Friday 1 May 2020

अविस्मरणीय पहिली भटकंती १९९२

 मे महिन्याच्या शेवटी पश्चिम घाटातील सह्याद्रीची डोंगररांग रणरणत्या उन्हात तृषार्त झालेली असते.मोठमोठे वृक्ष आपला पर्णसंभार उतरवून तग धरुन राहण्याच्या प्रयत्नात दिसतात.उंचसखल डोंगर उतारांवर अधिराज्य गाजवणारी कारवी मृतप्राय अवस्थेत केवळ काड्यांच्या रुपात आपले अस्तित्व सांभाळत असते तर कधीकाळी मखमली गालिचा म्हणून मिरवलेले तृण मुळापासून उखडून मातीचा घसारा बनवत पानगळीच्या आश्रयाला जाते.गाई गुरांच्या अन वाटसरुंच्या वावरान रज उडविणाऱ्या पायवाटा अगदी रखरखीत झालेले ओढे नाले ! एकंदर धरतीचा कण अन् कण वरुणराजाच्या आगमनाची प्रतीक्षा करत लाही लाही होत असतो.

अचानक पश्चिमेच्या क्षितिजावर कुठूनसे पांढऱ्या ढगांचे पुंजके गर्दी करू लागतात .साधारण दरवर्षी मे महिन्याच्या मध्यावर असे चित्र संपूर्ण पश्र्चिम घाटावर दिसते. सहयाद्रीच्या रांगेत वसलेल्या कुठल्याही गडांवरून किंवा कोकणात कोसळणाऱ्या कड्यावरून हे दृश्य सहजच नजरेस पडते.मग हळूहळू ढगांचे हे पांढरे पुंजके रंग बदलू लागतात.प्रचंड उष्मा आसमंतात भरून जातो आणि मग जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून अगदी वाजत गाजत तृषार्त धरणीवर मेघमाल्हाराच्या गडगडा सह आणि विजेच्या लखलखटासह बरसायला चालू होतो.अल्प कालावधीत आलेली मरणासन्न अवस्था झटकत अवघे चराचर चैतन्याच्या नव्हाळी ने न्हाऊन निघते.अवघे ओढे नाले धबधबे अवखळ खोंडासारखे झेपावू लागतात.पानगळीच्या वळचणीला पडलेली तृणाची हिरवाई काही क्षणातच परत यायला सुरुवात होते.छोटे मोठे उभयचर अचानक आपल्या सुप्तावस्थेतून बाहेर पडतात.परत नवसंजीवनी चा हा सोहळा न चुकता निसर्गनियमानुसार शतकानुशतके चालू आहे.
गडकिल्ले दऱ्याखोऱ्यातून भटकणाऱ्या मंडळींसाठी तर हा विलक्षण सोहळा अनुभवणे म्हणजेच जीवन सार्थकी लावणे!

अशाच अनुभूतीची जाणीव सर्वप्रथम मज मिळाली ती राजांच्या गडी किंवा गडांच्या राजा पाशी “ राजगडी”!नुकतेच पुण्यात शिक्षणासाठी येऊन स्थिरावू लागलो होतो. कॉलेज, क्लास, वसतिगृह या दिन क्रमासह माझे कॉलेज मधील काही मित्रांशी भटकंतीसाठी सुत जुळले.सत्यजित भातखंडे या मित्राच्या घरी सायकल वर डहाणूकर कॉलनी मध्ये जायचो.त्याचे वडील कमिन्स या कंपनी मध्ये कामाला पण त्यासोबत त्यांचा कंपनीचाच एक ट्रेकिंग क्लब होता.मी गेलो की हरिश्चद्रगडावरील वर्णन आणि इतर ट्रेकिंगची ठिकाणे आणि त्याची वर्णने ऐकून मलाही जावे वाटे पण योग काही आला नाही.खर तर माझे बालपण वज्रेश्वरी या ठाणे जिल्ह्यातील एका डोंगराने वेढलेल्या गावात व्यतीत झालेले त्यामुळे डोंगरांची आवड आणि निसर्गाची ओढ याचे पुरेपूर संस्कार झालेले.घराशेजारीच असणारा डोंगर अनेकवेळा एकट्याने कधी मित्रांसह चढाई करणे ,पावसाळ्यात घरामागे जंगलातील ओढ्याजवळ तासनतास घालवणे हा माझा नकळत जडलेला छंद होता.

शहरातील वातावरणाशी जुळवून घ्यायला अवघड नाही गेले कारण मी राहत असणारे बारामती वसतिगृह गोखलेनगर जवळ असणाऱ्या वेताळ टेकडी शेजारी.असेच एक दिवस कॉलेज सुटल्यावर सत्यजित म्हटला की अरे पावसाळा सुरु झालाय आपण ट्रेकला जाऊ.सुनील पाटील हा नाशिकचा कॉलेजचा मित्र जो हॉस्टेलला पण राहायचा तो मी आणि सत्यजित.मग बऱ्याचश्या गोष्टी त्याने घरूनच मिळवल्या.त्याच्या वडिलांना सांगितले तर ते त्यांनी अरे जा पण जपून.मग ठिकाण त्यानेच ठरवले.राजगड ते तोरणा! मला फार माहिती नव्हती मग तो म्हटला अरे पाळंदे काका आहेत त्यांना विचारू.मग एके संध्याकाळी काकांच्या घरी नळस्टॉप शेजारी पाळंदे कुरिअर च्या मागे त्यांच्याकडे दोघं गेलो.त्यांना प्लॅन सांगितला तर ते म्हटले तुम्ही करू शकता पण काळजी घ्या.मग जवळ असणारी सॅक आहे ते शूज , तांदूळ कांदे बटाटे डाळ रॉकेल आणि माचिस यासह सतरंजी एवढ्या परिपूर्ण तयारीने शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट हून नसरापूर फाट्यावरुन मार्गासनीपर्यंत आणि तिथून चालत साखर गावात. तिथे नदीवर पूल नव्हता.मग सकाळी ती नदी ओलांडून गुंजवणे आणि चोर दरवाजाने पद्मावती माची.

साधारण निम्मा गड तर पूर्ण पांढरया धुक्यात वेढलेला.पाऊस अधूनमधून भिजवत होता.चोर दरवाजातून वर जाताना एक वाक्य लिहिले होते पूर्ण आता आठवत नाही पण साधारण असे होते “स्वराज्यासाठी रक्त सांडले ईथे शिवबांच्या मावळ्यांनी, दारु पिणे गोंधळ करणे हे काम नसे विरांचे”!

पद्मावती तलाव ते पांढरेशुभ्र ढग पाऊस एकंदर एकदम गूढरम्य वातावरण थोडे भितीदायक वाटले.मंदिरात सँक टाकल्या बांधून आणलेले जेवण केले आणि लगेच पावसात बालेकिल्ला करायला निघालो. खरतर खूप थकलो होतो पण तरीपण उद्या तोरणा जायचे म्हणून निघालो. बालेकिल्ला भर पावसात कोणतेही रिलींग नसताना आणि वाहणाऱ्या ओढ्यात चढलो वर काही दिसेना.जोरदार वारा आणि खतरनाक पाऊस! त्यात थोडा पाऊस थांबला आणि एकेठिकाणी लोखंडी नळ्या एकावर एक बसवलेल्या आणि त्यावर सिंहगड तोरणा रायगड असे एका टोकाला लिहीलेले.उन्हाळ्यात ईथून नळीतून हे गड दिसतात असे सत्यजीत म्हटला.मागच्या वर्षी फेसबुकवर या नळ्यांच्या कल्पनेचा शिल्पकार कै.प्रमोदभाऊ मांडे हा विलक्षण माणूस होता हे समजले २०१९ ला.आम्ही ट्रेक केला १९९२ ला.म्हणजे २७ वर्षाने आणि असा माणूस गमावल्यावर याची खंत आज आहे.

