Saturday 28 March 2020

गायनाळेतील चकवा

  नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।

इस आत्माको शस्त्र काट नहीं सकते, आग जला नहीं सकती, जल गला नहीं सकता और वायु सूखा नहीं सकता ।


दिवसभर आग ओकून सूर्य मावळतीला चाललेला. सायंकाळची वेळ! सह्याद्रीच्या अतिशय अवघड आणि वर्षानुवर्षे मानवी वापर थांबलेल्या गाय नाळेच्या खालच्या खिंडीमध्ये तो एकटाच!जवळ न पाण्याची बाटली, न खाण्याचे काही !अंगावरचे कपडे आणि दोन-चार जमिनीचे कागद असणारी पिशवी या व्यतिरिक्त काहीही नाही.

       सह्याद्रीच्या या अतिदुर्गम भागामध्ये होते ते फक्त दोन्ही बाजूने हजारभर फूट खोल कोसळलेली दरी आणि वरच्या टप्या मध्येही हजार फूट उंचीचा डोंगर! दूरवर जंगल, शांतता आणि जंगलातील चित्रविचित्र आवाज या व्यतिरिक्त फक्त अगदी दखल न घेण्याइतका किरकोळ मानव!

    आज सकाळी सात वाजता जेव्हा पाने गावातून एका ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुप सोबत पुण्याला जाण्यासाठी तो सोबत निघाला तेव्हा ही वाट इतके लोक चालले आहेत तर आपणही जाऊ एवढाच त्याने विचार केलेला. वापर नसलेल्या अवघड जागी स्थानिक चांदर आणि पाने गावातील दोन वाटाडे सोबत घेऊन पुणे ट्रेक ग्रुप आणि नाशिक पुणे सह्यमित्र मंडळाच्या सह्याद्रीत नियमित भटकंती करणाऱ्या चौदा-पंधरा भटक्यांच्या समूहासोबत तो निघालेला पण कैक वर्ष वापर नसल्याने ही वाट पूर्णता मोडलेली! जंगलाच्या काटेरी जाळ्यांनी, झुडपांनी वेढलेली! ठिकठिकाणी त्या जाळ्या साफ करत आणि काही ठिकाणी दोर लावत ते इथपर्यंत पोहोचलेले सगळ्यांकडे पाणी आणि खाण्याचे पदार्थ भरपूर असल्याने त्याला कुठलीही अडचण आत्तापर्यंत तरी आली नव्हती मग तो एकटाच मागे कसा राहिला?

 तर कोणताही ट्रेकर असं कोणाला मध्येच सोडून जाणार नाही तसे संस्कारच सह्याद्री त्यांना देत नाही. पण इथपर्यंत सगळ्यांसोबत खाण्याचे पदार्थ आणि पाणी हे जागोजागी घेत आल्यानंतर का कोणास ठाऊक पण सर्वांनी आग्रह करूनही "येतो" "चला पुढे " हे त्यानेच या सर्व मंडळींना सांगितलेले.


 या खिंडीतून वर एक घसारयाचा टप्पा चढून गेल्यावर डावीकडे आभाळाला टेकलेले कडे आणि उजवीकडे पावलागणिक खोल होत जाणारी दरी! जेमतेम पाऊल बसेल अशी कड्याच्या पोटातून घसारा असणारी आणि चढ ऊतार असणारी वाट! निव्वळ गावकरी पोहचू शकत नाही त्यामुळे शिल्लक गवत आणि उजवीकडे असणारी कारवी यामुळेच हे पार करणे शक्य होते अन्यथा नाही.अंधार पडण्यापूर्वी खानूचा डिगा आणि पुढे माणगाव असा लांबचा पायी गाठायचा पल्ला आणि पुढे पानशेतमार्गे पुणे गाठून नाशिककर नाशिकसाठी रवाना होणार या तणावाखाली मग मामा येतो म्हटलेत तर येतील असे सर्वांनी मान्य केलेले.अवघड ठिकाणी एखाद्या ला जबरदस्ती न करता त्याच्या शरीराला पुढच्या अवघड चढाईसाठी तयार व्हायला वेळ द्यावा ही पण भावना यामागे त्यांची होती.आणि सगळ्या टीमची जबाबदारी असल्याने एकासाठी सर्व अडचणीत येणार नाहीत हे पण भान ठेवणे आवश्यक होते.अशा अवघड जागी पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नव्हता.

त्याचे नाव रामचंद्र सावंत.वय साधारण 60 वर्ष पुण्याच्या नाना पेठेतील एका जुन्या वाड्यात बायको आणि दोन मुलांसह एका छोट्याशा खोलीत तीस वर्ष संसार थाटलेला! उपजीविकेसाठी ऑटो रिक्षा चालविण्याचा त्याचा व्यवसाय.मोठा मुलगा आता शिकून भोसरी मधील एका कंपनीत नोकरीला लागलेला, त्याचं लग्न उरकून टाकले म्हणजे एका जबाबदारीतून आपण मुक्त होऊ या विचाराने काका आता अधूनमधून आपल्या मूळ गावी यायचे. त्यानिमित्ताने आपल्या पाहुण्यांमधून एखादी मुलगी पसंत पडली तर यंदा बार उडवून द्यावा हा मूळ उद्देश यामागे होता आणि जमलंच तर वर्षाला थोडाफार धान्य देणारी शेतीवाडीही आपल्या नावावर करून घेऊन दोन मुलांचे नाव त्यावर लावून घ्यावं असाही विचार यामागे होता.


पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला वेल्हा आणि भोर तालुक्याच्या सीमारेषेवर जी सह्याद्रीची रांग पसरलेली आहे त्याखाली कुंभे शिवथर हे त्याचे गाव! समर्थ रामदास स्वामी च्या वास्तव्याने पुनित झालेली शिवथरघळ याच गावाच्या हद्दीमध्ये.उत्तरेकडून आंबेनळी त्यानंतर गोप्याघाट, सुपेनाळ आणि सर्वात दक्षिणेकडे वरंधाघाट आणि त्याचा रक्षण कर्ता कावळ्या किल्ला! 


  अगदी बालपणापासून छोट्या मोठ्या कामांसाठी पुणे ,भोर येथे जाण्या-येण्यासाठी या घाटवाटांंचा वापर त्यांच्या पूर्वजांप्रमाणे त्यांनीही असंख्यवेळा केलेला. बऱ्याच वेळा वेल्ह्यात येऊन केळद गाठायचे आणि मग पुढे घाटाने खाली कोकणात उतरून आपले गाव गाठायचे हा त्यांचा आवडीचा प्रकार ! त्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी एक तर खर्च कमी व्हायचा आणि दुसरे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवता यायचे परत जाताना जर काही जड सामान नसेल तर अजूनही ते याच मार्गाने परत फिरायचे त्यांच्या या प्रकाराला काकू कधीतरी विरोध करायच्या पण आताशा मुलाने थोडी जबाबदारी घेतल्याने त्याही फार मनावर घेत नव्हत्या.

 एका शुक्रवारी त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले "अगं उद्या मी जरा गावाकडे जाऊन येतो त्या मोरेंनी एक स्थळ सुचवले आहे आणि तो भाऊसाहेब पण भेटला तर बघतो मागच्यावेळी ही उताऱ्यावर नोंद करायची राहिली होती "
बरं या जाऊन येताना जरा तांदळाचा एक कट्टा पण घेऊन या मग परत दोन महिने काळजी नाही.


 त्याप्रमाणे काका स्वारगेटहून केळद एस टी ने केळद आणि मग मढे घाटाने खाली उतरून आपल्या गावी पोहोचले.भावासोबत चर्चा करून त्या मोरेंची भाची आपल्या मुलासाठी बघण्यास शनिवारी लिंगाणा आणि रायगड यामध्ये वसलेल्या पाने गावात जायचे ठरवले.तलाठी सुट्टी वर असल्याने जमिनीचे काम होणार नव्हते मग तसेच पुढे पुण्याला जातो असे काकांनी त्यांच्या भावाला सांगितले.

शनिवारी पाने गावात आपले पाहुणे कोंडके यांच्याकडे ते गेले.मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून परत निघणार तर पाहुण्याने आग्रह केला की आज मुक्काम करा आणि उद्या निवांत बसने जावा.


दरम्यान शनिवारी रात्री उशीरा काही ट्रेकर मंडळी चांदरजवळच्या निसणीच्या वाटेने उतरुन गावात मुक्कामी आली.सकाळी लवकर चर्चा करताना ही मंडळी गायनाळ चढून वर खानूचा डिगा मग माणगाव आणि तिथून पानशेतमार्गे पुण्यात जाणार हे समजताच काकाही त्यांच्यासोबत जायला तयार झाले.खरतर नवख्या माणसाला सोबत घेण नियमात बसणार नव्हत पण काका काटक दिसत होते आणि वाटाड्याचेही ओळखीचे होते त्यामुळे एकमताने सर्व तयार झाले.


पाने हे गाव लिंगाणा आणि रायगड या मध्ये वसलेले. लिंगाण्याच्या वरची लिंगणमाची ही वाडी काही वर्षांपूर्वी दरड कोसळण्याच्या प्रकाराने स्थलांतरित करून पाने गावाच्या बाहेर पत्र्याची वाडी म्हणून वसवलेली. येथून पूर्वेला लिंगाणा काही हजार फूट उंचावलेला आणि त्यामागे रायलिंग पठार. बोराट्याची नाळ ही अवघड वाट वर घाटमाथ्यावरच्या मोहरी आणि कोकणातल्या पाने यांना जोडणारी तर त्याच्याच उत्तरेकडे निसणी, गायनाळ आणि बोचेघळ या वाटा घाटमाथ्यावरच्या अनुक्रमे चांदर, खानू आणि माणगाव यांना पाने वारंगी यांना जोडणाऱ्या! त्यापैकीच अजिबात वापरात नसणारी गायनाळ आज काका चढणार होते.


"ओ मामा" "ओ मामा" अशा वेळोवेळी हाका देऊनही मामा फक्त येतो असा आवाज द्यायचे.त्यांची चिंता आता सर्वांना लागली.वरच्या खिंडीत जवळजवळ दोन तास अवघड वाट पार करत पोहचल्यावरही मामा येईनात.त्यावरही अजून एक भयावह घसारयाचा टप्पा पार केल्यावरच बोचेघळीतून वर येणाऱ्या वाटेवर पोहचण्याच्या त्यामानाने सोप्या पण लांबलचक वाटेवर पोहचता येणार होते.तरी वरच्या एका टप्प्यावर जिथून खालची खिंड नजरेस पडायची तिथून परत मामांना आवाज दिले.आता मात्र त्यांचा प्रतिसाद येणे बंद झाले. 

खायला काही नाही, पाणी ही नाही त्यात जंगली जनावरांची भिती आणि कोणीही न फिरकणारी वाट! येथे त्यांचे बरे वाईट होऊ शकते या चिंतेने आम्हाला जरा बोचेघळीतून वर येणाऱ्या मार्गी लावून तुम्ही परत मामांना घ्यायला परत जा आणि खाली घेऊन एसटीने बसवून द्या अशी विनंती आम्ही वाटाड्यांना केली.दोघही समजदार होते.ते तयार झाले. बोचेघळीतून वर येणारी वाट येताच आम्ही त्यांना जवळचे काही पाणी आणि खाण्याचे पदार्थ देऊन आणि त्यांची बिदागी देऊन रवाना केले.फोनवर आम्हाला काय झाले ते कळवा हे पण सांगितले. आणि आम्ही ठळक मळलेल्या वाटेने खानूचा डिगा मग रात्री ८ वाजता पायी माणगाव आणि १२ च्या सुमारास घरी पोहचलो.

दोन दिवस त्या वाटाड्यांंचा फोनच लागला नाही. मग दोन दिवसांनी त्यांचा फोन लागला आणि काका सुखरूप असल्याचे कळले.पण त्यांना काकांनी स्वतः सांगितलेली कथा ही भयचकित करणारीच होती.

साधारण दुपारी २ च्या सुमारास जेव्हा आम्ही वरच्या खिंडीकडे जायला निघालो तेव्हा काका जरा थकवा आला म्हणून तिथे बसले.आम्ही त्यांना आवाज देत होतो तेव्हा त्यांची निघायची ईच्छा असूनही हातपाय हलायला तयार नव्हते.सुरुवातीला उन्हाच्या त्रासाने शरीरातील पाणी कमी झाले असे त्यांना वाटले म्हणून त्राण शिल्लक नसावे असेही वाटले.त्यामुळे आमच्या हाकांना प्रतिसाद देऊनही ते हालचाल करत नव्हते.पण अशाच अवस्थेत दोन तीन तास झाले आणि संध्याकाळचे पाच वाजले.आम्ही जसे नजरेआड झालो तसे त्यांना भिती वाटू लागली.
शरीराची हालचाल करायची इच्छा असूनही कसेबसे उठून बसता आले.

सगळीकडे नीरव शांतता आणि कसलाही आवाज नाही. अचानक त्यांना कोणीतरी हाक मारली असे त्यांना वाटले.त्यांनी आम्ही वर गेलोय त्या दिशेने पाहिले पण कोणीही नजरेस पडेना.थोड्या वेळात परत हाक ऐकू आली.आणि अचानक ते उठून उभे राहिले. एवढ्या वेळेत हातपाय हलवण्याचा प्रयत्न करुनही हालचाल होत नव्हती मग अचानक एवढी शक्ती कशी आली असावी याचा ते विचार करत होते.जरा आवाजाचा मागोवा घ्यावा म्हणून ते ईकडेतिकडे बघू लागले आणि आम्ही आलेल्या वाटेच्या अगदी विरुद्ध दिशेला जिकडे १५०० फूट खाली कोसळणारी दरी होता तिथून कोणीतरी त्यांना बोलवते आहे असे त्यांना जाणवले.अनाहूतपणे ते त्या दिशेला जाऊ लागले. हातातील पिशवी त्यांनी खाली दरीत फेकून दिली आणि हळूहळू दरीच्या टोकाकडे ते जाऊ लागले.ते काय करत आहेत याचे भानच त्यांना उरले नव्हते.आणि ते जेव्हा भानावर आले तेव्हा एका अशा अवघड कड्यावर ते पोहचले होते की जिथे दोराशिवाय जाणे अशक्य होते.अजून दोन चार पावले आणि आज त्यांचा अंत अटळ होता.तेवढ्यात आमचे वाटाडे जे अगदी कमी वेळात खालच्या खिंडीत उतरून गेले होते त्यांच्या हाका आल्या ओ पाव्हणं! या हाकेनेच त्यांचा जीव वाचवला होता.

कसेबसे करुन दोघांनी मदत करुन त्यांना परत खिंडीत आणले आणि हळूहळू करुन खाली गावात घेऊन गेले.आणि दुसऱ्या दिवशी एसटीने पुण्यात रवाना केले.

सह्याद्रीच्या दरयाखोरयात फिरताना असे अमानवीय अनुभव मला तर कधी आले नव्हते पण ही घटना माझ्या कल्पनेपलिकडची! एखादी जागा आपल्यावर गारूड करते आणि आपण त्या जागेच्या त्या शक्तीच्या अधीन होऊन संमोहित होऊन हे सगळ करतो असा विचार माझ्या मनात आला.अशा शक्ती म्हणजे इथे प्राण गमावलेले मानव असतील की आणखी काही? या संमोहनातून त्यांना बाहेर पडायला कारणीभूत आम्ही काळजीने अर्ध्या वाटेतून नियम तोडून परत पाठवलेले वाटाडे असतील की काही ईश्वरी शक्ती ? आजही गडकोटांच्या पायथ्याशी असणारे गावकरी ह्या शक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांचा आदर करतात हे पण मी अनुभवलेय.आयुष्याची दोरी बळकट असली तर अशा प्रसंगातूनही आपण बाहेर पडू शकतो आणि नसेल तर..।.

मित्रांनो हा अनुभव १००% खरा असून अजिबात काल्पनिक नाही ! त्या काकांचा जीव वाचला आणि ते सुखरुप राहिले याचे समाधान कायम राहील नाही तर आपण यासाठी नकळत का होईना कारणीभूत झालो याची सल कायम राहिली असती. मित्रांनो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना तिथले स्थळविशेष, भौगोलिक, ऐतिहासिक माहिती! तिथली जैवविविधता हे तर महत्त्वाचे आहेच पण असेही काही अनुभव कोणाला आले असतील तर नक्कीच वाचायला आवडेल.

धन्यवाद!







Wednesday 25 March 2020

अज्ञाताचा शोध

किती तास झाले असतील ? 
कदाचित काही वर्षे? 

कड्यावरच्या एक एक खोबण्यामध्ये जीवावर उदार होऊन वर सरकताना खाली २००० फूट कोसळणारी कातळाची उंची अजिबात खाली नजर जाऊ नये अशी! पण असेल ती शक्ती पणाला लावून हळूवार एक एक होल्ड घेत वर वर सरकत रहाण्याशिवाय पर्याय त्याच्याकडे नव्हता.कसेबसे शेवटचा काही फूटाचा टप्पा पार करत आणि त्यावरचा घसारा पार करत माथ्यावर एका सुरक्षित जागी त्याने बसकण मारली.खरतर त्याच्या बाबतीत जे घडले होते हे अविश्वसनीय होते.

सुट्टी चे दिवस बघून पाठपिशव्या अडकवायच्या त्यात जरूरीपुरते सर्व सामान भरून सह्याद्रीच्या दरयाखोरयात गडकोटांच्या भटकंती चा छंद गेली अनेक वर्ष त्याने जोपासला होता.खर पाहता ट्रेकींगचे हे वेड त्याच्यापुरतेच मर्यादित नव्हते तर समविचारी अनेक सह्य सवंगडी त्याच्यासोबत गेली अनेक वर्ष सोबतीला होते.नवनवीन माहिती काढून फारसे कुणी फिरकत नसणाऱ्या ठिकाणांची भटकंती करायची आणि तेथील भूगोलाचा आणि ईतिहासाचा मेळ जमतो का ते बघायचे हा त्याच्या भटकंती चा एक अविभाज्य घटक आताशा बनला होता.

त्यादिवशी त्याने फोन करुन विचारले की भंडारदरा धरणाच्या मागे असणाऱ्या कळसूबाई रांगेतील अलंगच्या भटकंती साठी कोणी तयार आहे का? पण का कुणास ठाऊक त्याला एकही जोडीदार मिळाला नाही. एकट्याने कुठे भटकायचे नाही हा अलिखित नियम मोडून जाण्यासाठी त्याचे मन धजावेना अनं घरीही शांत बसणे जमेना मग त्याने विचार केला की स्थानिक वाटाड्या ज्याला तो खूप वर्षापासून ओळखत होता त्याच्या सोबतीने हा ट्रेक पार पाडावा.त्याप्रमाणे त्याने सर्व तयारी केली.स्लिपींग बँग, पाणी, खाण्याचे पदार्थ, एक शिट्टी, स्विस नाईफ, स्लींग, हेड टाँर्च, हेल्मेट, १०० फूटी दोर, कँराबिनर, प्रथमोपचार पेटी आणि बरेच काही! वर्षानुवर्षे असणाऱ्या अनुभवातून यातील कोणती वस्तू कधीही उपयोगी पडू शकते हे तो जाणून होता.

शिवाजीनगर बसस्थानकावरून भंडारदरा जाणारी शेवटची बस त्याने पकडली आणि पहाटे ५ वाजता शेंडी स्थानकावर उतरुन समोरच्या हाँटेलात पाठपिशवीला टेकून हाँटेल उघडायची वाट बघू लागला.थोडा डोळा लागला आणि ओ पाव्हणं या हाँटेलमालकाच्या हाकेने त्याची झोप चाळवली.सकाळचे ६.३० वाजलेले.त्याने शांतपणे तोंड धुवून गरमागरम बटाटेवडे आणि चहा घेतला.मामा घाटघरला जायचे आहे बस किती वाजता आहे? ही काय समोर लागली हाय.बरोबर ७ वाजता सुटेल.त्याने मामांच्या हातात पैसे दिले आणि बसमध्ये जाऊन बसला.ड्रायव्हर आणि कंडक्टर आले आणि बस निघाली. 

भंडारदराच्या विल्सन जलाशयाच्या बाजूबाजूने उडदावणे, सामरद आणि घाटघर असा १.३० तासाचा प्रवास! घाटघरला एकनाथ च्या घरापाशी उतरून त्याने आत हाळी दिली.”एकनाथ” आतून एकनाथ ची वहिनी बाहेर आली.भाऊ या ! अनेक वर्षाच्या ओळखीतून एकनाथच्या घरचेही आता त्याला ओळखायला लागलेले.वहिनींनी कोरया चहाचा कप आणि पाण्याचा लोटा आणून ठेवला.एकनाथ वाईच नाशिकला गेलाय आज घरी नाही.

झाली का पंचाईत! पण अलंगचचा रस्ता त्याच्या अंगवळणी पडलेला.त्याने तिथ निरोप दिला की वहिनी मी अलंगला वर जातोय आज गुहेत मुक्काम करणार आहे.उद्या सकाळी एकनाथ ला नाष्टा घेऊन पाठवा.आणि तो एकटाच घाटघर उदंचन धरणाशेजारून निघाला.अलंग उजवीकडे ठेवत हळूहळू गाव ओलांडून पुढच्या ओढ्यात प्रातर्विधी उरकण्यासाठी पाठपिशवी उतरवली.नंतर थोडे हातातोंडावर पाणी मारून पुढच्या उभ्या चढाला लागला.दिवस उन्हाळ्याचे होते आणि साधारण ९ वाजलेले.पहिला झाडीचा टप्पा ओलांडून वरच्या पठारावर पोहचणारया दोन छोट्या टेकड्यांची चढाई एका लयीने चढत त्याने अलंगच्या कातळभिंती खाली असणारे पठार गाठले.तिथून हळूहळू सरळ एका नाळेपर्यंत तो आला आता ही नाळ वर चढली आणि सोपे कातळटप्पे पार केले की अलंगच्या त्यामानाने सोप्या वाटेवरची शिडी आणि शाबूत पण दगडाने चिणलेला दरवाजा.

हा टप्पाही त्याने सराईतपणे पार केला आणि दरवाजाशेजारून दगडाच्या भिंतीवरून दरवाजाच्या वरच्या कातळभिंती शेजारचा निमुळता पण सुरक्षित ट्रँव्हर्स गाठला.काही वेळातच उजवीकडची वाटेतील गुहा ओलांडून मोकळ्या मैदानात तो पोहचला आता वर उजवीकडे असणारी प्रशस्त गुहा हे त्याचे आजचे मुक्कामाचे ठिकाण! साधारण दुपारचा १ वाजलेला.गुहेकडे जातानाच मैदानावरच्या टाक्यात त्याने पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.गुहेत पण एक टाके आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नसते हे त्याला माहिती होते. गुहेमध्ये पोहचताच पाठपिशवी उतरवून तो विसावला.काही वेळ आराम करुन घरून आणलेला दुपारच्या जेवणाचा डबा त्याने उघडला आणि एकट्यानेच जेवण केले.रात्रीसाठी दोन जादाच्या दशम्या असणारा डबा बंद करुन परत व्यवस्थित ठेवला आणि स्लिपींग बँग काढून मस्त ताणून दिली.

रात्रभरचा प्रवास आणि सकाळची चढाई या थकव्याने अगदी काही सेकंदातच तो निद्रादेवीच्या आहारी गेला.त्याचे डोळे उघडले तेव्हा सायंकाळचे ५ वाजलेले.हळूवारपणे स्लिपींग बँग गुंडाळून त्याने पाठपिशवी उचलत बाहेर येत अंदाज घेतला.आज शुक्रवार असल्याने गडावर कोणी चिटपाखरूही नव्हते.खरतर एखादा घाबरला असता पण त्याला सह्याद्रीच्या दरयाखोरयात कधीही भिती वाटली नाही. नाही म्हटले तर साप आणि जंगली जनावरांची मात्र थोडी काळजी होतीच.पाठपिशवी त्यामुळेच त्याने गुहेत न ठेवता बरोबर घेतली आणि गुहेच्या वरचा कातळ चढत पाण्याच्या टाक्यांचा समुह गाठला.थोडे फ्रेश होत चिकीचे पाकीट काढून उगाच दोन तुकडे तोंडात टाकले.मावळतीच्या सूर्यनारायणाच्या साक्षीने वरच्या पडक्या राजवाड्याच्या एका अखंड भिंतीभोवती चक्कर मारत वर आत जाऊन एक दोन फोटो घेतले.

राजवाड्याच्या पलिकडे एक तलाव आणि त्यापुढे उघड्यावरचे मंदिर आणि पुरातन शिलालेख गाठायला त्याला अजून अर्धा तास लागला.का कुणास ठाऊक पण न वाचता येणारा शिलालेख आज त्याला स्पष्ट पणे वाचता येईल असे वाटत होते.सायंकाळच्या गूढरम्य वातावरणात एकेकाळी गजबजलेला गड, त्याचा ईतिहास आणि शिल्लक अवशेष यांच्यामध्ये तो हरवून गेला आणि जेव्हा भानावर आला तेव्हा सरळ अजून पुढे गडाच्या दक्षिण टैकाकडे अनाहूतपणे चालायला लागला.

जणू कोणीतरी त्याला तिकडे नेत होते. अगदी शेवटच्या टोकाजवळ पोहचताच तो आश्चर्यचकित झाला.त्याला उजवीकडे एक पायरयांची वाट उतरताना दिसली.आजवर कोणीही उल्लेख न केलेली आणि कदाचित कोणीही न पाहिलेली.अंधार आता काही क्षणात दाटणार होता.पण एखाद्या जादूगाराने त्याच्या मनाचा ताबा घ्यावा असे तो त्या अवघड पायरया सराईतपणे उतरला आणि कड्याच्या बाजूला आत त्या पायरया वळत होत्या.

आत वळताच आतल्या अंधारात त्या गुडूप झाल्या आणि काही समजायच्या आत तोही त्या भुयारात आत कैक फूट घसरत जाऊन जमिनीवर पडला.त्याची शुद्ध हरपली आणि……

घाटघरच्या एकनाथ च्या घराच्या समोरच्या मैदानात रात्री ८ वाजता एक चारचाकी उभी राहिली.गाडीमधून एकनाथ बरोबर अजून दोघ उतरले.एकनाथ घरामध्ये जाईपर्यंत त्या दोघांनी गाडीमधून आपल्या पाठपिशव्या उतरवल्या.आणि शेणाने सारवलेल्या पडवीमध्ये ते विसावले.आतमधून एकनाथ पाण्याची बादली आणि लोटा घेऊन आला.डॉ साहेब हातपाय धुवा आत जेवण बनवायला सांगितले आहे.दोघही शांतपणे हातपाय धुवेपर्यंत एकनाथ आत गेला आणि आवरायला लागला.

ओ भावजी ते पुण्याचे भाऊ आलते.

एकनाथने विचारले अर् त्यांनी फोन बी केला नव्हता नाही तर थांबलो असतो वाईच घरी.

नाय वो ते वर गडावर गेले.

अजून कोण हाय संग? कोणीबी नाय बगा.एकटंच गेलेत.मी थांबा सांगेस्तोवर निगाले.

कस काय एकटं? ते कदी आस येत न्हाईत.वर गडावर आज तर कुणी बी गेल नाय इथून.

हो त्यास्नी तुमाला उद्या बोलावल हाय सकाळी भाकरी घेऊन.

बरं.

बाहेर येऊन डॉ आणि त्यांच्या जोडीदाराला एकनाथ ने वहिनीने सांगितलेली खबर दिली.डॉ पण आश्चर्यचकित झाले.चला उद्या कुलंगला जायच रद्द करु आणि वर अलंगलाच जाऊ! मागच्या आठवड्यात भाऊशी झालेले दूरध्वनीचे बोलणे आठवून त्यांना कल्पना आली की भाऊ नक्कीच त्याचा शोध घ्यावा म्हणूनच आला असेल.तशी सह्याद्री मध्ये भटकणारी मंडळी वारंवार भेटत नसली तरी त्यांची नाळ आजकालच्या सोशल मिडीयाच्या जगातही जुळलेली आहे किंबहुना आपल्याला जाणून घ्यायच्या असणारया किंवा समोरच्याला स़ागाव्याशा वाटणारया गोष्टी आवर्जुन या माध्यमातून वाटल्या जातातच.पण निदान कल्पना तरी द्यायची लवकर आलो असतो आज.
असो.

भाकरी आणि झुणका खाऊन अंगणात त्यांनी पथारया पसरलया.तशी सवयच प्रत्येक भटक्याला असते.मऊ बिछान्यावर लागणार नाही अशी झोप स्लिपींग बँगमध्ये लागते.आकाशातील तारे बघत आणि उत्तर पूर्वेला पसरलेला अलंग मदन कुलंगचा अफाट पसारा बघत कधी डोळा लागला त्यांना समजलेच नाही. 

सकाळी ६ वाजताच एकनाथ ने दिलेला गरमागरम चहा आणि पोहे खाऊन तिघं अलंगच्या वाटेला लागले.साधारण ९.३० ला च अलंगची गुहा गाठली तर गुहेत कोणीही नाही. एवढ्या लवकर उठून एकटेच असल्याने भाऊ गडफेरीसाठी गेला असेल बहुतेक.थोडा विसावा घेत त्यांनी थोड फार खाल्ल आणि पाणी पिऊन गडफेरीसाठी निघाले. 

वर टाक्यांचा समुह, राजवाडा, पुढचा तलाव आणि उघड्यावरचे मंदिर! भाऊचा काही मागमूस नाही. आता जरा त्यांना काळजी लागली.
एकनाथ आपण त्यादिवशी बघायला गेलेल्या दक्षिण टोकाकडे तर ते गेले नसतील? तिघही लगबगीने निघाले.अगदी टोकावरच्या अवघड जागेवर जिथ उभ्या कड्यात त्यांनी पायरया बघितल्या तिथवर गेले तरी काही नाही. आता मात्र एकनाथसह सगळे चिंतीत झाले. अरे हे गेले कुठं? 

लहानपणापासून या गडाच्या अंगाखांद्यावर खेळलेला एकनाथही फार क्वचितच या भागात फिरकलेला.आणि एवढ्या कठीण जागी उतरण्याचे त्याचेही काळीज नव्हते.किमान दोर लावून बिले घेऊनच जावे असे हे ठिकाण! काय झालं असेल? काही वंगाळ तर नाही ना असा सहज विचार त्याच्या मनात आला.पण एकंदर भाऊंना ओळखता ते एकटे हे धाडस करणार नाहीत असे पुटपुटत त्याने तो विचार दूर लोटला.थोडा विचारविर्मश करुन तिघही परत खालच्या बाजूला निघाले.सगळ बघून गुहेपाशी परत आल्यावरही भाऊंचा काही तपास नाही. 

आता मात्र डॉ अस्वस्थ झाले. काय करावे? एकनाथ खाली फोन करून बघ बर उतरून गेलेत का? अलंगच्या कातळभिंती वरुन आंबेवाडीत उतरायच्या दुसरया मार्गाने उतरण्याचीही शक्यता नाही कारण परत एकट्याने अस कोणी करणे हा वेडेपणाच ठरु शकतो.त्यातल्या त्यात घाटघरकडे उतरण्यासाठी असणारी वाट सोपी.एकनाथने सवयीने उंचीवर जाऊन खाली फोन केला आणि पडत्या चेहरयाने तो परत आला.

डॉ. ते खाली पण उतरले न्हाईत.

दुपारचे ३ वाजलेले.आता आपण काही करायचे तर अंधाराच्या आत ते करणे शक्य नाही. तरीही एकनाथने त्याच्या सामरदच्या मित्रांना झालेलया घटनेची माहिती दिली.डॉ नी आता सूत्रे हाती घेतली आणि त्यांना दक्षिणेकडे कड्याच्या खाली तपास करुन कळवायला सांगितले. बाहेर कुठे अजून काही बोलू नका ही सूचनाही ते द्यायला विसरले नाहीत. त्यांच्यासोबत ३०० फूटाचा दोर आणि कातळरोहणाची सामुग्री त्यांनी तपासली आणि उद्या सूर्याच्या उगवतीला दक्षिण कड्याला गरज पडली तर भिडायचे याची त्या़नी मनोमन तयारी केली.तशा सूचना त्यांनी त्यांच्या जोडीदाराला आणि एकनाथलाही दिल्या…..

 एक मंदशी वारयाची झुळूक शुद्ध हरपलेल्या भाऊच्या अंगावर आली आणि त्याचे डोळे उघडले.पण सभोवताली संपूर्ण अंधार! कसबस बसत त्याने त्याच्या पाठपिशवीच्या वरच्या कप्प्यातून त्याची हेडटाँर्च चाचपली.अंधारातच अंदाजाने त्याचे सेलही टाकले आणि टाँर्च सुरु केली.सर्वप्रथम हातपाय हलवत तो उभा राहिला.आश्चर्य म्हणजे एवढ्या उंचीवरुन घसरुनही त्याला कुठलीच दुखापत झाली नव्हती.त्याने आँफलाईन मोडला टाकलेल्या मोबाईल वर वेळ बघितली.३ वाजलेले.पण दुपारचे की रात्री चे हे समजायला मार्ग नव्हता.बहुतेक रात्रीचे असावेत की दुपारचे? त्याला आता भूकेची जाणीव झाली आणि पाठपिशवीच्या आत ठेवलेल्या दोन दशम्या आणि चटणी तिथंच बसून त्यानी खाल्ली आणि पाणी प्याल्यावर जरा तरतरी आल्यावर त्याने मोबाईल परत चेक केला त्यावर ३.४३ पी.एम.बघितल्यावर त्याला जाणीव झाली की तो काल संध्याकाळ पासून पूर्ण रात्र आणि अर्धा दिवस बेशुद्ध अवस्थेत होता.

कालची घटना त्याच्या डोळ्यासमोर झरझरत आली पण शिलालेखापासून पुढे अशा ठिकाणी आपण कस पोहचलो आणि एवढ्या वरुन घसरुन काही न होता कस राहिलो हे त्याच्या विचारशक्ती पलिकडले होते.बरोबरच्या माणसांना साध्या साध्या सुरक्षितता गोष्टींचा आग्रह धरणारा मी अस कस आलो? विचारचक्र चालू असताना आता काही तरी करणे आवश्यक आहे हे त्याला जाणवले.त्याने टाँर्चच्या प्रकाशात त्या जागेची पाहणी केली पण तो जिथून पडला ते ठिकाण छताच्या बाजूला ७/८ फूट उंचीवर असावे त्यामुळे साहित्य असूनही वर जाता येण्याचा प्रश्नच नव्हता.मग हळूहळू तो किती संकटात सापडला आहे याची त्याला जाणीव झाली. 

मग घाटघरवरुन एकनाथ भाकरी घेऊन आला असेल हे पण आठवले.पण एकंदर वेळ बघता आतापर्यंत आपण गायब झालो हे त्याला समजले असेलच पण आपल्यापर्यंत तो कसा पोहचणार? त्याने आपल्या मित्रांना सांगितले असेल का? ते काय विचार करत असतील? माझा शोध ते घेत असतील का? असे एक ना अनेक प्रश्नांनी त्याचे डोके भंजाळून गेले.

पण काही तरी हातपाय स्वतः हलवणे गरजेचे होते.त्याने उगाच मोबाईल आँनलाईन केला पण रेंजचा प्रश्नच नव्हता.मग शिकलेल्या गोष्टी मधून त्याने मदतीचा टेक्स्ट मेसेज आपल्या परिचित भटक्यांना टाकला.बरयाच वेळा नेट चालत नाही पण टेक्स्ट मेसेज जातात हे तो जाणून होता.आता पुढचे काम आपल्याला बाहेर पडायचा काही मार्ग मिळतो का? त्याने ती गुहा निरखली ती एका बाजूला निमूळती होत जात होती म्हणजे इथून बाहेर पडायचा एकच मार्ग तोही आपल्या आवाक्या बाहेरचा.त्याने उगाच पाठपिशवी उभी करून वर होल्ड मिळतो का असा अयशस्वी प्रयत्न केला.निराशेने त्याने बसकण मारली.का आपल्याला एवढ्या वर्षानंतर एकटं अस काही करण्याची बुद्धी झाली? आता सगळे किती तणावात असतील किंबहुना आपले बरे वाईट झाले असावे अशीच शक्यता सर्वांनी आतापर्यंत ग्रहीत धरली असेल.

असाच काही वेळ गेला आणि अचानक परत वारयाची मंद झुळूक आली.त्याबरोबर तो परत भानावर आला.अरेच्चा हा वारा तर निमूळत्या भागाकडून येतोय.मग तिकडून काही तरी मार्ग नक्की असणार. त्याने जवळ जाऊन बघितले जेमतेम माणूस सरपटत जाईल एवढी जागा.आणि ती संपली तर परत कसे फिरणार?जाऊ की नको? पण एकंदर परिस्थिती बघता हे धाडस केले नाही तर इथेच आपला जीव जाणार.एक शक्यता कोणीतरी तपास करत येईल मग? हे अवघड असले तरी अशक्य नव्हते.मग थोडा विचार करुन त्याने आपल्या स्टीकचा वापर करुन तिथ एक बाण गुहेच्या निमूळत्या बाजूने काढला.

पिशवीतून दोर काढला आणि त्याचे एक टोक आपल्या पाठपिशवीला बांधले आणि एक टोक कमरेला बांधले.पाण्याचे दोन घोट घेत सगळ व्यवस्थित असल्याची खात्री करुन मग देवाचे नाव घेत त्या निमूळत्या भागात तो सरपटत निघाला.समोरुन येत असणाऱ्या हवेने जीव गुदमरत नव्हता त्यामुळे हळूहळू सरपटत जात असताना मध्ये एका ठिकाणी अगदीच निमूळता भाग आला.जिवाच्या अकांतांने त्याने स्वतः चे शरीर पुढे ढकलले.त्यानंतर मात्र ती पोकळी रुंद होत होती.एका जागी तो बसू शकेल एवढी जागा मिळताच त्याने त्याची पाठपिशवी ओढून घेतली कारण साहित्याशिवाय अशा जागी तो काही तासही जिवंत राहू शकेल अशी परिस्थिती नव्हती.अजून एक घोट पाणी पिऊन तो पुढे जाण्यास सज्ज झाला.खरतर पाणी त्याच्याकडे अजून ४ लिटर शिल्लक होते आणि खाण्याचेही ४ दिवस जगता येईल असे पदार्थ. त्यामुळे २/३ दिवस तो सहज तग काढू शकत होता.

आता ती पोकळी चांगलीच रुंदावली आणि नंतर एका दालनात जाऊन मिळाली.हो ते दालनच होते.१५ फूट उंचीचे आणि ४०/५० फूट लांब रुंद.खाली उतरायला त्याला ७/८ फूट हळूवारपणे उतरावे लागले.हे नैसर्गिक आहे की मानवनिर्मित हे मात्र त्याला समजेना.खाली उतरुन त्याने सगळीकडे ते निरखले आणि काय आश्चर्य त्याच्या एका भिंतीवर काही तरी कोरलेले त्याला दिसले आणि छन्नी हातोड्याचे घाव घालून तासलेला कातळ आजूबाजूला. 

अरे बापरे हे काय? एवढ्या कठीण जागी असे दालन आणि शिलालेख! त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.त्याने हळूवारपणे हाताने ती अक्षर चाचपडली.ही कोणती लिपी असावी? भटकंती करताना काही ईतिहासाचा अभ्यास करणारया मित्रांच्या नादाने मागे एकदा कधीतरी याचा अभ्यास त्याने अर्धवट केला होता.नक्की काय असावे हे? त्याने काही अक्षरं जुळवायचा प्रयत्न केला आणि त्याचा थोडाफार अर्थ असा होता..

हे प्रभो तू सर्वशक्तिमान आहेस,
तू सगळ्याचा रक्षणकर्ता आहेस,
तुझ्या उदरात या जगाचे सर्व वैभव दडलेले आहे!

या इतक्या दुर्गम जागी आणि गडाच्या उदरात हे दालन तेही सहजासहजी आत येणारयासही सापडणार नाही अशा ठिकाणी एवढ्या मेहनतीने असा शिलालेख कोरण्यामागचा उद्देश त्याच्या लक्षात येईना.काय असेल बरं हे? काय रहस्य आहे? आणि मी इतक्या शतकांनंतर इथे पोहचणारा पहिला मानव असेल तर त्याचे कारण काय? कालचा घटनाक्रम बघता मी इथे आलो यापेक्षा मला ईथपर्यंत कोणीतरी पोहचवले असा भास सतत मला का होतोय.अन्यथा जेथे डोकावून पाहतानाही भिती वाटावी अशा ठिकाणी इतक्या सहज सुखरुप मी कसा पोहचलो? यामागे ईश्वराचा काय संकेत आहे? अशा अनेक विचारांनी त्याचे मन गोंधळून गेले.

बर पोहचलो तर आहे आता बाहेर कस पडाव.हवा वाहून येणारे भुयार तर अजून वरच्या बाजूला दिसतेय आणि त्यातूनही हवा सोडून उजेडाची तिरीपही नाही. सायंकाळचे ६ वाजलेले आणि आता काही प्रयत्न करावा की थोडा विसावा घ्यावा या विचारात तो एका दगडाला टेकला.
पाण्याची बाटली काढून दोन घोट पाणी प्याला, बाटली परत ठेवण्यासाठी वाकला आणि बाटली चुकून खाली पडली.त्याने ती उचलून परत पिशवीत कोंबली.आणि तो दचकला! परत त्याने बाटली पिशवीतून बाहेर काढली आणि अलगद खाली आपटली! खण् खण्! आतमध्ये मोठी पोकळी असल्यासारखा! हे काहीतरी वेगळेच दिसतेय! बँटरीच्या प्रकाशात त्याने त्यावर असणारी थोडी माती दूर सारली आणि एक गोलाकार तयार केलेले छिद्र असावे असे वाटले.त्याने अजून थोडी साफसफाई करत ते मोकळे केले.आतमध्ये हात घातला आणि आजूबाजूला कुठतरी आवाज झाला.कर् कर् ! जुन्या दरवाजाचा होतो तसा! त्याने भयचकित होत आजूबाजूला टाँर्चच्या प्रकाशात पाहिले तर काहीच दिसेना! एक दोन वेळा हाच प्रकार आणि काही नजरेस पडेना! आता मात्र तो भयभीत झाला.
कसेबसे अवसान आणत त्याने पाठपिशवी उघडली आणि आतून स्लिपींग बँग काढली आणि त्याच्या आत शिरून स्वतःच्या भितीला सुरक्षिततेचे कुंपण घालण्याचा प्रयत्न करु लागला. 

त्याने आता ऐकले तो भास आहे की खरोखर अस काही वाजलय ? या विचारात त्याने डोळे मिटले.आता संध्याकाळचे ७.३० वाजले होते.बाहेर पडायचा प्रयत्न करायचा तो उद्या लवकर कारण तरच दिवसा उजेडी जर आपल्याला मार्ग गवसला तर काही तरी करता येईल आणि किमान आपल्याकडच्या शिट्टी ने गडावर असणारया कोणाचे तरी लक्ष वेधता येईल असे त्याला वाटले.तसाही आज शनिवार होता आणि उद्या गडावर कोणी नी कोणी चढाई किंवा उतराई करणारे असेल किमान एकनाथ मला शोधण्याचा प्रयत्न करणार असला तर त्याला तरी समजेल.

ईकडे एकनाथ, डॉ आणि त्यांचा जोडीदार गुहेपाशी मुक्काम करण्यास थांबले.एकनाथने डॉ नी आणलेल्या फोल्डींग स्टोव्हवर रात्रीसाठी भाजी बनवली.सोबत बांधून आणलेल्या भाकरया होत्याच! खरतर आज भाऊ भेटले असते तर गप्पांची भारी मैफील रंगली असती आणि जेवणही साग्रसंगीत आरामात सगळ्यांनी हातभार लावून बनवले असते.पण एकंदर तणाव बघता डॉ आणि जोडीदारही उपाशी झोपतील या भितीने एकनाथने न सांगताच तयारी केली.भाकरी खाताना मात्र त्यालाही कसेसे वाटले.भाऊने भाकरी घेऊन बोलावलं प्रेमाने आणि आता असे कसे झाले? तिघही एकमेकाशी फार न बोलता पडून राहिले. डॉ उद्याचा दिवस काय घेऊन येतोय या चिंतेत तर एकनाथ खालचे मित्र काही विपरीत तर बातमी देत नाहीत ना या विवंचनेत! कायम सुखावह आणि चढाईसाठी केलेल्या श्रमाची पुरेपूर परतफेड करणारा असा हा अलंग मुक्काम आज विवंचनेचा होता.

भाऊचा डोळा लागला आणि अचानक त्याला कोणीतरी बोलतेय असा भास झाला.संवाद मात्र मराठीत नसावा.शब्दही आजवर कधी न ऐकलेले! ही भाषा राजस्थानी असावी! हुकूम! डोळे उघडे करुन बघायची काही हिंमत होईना.पण कान टवकारलेलेच!

 हुकूम! आपने दिया हुवा काम, पुरा हो गया!
 सब सामान यहाँ लाके रख दिया है! 

कल रस्सी काटके रास्ता बंद कर देंगे.

