Saturday 28 March 2020

गायनाळेतील चकवा

  नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।

इस आत्माको शस्त्र काट नहीं सकते, आग जला नहीं सकती, जल गला नहीं सकता और वायु सूखा नहीं सकता ।


दिवसभर आग ओकून सूर्य मावळतीला चाललेला. सायंकाळची वेळ! सह्याद्रीच्या अतिशय अवघड आणि वर्षानुवर्षे मानवी वापर थांबलेल्या गाय नाळेच्या खालच्या खिंडीमध्ये तो एकटाच!जवळ न पाण्याची बाटली, न खाण्याचे काही !अंगावरचे कपडे आणि दोन-चार जमिनीचे कागद असणारी पिशवी या व्यतिरिक्त काहीही नाही.

       सह्याद्रीच्या या अतिदुर्गम भागामध्ये होते ते फक्त दोन्ही बाजूने हजारभर फूट खोल कोसळलेली दरी आणि वरच्या टप्या मध्येही हजार फूट उंचीचा डोंगर! दूरवर जंगल, शांतता आणि जंगलातील चित्रविचित्र आवाज या व्यतिरिक्त फक्त अगदी दखल न घेण्याइतका किरकोळ मानव!

    आज सकाळी सात वाजता जेव्हा पाने गावातून एका ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुप सोबत पुण्याला जाण्यासाठी तो सोबत निघाला तेव्हा ही वाट इतके लोक चालले आहेत तर आपणही जाऊ एवढाच त्याने विचार केलेला. वापर नसलेल्या अवघड जागी स्थानिक चांदर आणि पाने गावातील दोन वाटाडे सोबत घेऊन पुणे ट्रेक ग्रुप आणि नाशिक पुणे सह्यमित्र मंडळाच्या सह्याद्रीत नियमित भटकंती करणाऱ्या चौदा-पंधरा भटक्यांच्या समूहासोबत तो निघालेला पण कैक वर्ष वापर नसल्याने ही वाट पूर्णता मोडलेली! जंगलाच्या काटेरी जाळ्यांनी, झुडपांनी वेढलेली! ठिकठिकाणी त्या जाळ्या साफ करत आणि काही ठिकाणी दोर लावत ते इथपर्यंत पोहोचलेले सगळ्यांकडे पाणी आणि खाण्याचे पदार्थ भरपूर असल्याने त्याला कुठलीही अडचण आत्तापर्यंत तरी आली नव्हती मग तो एकटाच मागे कसा राहिला?

 तर कोणताही ट्रेकर असं कोणाला मध्येच सोडून जाणार नाही तसे संस्कारच सह्याद्री त्यांना देत नाही. पण इथपर्यंत सगळ्यांसोबत खाण्याचे पदार्थ आणि पाणी हे जागोजागी घेत आल्यानंतर का कोणास ठाऊक पण सर्वांनी आग्रह करूनही "येतो" "चला पुढे " हे त्यानेच या सर्व मंडळींना सांगितलेले.


 या खिंडीतून वर एक घसारयाचा टप्पा चढून गेल्यावर डावीकडे आभाळाला टेकलेले कडे आणि उजवीकडे पावलागणिक खोल होत जाणारी दरी! जेमतेम पाऊल बसेल अशी कड्याच्या पोटातून घसारा असणारी आणि चढ ऊतार असणारी वाट! निव्वळ गावकरी पोहचू शकत नाही त्यामुळे शिल्लक गवत आणि उजवीकडे असणारी कारवी यामुळेच हे पार करणे शक्य होते अन्यथा नाही.अंधार पडण्यापूर्वी खानूचा डिगा आणि पुढे माणगाव असा लांबचा पायी गाठायचा पल्ला आणि पुढे पानशेतमार्गे पुणे गाठून नाशिककर नाशिकसाठी रवाना होणार या तणावाखाली मग मामा येतो म्हटलेत तर येतील असे सर्वांनी मान्य केलेले.अवघड ठिकाणी एखाद्या ला जबरदस्ती न करता त्याच्या शरीराला पुढच्या अवघड चढाईसाठी तयार व्हायला वेळ द्यावा ही पण भावना यामागे त्यांची होती.आणि सगळ्या टीमची जबाबदारी असल्याने एकासाठी सर्व अडचणीत येणार नाहीत हे पण भान ठेवणे आवश्यक होते.अशा अवघड जागी पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नव्हता.