तिथून कसेबसे कसरत करत खाली आलो आणि मग नेढ्याकडे निघालो. सुवेळाच्या ठुब्यापासूनचा प्रवास हा मी त्या भयानक वारयात उडून कसा गेलो नाही याचे आजही आश्चर्य वाटते.नेढे पण कसरत करत चढलो आणि उतरलोदेखील. परत येईपर्यंत ५ वाजलेले.तेव्हा मोबाईल नव्हता घड्याळ होते.कुडकुडत रात्रीच्या जेवणासाठी लाकड गोळा करु म्हटले तर एकही कोरडे लाकूड नाही. आता काय करावे? भूक तर खूप लागलेली.बाहेर पाऊस जोरदार चालू होता.मंदिराचे पत्रे उडून जातात की काय असा वारा आणि पाऊस.थोडे ग्लुकाँन डी चे पाणी प्यालो आणि निपचित बसलो.आता थंडी भरली.गरम कपडे नाही आणि आहे ते ओले.बर आम्ही तिघं सोडलो तर चिटपाखरूही नाही. असाच अंधार गडद व्हायला लागला आणि अचानक देवदूतासारखा एक गावकरी आणि त्यासोबत एक जण कुठूनसे उगवले.मग त्यांना आमची हकीकत सांगितली तर ते म्हटले या मी तुम्हाला चूल पेटवून देतो.मग त्यांनी मंदिराशेजारी एक त्यांची कोठी उघडली त्यात लाकूडफाटा रचलेला.

खिचडी होईपर्यंत बोलताना ते म्हटले अरे बाळांनो पावसाळ्यात मी १५ दिवसात एकदा येतो.मी ईथला नेमलेला किल्लेदार आहे.तुमच नशीब चांगल म्हणून आज आलो.खरच शिवरायांनाच दया आली असावी आमची. मग भोजन करुन कपडे सुकवायला टाकले आणि तसच मंदिरात पडलो.त्यांनी देवीला तेल घालून दिवा लावला तेवढाच प्रकाश.बँटरी वगैरे काही भानगड नाही.पहाटे केव्हा तरी सू करायला बाहेर तटबंदीपाशी गेलो आणि खालून वर येणारे ढग आणि पूर्ण आसमंत पांढरयाशुभ्र दुलई ने आच्छादलेला।हा अनुभव माझ्या आयुष्यात ट्रेकींग रुजवणारा आद्य असा अनुभव! आयुष्यात एवढा सुंदर अनुभव मी पहिल्यांदा घेत होतो.अगदी कधीही डोळे मिटले की ते दृष्य सहजच डोळ्यासमोर येते एवढे ह्रदयात ते कोरलेले आहे.

दुसरया दिवशी सकाळी उठून रात्रीची खिचडी खाल्ली आणि संजीवनी माचीच्या दिशेने वेळू दरवाजाकडे निघालो.पाऊस चालूच होता पण चालत राहिल्याने शरीर गरम होते.४ तास चालून बुधला गाठला.तो चढताना परत भयानक पाऊस आणि पाय ठरु न देणारा वारा आणि दोन्ही बाजूला भयंकर खोल दरी!  आता सत्यजीत म्हटला आपल्याला हे चढायचे म्हणजे आपण गडावर पोहचू.पोटात अन्नाचा कण शिल्लक नाही. बरं बुधल्यावर पण रिलींग शिडी बिडी काही नाही. तो दाखवायचा तसा जीवाच्या भितीने शेवाळलेला दगड खाच पकडायची आणि वर सरकायचे.त्यात माकडांची एक टोळी सँक हिसकावून घ्यायला आली.काही पर्याय शिल्लक नाही. कसेबसे ओरडा करत हळूहळू वर चढलो.

वर पण मंदिर येता येईना.मधला कातळ पण शेवाळलेला आणि तिथेही रिलींग नाही. आता जीवच जायचा बाकी राहिला.ग्लानी यायला लागली.मग त्याने दोन खेकडे पकडले आणि त्याची नांगी चावून खा म्हटला.बेअर ग्रील आता दाखवतोय पण तेव्हाच मँन वर्सेस वाईल्ड चा प्रत्यक्ष अनुभव!

मंदिरात पोहचलो तोरणजाईच्या! दुपारचे ३ वाजलेले.आता तोरणा उतरुन ६ची शेवटची एस टी पकडायची तर घाई करायला हवी असे सत्यजीतचे मत! पण चालायचे त्राण नाहीत. आणि मग मंदिरात देवीला नमस्कार करायला गेलो तर एका पेपरवर ताजे पोहे कोणीतरी ठेवलेले! कदाचित नैवेद्य असेल पण काही विचार न करता तिघांनी ते खाल्ले! आम्हाला कालपासून राजगडवरचा किल्लेदार सोडला तर माणूस दिसला नाही पण खायला मिळाले याचा आनंद काय वर्णावा.देवी आमच्या वर प्रसन्न असावी.

मग हळूहळू परत रिलींग नसणाऱ्या घसरड्या कातळावरुन आणि खाली चिकनमातीच्या उतारावरून धडपडत वेल्ह्यात पोहचलो तर ७ वाजलेले.मग तोरणा विहार च्या जुन्या घरामध्ये जेवण केले आणि दुधाच्या गाडीने नसरापूर आणि पुणे परत असा प्रवास केला.

त्यानंतर बरेच अनुभव घेतले पण आयुष्यात पहिलाच ट्रेक असणारा हा राजगड ते तोरणा तोही भरपावसात काही सुविधा नसताना केवळ ईच्छा शक्तीवर केलेला सगळ्यात भारी ट्रेक म्हणून कायम स्मरणात राहील.

मित्रांनो आज मी कदाचित असे साहस करताना खूप विचार करेन आणि माझ्या कडे सर्व सुरक्षा साधने शिधा असेल पण नकळत का असेना एखादे वेड लागायला असेच काही तरी घडावे लागते नाही का?

धन्यवाद! भेटू परत!



Wednesday 1 April 2020

"नांगरदरा : मोरोशीच्या भैरवाचे तिसरे नेत्र" - भाग २

         

पर्वत चढाई साठी जितके कठीण तितकेच त्यांचे अनुभव कठीण नारळाच्या आतील मऊशार गाभ्यासारखे!
 
सुरुवातीला दिलीपसर आणि संजय एकामागे एक चढाई करत वरच्या बाजूला दोर बांधायची जागा शोधत निघाले पण बराच वेळ त्यांचा आवाज येईना.आता अंधार पण दाटलेला.खरतर आहे ती जागा मुक्काम करायला योग्य होती पण वरच्या बाजूला कुठतरी अजून चांगली जागा मिळते का असा दिलीप सरांचा प्रयत्न असावा.सगळे जण दिवसभराच्या श्रमाने खूप थकलेले आणि अस्वस्थ होते.जेव्हा तुम्ही सलग चालता तेव्हा जेवढे थकणार नाही एवढा दम दोराचे नियोजन करेपर्यंत वाट बघणे, तीही घोड्यासारखी सरळ उभं राहून आणि परत जीव मुठीत घेऊन पुढचा टप्पा गाठणे, जे आधी होतं ते बरं होतं याची जाणीव करुन देणारा याने लागला होता."आगीतून निघून फुफाट्यात" ही म्हण अशाच कुठल्या अनुभवानंतर जन्माला आली असावी.

एकदाचा वरून आवाज आला की दोराला पकडून हळूहळू वर या.आता अंधारात हेडटाँर्च च्या प्रकाशात डावीकडे असणारी दरी जरी दिसत नसली तरी दूरवर लुकाकणारे दिवे आपण कोणत्या उंचीवर आहे याची सतत मनाला भिती दाखवणारी.हातपाय या थोड्या विश्रांती नंतर अजून शिथील झालेले.एक एक जण वर जाताना माझा तणाव अजून वाढायला लागला.पायाखाली घसारा आणि अधूनमधून कातळ आणि जवळजवळ ९० अंशाच्या कोनात वर चढाई! आणि ज्याची भिती होती तेच व्हायला लागले.एका अवघड कातळावर एक जण अडकला.ना खाली ना वर ! कसेबसे एकाने खाली जाऊन त्याला आधार देऊन सोडवल आणि बाजूच्या नाळीत दोघ बसले.मी शेवटी एकटाच खाली!

आता वरून बिले देऊन त्याला खेचून घेणे हेच योग्य होते कारण लोंबकळून त्याच्या हातापायाला क्रँप आलेले आणि या प्रकारात मानसिक  दृष्ट्या तो खचून गेला होता.मग वरुन दिलीपसर स्वतः खाली यायला निघाले पण हा प्रकार बघून मला स्वतः वर असणारा विश्वास डळमळीत झाला.मग मी वर येऊ का? अस विचारून दोर पकडला पण खरोखरच हे अवघड होत.आता मी खाली त्या दोघांपाशी नाळेत जाव अस त्यांना वाटत असावं पण आता जर इथ थांबलो तर कदाचित यांची वर येण्याची मानसिक तयारी होणार नाही हा विचार मनात आला आणि तसच वर निघालो. ठिकठिकाणी नाळीत कड्याला चिकटून जागा मिळेल तस सगळे बसलेले, त्यांना ओलांडून अजून वर जिथे हिरासर आणि परमभैया दोर अँकर करून बसलेले तिथवर पोहचलो.कड्यात कोरलेल्या पायरयांवर कसबस सांभाळून बसलो पण हातपाय हालवायला जागा नाही आहे तसच बसायच नाही तरी समोर आणि डावीकडे असणाऱ्या दरीत एक टप्पा आऊट!

दिलीपसर खाली गेले आणि मग हार्नेस बांधून दोघांना वर खेचले.परमभैया हे दोर खेचायचे काम करत होते तेही त्यांच्या पायाखाली अस्थिर दगडं! थोडा पाय हलवला तर १० फूट खाली बसलेल्या कोणाचा तरी दगड पडून कार्यक्रम व्हायचा! खालच्या बाजूला दोघ पोहचले आणि सर परत वर गेले दोर घेऊन! अर्धा तास काही उत्तर नाही.संजय वर गेला तोही उत्तर देईना.माझ्याही वर विजय बसलेला तो अजून अवघडल्या स्थितीत! माझी पण वाटच लागलेली.थोडी चिडचिड होत होती की अजून कस हे लोक वर बोलवेनात! 

मग अचानक संजयने आवाज दिला आता रात्रीचे ९ वाजलेत सर्वांनी आहे त्याठिकाणी थांबायचे.उरलेली चढाई उद्या उजाडल्यावर!  जागेवर दोराला अँकर करा आणि जेवण करुन घ्या.सगळे शांत! पण विजय आणि मी न खाली न वर! मग विजयनेच विचारले मी वर येऊ का? जागा आहे का? संजय म्हटला बरं ये पण जागा कमी आहे.तो दोराला पकडून गेला.परमभैया आहे तिथेच बाजूला हिरा सर जेमतेम नाळीतील कातळाला टेकून उभे! मला जागा नाही. मग मीही वर गेलो.

खरतर त्यावेळी कड्यात खोबण्या पकडून आणि एका हातात दोर गुंडाळून वर जाणे ही कठीण गोष्ट होती पण पर्याय नव्हता.वर पोहचलो तर एक प्रचंड घसारा साधारण १५ फूटाचा आणि त्यानंतर २ फूट कातळाच्या जागेवर तिघ बसलेले.कसबस आहे ती ताकद वापरत दोर ओढून त्यांच्यापाशी पोहचलो.मग त्यांच्या शेजारी जागा करत बसलो आणि मग मलाही त्यांनी दोराला अँकर केले.आज रात्र इथेच बसून काढायची.समोर १८०० ते २००० फूट दरी वर कडा आणि छोटीशी लेज ज्यात दिलीपसर, संजय, विजय आणि मी आमच्या पाठपिशवी सह! दूरवर खाली माळशेजकडे जाणारा महामार्ग आणि गावातील लुकलुकत असणारे दिवे असा नजारा! काही खाण्याची इच्छा मरून गेलेली.काही संत्री खाल्ली आणि पाणी प्यालो.पाठपिशवी मधून विंड शीटर जे मी नेहमी बाळगतो कसेबसे काढून चढवले.स्लिपींग बँग काढून करणार काय? खाली कातळ पार्श्वभागाला टोचत होता आणि पाय दुमडून एका दगडाच्या होल्डवर रुतवून ठेवले होते.अँकर असल्याने खाली पडणार नव्हतो पण झोप येण्याची शक्यता नव्हती.फारतर ग्लानी येऊन डोळे मिटणार! 


दिलीपसर तर एकदम कड्याच्या बाजूला स्लिपींग बँग काढून चक्क झोपले! खाली गावात कोणाचे तरी लग्न असावे त्याचा डीजे चा आवाज कड्यावर दाणदाण आदळत होता परत एकच टोन! हे सर्व रात्री २ ते २.३० पर्यंत चाललेले.मध्येच थोड पुढं सरकूून सू केली ! आता सकाळ होण्याची वाट बघत मध्येच बसल्या बसल्या डुलकी आणि परत जाग यायची! खाली कातळची टोक टोचत असल्याने कधी डावीकडे जोर द्यायचा कधी उजवीकडे! दिलीप सर मात्र गुडूप! संजय आणि विजयही थोड पाय लांब करून झोपलेले.

जीवनात अनेक अनुभव घेतले पण असा अनुभव आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करुन देणारा ठरला.उजाडताच समोर अफाट प्रदेश दिसायला लागला अगदी आजोबापासून कळसूबाई पर्यंत आणि हरिश्चंद्रपर्यंत! खाली इवलीशी गावे सगळीकडे विखूरलेली.आता येथून आपली सुटका होणार या आनंदात साथीदारांना आवाज दिला."सकाळ झाली रे"चला आवरा! 

परत एकेकाला आम्ही होतो तेथपर्यंत वर घेतले आणि तोपर्यंत मी आहे त्याच जागी! रात्री १० पासून सकाळी ११ पर्यंत! कारण सगळे जसे आले तसे दोर घेऊन दिलीप सर परत वरचा कडा येंगून पुढं! संजय त्यांच्या मागे जरा वरचे नजरेला येईल किंवा त्यांचा आवाज येईल इतका चढला.साधारण २५ फूटाचा कातळ होता पण मागे भयावह दरी आ वासून उभी! चुकीला क्षमा नाही! मग एकंदर लक्षात आले २०० फूट दोर अपूर्ण आहे कारण मध्ये अँकरला जागा नाही. आपण तयारीने गेलो तर कुठली वस्तू उपयोगाला येईल ते सांगता येत नाही. श्रीकांतला आमच्या १० फूटी प्रत्येकी अशा ६/७ स्लींग दिल्या त्याने आपल्या बेसिक माऊंटेनियरींगच्या मध्ये शिकलेल्या "फिशर नाँट"प्रकारच्या गाठी मारून एका मागून एक सर्व दोराला जोडल्या.

मग कुठेतरी सरांनी अँकरला जागा शोधली.दोर जेमतेम कातळाच्या खाली आला.अँकर सेल्फ असेल किंवा साधा बोल्डरही असेल खालून काही कल्पना नाही. म्हणून एक जण वर जायचा तो अगदी ठराविक ठिकाणी पोहचेपर्यंत बाकी थांबून रहायचे असे करत मागे हिरा काका आणि मी राहिलो.मग काका म्हटले तू चल मी तुझ्या मागून येतो.तोपर्यंत काकांच्या प्रोत्साहनाने दोर न पकडता तो कातळ त्यातल्या कोरलेल्या खोबण्या पकडून पण मागे वळून न घेता पार पाडला होता कारण दोरावर वर अजून कोणीतरी असले तर त्याला हिसका बसण्याची शक्यता होती.

वर जाऊन बघतो तर दिलीप सर परत नजरेच्या टप्प्याबाहेर पण दोराच्या मध्येच एका अवघड जागी संजय दिसला.तो एकेकाला पुढे पाठवत होता.मीही हळूहळू त्याच्यापर्यंत पोहचलो आणि वर त्याहून अवघड ७० अंशाची उजवीकडून वळून डावीकडे जाणारी वाट दिसली.पण दोर तर सरळ दरीच्यापासून गेलेला.मग संजय म्हटला भाऊ दोर सोडा आणि उजवीकडून हळू जा! आता बाकी गेले म्हणजे मीही जाणार एवढेच समाधान!पण हे खतरनाक प्रकरण होते.कसेबसे मध्ये एका बोल्डरपाशी पोहचलो. तिथून वर दूरवर दिलीपसर एका मध्यम आकाराच्या बोल्डरला दोर अडकवून तो निघू नये म्हणून त्यावर बसलेले दिसले.मला आहे तिथेच थांबायला लावून मग हिराकाकांना वर घेतले आणि दोर वर खेचून संजय पर्यंत आणला.आता त्या १० मिनिटात मी पुढची वाट कशी चढायची या चिंतेत तर खाली बघायची सोय नाही. पाय जेमतेम रोवलेले.मग इशारा मिळताच वर सरकलो आणि मग शेवटी दोराला पकडतच वर दिलीप सरांच्या मागे जिथे बाकी बसले होते तेथे जाऊन बसलो पण इथेही पाय खाली दगड बघून रोवून बसायला लागले कारण थोडा घसरलो तरी भैरवाच्या पायाशी पण थेट कैलासावर!

मग हिराकाका संजय आले आणि परत वरात उजवीकडे अजून घसारयाचा भाग ओलांडत खिंडी खालच्या नाळीत.पण आता खिंड नजरेच्या टप्प्यात म्हणजे १०० फूट वर होती.हळूहळू सगळे दोर पकडून शेवटच्या ३० फूट चढाईच्या जागी पोहचले आणि मग दोर पकडून चिमणी क्लाईंब करत वर खिंडीत!

तिथून पुढे डावीकडून दौंड्याच्या कड्यातून ट्रँव्हर्स मारत एका अतिसुंदर पाणवठ्यापाशी आणि कोरड्या धबधब्यापाशी थांबून भेळ भत्ता सरबत आणि २ लिटर पाणी असा कार्यक्रम पार पडला.संध्याकाळचे ४ वाजलेले पण आता चिंता नव्हती.आम्ही कसेही करून अंजनावळेपर्यंत पोहचणार याची खात्री होती.दरी आणि जंगलाच्या मधून कोकणाच्या बाजूने नितांतसुंदर वाटचाल करत अंजनावळे पठार गाठले आणि त्याची अंजनावळेकडची एक सोपी वाट उतरत रात्री ८ ला अंजनावळेमधील एका घरात चहापाणी, जेवण उरकले.दरम्यान एक गाडी ठरवली त्याने आम्हाला मोरोशी सोडले.रात्री १२ वाजलेले मग तेथेच आराम करुन सकाळी उठून आपापल्या गावी सगळे रवाना झाले.

जीवनात अनेक ट्रेक केले, अनेक थरारक वाटा केल्या पार मे मध्ये फडताड, माकडनाळ, गायनाळ यासारख्या सुद्धा.पण नांगरदरा उर्फ भिल्लीणीचा पुड ही वाट आमच्या सर्व संयमाची, सहनशीलतेची कसोटी बघणारी होती.शारीरिक, मानसिक क्षमतेचा एक क्रँश कोर्स आम्ही सह्याद्रीच्या विद्यापीठात आज गुणवत्तेसह पूर्ण केला होता.

मित्रांनो खरतर हा अनुभव मी लिहीणार नव्हतो पण आपल्याला सह्याद्रीची शिकवण आहे नितळ आणि स्वच्छ मनाने वाटून टाकण्याची त्यामुळेच हे लिहीतोय.

नांगरदरा किंवा भिल्लीणीचा पूड ही नेहमीची घाटवाट नसून तो एक टेक्नीकल क्लाईंब आहे आणि तोही आपल्याकडे कितीही अनुभवी मार्गदर्शक असतील किंवा साहित्य असेल तरी देवाच्या भरवश्यावर एक एक टप्पा पार करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. कारण अँकरींगला जागा नाही, झाड नाही, कातळ नाही आणि आपली सोबतीण कारवीही नाही असा ६०% भाग आहे.कातळात असणारया पायरया किंवा खोबणी ३/४ ठिकाणी आहेत पण त्या संपूर्ण वाटेच्या ०.०१ टक्का पण नाहीत. 

माझ्या मताने ही वाट करू नये!आणि अगदीच करायचे ठरवले तर सर्व काळजीसह नोव्हेंबरमध्येच करावी कारण तेव्हा गवत असल्याने पाय घसरणार नाहीत. 

दिनांक :
पायथ्याचे गाव :मोरोशी, फांगुळगव्हाण
माथ्यावरचे : अंजनावळे
पाणी: भैरवगड टाक्यानंतर थेट दौंड्या खिंडीत!
श्रेणी : तांत्रिक अवघड
योग्य वेळ : नोव्हेंबर / डिसेंबर
साहित्य : ३०० फूटाचे २ दोर आणि वैयक्तिक सुरक्षा साधने.

टिम : हिरा पंडीत काका आणि दिलीप झुंजारराव सर, मुंबई
संजय अमृतकर नाना, डॉ. भोजराज गायकवाड, परमजीत भैया, श्रीकांत पाटील, नाशिक
मिलिंद कुलकर्णी, संजयभाऊ शेळके, विजय गुर्जर, तुषार पोमण आणि तुषार कोठावदे, पुणे.

छायाचित्रे : डॉ. भोजराज गायकवाड, विजय गुर्जर, श्रीकांत पाटील आणि तुषार कोठावदे.

विशेष धन्यवाद : हिरा पंडित काका, दिलीप झुंजारराव सर आणि गुरुवर्य नाना!

नांगरदरा : मोरोशीच्या भैरवाचे तिसरे नेत्र

"The choices we make lead up to actual experiences. It is one thing to decide to climb a mountain. It is quite another to be on top of it. "

Herbert A. Simon

समोर हिरव्यागार झाडांनी वेढलेली फारसा मानवी हस्तक्षेप दिसत नसलेली दरी बघून माझ्या तोंडून आपसूक शब्द फुटले "स्वर्गाचे दार"! हो "Door to Heaven" !! बाजूला उभ्या असलेल्या परमभैयाच्या चेहरयावरचे भावही हेच होते.

दौंड्या पर्वताच्या खिंडीत पोहोचताना दुपारचे दोन वाजलेले, अजून काही सवंगडी खाली कड्यापाशी चढाईच्या प्रतिक्षेत होते!शेवटचा ३० फूटाचा कातळ दोराच्या सहाय्याने चढून इतर लोक वर येईपर्यंत मी खाली झाडाखाली विसावलो आणि काल सकाळी ७.३० ला मोरोशीहून सुरु झालेली ही चढाई आता संपली आहे या अवर्णनीय आनंदाने दोनचार घोट पाणी पित पाठपिशवी ला टेकत इतरांची वाट बघू लागलो.खरतर अजून अंजनावळेपर्यंत पोहचायला ४/५ तास लागणार होते पण ती चाल आपण कालपासून जे अनुभवतोय त्यामानाने किरकोळ आहे याची मला खात्री होती.