जी! हम नही जानते की इस लडाई मे क्या होगा, लेकीन हम राजपूत है, खून की आखरी बूंद तक हार नही मानेंगे! और शिकस्त हुई भी तो दुश्मनो को सिर्फ हमारी लाँशे मिलेंगी! जिसके लिए वो यहाँ आना चाँहते है वो कभी हासिल नही कर पाऐंगे! 

जी हुकम! 

ये तयखाने की सिडीया बंद करके उसका ताला बंद कर देना!

आता मात्र भाऊने डोळे किलकिले करुन बघण्याचा प्रयत्न केला! एक उंचापुरा राजस्थानी सरदार आणि ५/६ ताकदवान सैनिकांच्या आक्रत्या त्याला समोरच्या हवा येणारया भुयारुतून बाहेर जाताना दिसल्या! 
दचकून त्याने डोळे पूर्ण उघडले आणि समोर पूर्ण अंधार! अंगाला दरदरुन घाम फुटलेला! अर्धा तास काही हालचाल करण्यासाठी त्याच्यात त्राण शिल्लक नाही राहिले. नंतर हळूवारपणे उठत त्याने मोठ्या हिमतीनं टाँर्च सुरु केली.पण सगळीकडे काही हालचाल झाल्याचे लक्षण दिसेना.पाण्याचे दोन घोट घेत त्याने मोबाईल चालू केला.रात्रीचे बरोबर १२.३० वाजलेले.

बापरे आपण अनुभवले ते स्वप्न होते की खरच आपण हे बघितले.आणि खोटे असेल तर परत जाताना बरोबर समोर हवा येणाऱ्या मार्गातून ते कसे गेले? आणि आपल्यासमोर ही चर्चा का केली ? आज २०२० चा मार्च महिना चालू आहे आणि ही लोक १५व्या १६ व्या शतकातील असल्यासारखी होती.त्यांनाच आपल्याला हे दाखवायचे होते म्हणून तर कालपासूनचा हा अघटित क्रम घटला नसावा ना? 

एकंदर सगळीच परिस्थिती कल्पनाशक्तीच्या पलिकडची अन् आधुनिक विज्ञानाच्या कक्षेला मान्य नसणारी.विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न गौणच होता कारण सगळे अघटित हे देखील सत्य होते.त्याचा परत डोळा लागेना आणि स्लिपींग बँगच्या बाहेर  पडण्याचीही हिमंत होईना.पण आता काही पर्यायही नव्हता.

 काही तरी हालचाल करावी असे त्याला वाटले किंबहुना अनाहूतपणे तो उठला आणि सरळ शिलालेखाजवळ गेला.टाँर्चच्या प्रकाशात नीट निरखून परत ते वाचण्याचा प्रयत्न केला “वैभव उदरात दडलेय” हे वाक्य आणि आता त्याने अनुभवलेला प्रकार म्हणजे नक्कीच असे ईथे काही तरी दडलेय की जे शतकानुशतके सर्वांच्या नजरेपासून दूर आहे.”खजिना”त्याचे डोळे एवढ्या अंधारातही विस्फारले! त्याने आजूबाजूच्या भिंती नीटपणे चाचपडायला सुरुवात केली मघाशी तो कर् कर् चा आवाज या भिंतीतूनच आला असावा.भास आणि अभासाच्या सीमारेषेवर त्याचे मन हिंदळत होते आणि बुद्धी प्रमाण शोधायचा प्रयत्न करत होती.

शिलालेखाजवळ नीट निरखले असता त्याला त्या ओळी मघाशी बघितल्या त्यापेक्षा वेगळ्या रेषेत दिसू लागल्या.अजून निरीक्षण करताना तिथे हा शिलालेख नंतर बसवला असावा हे त्याला जाणवले तो मुळ कातळाचा भाग नसावा हे नक्की! मग यामागे काही आहे का? त्याने सर्व दालन पिंजून काढले.एवढ्या थंड जागी अंगावरुन घामाच्या धारा वाहयला लागल्या! त्याने पुन्हा दोन घोट पाणी पित चाचपणी चालू केली.

काही दगडाच्या कपच्या एका कोपरयात रचलेल्या होत्या.त्या कपच्या त्याने हळू हळू दूर केल्या.त्या करत असताना एक दगड बाजूला फेकल्यावर चटकन काही तरी त्याच्या ध्यानात आले आणि त्याने तो दगड परण उचलला आणि नीट निरखून बघितला.त्यावर काही तरी चिन्ह कोरलेले दिसले.अतिशय नाजूकपणे लंबवर्तुळाकार आकारात घडवलेला दगड आणि त्यावर चिन्ह! याचा काय अर्थ? 

तिकडे डॉ एका कुशीवरुन दुसरया कुशीवर वळत रात्र जागवत होते.आकाश संपूर्ण तारकांनी भरलेले.काल की आजच अमावस्या आहे? त्यामुळे तर चंद्र आकाशात नसताना सर्व नक्षत्रांनी आकाशगंगेने आकाश सजलेय! बापरे आपण तर हा विचारच केला नव्हता.वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक विज्ञान सोडून अमावस्या पोर्णिमा आणि ईतर अंधविश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी त्यांच्या मनात थारा नव्हता! पण अगम्य अशा घटनांनी तेही विस्मयचकित होते.

एकनाथ?”

 बोला डॉ साहेब?

अरे आज अमावस आहे का?

जी डॉ. साहेब.घरुन निघताना माझा बा आरडत व्हता.कधीबी गडावर जात्यात ही लोकं! अमावस पूनव काय बी बगत न्हाईत.आरं भूतंखेतं असत्यात त्यांचा दिन असतूया.या गडावर लय जीव गेलेले असतील का जाताय अशा वेळी?
 पण तुमाला नाय म्हणू शकत नाही अनं भाऊ बी वर आलते त्यामुळं मी आलो.

शांततेला छेद देणारा हा संवाद डॉ च्या बुद्धी ला विश्वास न ठेवता येणाऱ्या गोष्टींची दखल घ्यायला भाग पाडणारा!काय झाले असेल भाऊला.कधीही एकटा न फिरणारा माणूस का बरं असा आला आणि आला तर गेला कुणीकडं.काही भूतखेताने तर खेचून आणले नाही ना त्याला? शंका कुशंकानी मन चिंतीत झाले.

एकनाथ च्या मनातही हाच विचार चालू होता.लहानपणापासून त्यांच्या आदिवासी समाजात भूतखेतं आणि मंत्रतंत्र याचा मोठा पगडा! पण लांबून येणाऱ्या भटक्यांनी त्याला आधुनिक विचारांचे दालन उघडे केले होते.सुरक्षित पणे दोर लावणे.कातळचढाई, उतराई या सगळ्या गोष्टी त्याच्या अंगवळणी पडलेल्या आणि एक नामवंत वाटाड्या आणि चांगला माणूस म्हणून लोक आता त्याला ओळखायचे.वर्षभर शेतीच्या बरोबर इथल्या दरयाखोरयात गडकोटांच्या अंगाखांद्यावर तो रमायचा. विचार करता करता त्यांचा थोडा डोळा लागला.

भाऊ बसल्या जागी अर्धातास तो दगड आणि शिलालेख अनुक्रमे न्याहळत होते आणि अचानक ते चटकन उठले आणि मघाशी माती बाजूला सारून मोकळ्या छिद्राजवळ पोहचले.लख्ख वीज चमकावी तसे त्यांच्या ध्यानात आले की हा दगड या छिद्राच्या आकाराचाच आहे.शिवरायांच्या नावाचा मनोमन जप करत त्यांनी ती जागा अजून व्यवस्थित साफ केली आणि तो दगडं चपखलपणे तिथे बसला.थोडी हालचाल करुन तो व्यवस्थित बसलाय याची खात्री करताच त्यांनी तो कळ फिरवावी असा फिरवला मात्र आणि कर्रर् कर्र् करत शिलालेख खाली सरकला.अंधारात त्या आवाजाने भाऊची भितीने गाळणच उडाली आणि सर्वांग घामाने डबडबले.त्याने झपाट्याने शिलालेखाजवळ जात टाँर्चच्या प्रकाशात आत डोकावले तर एक प्रशस्त कातळजीना वरच्या बाजूला चढत होता.

भाऊने लगबगीने त्याची पाठपिशवी भरली,दोर गळ्यात अडकवला, हेल्मेट घातले आणि ४/५ फूट वर रेटा देत आत पोहचला.साधारण २०/२५ सरळ रेषेत जाणाऱ्या पायरया आणि नंतर समोर कातळ दिसत होता.जेमतेम १ माणूस जाईल एवढीच जागा! वर जाताना त्याचा जीव घाबराघुबरा व्हायला लागला, मग त्याने परत पाठपिशवीला दोर बांधून ती खाली सोडली आणि एक टोक आपल्या कमरेला बांधले.जर जास्तच त्रास झाला तर परत दोरामुळे मार्ग सोपा होईल असा विचार त्याने केला.

