Thursday, 25 February 2016

पांडवगड कमळगड धोमच्या खोरयातील मनसोक्त भटकंती : भाग एक

“The real voyage of discovery consists not in seeking new landscapes, but in having new eyes.”

मागच्या काही दिवसापासून कमळगडचा ट्रेक ठरला होता.पण बेंगलोर महामार्गाच्या कोंडीमुळे हुकला होता त्याऐवजी पुरंदरचा ट्रेक करून समाधान मानले होते.पण एखादी राहिलेली भटकंती अजून काही तरी चांगल्या प्रकारे होते असा मला अनुभव येतोय.त्यामुळे यावेळी कमळगडाबरोबर वाईजवळच्या मांढरदेवी रस्त्यावरील पांडवगड हा छोटा गड करण्याचे ठरवले तेव्हा काहीतरी चांगलेच बघायला मिळेल अशी मनात आशा होती आणि खर सांगायच तर खरोखर हा अनुभव आनंददायी होता.

सुरूवातीला प्रशांत आणि मी दोघच तयार होतो पण अनपेक्षितपणे अनिकेत नेमाडेचा मेसेज आला की या शनिवारी रविवारी कोठे ट्रेक आहे का? मग प्रशांतने आमच्याबरोबर कॉलेज जीवनात राजमाचीच्या भटकंतीला आलेेल्या मुकुंद पाटेला विचारले तोही तयार झाला.अजून गाडीत एक सीट रिकामी आहे म्हटल्यावर आमच्या येथील पाषाण टेकडीवर वृक्षसंवर्धन करणारे मोहन हिंगडेना विचारले तेही एकदोन वेळेला ट्रेक असला तर सांगा म्हटले होते.तेही लगेच तयार झाले.

दुपारी लवकर ब्रंच करून 12 ला वाईकडे रवाना झालो.प्रशांतने अर्णवलाही (प्रशांतचा मुलगा वय वर्ष 7) बरोबर घेतले.त्याचा पहिला मुक्कामी ट्रेक होता.साधारण तीनच्या आसपास वाईत पोहचून वाट विचारून मांढरदेवी रस्त्यावरच्या पांडवगडाच्या पायथ्याच्या वाडीतील कोंडकेंच्या घरासमोर गाडी लावली व साडेतीनच्या आसपास पांडवगडाची चढाई चालू केली.ऊन ऊतरतीला लागल्यामुळे चढाई सुखकर होती.
वरच्या पठाराच्या आधी काही दगडातील पायरयांचे अवशेष आहेत.


तेथून पठारावर पोहचलो.तेथे मॅप्रो फूडसच्या खाजगी मालकीची पाटी वाचून आश्चर्याचा धक्का बसला.गडाच्या पायथ्याला फार्म हाऊसचे प्लॉट बघितले होते पण ईथे तर गडच खाजगी मालकीचा विकत घेतलेला.आपल्या लोकशाहीत धनाच्या जोरावर ऐतिहासिक वास्तूच विकत घेतल्य़ाचे हे ऊदाहरण क्लेषदायक होते.पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांनी याला परवानगी दिली कशी? हा सहाजिक प्रश्न कुठल्याही दुर्गप्रेमीला पडावा असाच आहे.
कंपनीने वर एका बंगलीवजा घरात चार रखवालदार नेमलेत त्यातला एक पायथ्याच्या कोंडके परिवारातील आहे, हे ऐकून महाराजांनी स्वराज्य स्थापनेला केलेल्या खटाटोपीचा विसर पोटापाण्याच्या प्रश्नापायी मावळ्यांना पडला काय असा विचार मनात चमकून गेला.असो.


पठारावरून पांडवगड मावळतीच्या सोनेरी प्रकाशात ऊजळून गेला होता.गड म्हणून त्याच्या दिमाखदार  अस्तित्वाच्या शेवटच्या घटका तो मोजतोय याची सल मनात राहीलच.

ऊजवीकडून म्हणजे पश्चिमेकडून गडफेरी चालू केली.छोट्या गडांवर अवशेष श्रीमंत असू शकतात याची प्रचिती अवचितगडासारख्या कोकणातल्या गडाने दिलीय म्हणून अशा वेळी शक्यतो पूर्ण गडाचा कानाकोपरा धुंडाळण्याचा आमचा प्रयत्न असतो.


ईथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की डोंगरयात्रा किंवा तत्सम साहीत्याचा वापर मी जाणूनबूजून टाळतोय आणि आपल्याला काय दिसतेय याचा विचार करतो म्हणजे ऊत्सुकता पण राहते आणि साचेबद्ध भटकंती पलिकडील दुर्लक्षित एखादी गोष्ट नजरेस पडू शकते का? असा विचार असतो.अर्थात पाळंदे सर, गोनीदा, बाबासाहेब ज्या काळात अशा कानाकोपरयात पोहचले आणि त्याचा एवढा सखोल अभ्यास व नोंदी केल्या त्या ईतिहासाचा भाग बनून गेल्यात ज्याचा वापर प्रत्येक डोंगर भटका कधीतरी करतोच.

गडाच्या पश्चिम दक्षिणबाजूने पुढे जाताना प्रथम एक मोठे टाके  (किंवा विहीर म्हणता येईल)  लागते त्यापुढे एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.हे खांब टाके आहे.


तेथून पुढे गडाच्या कातळाला लागून एक मोठे टाके आहे.
त्यापुढे कातळाच्या पोटात एक निमुळते तोंड असलेली गुहा.ऊजवीकडे वैराटगडापासून कमळगडापर्यंतचा पॅनोरॅमिक व्ह्यू एकदम झकास! असच कातळभिंतीला लागून पुढे गेल्यावर मेणवलीच्या बाजूने वर येणारी डोंगरधारेवरची वाट आणि वाई एम आय डी सी व शहर यांचे मनोहरी दर्शन होते.
मग डावीकडे गडाला वळसा घालून जाताना कातळात एक मंदीर लागते.


 त्यापुढे काही छोट्या गुहा आणि कोरडी पाण्याची टाकी होती.झुडूपांनी वेढलेल्या या वाटेवरून बाहेर येताना मांढरदेवी डोंगर बारकाव्यासह नजरेस पडला.मावळतीच्या ऊन्हात प्रत्येक बारकावे न्याहाळता येतील असे.


पुन्हा गडफेरी पूर्ण होत असताना कातळाच्या मधल्या काही चढाई करता येण्यासारख्या जागांना तटबंदीने बांधून सुरक्षित केलेय.


एका नांदत्या गडाची सर्व लक्षणे असलेला असा हा गड आहे.पुन्हा ऊत्तरेला कातळाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी वर जाणारी वाट महादरवाजाकडे घेऊन गेली.

               अर्णवची ऊत्सुकता आणि ऊत्साह

महादरवाजातून आत गेल्यावर एका वळणानंतर आणखी वर गडमाथ्यावर आम्ही पोहचलो.वर एका अवशेषमय पण छप्पर असलेले मारूतीरायाचे मंदीर बघितले.त्याशेजारी चुन्याची घानी.

पुढे ऊजवीकडे झुडूपांनी आच्छादलेले वाड्याचे अवशेष! दोन पायरया चढून वाटेने जाताना जिर्णोद्धार केलेले देवीचे ठाणे!

देवीला नमस्कार करून गडमाथा पालथा घालताना अजून ऊंचीवरून चौफेर खूप सुंदर नजारा दृष्टीस पडतो.


पुढे परतीच्या मार्गावर एका झाडाखाली पिंड!


 आणि पुढे एक छोटा तलाव बघून परत महादरवाजातून खाली बंगल्याजवळ आलो.रखवालदारांनी चहा दिला.कमळगडाच्या पार्श्वभूमीवर आणि धोम खोर्याची सोबत ठेवणारा सूर्यास्त कॅमेरात बंदिस्त केला आणि अंधाराच्या आधी परतीला लागलो.


एक खूप समाधान देणारी ही सफर होती.आता वेध कमळगडाचे लागले होते.परत वाईकडे निघालो बंडू गोरेच्या खानावळीत गरमागरम पंचपक्वान्न हाणले आणि वासाऴ्याकडे कमळगडाच्या पायथ्याला मुक्कामी निघालो.

भाग एक : पांडवगड संपूर्ण.

भटकंती साथीदार : अर्णव कोठावदे, प्रशांत कोठावदे, अनिकेत नेमाडे, मुकुंद पाटे आणि मोहन हिंगडे.

श्रेणी : सोपी.

अंतर : वाईपासून 6 कि मी, पुण्यातून 80 कि मी.

10 comments:

  1. खुपचं भारी ब्लाॅग तुषार..वा..

    ReplyDelete
  2. छान लेखन, गडकिल्ले आणि त्यांच्या सध्याच्या अवस्थेबद्दल असलेली कळकळ लेखनातून जाणवत आहे

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete