Friday 1 May 2020

अविस्मरणीय पहिली भटकंती १९९२

 मे महिन्याच्या शेवटी पश्चिम घाटातील सह्याद्रीची डोंगररांग रणरणत्या उन्हात तृषार्त झालेली असते.मोठमोठे वृक्ष आपला पर्णसंभार उतरवून तग धरुन राहण्याच्या प्रयत्नात दिसतात.उंचसखल डोंगर उतारांवर अधिराज्य गाजवणारी कारवी मृतप्राय अवस्थेत केवळ काड्यांच्या रुपात आपले अस्तित्व सांभाळत असते तर कधीकाळी मखमली गालिचा म्हणून मिरवलेले तृण मुळापासून उखडून मातीचा घसारा बनवत पानगळीच्या आश्रयाला जाते.गाई गुरांच्या अन वाटसरुंच्या वावरान रज उडविणाऱ्या पायवाटा अगदी रखरखीत झालेले ओढे नाले ! एकंदर धरतीचा कण अन् कण वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा करत लाही लाही होत असतो.

अचानक पश्चिमेच्या क्षितिजावर कुठूनसे पांढऱ्या ढगांचे पुंजके गर्दी करू लागतात .साधारण दरवर्षी मे महिन्याच्या मध्यावर असे चित्र संपूर्ण पश्र्चिम घाटावर दिसते. सहयाद्रीच्या रांगेत वसलेल्या कुठल्याही गडांवरून किंवा कोकणात कोसळणाऱ्या कड्यावरून हे दृश्य सहजच नजरेस पडते.मग हळूहळू ढगांचे हे पांढरे पुंजके रंग बदलू लागतात.प्रचंड उष्मा आसमंतात भरून जातो आणि मग जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून अगदी वाजत गाजत तृषार्त धरणीवर मेघमाल्हाराच्या गडगडा सह आणि विजेच्या लखलखटासह बरसायला चालू होतो.अल्प कालावधीत आलेली मरणासन्न अवस्था झटकत अवघे चराचर चैतन्याच्या नव्हाळी ने न्हाऊन निघते.अवघे ओढे नाले धबधबे अवखळ खोंडासारखे झेपावू लागतात.पानगळीच्या वळचणीला पडलेली तृणाची हिरवाई काही क्षणातच परत यायला सुरुवात होते.छोटे मोठे उभयचर अचानक आपल्या सुप्तावस्थेतून बाहेर पडतात.परत नवसंजीवनी चा हा सोहळा न चुकता निसर्गनियमानुसार शतकानुशतके चालू आहे.
गडकिल्ले दऱ्याखोऱ्यातून भटकणाऱ्या मंडळींसाठी तर हा विलक्षण सोहळा अनुभवणे म्हणजेच जीवन सार्थकी लावणे!

अशाच अनुभूतीची जाणीव सर्वप्रथम मज मिळाली ती राजांच्या गडी किंवा गडांच्या राजा पाशी “ राजगडी”!नुकतेच पुण्यात शिक्षणासाठी येऊन स्थिरावू लागलो होतो. कॉलेज, क्लास, वसतिगृह या दिन क्रमासह माझे कॉलेज मधील काही मित्रांशी भटकंतीसाठी सुत जुळले.सत्यजित भातखंडे या मित्राच्या घरी सायकल वर डहाणूकर कॉलनी मध्ये जायचो.त्याचे वडील कमिन्स या कंपनी मध्ये कामाला पण त्यासोबत त्यांचा कंपनीचाच एक ट्रेकिंग क्लब होता.मी गेलो की हरिश्चद्रगडावरील वर्णन आणि इतर ट्रेकिंगची ठिकाणे आणि त्याची वर्णने ऐकून मलाही जावे वाटे पण योग काही आला नाही.खर तर माझे बालपण वज्रेश्वरी या ठाणे जिल्ह्यातील एका डोंगराने वेढलेल्या गावात व्यतीत झालेले त्यामुळे डोंगरांची आवड आणि निसर्गाची ओढ याचे पुरेपूर संस्कार झालेले.घराशेजारीच असणारा डोंगर अनेकवेळा एकट्याने कधी मित्रांसह चढाई करणे ,पावसाळ्यात घरामागे जंगलातील ओढ्याजवळ तासनतास घालवणे हा माझा नकळत जडलेला छंद होता.

