुण्यातून 80 कि मी.

Friday 12 February 2016

तळपेवाडी ते भिमाशंकर




 "हजार महफ़िलें हों, 

   लाख मेले हो...
   पर जब तक खुद से न मिलो,

   अकेले हो..."
             

कुठल्यातरी शायराने केलेला हा शेर चार ओळीत आपल जगण्याच प्रयोजन काय हा विचार करायला भाग पाडणार आहे.सह्याद्रीच्या अनेक आडवाटा मला व्यक्तीश: स्वत:चा शोध घेण्यास मदत करत आहेत.कुठ् तरी एखाद चंद्रमौळी घर जेव्हा ऊन्हातन बेजार झाल्यावर राजस स्वागत करत दूरवरन आणलेल्या पाण्यान भरलेली कळशी रित करत, कुठल्यातरी मुक्कामी एश टीच्या गावातील मंदीरात हरिनामाचा गजर होतो, एखादा फाटका माणूस जेवण देतो आणि पैसे घेण्याच नाकारतो तेव्हा शहरी मापात फीट बसत चाललेले हे मन परत जाग होत.खर सांगायच तर ट्रेकमधले हे अनुभव परत माणसातल माणूसपण जाग करतात आणि आत्मभान परत मिळवायला मदत करत.

अशाच जानेवारी 2016 च्या शनिवारी मल्लिकार्जुन श्रीशेट्टी (दोन तीन वर्षात सह्याद्रीतील सर्व अवघड जागा पादाक्रांत करण्याचा मानस बाळगणारा) याच्या आग्रहाने त्याचा हक्काचा साथीदार संतोष कुलकर्णी (वेळ पडली तर अर्जुन खांद्यावर टाकून परत आणेल असा आत्मविश्वास असणारा), प्रशांत आणि मी चौघे प्रसिद्ध लोणावळा भिमाशंकर मार्गातील तळपेवाडी ते भिमाशंकर हा ऊत्तरार्धाचा भाग करण्यासाठी शिवाजीनगरहून सायंकाळी पाचच्या लोकलने कान्हे स्टेशनकडे निघालो.तसा पुणेकर ट्रेकरला लोकल प्रवास हा नवीनच कारण लोहगड राजमाची अशा ट्रेकलाचा असा योग येतो.तिकीट प्रत्येक माणशी 10 रू बघून दोन वेळा चेक केल कारण पाषाणहून शिवाजीनगर या 8 कि मीचे रिक्षाचे 125 रू मोजून नुकतच ऊतरले होतो.रेल्वेने या जमाऩ्यात अशा सुविधा देणे सुखद धक्का देणारे होते.

कान्हे फाट्याला ऊतरल्यानंतर नकाशाप्रमाणे कुसूर कडे जायचे अर्जुनचे प्लॅनिंग होत.मी मॅनेजमेंटच्या
भानगडीत नाय पडत किंवा ट्रेक कुठन चालू होईल आणि कुठ संपेल एवढच विचारतो.जीप वाल्याने डायरेक्ट बाराशे सांगितल्यावर व नंतर सातशेवर ऊतरल्यावर शेवटची मुक्कामी एश टीची चौकशी करायला बाहेर पडलो.मग ऊगाचच लिफ्टसाठी हात केले.आश्चर्य म्हणजे एक स्कॉर्पीओवाले दादा थांबले. गाडीत तिशीतला गुंठामंत्री वाटावा असा पैलवान.“कुठ निघाला?“ आम्ही कुसूर म्हटल्यावर मी फक्त टाकव्यात जातोय तिथ सोडतो फाट्यावर.मग गाडीत गप्पात नवनाथ मोडवे यांनी विचारल कुठला ट्रेक? भिमाशंकरचा मग त्यांनी सांगितल कुसूर ते तळपेवाडी डांबरी सडक आहे तुमचा ट्रेक तळपेवाडीतून चालू होतो.कस जाणार? आता तुम्हीच सांगा या विनंतीवर त्यांनी कुठतरी फोन केला मग टाकव्यात त्यांच्या माती वाहतूक करणारया हायवातून आम्हाला ईंगळूनपर्यंत सोडायची व्यवस्था केली परत तिथून त्यांच्या मामाच्या जोरी साहेबांच्या गाडीतून तळपेवाडीपर्यंत सोडून देण्याची सूचना ड्रायवरला दिली.अतिशय निरपेक्ष मदत करणारी अशी माणस ही ट्रेकरला भेटतातच.पैसे भरपूर असून अशी मनाची श्रीमंती ठेवणारे मात्र कमीच.