नाशिक पुणे सह्यमित्रमंडळाच्या यादीत आज गिर्यारोहण क्षेत्रातील दिग्गज हिरा पंडीत काका आणि दिलीप झुंजारराव सर यांच्या सोबतीने एका अतिशय अवघड आणि अशक्य चढाईची "नांगरदरा"वाट सुरक्षित जमा झाली होती.नानांच्या आग्रहाखातर ऐनवेळी तयारी करुन येताना हा मार्ग किती कठीण आहे याची जाणीव आमचे सह्यसवंगडी दिलीपभाऊ वाटवे यांनी टाकलेलया एका चित्रफिती वरुन आली होतीच पण ज्याचा विचार केला होता त्यापेक्षाही कस बघणारी ही चढाई होती.

रात्री उशिरा नाशिक, पुणे, मुंबई येथून सर्व जण मोरोशीच्या भैरवनाथ ढाब्यावर जमले.सकाळी उठून आवरून खराब होऊ नये म्हणून ताजी पाणी न टाकता बनवलेली मटकी ऊसळ मनूकडून पार्सल घेतली, बाकी चपाती, दशमी आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत होत्याच पण मुख्यत: प्रत्येकी ४ लिटर  पाणी जे भैरवगडाच्या टाक्यावर परत भरून घ्यायचे ठरले तेही होते.

सुरक्षा साधने म्हणजे स्क्रूगेट, हेल्मेट, स्लींग, दोर, मेखा सर्व होत्या.हिरा काका, दिलीपसर यासोबत संजयभाऊ शेळके आणि श्रीकांत पाटील हे आमचे दोघे तांत्रिक गिर्यारोहक मदतीला! हेडटाँर्च, स्लिपींग बँग इ.महत्वाच्या गोष्टी पण सोबत आवर्जुन घेतलेल्या! थोडक्यात सर्व तयारीनिशी आणि योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही हे साहस करणार होतो.ऐनवेळी येणाऱ्या अडचणी ला तोंड द्यायलाही या सर्व बारीक सारीक गोष्टीसह आमच्या प्रत्येकाची तयारी होती.

मोरोशीच्या कमानीतून भैरवगडाच्या पायथ्याशी जाणारी वाट तशी रूळलेली कारण प्रत्येक गिर्यारोहकाला आपण मोरोशीच्या भैरवगडाच्या पायरया चढून आणि उतरुन आल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही याची जाणीव असते.

हळूहळू वर जाताना सकाळ च्या रम्य वातावरणात मजा येत होती.आज नानांच्या शब्दाखातर ज्यांनी महाराष्ट्रात गिर्यारोहण क्षेत्रातील कातळरोहणाची चळवळ चालू केली असे हिराकाका आणि दिलीपसर असल्याचे वेगळेच अप्रूप होते.नानाच्या सर्वसमावेशक वृत्तीने आजपर्यंत अनेक थोरामोठ्यांचा सहवास लाभला आहे हे नक्की नमूद करावे असे.एका टप्प्यावर सकाळच्या सोनेरी रंगात उजवीकडे गेलेली सोंड काही जण वाकडी वाट करून पाहून आले नव्हे छायाचित्रे काढण्यासाठी मुद्दाम गेले. दरम्यान उजवीकडे भोरांड्या च्या दाराच्या दिशेने कसे जाणार याविषयी गुरुवर्यांची चाललेली चर्चा समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो.

भैरवगडाच्या कातळचढाई मोहिमांसाठी मुक्काम करण्याची जागा काही वेळात आली.सकाळच्या थंड वातावरणात तिथली हिरवीगार दाट झाडी अतिशय सुखद होती.त्यानंतर सरळ भैरवगडाच्या कातळभिंती कडे जाणारी ६० अंशाची चढाई करत आम्ही भैरवच्या दक्षिणेकडे म्हणजे मोरोशीच्या दिशेने असलेल्या कातळातील थंडगार खांबटाक्याच्या पाशी विसावा घेतला.छान गप्पा गोष्टी करत वर जाऊन टाक बघून पोटभर पाणी प्यालो आणि सगळ्यांनी सर्व पाण्याचा साठा १००% भरुन घेतला.आता पाणी थेट दौंड्याच्या खिंडीतून खाली उतरल्यावर मिळणार होते.

टाक्यापासून पूर्वेस जाऊन भैरवगडाच्या मागच्या भिंतीपाशी जिथून सुप्रसिद्ध कातळातल्या अवघड पायरया आहेत तिथ जायला निघालो. ती चढाई पण तशी नवख्या माणसाला कठीणतेची कल्पना देणारीच आहे.अगदी २० मिनिटात आम्ही बरोबर पायरयांच्या खाली असणाऱ्या खिंडीत पोहचलो.तिथे एक ग्रुपफोटो नानांनी घेतला आणि तिथून दौंड्याची खिंड बघत असताना सरळ घसारा चढ बघून खरया आव्हानाची जाणीव सर्वांना झाली. पायरया, खोबण्या आहेत म्हणजे वाट आहे ही एकच दिलासा देणारी नोंद असल्याशिवाय या ठिकाणी चढाई करायला कोणी धजवणार नाही. असो.

वेळ शनिवार सकाळी ९ ची.एक घसारयाचा चढ चढून आम्हा सर्वांना एका जागी थांबवून हिराकाका आणि दिलीपसर पुढे वाट बघायला निघाले आणि आम्ही भैरवच्या पायरया कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय चढणाऱ्या ५/६ मुलांची गंमत बघत थांबलो.गुहेपासून वर त्यांना चढताना पाहून न राहवून मी चार गोष्टी सुनावल्या पण तरीही दोन आगाऊ कार्टी वर गेलीच.मात्र बाकी घाबरून थांबले.१५/२० मिनिटात वरुन दोर लावल्याचा आवाज दिलीप सरांनी दिला आणि कसेबसे दोराच्या खाली पोहचलो.इथून डावीकडे भयंकर दरी आणि उजवीकडे ८० अंशाची चढाई चालू झाली ती अजून भयप्रद उंची गाठत दौंड्याच्या खिंडीपर्यंत कायम राहिली.



एक एक जण दोर पकडून वर १५० फूट चढला आणि खालची जागा लय भारी होती अस वाटायला लागले.अगदी कातळाला पाठ चिकटून समोर ७००/८०० फूट खोल दरी असे सगळे उभे राहिले काही बसले.सर्व वर आले आणि दिलीप सरांनी दोर कमरेला गाठ मारत गुंडाळून तशा खतरनाक वाटेवरून परत डावीकडे समांतर वाटचाल चालू केली.परत ते आमच्या नजरेआड! मग दोराच्यालांबीचा अंदाज घेत परत बोल्डरला अँकर करून आवाज दिला.जीव मुठीत घेऊन आणि दोर पकडत परत आम्ही अँकरपर्यंत पोहचलो.


ईथे पहिल्या ७/८ पायरया दिसल्या आणि वाट बरोबर असल्याची खात्री पटली.पण पायरया म्हणजे एखाद्या मुलाला दिवसभर घरात डांबून ठेवायचे आणि एखादे चाँकलेटचे आमिष दाखवायचे इतकेच नुसता दिलासा देण्यापुरत्या!
मात्र आता अंगावर असणारा छोट्या नाळीसारख्या जागेतून वर जाणारा कातळ! खाली न बघता वर पकड घेत सावकाश वर चढलो आणि मग परत तिरपी वर चढणारी घसारयाची वाट! 


कुठं बुड टेकायच समाधान या वाटेत असण्याची शक्यता संपुष्टात येत होती.एकदा चक्रव्यूहात घुसलो की एकामागून एक अवघड कोडी आणि त्यातून मागे येण्याचा दरवाजा बंद!