९०अंशात वळणारा जीना अजून ८/१० पायरया असाव्यात त्या संपल्यावर जीना संपला आणि एक अजून दालन लागले.तो जपून आत उतरला! चारही बाजूला ध्यान करायला असतात अशा कातळाच्या बसायच्या जागा आणि त्यावर काही खोबण्या आणि वर छताजवळ एक छिद्र! नक्की काय प्रकार आहे याचा छडा लावण्याचा त्याचा मेंदू प्रयत्न करत होता.मग त्याने कमरेचा दोर सोडला आणि खोबण्या पकडून वर चढत त्या छिद्रापर्यंत पोहचण्यात तो यशस्वी झाला! त्या छिद्रातून आत डोकावताच त्याला आत काही हंडे रचलेले दिसले पण त्यासाठी त्याला ७/८ फूट आत उतरणे आवश्यक होते.त्याने परत खाली येत पाठपिशवी वर खेचून घेतली आणि दोर कमरेला लटकवला.त्याचे दुसरे टोक खाली एका शिळेला बांधले.

परत खोबण्या पकडून वर जात शरीर त्या फार मोठ्या नसणाऱ्या छिद्रातून आत सोडले.थोडे अवघड गेले पण आत जेमतेम ५/६ फूट जागा असावी.एका हंड्यावर जीर्ण जनावरच्या कातडीचे आवरण त्याने त्याच्याकडच्या छोट्या स्विस नाईफच्या सहाय्याने उघडले आणि त्याचे डोळे विस्फारले! त्यात मौल्यवान रत्न आणि खडे याची रास होती आणि एक कातडीचा खलिता!

राजराजेश्वर विक्रमसिंह याच्या मालकीचा राजखजिना किल्ल्याचा रक्षक सरदार उदयभान याने स्वतःच्या उपस्थितीत जमा करुन सुरक्षित केला आहे.

आणि खाली त्यात असणारया संपत्तीची यादी!
भाऊने आजपर्यंत कधीही न बघितलेली रत्नांची खाण बघून काय करावे हे त्याला सुचेना! त्याने परत तो खलिता आत टाकला आणि त्याचे कातडी झाकण परत लावले.आज तो एका ऐतिहासिक खजिन्यापर्यंत पोहचला होता तेही अकल्पित रित्या! त्यातले एक रत्न त्याने पुरावा म्हणून आपल्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवले आणि परत दोराला जोर लाऊन शरीर बाहेर ओढले.हळूहळू कातळ उतरत त्याने खाली बसकण मारली.

थोडं काही खाण्याचे काढून दोन घोट पाणी कसेबसे घशाखाली उतरवले.अशी अजून काही छिद्र वर दिसत होती.त्याने त्याचा मोबाईल काढून वेळ बघितली.सकाळचे ५ वाजले होते.
आता हा खजिना सुरक्षित रित्या शासनाच्या दरबारी जमा व्हायला हवा आणि यासाठी मला येथून बाहेर पडणे आवश्यक आहे याची त्याच्या मेंदूने नोंद घेतली.त्याने दोर गुंडाळून गळ्यास अडकवला आणि सामान आवरुन खाली उतरण्यास सुरुवात केली.बाहेर पडताच त्या दालनात त्याने परत त्या द्वाराची चावी असणारा दगड फिरवून बाहेर काढला आणि शिलालेख परत हळूहळू त्याच्या जागेवर स्थिर झाला.

आता हवा येणाऱ्या छिद्राच्या दिशेने कसे चढायचे यासाठी त्याने प्रयत्न चालू केला.परत पाठपिशवीला दोराचे एक टोक बांधत आणि एक कमरेला गुंडाळून तो कातळाला काही चढण्यासाठी खोबण्या आहेत का हे चाचपडू लागला.प्रथमदर्शनी अवघड वाटणारा हा कातळ चढायला सुरुवात करताच त्याला एक एक खोबणी जी खालून दिसत नव्हती ती मिळत गेली आणि दोन मिनिटातच तो त्या छिद्रापाशी पोहचला.

ती जागा काही रुंद नव्हती.४/५ फूटानंतर तर सरपटत जावे अशीच! त्याने परत पाठपिशवी वर खेचून घेतली आणि हळूहळू बाहेरच्या दिशेला सरकू लागला.खूप वेळ सरकत गेल्यावर त्याला प्रकाशाचा किरण दिसला! आतापर्यंत पहिल्यांदा तो या काळोखातून प्रकाशाची तिरीप बघत होता.घाईगडबडीत त्याने आपला सरपटण्याचा वेग वाढवला आणि अचानक त्याला जाणीव झाली की या भुयाराचा अंत काही सोप्या जागेत असेल असे नाही. त्याने पाठपिशवी पुढे ओढून घेतली हळू हळू आणि सावकाश पुढे सरकू लागला.आणि ५/१० मिनिटात बाहेरचे आकाश त्याला दिसू लागले.

एकदम शेवटी ते भुयार संपत असणाऱ्या ठिकाणी एक तीन चार फूटांची उभ राहू अशी जागा आणि त्याच्या डोक्यावर एक छोटेसे छिद्र! त्याने बाहेरची हवा फुफ्फुसात भरुन घेतली.आणि वर चढाई करत छिद्रापलिकडे बघितले! बापरे! खाली १००० फूटाचा सरळ कातळ आणि वर साधारण ५०/१०० फूटापर्यंत दिसणारा कातळ! आता काय करावे.समोर बघत असता त्याला कातळभिंती आणि जंगल दिसत होते आणि दूरवर भंडारदरा धरणाचा जलाशय. म्हणजे आपण अलंगच्या नेहमीच्या वाटेच्या अगदी विरुद्ध दिशेला! हे कस शक्य आहे? कारण साधारण येथूनच आपण उतरलो असावोत हा विचार त्याच्या मनात आला.

पण अलंगच्या इतर कातळवाटेप्रमाणे इथेही दगडात एक दोर अडकवण्यासाठी गोल छिद्र बघून त्याला आशेचा किरण दिसला.पण आपला दोर खूप अपुरा असून खाली उतरणे शक्य नाही याचीही जाणीव त्याला झाली.

ईकडे उगवतीच्या रंगात पटापट आवरत तिघ जण आणि ५/६ जणांचा भटकंती साठी आलेला एक ग्रुप साहित्याची जमवाजमव करत रेस्क्यू ची तयारी करत होता.

सगळी तयारी करुन बरोबर ७ च्या ठोक्याला ती मंडळी दक्षिणेकडे कड्याच्या पायरयांच्या दिशेने निघाली.४५ मिनिटात ईप्सित स्थळी पोहचून दोर बांधण्यास योग्य जागा निवडण्याची लगबग चालू झाली. एकनाथ स्वतः खाली उतरणार आणि डॉ त्याला वरून बिले देणार असे ठरले आणि हार्नेस बांधून एकनाथ तयार झाला.

बाकी लोकांनी आपापल्या परिने सेल्फ अँकर होत मदत चालू केली.थोडा घसारयाचा टप्पा सावकाश पार करत दोराच्या सहाय्याने एकनाथ आणि डॉ पायरयांपाशी उतरले.मग डॉ नी एका झाडाला एकनाथचा आणि स्वतःच्या सेल्फ अँकरचा दोर अडकवला.एकनाथ आता हळूहळू त्या कातळकड्यावरच्या पायरया उतरु लागला.एका क्षणी त्या पायरया संपल्या आणि एकनाथ ने आवाज दिला डॉ साहेब पायरया संपल्या खाली सरळ कातळ आहे इथून उतरता येणार नाही.

खरतर जरी भाऊ गेली अनेक वर्ष ट्रेकींग करत असला तरी फ्री क्लांयंबिंग असा प्रकार त्याने आजवर केला नव्हता.आणि काही केले नाही तर इथेच जीव जाण्याचा धोकाही होता.काय करावे? अन्य वेळी असा विचारही त्याच्या मनाला शिवला नसता कारण कातळारोहण हे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि त्यानंतर अविरत मेहनत सातत्याने करण्याची तयारी असेल तरच नादी लागायची गोष्ट आहे हे तो जाणून होता.अनेक अवघड ठिकाणी त्याने असे प्रकार केले होते पण सोबतीला तंत्रशुद्ध प्रशिक्षित आणि अविरतपणे अशा मोहिमा करणाऱ्या सवंगड्यांसह. 

पण आता पर्याय नव्हता न लढता मरायचे की लढून हेच ठरवायचे होते.२ मिनीटं बसून त्याने थोडी गूळपोळीचे पाकीट काढून जबरदस्ती १ पोळी खाल्ली आणि १/२ बाटली पाणी संपवले.कारण चढाई करताना स्नायू आखडले तर अवघड झाले असते.परत ५ मिनिटात पूर्ण झाले असते.परत ५ मिनिटात पूर्ण पाणी संपवत पाठपिशवी व्यवस्थित समतोल भरली.थोडे जागच्या जागी स्नायू मोकळे केले.दोराचे एक टोक गोल छिद्रात अडकवले आणि गाठ मारली, जरी फाँल झाला तरी पूर्ण खाली न जाता कुठेतरी अडकू अशी भाबडी आशा यामागे होती.खरतर क्लाईंब करताना काही अंतरावर असणाऱ्या बोल्ट मध्ये दोर अडकवल्यास १० ते १५ फूटाच्या वर फाँल होत नाही आणि वाचण्याची शक्यता असते पण आता पर्याय नव्हता.कोणीही न केलेले धाडस त्याला करायचे होते.जगलो तर जगासमोर ईतिहासाच्या सुवर्णक्षणांचा खजिना उघड करता येणार होता अन्यथा जेव्हा शोध मोहीम होईल त्यावेळी त्याचा देह दोरावर लटकलेला लोकांना मिळाला असता.