रातच्या आठला तळपेवाडीत ऊतरून मारूतीरायाच्या गावच्या मंदीरात विचारून सॅक टाकल्या.थोड पाणी मागून घरून आणलेल्या डब्यातून जेवण आटोपली आणि शतपावली करायला आणि ऊद्यासाठी कोणी वाटाड्या मिळतो का याची चौकशी केली.रामचंद्र म्हणून तरूण त्याच्या मित्रासह येण्यास तयार झाला त्याला सकाळी नाष्टा त्याच्याच घरी तयार करायला लावला.


सकाळी प्रातर्विधी ऊरकून सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांसहित आम्ही भिमाशंकरच्या दिशेने मार्गस्थ झालो.बरोबर तळपेवाडीतील तीन तरूण होते.वांद्रे खिंड तळपेवाडीच्या ऊत्तरेला आहे.कोकणातून येणारी हाय टेंशन वायर टॉवर ओलांडून  खिंडीच्या दिशीने मार्गाक्रमण चालू केले.


ऊन वाढायच्या आधीची चाल खूप सुखकारक असते मग जसजस ऊन आणि अंतर वाढत तसतस कमी सवय असलेले गडी सर्व ग्रुपची चाल हळू करतात आता थोड्याफार अनुभवातून हे शिकलोय.म्हणून जरा जोर लावून सकाळी लवकर पाऊल ऊचलले तर त्रास कमी होतो.


पण अर्थात आजूबाजूचा निसर्ग न्याहाळून चित्रबद्ध करूनच ट्रेलची मजा आहे अस मला पण वाटत म्हणून नाना प्रशांतसारख्या माणसांबरोबर ट्रेक करणे जास्त आनंददायी! अर्थाच शारिरीक क्षमतेचा कस लावायचा तर मिलिंददादा कुलकर्णी, एऩ डी गवारे यांच्यासोबत पण मी कधीकधी जातो पण त्यांचे fast & furious असे ट्रेक असतात.भल्याभल्यांना फेस आणणारे ट्रेक ते मॅरेथॉन वेगाने करतात.असो.





वांद्रे खिंड गाठताना वर खडकात एका ठिकाणी पाण्याचे टाके कोरलेय पण पिण्यायोग्य नाही.





वर डोंगरावर भल्यामोठ्या विंडमिलस् ओळीने आपले स्वागत करतात.खिंड ओलांडल्यावर समोर दूरवरचे खोरे दृष्टीक्षेपास पडते.सकाळच्या कोवळ्या ऊन्हात समोरचा परिसर सोनेरी प्रकाशात न्हाऊन गेला होता.






पडारेवाडीच्या परिसरात प्रवेश करताना लोकांची सकाळची लगबग चालू होती.एका घरासमोर छोटा पाणी थांबा घेतला.






पुढ एक छोटी नदी ओलांडून समोरच्या डोंगराच्या अंगाला भिडलो.



एक भिमाशंकरला जाणारी सडक आडवी आली की पाच सातशे मीटर पूर्वेकडे चाल केल्यानंतर
एका डोंगराच्याबाजूने जंगलात डावीकडे भिमाशंकरची वाट भिमाशंकर अभयारण्याच्या पोटातून ही कुठे कारवीच्या जंगलातून जाणारी तर कुठे घनगर्द झाडीतून जाणारीवाट सुखद वाटणारी.
मध्ये एक कोरडा धबधबा लागला.




पुढे थोडे गेल्यावर कोकणाच्या बाजूचे विहंगम आणि पेठचा किल्ला त्याआधी सरळ हजारभर मीटर खाली ऊतरणारी घळ असा अप्रतिम नजारा थकवा पळवणारा होता.







तिथे थोडे फोटो घेऊन पुढे निघालो एक छोटा झाडीचा टप्पा पार केला आणि समोरच्या पठाराच्या पल्याड पदरगड व त्याबाजूचा अजस्र डोंगर डोकावला.



मागच्या ऊन्हाळ्यात नानाच्या बरोबर ऩाशिककर मंडळींसोबत साखरमाची भट्टी रान आणि आहुपे घाटाच्या ट्रेकच्या वेळी याच्या पलिकडून ऊचलेतून खाली कोकणच्या दमटपणात केलेली चढाई आठवली.घाटवाटा करायला लागल्यापासून आजूबाजूचे डोंगर आता ओळख द्यायला लागलेत.