आता मात्र सहनशीलता तपासणी चालू झाली होती.डावीकडून डोळे फिरवणारी दरी उजवीकडे तसाच उंच ७० अंशाचा घसारा, ना कारवी, ना कातळ ना झाडं! बरं एका जागी पुढची व्यवस्था होईपर्यंत थांबावे तर पायाखालची भुसभुशीत माती दरी कडे घसरायची, पकडायला काही नाही. काठी गाडायची आणि बर्फात क्रँपाँनने करतो तशी डोंगराकडच्या बाजूची माती उकरायची बुटानं आणि स्थिर व्हायचं!

इथे आता एक गडबड झाली. समोर वाट अजून अवघड घसारायुक्त असल्याने आणि दोर बांधायला जागा नसल्याने हिरा सरांना वाटले की वर कातळकड्यापर्यंत जाऊन ट्रँव्हर्स मारावा.दिलीप सर मात्र सरळ गेले.मग संजय शेळकेने दोर कमरेला गुंडाळत वर कड्याकडे चढाई चालू केली.तो कसाबसा एका अवघड जागी पोहचला जो की खालून आम्हाला दिसेना.मग मोठ्या मुश्किलीने एका जागी दगडाला पाय रोवून बसत आम्हाला वर येण्यासाठी दोर पकडून यायला त्याने सांगितले. मग एक वर जाईपर्यंत दुसरा खाली अस करत एक एक जण वर चढाई करु लागला.दोर हा संजयला अँकर असल्याने त्यावर फार भार द्यायचा नाही. फक्त आधारापुरता धरायचा आणि बाकी फ्री क्लाईंब! 


त्यात सगळे वेगवेगळ्या टप्प्यात आणि हिरासर वर जाऊन बघतात तर तिथून जाणे शक्य नाही. मग परत आहे त्या ठिकाणी परत यायची जी कसरत झाली ती तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये अशी.७० ते ८० अंशाची उतराई तीही फक्त आम्हाला दोरावर लोंबकळत करण्याची सुविधा आणि दोर गुंडाळून संजय आणि हिरासर कसे उतरले असतील ही त्यांनाच कल्पना! मात्र या भानगडीत दुपारचे ३ वाजले.म्हणजे ६ तासात आम्ही फक्त दोन टप्पे चढून आणि एका अवघड घसारयावर! परत जायचे म्हटले तर तिरप परत कस उतरणार कारण अँकरींगला जागा नाही आणि दरी ९०० ते १००० फूट सरळ घसारयाची.कातळ, नाळ, झाड काही नाही! मग दोघं खाली आल्यावर त्यांच्यामागे दिलीपसर ज्या बाजूने गेले तिकडून चालू लागलो.एकामागे एक! बोलती बंद! 

माझ्यासमोर विजय त्यामागे नाना आणि त्यामागे डॉ. गायकवाड! आता डॉ चे वजन ८७ किलो! खालचे गवत त्यांचे वजन घेण्याचे कबूल करेना आणि पुढ माग व्हायची संधी नाही. कसबस त्यांना माझी कल्पना सांगत डोंगराकडचा भाग बूट घासून माती उकरुन जागा करत उभ राहण्याचा प्रयत्न करणच आमच्या हाती.बर पुढ दोर लावण्यासाठी जागा बघायला गेलेले मागे येऊ शकत नव्हते.मग सावकाश आम्ही एकमेकांना धीर देत पुढे सरकू लागलो.बर त्यातही वाट कधी खाली उतरायची तर कधी वर चढायची.आता वर चढायचे जेमतेम पाऊल बसेल अशा घसारयावर तर पाठपिशवी सह शरीर ओढणे अजून अवघड! मला स्वतः पेक्षा समोरच्यांचे प्रयत्न बघून त्यांचीच भिती वाटायची! परत थांबून आपल्याला तेच करायचं आहे हा नकळत तणाव! खालून सुरु केल्यापासून आतापर्यंत एकदाही बूड टेकून काही करता आले नव्हते आणि अजून काही तस होण्याची संधी ही नव्हती.मी पाणपिशवी घेऊन त्याची नळी समोर अडकवल्याने अधूनमधून पाण्याचे दोन घोट घेऊ शकत होतो नाही तर पाण्याची बाटली काढणे आणि परत ठेवणे ही कसरत पण मागच्या भिडूच्या मदतीने! 

काही अंतर गेल्यावर समोर अशक्य असा वक्राकार ट्रँव्हर्स आणि समोर एक झाडं! त्या झाडाला दोर बांधून एकीकडे संजय उभा.एकेकाने देवाचे नाव घेत झाड गाठले आणि संजय मागून रोप गुंडाळत आला.इथे वरून दूरून दिलीपसरांचा आवाज आला.या वाटेची गंमत म्हणजे प्रत्येक टप्पा १०० फूटांच्या पलिकडे नजरेआड! म्हणजे दोर घेऊन गेलेला माणूस काय करतो हे त्याने जागा शोधून दोर बांधेपर्यंत दिसायचे नाही आणि ईकडे काही तरी करुन पुढे गेलो तर कुठतरी विसावता येईल ही "भाबडी"आशा!सारखा आवाज द्यायचा आणि समोरचा कधी ये म्हणतो याची वाट बघायची.वेळ संध्याकाळी ६! 


आता उरलेली न दिसणारी वाट बघता आपण आज याबाहेर पडणार नाही हे नक्कीच याची खात्री पटलेली! फक्त नाळीत पोहचलो तर सुरक्षित जागी मुक्काम करता येईल  एवढीच समाधानकारक बाब आणि उद्दिष्ट! पाणी आणि खाण्याचे भरपूर असल्याने बाकी चिंता नव्हती.हेड टाँर्च प्रत्येकाने आता तयार केल्या आणि डोक्याला लावल्या.

परत एक कातळ चढत हिरासर वर गेले आणि आम्ही कसरत करत त्यांच्या मागे दोर धरून! वर परत घसारा पण काही कारवीचा आधार पहिल्यांदा मिळाला. आता डावीकडे नाळ आमच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि दिलीप सर जे सकाळपासून गायब होते ते समोर दिसले.ते म्हटले अरे मी बँग वर पायरया पाशी ठेवून आलोय चला.आता उजवीकडे नाळ चालू झाली. सुरुवातीला काही १०० /२०० फूट बरी जागा आणि कमी उतार पण परत सरळसोट उभा कडा आणि नाळेतून वर जाता येणार नाही तर डावीकडे कड्याच्या बाजूने चढावे लागेल म्हणून परत दोर वर जाऊन लावला.तोपर्यंत आम्ही थोडावेळ बसून काही संत्री खाल्ल्या! सकाळपासून अन्नाचा कण नाही. डबे तसेच पाठपिशवीत! पण आता ७ वाजलेले! अंधार पडलेला.आता पुढ काय वाढून ठेवलेय याची कल्पना पुरेशी नव्हती!

भाग १ समाप्त!

धन्यवाद!




Saturday 28 March 2020

गायनाळेतील चकवा

  नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।

इस आत्माको शस्त्र काट नहीं सकते, आग जला नहीं सकती, जल गला नहीं सकता और वायु सूखा नहीं सकता ।


दिवसभर आग ओकून सूर्य मावळतीला चाललेला. सायंकाळची वेळ! सह्याद्रीच्या अतिशय अवघड आणि वर्षानुवर्षे मानवी वापर थांबलेल्या गाय नाळेच्या खालच्या खिंडीमध्ये तो एकटाच!जवळ न पाण्याची बाटली, न खाण्याचे काही !अंगावरचे कपडे आणि दोन-चार जमिनीचे कागद असणारी पिशवी या व्यतिरिक्त काहीही नाही.

       सह्याद्रीच्या या अतिदुर्गम भागामध्ये होते ते फक्त दोन्ही बाजूने हजारभर फूट खोल कोसळलेली दरी आणि वरच्या टप्या मध्येही हजार फूट उंचीचा डोंगर! दूरवर जंगल, शांतता आणि जंगलातील चित्रविचित्र आवाज या व्यतिरिक्त फक्त अगदी दखल न घेण्याइतका किरकोळ मानव!