त्याने जवळच्या मोबाईल मध्ये नोटपँडवर १० मिनिटात काही नोंदी केल्या जेणेकरून झाल्या प्रकाराचा शोध बचावकर्त्याला लागावा.आणि तो चढाई करण्यास सज्ज झाला. 

आलेल्या तणावामुळे हाताला असलेला घाम पुसून माती लावली आणि छिद्राबाहेर असणारा पहिला होल्ड त्याने पकडला.हळूहळू पाय योग्य जागी स्थिर केले.त्याच्या अंदाजाप्रमाणे हा खजिना लपवणारया माणसांनी इथे काही खोबण्या बनवल्या असण्याची शक्यता .पण अनेक शतकानंतर ते होल्ड नैसर्गिक झीज झाल्याने संपले असण्याचीही शक्यता होती.पण ज्या शक्तीने त्याला खजिन्यापर्यंत पोहचवले ती त्याच्या मागे सक्षमपणे उभी आहे हीच काय तर जमेची बाजू! 

एक एक खोबण थोडी साफ करायची शरीर वर उचलायचे आणि पाय तिथे स्थिर करायचा असे करत करत तो २०/२५ फूट चढला.साधारण अजून ७०/७५ फूट तरी चढाई बाकी होती पण खाली चुकूनही बघायचे नाही हा नियम त्याने पाळला असला तरी खाली आपला म्रुत्यु जबडा वासून तयार आहे हे पण त्याच्या मनाच्या कोपरयाला माहिती होते.आता साधारण डावीकडे खोबण्या सरकत होत्या.एवढ्या उंचीवर अशी मुव्ह भयानक होती पण जिथे पर्याय नसतो तिथे कुठूनतरी आपले शरीर अचाट गोष्टी साध्य करते हे त्याने अनुभवले होते.एका ठिकाणी खोबणी दिसेना मग चाचपत एका भेगेत हात घातला आणि जीवाच्या आकांताने शरीर वर ओढले.पुढे एका ठिकाणी थोडा कातळ अंगावर येणारा होता.पण आता आपण थोड्या प्रयत्नात हे पार करु शकतो या भावनेने त्याने चढाई सुरु ठेवली.तो श्रमाने अतिशय थकला होता पण एक एक पाऊल त्याला जीवनाकडे घेऊन जात होते.

आता कातळ ६०अंशाच्या उतारात बदलला आणि त्यावर एक लेज दिसत होती त्यावरही एक कडा होता.पण पहिला टप्पा पार पडला तर पुढच बघता येईल या विचारात एक एक पाऊल रोवत त्याने चढाई चालू ठेवली.पण अचानक त्याचा दोर ताणला गेला! बापरे! नशीब त्याची पकड मजबूत होती.दोर संपला असावा.मग हळूच एक पायरी खाली उतरत त्याने कमरेचा दोर सोडून दिला.नियमात न बसणाऱ्या सगळ्या गोष्टी आज त्याला कराव्या लागत होत्या.

यापुढची चढाई तर कसल्याही आधाराविना! पण आता त्याला जरा शरीर हलके झाल्यासारखे वाटले.कदाचित दोराचे वजन त्याला खाली खेचत असावे.उरलेला चढाईचा टप्पा कसाबसा संपवत त्याने लेजवर एका जागी बसकण मारली.पूर्ण कातळटप्पा आज प्रथमच त्याने फ्री क्लाईंब केला होता जणू त्या शक्तीनेच त्याच्याकडून तो करुन घेतला होता.पाण्याची बाटली काढत तो पाणी प्याला.मोबाईल पाठपिशवी मधून काढत वेळ बघितली सकाळचे ११ वाजलेले.आता तो जिवंत राहू शकेल या समाधानाने त्याने डोळे बंद करुन ईश्वराचे आभार मानले.

तिकडे एकनाथ परत वर चढून आला आणि डॉ आणि तो दोर गुंडाळून वरच्या टप्प्यावर आले.सगळे नजर लावून बसलेले सह्यसवंगडी आता निराशेत होते.आजवर कधीही न बघितलेली दुर्देवी घटनेचे ते साक्षीदार होते असे त्यांची शांतता सांगत होती.
“एकनाथ”तुझ्या मित्रांना फोन लावून बघ.ते खाली पोहचले का? सामरदहून भल्या पहाटे ३ वाटाडे एकनाथच्या फोननंतर त्या कड्याखाली शोधाशोध करत होते पण त्यांच्या हाती काही लागले नव्हते.ते आता एकनाथला कळवणार इतक्यात त्याचाच फोन आला.

रम्या कुठ हाय? 

आरं सकाळधरनं इथ कड्यापाशी शोधतो हाय पर इथ कायबी नाय रं.

आर नीट बगितले का? 

हो आर आमी तिगबी बगतूया.

संधन दरीमध्ये रोज शेकडो लोकांना उतरवणारे सगळे अनुभवी वाटाडे होते.
डॉ. खाली काय बी नाय घावलं.
आता मात्र डॉ काय करावे या विचारात पडले.

भाऊने डोळे उघडले आणि आपल्या पिशवीतून शिट्टी काढली.पाच सहा वेळा जोरात फुंकली.सगळ्या दरयाखोरयात त्या शिट्टी चा आवाज घुमला.

डॉ. ते बघा ऐकले का? 

हो हा शिट्टी चा आवाजच आहे.

त्या आवाजाचा मागोवा घेत सगळे तिकडे धावले. भाऊने ५ मिनीटाने परत शिट्टी मारली आणि वरुन कड्याच्या टोकावरून आवाज आला 
भाऊ….।

एकनाथ का? 

हो भाऊ तुम्ही कुठ आहात? 

इथ कड्याच्या खाली बसलोय.रोप सोडा.

डॉ आणि सर्वांच्या आनंदाला पार राहिला नाही. आज एक अघटित घडता घडता राहिले होते.एकनाथने पळत जाऊन रोप आणून एका झाडाला बांधला आणि हार्नेस अडकवत बिले घेऊन खाली उतरु लागला.जागेचा अंदाज घेत १० मिनिटात तो भाऊपाशी पोहचला.भाऊच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.एकनाथने हार्नेस त्यांच्या कमरेला बांधला आणि क्रँब अडकवत वर आवाज दिला घ्या वर.भाऊची पाठपिशवी त्याने स्वतः अडकवली.अर्ध्या तासात दोघ वर आले.

डॉ नी भाऊला मिठीच मारली.सगळी आवराआवर करुन सगळे गुहेकडे निघाले. अत्यंत जगावेगळ्या परिस्थितीतून बाहेर पडत असल्याने भाऊच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता आणि डॉ, एकनाथ आणि इतरही त्यांना आता फार छेडण्याच्या मनस्थितीत नव्हते.एकनाथने खाली फोन करुन ही आनंदवार्ता आपल्या सामरदच्या मित्रांना दिली आणि त्यांना संध्याकाळी घरी जेवायला यायचे आमंत्रण दिले.

गुहेपाशी काही वेळ थांबून सगळे उतराईला लागले आणि अंधाराच्या आत घाटघरला एकनाथच्या प्रांगणात पोहचले.रात्री जेवणं उरकून एकनाथ आणि डॉ ना घडलेला सगळा प्रकार भाऊने सांगितला.एकनाथच्या म्हतारयानं ते ऐकताच

 आर् तुमी लय शहाणे हायसा! अमावसीच्या वक्ताला आसं गडावर ते बी एकटं जाऊ नये हे बी समजना का! माज्या आजल्याला तो माणूस दिसला व्हता जवा तो पोरगा व्हता त्या वक्तानंतर आमी कदीबी अमावस्येच वर गडावं जात नाय.तुमी बगितलं ते सगळ भूतांच हाय! तुमाला जीतं सोडलं हेच बरं झालं बगा !आनं हे कोणाला बी सांगू नका.कोणाचा जीव गेल्याबीगर रहायचा नाय! 

सर्व जण शांततेत झोपी गेले.सकाळी लवकर नाशिकहून भाऊला पुण्याच्या गाडीत डॉ नी बसवून दिले आणि नंतल यावर बोलू अस म्हणून निरोप दिला.

घरी पोहचून सगळं सामान आवराआवर करताना भाऊचा हात खिशात गेला.आणि एक खडा बाहेर आला.

अहो हा कुठला दगड आणला.उगाच गारगोट्या गोळा करुन आणता दरवेळी! 

भाऊने मंदस्मित करत ही गारगोटी देव्हाऱ्यात ठेव ती आपल्याला सह्याद्रीची देणगी आहे अस म्हणत विषय थांबवला.

काही दिवसांनी पुरातत्व खात्याला भाऊने एक पत्र लिहीत सर्व कळवले पण सरकारी कारभारात अजून हा विषय चर्चेला आला नाही. किंबहुना असे भास लोकांना होतात अस म्हणत एका वरीष्ठ अधिकारयाने पत्र केराच्या टोपलीत टाकले.पण हा खजिना नक्की आहे हा विश्वास डॉ ना आणि भाऊना आहे.लवकरच एक तंत्रशुद्ध मदतीने ही मोहीम राबवून हे जगासमोर आणण्याचे त्यांचे नियोजन आहे।।।