परत समोर घनदाट झाडीत प्रवेश केला.ही वाट ऊन्हाचा त्रास वाचवणारी होती.


मध्ये सुवर्ण किरणांनी व्यापलेला गवताचा गालीचा त्यामध्ये लोळण घ्यायची सुप्त ईच्छा जागृत करणारा होता.


पण अशा अधूनमधून डोकावणार्या बालहट्टांना अजून कमळादेवीचे पठार किती आहे याचा अंदाज नसल्याने वेसण घातली. थोड्या अंतरावर जंगलातून बाहेर पडल्यावर पुन्हा पठार लागले या पठारानंतर वाट दोन्ही बाजूला दगड रचून अधोरेखित केली आहे.संतोषभाऊचा पाय जरा त्रास देत होता आणि तो लाड करून घ्यायच्या मूडमध्ये येण्याच्या आत ऊरलेले अंतर कापण्याच्या दृष्टीने थोडे वरकरणी कठोर वाटावे असे नाईलाजाने पण चेष्टेच्या स्वरूपात त्याला समजावून ऊठवले.पण खरच त्रास होत असल्यावर तो तरी काय करणार मग नेहमीच्या पद्धतीने त्यांना आपण मागे राहीलो असा भास व्हावा एवढा वेग वाढवला पण मागे ते आहेत याची खात्री करतच पुढे चाल चालू होती.




अर्जुन मात्र एकदम लांब पल्ल्याचा गडी.बहाद्दराने मध्ये ऐनवेळी कोणी आले नाही म्हणून तोरणा ते रायगड बोराट्याच्या नाळेतून एकट्याने केला.अर्थात त्याला जमेल तेवढे टोचून परत सोलो ट्रेक करू नये यासाठी मिलिंददादा, एवरेस्टवीर किशोरभाऊ, एन डी दादांच्या ट्रेकला बोलावले म्हणजे पायाची रग जिरण्यासाठी पर्याय असणे चांगले.
अजून थोड्या अंतरानंतर कमळदेवी मंदीर लागले.तिथे थोडे विसावलो.




 खाली दरीत भोरगिरीकडून येणारी वाट बघून भिमाशंकर मंदीर टप्प्यात आल्याची खात्री पटली पण अजून तास दीड तासाची पायपीट नक्की होती.ऊन्हाळ्यात पाणी बरोबर असणे किती चांगले हे आटलेले जलाशय पाहून पटत होते.एक ट्रॅव्हर्स मारून नदीच्या पात्रात ऊतरल्यावर भोरगिरीचा मार्ग लागला.पावसाळ्यातल्या सुंदर ट्रेकची आठवण झाली.पण आता डोहातले म्हशी बसून खराब झालेले पाणी पाहून ऊन्हाळातला विसावा निराशाजनक झाला.येथून आता शेवटचा टप्पा गर्द झाडीतून क्षेत्र भिमाशंकरच्या मंदीरात घेऊन जाणारा.नाईलाजाने ऊठलो आणि मार्गस्थ झालो.न थांबता अर्ध्या तासात बरोबर दीड वाजता मंदीराच्या प्रांगणात दम घेतला.






संतोष आल्यावर वर हॉटेल क्षितीजमध्ये भरपेट जेवण हाणले आणि बाहेर येऊन भिमाशंकर पुणे निमआराम गाडीने बसून सायंकाळी 7 वाजता घरी पोहचलो.

हा ट्रेक पावसाळ्यात जास्त आनंददायी आहे यात शंकाच नाही पण ऊन्हाळ्यात साधारण 6 तासात 20 कि मी अंतर आमची सह्याद्रीतल्या किंवा हिमालयातील भविष्यातील भटकंती सुखकर करेल यात शंका नाही.
धन्यवाद! परत भेटू!

ट्रेक रूट:  तळपेवाडी ते भिमाशंकर
ट्रेक मेटस्:  प्रशांत कोठावदे, मल्लिकार्जुन श्रीशेट्टी, संतोष कुलकर्णी आणि मी.
वाटाड्या:  रामचंद्र, तळपेवाडी
ग्रेड:  मध्यम
लागणारा वेळ:  6 ते 7 तास ऊन्हाळ्यात.लवकर चालू केला तर.