शहरातील वातावरणाशी जुळवून घ्यायला अवघड नाही गेले कारण मी राहत असणारे बारामती वसतिगृह गोखलेनगर जवळ असणाऱ्या वेताळ टेकडी शेजारी.असेच एक दिवस कॉलेज सुटल्यावर सत्यजित म्हटला की अरे पावसाळा सुरु झालाय आपण ट्रेकला जाऊ.सुनील पाटील हा नाशिकचा कॉलेजचा मित्र जो हॉस्टेलला पण राहायचा तो मी आणि सत्यजित.मग बऱ्याचश्या गोष्टी त्याने घरूनच मिळवल्या.त्याच्या वडिलांना सांगितले तर ते त्यांनी अरे जा पण जपून.मग ठिकाण त्यानेच ठरवले.राजगड ते तोरणा! मला फार माहिती नव्हती मग तो म्हटला अरे पाळंदे काका आहेत त्यांना विचारू.मग एके संध्याकाळी काकांच्या घरी नळस्टॉप शेजारी पाळंदे कुरिअर च्या मागे त्यांच्याकडे दोघं गेलो.त्यांना प्लॅन सांगितला तर ते म्हटले तुम्ही करू शकता पण काळजी घ्या.मग जवळ असणारी सॅक आहे ते शूज , तांदूळ कांदे बटाटे डाळ रॉकेल आणि माचिस यासह सतरंजी एवढ्या परिपूर्ण तयारीने शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट हून नसरापूर फाट्यावरुन मार्गासनीपर्यंत आणि तिथून चालत साखर गावात. तिथे नदीवर पूल नव्हता.मग सकाळी ती नदी ओलांडून गुंजवणे आणि चोर दरवाजाने पद्मावती माची.

साधारण निम्मा गड तर पूर्ण पांढरया धुक्यात वेढलेला.पाऊस अधूनमधून भिजवत होता.चोर दरवाजातून वर जाताना एक वाक्य लिहिले होते पूर्ण आता आठवत नाही पण साधारण असे होते “स्वराज्यासाठी रक्त सांडले ईथे शिवबांच्या मावळ्यांनी, दारु पिणे गोंधळ करणे हे काम नसे विरांचे”!

पद्मावती तलाव ते पांढरेशुभ्र ढग पाऊस एकंदर एकदम गूढरम्य वातावरण थोडे भितीदायक वाटले.मंदिरात सँक टाकल्या बांधून आणलेले जेवण केले आणि लगेच पावसात बालेकिल्ला करायला निघालो. खरतर खूप थकलो होतो पण तरीपण उद्या तोरणा जायचे म्हणून निघालो. बालेकिल्ला भर पावसात कोणतेही रिलींग नसताना आणि वाहणाऱ्या ओढ्यात चढलो वर काही दिसेना.जोरदार वारा आणि खतरनाक पाऊस! त्यात थोडा पाऊस थांबला आणि एकेठिकाणी लोखंडी नळ्या एकावर एक बसवलेल्या आणि त्यावर सिंहगड तोरणा रायगड असे एका टोकाला लिहीलेले.उन्हाळ्यात ईथून नळीतून हे गड दिसतात असे सत्यजीत म्हटला.मागच्या वर्षी फेसबुकवर या नळ्यांच्या कल्पनेचा शिल्पकार कै.प्रमोदभाऊ मांडे हा विलक्षण माणूस होता हे समजले २०१९ ला.आम्ही ट्रेक केला १९९२ ला.म्हणजे २७ वर्षाने आणि असा माणूस गमावल्यावर याची खंत आज आहे.

तिथून कसेबसे कसरत करत खाली आलो आणि मग नेढ्याकडे निघालो. सुवेळाच्या ठुब्यापासूनचा प्रवास हा मी त्या भयानक वारयात उडून कसा गेलो नाही याचे आजही आश्चर्य वाटते.नेढे पण कसरत करत चढलो आणि उतरलोदेखील. परत येईपर्यंत ५ वाजलेले.तेव्हा मोबाईल नव्हता घड्याळ होते.कुडकुडत रात्रीच्या जेवणासाठी लाकड गोळा करु म्हटले तर एकही कोरडे लाकूड नाही. आता काय करावे? भूक तर खूप लागलेली.बाहेर पाऊस जोरदार चालू होता.मंदिराचे पत्रे उडून जातात की काय असा वारा आणि पाऊस.थोडे ग्लुकाँन डी चे पाणी प्यालो आणि निपचित बसलो.आता थंडी भरली.गरम कपडे नाही आणि आहे ते ओले.बर आम्ही तिघं सोडलो तर चिटपाखरूही नाही. असाच अंधार गडद व्हायला लागला आणि अचानक देवदूतासारखा एक गावकरी आणि त्यासोबत एक जण कुठूनसे उगवले.मग त्यांना आमची हकीकत सांगितली तर ते म्हटले या मी तुम्हाला चूल पेटवून देतो.मग त्यांनी मंदिराशेजारी एक त्यांची कोठी उघडली त्यात लाकूडफाटा रचलेला.