    आज सकाळी सात वाजता जेव्हा पाने गावातून एका ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुप सोबत पुण्याला जाण्यासाठी तो सोबत निघाला तेव्हा ही वाट इतके लोक चालले आहेत तर आपणही जाऊ एवढाच त्याने विचार केलेला. वापर नसलेल्या अवघड जागी स्थानिक चांदर आणि पाने गावातील दोन वाटाडे सोबत घेऊन पुणे ट्रेक ग्रुप आणि नाशिक पुणे सह्यमित्र मंडळाच्या सह्याद्रीत नियमित भटकंती करणाऱ्या चौदा-पंधरा भटक्यांच्या समूहासोबत तो निघालेला पण कैक वर्ष वापर नसल्याने ही वाट पूर्णता मोडलेली! जंगलाच्या काटेरी जाळ्यांनी, झुडपांनी वेढलेली! ठिकठिकाणी त्या जाळ्या साफ करत आणि काही ठिकाणी दोर लावत ते इथपर्यंत पोहोचलेले सगळ्यांकडे पाणी आणि खाण्याचे पदार्थ भरपूर असल्याने त्याला कुठलीही अडचण आत्तापर्यंत तरी आली नव्हती मग तो एकटाच मागे कसा राहिला?

 तर कोणताही ट्रेकर असं कोणाला मध्येच सोडून जाणार नाही तसे संस्कारच सह्याद्री त्यांना देत नाही. पण इथपर्यंत सगळ्यांसोबत खाण्याचे पदार्थ आणि पाणी हे जागोजागी घेत आल्यानंतर का कोणास ठाऊक पण सर्वांनी आग्रह करूनही "येतो" "चला पुढे " हे त्यानेच या सर्व मंडळींना सांगितलेले.


 या खिंडीतून वर एक घसारयाचा टप्पा चढून गेल्यावर डावीकडे आभाळाला टेकलेले कडे आणि उजवीकडे पावलागणिक खोल होत जाणारी दरी! जेमतेम पाऊल बसेल अशी कड्याच्या पोटातून घसारा असणारी आणि चढ ऊतार असणारी वाट! निव्वळ गावकरी पोहचू शकत नाही त्यामुळे शिल्लक गवत आणि उजवीकडे असणारी कारवी यामुळेच हे पार करणे शक्य होते अन्यथा नाही.अंधार पडण्यापूर्वी खानूचा डिगा आणि पुढे माणगाव असा लांबचा पायी गाठायचा पल्ला आणि पुढे पानशेतमार्गे पुणे गाठून नाशिककर नाशिकसाठी रवाना होणार या तणावाखाली मग मामा येतो म्हटलेत तर येतील असे सर्वांनी मान्य केलेले.अवघड ठिकाणी एखाद्या ला जबरदस्ती न करता त्याच्या शरीराला पुढच्या अवघड चढाईसाठी तयार व्हायला वेळ द्यावा ही पण भावना यामागे त्यांची होती.आणि सगळ्या टीमची जबाबदारी असल्याने एकासाठी सर्व अडचणीत येणार नाहीत हे पण भान ठेवणे आवश्यक होते.अशा अवघड जागी पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नव्हता.

त्याचे नाव रामचंद्र सावंत.वय साधारण 60 वर्ष पुण्याच्या नाना पेठेतील एका जुन्या वाड्यात बायको आणि दोन मुलांसह एका छोट्याशा खोलीत तीस वर्ष संसार थाटलेला! उपजीविकेसाठी ऑटो रिक्षा चालविण्याचा त्याचा व्यवसाय.मोठा मुलगा आता शिकून भोसरी मधील एका कंपनीत नोकरीला लागलेला, त्याचं लग्न उरकून टाकले म्हणजे एका जबाबदारीतून आपण मुक्त होऊ या विचाराने काका आता अधूनमधून आपल्या मूळ गावी यायचे. त्यानिमित्ताने आपल्या पाहुण्यांमधून एखादी मुलगी पसंत पडली तर यंदा बार उडवून द्यावा हा मूळ उद्देश यामागे होता आणि जमलंच तर वर्षाला थोडाफार धान्य देणारी शेतीवाडीही आपल्या नावावर करून घेऊन दोन मुलांचे नाव त्यावर लावून घ्यावं असाही विचार यामागे होता.


पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला वेल्हा आणि भोर तालुक्याच्या सीमारेषेवर जी सह्याद्रीची रांग पसरलेली आहे त्याखाली कुंभे शिवथर हे त्याचे गाव! समर्थ रामदास स्वामी च्या वास्तव्याने पुनित झालेली शिवथरघळ याच गावाच्या हद्दीमध्ये.उत्तरेकडून आंबेनळी त्यानंतर गोप्याघाट, सुपेनाळ आणि सर्वात दक्षिणेकडे वरंधाघाट आणि त्याचा रक्षण कर्ता कावळ्या किल्ला! 


  अगदी बालपणापासून छोट्या मोठ्या कामांसाठी पुणे ,भोर येथे जाण्या-येण्यासाठी या घाटवाटांंचा वापर त्यांच्या पूर्वजांप्रमाणे त्यांनीही असंख्यवेळा केलेला. बऱ्याच वेळा वेल्ह्यात येऊन केळद गाठायचे आणि मग पुढे घाटाने खाली कोकणात उतरून आपले गाव गाठायचे हा त्यांचा आवडीचा प्रकार ! त्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी एक तर खर्च कमी व्हायचा आणि दुसरे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवता यायचे परत जाताना जर काही जड सामान नसेल तर अजूनही ते याच मार्गाने परत फिरायचे त्यांच्या या प्रकाराला काकू कधीतरी विरोध करायच्या पण आताशा मुलाने थोडी जबाबदारी घेतल्याने त्याही फार मनावर घेत नव्हत्या.

 एका शुक्रवारी त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले "अगं उद्या मी जरा गावाकडे जाऊन येतो त्या मोरेंनी एक स्थळ सुचवले आहे आणि तो भाऊसाहेब पण भेटला तर बघतो मागच्यावेळी ही उताऱ्यावर नोंद करायची राहिली होती "
बरं या जाऊन येताना जरा तांदळाचा एक कट्टा पण घेऊन या मग परत दोन महिने काळजी नाही.


 त्याप्रमाणे काका स्वारगेटहून केळद एस टी ने केळद आणि मग मढे घाटाने खाली उतरून आपल्या गावी पोहोचले.भावासोबत चर्चा करून त्या मोरेंची भाची आपल्या मुलासाठी बघण्यास शनिवारी लिंगाणा आणि रायगड यामध्ये वसलेल्या पाने गावात जायचे ठरवले.तलाठी सुट्टी वर असल्याने जमिनीचे काम होणार नव्हते मग तसेच पुढे पुण्याला जातो असे काकांनी त्यांच्या भावाला सांगितले.

शनिवारी पाने गावात आपले पाहुणे कोंडके यांच्याकडे ते गेले.मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून परत निघणार तर पाहुण्याने आग्रह केला की आज मुक्काम करा आणि उद्या निवांत बसने जावा.


दरम्यान शनिवारी रात्री उशीरा काही ट्रेकर मंडळी चांदरजवळच्या निसणीच्या वाटेने उतरुन गावात मुक्कामी आली.सकाळी लवकर चर्चा करताना ही मंडळी गायनाळ चढून वर खानूचा डिगा मग माणगाव आणि तिथून पानशेतमार्गे पुण्यात जाणार हे समजताच काकाही त्यांच्यासोबत जायला तयार झाले.खरतर नवख्या माणसाला सोबत घेण नियमात बसणार नव्हत पण काका काटक दिसत होते आणि वाटाड्याचेही ओळखीचे होते त्यामुळे एकमताने सर्व तयार झाले.


पाने हे गाव लिंगाणा आणि रायगड या मध्ये वसलेले. लिंगाण्याच्या वरची लिंगणमाची ही वाडी काही वर्षांपूर्वी दरड कोसळण्याच्या प्रकाराने स्थलांतरित करून पाने गावाच्या बाहेर पत्र्याची वाडी म्हणून वसवलेली. येथून पूर्वेला लिंगाणा काही हजार फूट उंचावलेला आणि त्यामागे रायलिंग पठार. बोराट्याची नाळ ही अवघड वाट वर घाटमाथ्यावरच्या मोहरी आणि कोकणातल्या पाने यांना जोडणारी तर त्याच्याच उत्तरेकडे निसणी, गायनाळ आणि बोचेघळ या वाटा घाटमाथ्यावरच्या अनुक्रमे चांदर, खानू आणि माणगाव यांना पाने वारंगी यांना जोडणाऱ्या! त्यापैकीच अजिबात वापरात नसणारी गायनाळ आज काका चढणार होते.


"ओ मामा" "ओ मामा" अशा वेळोवेळी हाका देऊनही मामा फक्त येतो असा आवाज द्यायचे.त्यांची चिंता आता सर्वांना लागली.वरच्या खिंडीत जवळजवळ दोन तास अवघड वाट पार करत पोहचल्यावरही मामा येईनात.त्यावरही अजून एक भयावह घसारयाचा टप्पा पार केल्यावरच बोचेघळीतून वर येणाऱ्या वाटेवर पोहचण्याच्या त्यामानाने सोप्या पण लांबलचक वाटेवर पोहचता येणार होते.तरी वरच्या एका टप्प्यावर जिथून खालची खिंड नजरेस पडायची तिथून परत मामांना आवाज दिले.आता मात्र त्यांचा प्रतिसाद येणे बंद झाले. 

खायला काही नाही, पाणी ही नाही त्यात जंगली जनावरांची भिती आणि कोणीही न फिरकणारी वाट! येथे त्यांचे बरे वाईट होऊ शकते या चिंतेने आम्हाला जरा बोचेघळीतून वर येणाऱ्या मार्गी लावून तुम्ही परत मामांना घ्यायला परत जा आणि खाली घेऊन एसटीने बसवून द्या अशी विनंती आम्ही वाटाड्यांना केली.दोघही समजदार होते.ते तयार झाले. बोचेघळीतून वर येणारी वाट येताच आम्ही त्यांना जवळचे काही पाणी आणि खाण्याचे पदार्थ देऊन आणि त्यांची बिदागी देऊन रवाना केले.फोनवर आम्हाला काय झाले ते कळवा हे पण सांगितले. आणि आम्ही ठळक मळलेल्या वाटेने खानूचा डिगा मग रात्री ८ वाजता पायी माणगाव आणि १२ च्या सुमारास घरी पोहचलो.

दोन दिवस त्या वाटाड्यांंचा फोनच लागला नाही. मग दोन दिवसांनी त्यांचा फोन लागला आणि काका सुखरूप असल्याचे कळले.पण त्यांना काकांनी स्वतः सांगितलेली कथा ही भयचकित करणारीच होती.

साधारण दुपारी २ च्या सुमारास जेव्हा आम्ही वरच्या खिंडीकडे जायला निघालो तेव्हा काका जरा थकवा आला म्हणून तिथे बसले.आम्ही त्यांना आवाज देत होतो तेव्हा त्यांची निघायची ईच्छा असूनही हातपाय हलायला तयार नव्हते.सुरुवातीला उन्हाच्या त्रासाने शरीरातील पाणी कमी झाले असे त्यांना वाटले म्हणून त्राण शिल्लक नसावे असेही वाटले.त्यामुळे आमच्या हाकांना प्रतिसाद देऊनही ते हालचाल करत नव्हते.पण अशाच अवस्थेत दोन तीन तास झाले आणि संध्याकाळचे पाच वाजले.आम्ही जसे नजरेआड झालो तसे त्यांना भिती वाटू लागली.
शरीराची हालचाल करायची इच्छा असूनही कसेबसे उठून बसता आले.

सगळीकडे नीरव शांतता आणि कसलाही आवाज नाही. अचानक त्यांना कोणीतरी हाक मारली असे त्यांना वाटले.त्यांनी आम्ही वर गेलोय त्या दिशेने पाहिले पण कोणीही नजरेस पडेना.थोड्या वेळात परत हाक ऐकू आली.आणि अचानक ते उठून उभे राहिले. एवढ्या वेळेत हातपाय हलवण्याचा प्रयत्न करुनही हालचाल होत नव्हती मग अचानक एवढी शक्ती कशी आली असावी याचा ते विचार करत होते.जरा आवाजाचा मागोवा घ्यावा म्हणून ते ईकडेतिकडे बघू लागले आणि आम्ही आलेल्या वाटेच्या अगदी विरुद्ध दिशेला जिकडे १५०० फूट खाली कोसळणारी दरी होता तिथून कोणीतरी त्यांना बोलवते आहे असे त्यांना जाणवले.अनाहूतपणे ते त्या दिशेला जाऊ लागले. हातातील पिशवी त्यांनी खाली दरीत फेकून दिली आणि हळूहळू दरीच्या टोकाकडे ते जाऊ लागले.ते काय करत आहेत याचे भानच त्यांना उरले नव्हते.आणि ते जेव्हा भानावर आले तेव्हा एका अशा अवघड कड्यावर ते पोहचले होते की जिथे दोराशिवाय जाणे अशक्य होते.अजून दोन चार पावले आणि आज त्यांचा अंत अटळ होता.तेवढ्यात आमचे वाटाडे जे अगदी कमी वेळात खालच्या खिंडीत उतरून गेले होते त्यांच्या हाका आल्या ओ पाव्हणं! या हाकेनेच त्यांचा जीव वाचवला होता.

कसेबसे करुन दोघांनी मदत करुन त्यांना परत खिंडीत आणले आणि हळूहळू करुन खाली गावात घेऊन गेले.आणि दुसऱ्या दिवशी एसटीने पुण्यात रवाना केले.

सह्याद्रीच्या दरयाखोरयात फिरताना असे अमानवीय अनुभव मला तर कधी आले नव्हते पण ही घटना माझ्या कल्पनेपलिकडची! एखादी जागा आपल्यावर गारूड करते आणि आपण त्या जागेच्या त्या शक्तीच्या अधीन होऊन संमोहित होऊन हे सगळ करतो असा विचार माझ्या मनात आला.अशा शक्ती म्हणजे इथे प्राण गमावलेले मानव असतील की आणखी काही? या संमोहनातून त्यांना बाहेर पडायला कारणीभूत आम्ही काळजीने अर्ध्या वाटेतून नियम तोडून परत पाठवलेले वाटाडे असतील की काही ईश्वरी शक्ती ? आजही गडकोटांच्या पायथ्याशी असणारे गावकरी ह्या शक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांचा आदर करतात हे पण मी अनुभवलेय.आयुष्याची दोरी बळकट असली तर अशा प्रसंगातूनही आपण बाहेर पडू शकतो आणि नसेल तर..।.

मित्रांनो हा अनुभव १००% खरा असून अजिबात काल्पनिक नाही ! त्या काकांचा जीव वाचला आणि ते सुखरुप राहिले याचे समाधान कायम राहील नाही तर आपण यासाठी नकळत का होईना कारणीभूत झालो याची सल कायम राहिली असती. मित्रांनो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना तिथले स्थळविशेष, भौगोलिक, ऐतिहासिक माहिती! तिथली जैवविविधता हे तर महत्त्वाचे आहेच पण असेही काही अनुभव कोणाला आले असतील तर नक्कीच वाचायला आवडेल.

धन्यवाद!