खिचडी होईपर्यंत बोलताना ते म्हटले अरे बाळांनो पावसाळ्यात मी १५ दिवसात एकदा येतो.मी ईथला नेमलेला किल्लेदार आहे.तुमच नशीब चांगल म्हणून आज आलो.खरच शिवरायांनाच दया आली असावी आमची. मग भोजन करुन कपडे सुकवायला टाकले आणि तसच मंदिरात पडलो.त्यांनी देवीला तेल घालून दिवा लावला तेवढाच प्रकाश.बँटरी वगैरे काही भानगड नाही.पहाटे केव्हा तरी सू करायला बाहेर तटबंदीपाशी गेलो आणि खालून वर येणारे ढग आणि पूर्ण आसमंत पांढरयाशुभ्र दुलई ने आच्छादलेला।हा अनुभव माझ्या आयुष्यात ट्रेकींग रुजवणारा आद्य असा अनुभव! आयुष्यात एवढा सुंदर अनुभव मी पहिल्यांदा घेत होतो.अगदी कधीही डोळे मिटले की ते दृष्य सहजच डोळ्यासमोर येते एवढे ह्रदयात ते कोरलेले आहे.

दुसरया दिवशी सकाळी उठून रात्रीची खिचडी खाल्ली आणि संजीवनी माचीच्या दिशेने वेळू दरवाजाकडे निघालो.पाऊस चालूच होता पण चालत राहिल्याने शरीर गरम होते.४ तास चालून बुधला गाठला.तो चढताना परत भयानक पाऊस आणि पाय ठरु न देणारा वारा आणि दोन्ही बाजूला भयंकर खोल दरी!  आता सत्यजीत म्हटला आपल्याला हे चढायचे म्हणजे आपण गडावर पोहचू.पोटात अन्नाचा कण शिल्लक नाही. बरं बुधल्यावर पण रिलींग शिडी बिडी काही नाही. तो दाखवायचा तसा जीवाच्या भितीने शेवाळलेला दगड खाच पकडायची आणि वर सरकायचे.त्यात माकडांची एक टोळी सँक हिसकावून घ्यायला आली.काही पर्याय शिल्लक नाही. कसेबसे ओरडा करत हळूहळू वर चढलो.

वर पण मंदिर येता येईना.मधला कातळ पण शेवाळलेला आणि तिथेही रिलींग नाही. आता जीवच जायचा बाकी राहिला.ग्लानी यायला लागली.मग त्याने दोन खेकडे पकडले आणि त्याची नांगी चावून खा म्हटला.बेअर ग्रील आता दाखवतोय पण तेव्हाच मँन वर्सेस वाईल्ड चा प्रत्यक्ष अनुभव!

मंदिरात पोहचलो तोरणजाईच्या! दुपारचे ३ वाजलेले.आता तोरणा उतरुन ६ची शेवटची एस टी पकडायची तर घाई करायला हवी असे सत्यजीतचे मत! पण चालायचे त्राण नाहीत. आणि मग मंदिरात देवीला नमस्कार करायला गेलो तर एका पेपरवर ताजे पोहे कोणीतरी ठेवलेले! कदाचित नैवेद्य असेल पण काही विचार न करता तिघांनी ते खाल्ले! आम्हाला कालपासून राजगडवरचा किल्लेदार सोडला तर माणूस दिसला नाही पण खायला मिळाले याचा आनंद काय वर्णावा.देवी आमच्या वर प्रसन्न असावी.

मग हळूहळू परत रिलींग नसणाऱ्या घसरड्या कातळावरुन आणि खाली चिकनमातीच्या उतारावरून धडपडत वेल्ह्यात पोहचलो तर ७ वाजलेले.मग तोरणा विहार च्या जुन्या घरामध्ये जेवण केले आणि दुधाच्या गाडीने नसरापूर आणि पुणे परत असा प्रवास केला.

त्यानंतर बरेच अनुभव घेतले पण आयुष्यात पहिलाच ट्रेक असणारा हा राजगड ते तोरणा तोही भरपावसात काही सुविधा नसताना केवळ ईच्छा शक्तीवर केलेला सगळ्यात भारी ट्रेक म्हणून कायम स्मरणात राहील.

मित्रांनो आज मी कदाचित असे साहस करताना खूप विचार करेन आणि माझ्या कडे सर्व सुरक्षा साधने शिधा असेल पण नकळत का असेना एखादे वेड लागायला असेच काही तरी घडावे लागते नाही का?

धन्यवाद! भेटू परत!