त्याचे नाव रामचंद्र सावंत.वय साधारण 60 वर्ष पुण्याच्या नाना पेठेतील एका जुन्या वाड्यात बायको आणि दोन मुलांसह एका छोट्याशा खोलीत तीस वर्ष संसार थाटलेला! उपजीविकेसाठी ऑटो रिक्षा चालविण्याचा त्याचा व्यवसाय.मोठा मुलगा आता शिकून भोसरी मधील एका कंपनीत नोकरीला लागलेला, त्याचं लग्न उरकून टाकले म्हणजे एका जबाबदारीतून आपण मुक्त होऊ या विचाराने काका आता अधूनमधून आपल्या मूळ गावी यायचे. त्यानिमित्ताने आपल्या पाहुण्यांमधून एखादी मुलगी पसंत पडली तर यंदा बार उडवून द्यावा हा मूळ उद्देश यामागे होता आणि जमलंच तर वर्षाला थोडाफार धान्य देणारी शेतीवाडीही आपल्या नावावर करून घेऊन दोन मुलांचे नाव त्यावर लावून घ्यावं असाही विचार यामागे होता.


पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला वेल्हा आणि भोर तालुक्याच्या सीमारेषेवर जी सह्याद्रीची रांग पसरलेली आहे त्याखाली कुंभे शिवथर हे त्याचे गाव! समर्थ रामदास स्वामी च्या वास्तव्याने पुनित झालेली शिवथरघळ याच गावाच्या हद्दीमध्ये.उत्तरेकडून आंबेनळी त्यानंतर गोप्याघाट, सुपेनाळ आणि सर्वात दक्षिणेकडे वरंधाघाट आणि त्याचा रक्षण कर्ता कावळ्या किल्ला! 


  अगदी बालपणापासून छोट्या मोठ्या कामांसाठी पुणे ,भोर येथे जाण्या-येण्यासाठी या घाटवाटांंचा वापर त्यांच्या पूर्वजांप्रमाणे त्यांनीही असंख्यवेळा केलेला. बऱ्याच वेळा वेल्ह्यात येऊन केळद गाठायचे आणि मग पुढे घाटाने खाली कोकणात उतरून आपले गाव गाठायचे हा त्यांचा आवडीचा प्रकार ! त्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी एक तर खर्च कमी व्हायचा आणि दुसरे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवता यायचे परत जाताना जर काही जड सामान नसेल तर अजूनही ते याच मार्गाने परत फिरायचे त्यांच्या या प्रकाराला काकू कधीतरी विरोध करायच्या पण आताशा मुलाने थोडी जबाबदारी घेतल्याने त्याही फार मनावर घेत नव्हत्या.

 एका शुक्रवारी त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले "अगं उद्या मी जरा गावाकडे जाऊन येतो त्या मोरेंनी एक स्थळ सुचवले आहे आणि तो भाऊसाहेब पण भेटला तर बघतो मागच्यावेळी ही उताऱ्यावर नोंद करायची राहिली होती "
बरं या जाऊन येताना जरा तांदळाचा एक कट्टा पण घेऊन या मग परत दोन महिने काळजी नाही.


 त्याप्रमाणे काका स्वारगेटहून केळद एस टी ने केळद आणि मग मढे घाटाने खाली उतरून आपल्या गावी पोहोचले.भावासोबत चर्चा करून त्या मोरेंची भाची आपल्या मुलासाठी बघण्यास शनिवारी लिंगाणा आणि रायगड यामध्ये वसलेल्या पाने गावात जायचे ठरवले.तलाठी सुट्टी वर असल्याने जमिनीचे काम होणार नव्हते मग तसेच पुढे पुण्याला जातो असे काकांनी त्यांच्या भावाला सांगितले.

शनिवारी पाने गावात आपले पाहुणे कोंडके यांच्याकडे ते गेले.मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून परत निघणार तर पाहुण्याने आग्रह केला की आज मुक्काम करा आणि उद्या निवांत बसने जावा.


दरम्यान शनिवारी रात्री उशीरा काही ट्रेकर मंडळी चांदरजवळच्या निसणीच्या वाटेने उतरुन गावात मुक्कामी आली.सकाळी लवकर चर्चा करताना ही मंडळी गायनाळ चढून वर खानूचा डिगा मग माणगाव आणि तिथून पानशेतमार्गे पुण्यात जाणार हे समजताच काकाही त्यांच्यासोबत जायला तयार झाले.खरतर नवख्या माणसाला सोबत घेण नियमात बसणार नव्हत पण काका काटक दिसत होते आणि वाटाड्याचेही ओळखीचे होते त्यामुळे एकमताने सर्व तयार झाले.


पाने हे गाव लिंगाणा आणि रायगड या मध्ये वसलेले. लिंगाण्याच्या वरची लिंगणमाची ही वाडी काही वर्षांपूर्वी दरड कोसळण्याच्या प्रकाराने स्थलांतरित करून पाने गावाच्या बाहेर पत्र्याची वाडी म्हणून वसवलेली. येथून पूर्वेला लिंगाणा काही हजार फूट उंचावलेला आणि त्यामागे रायलिंग पठार. बोराट्याची नाळ ही अवघड वाट वर घाटमाथ्यावरच्या मोहरी आणि कोकणातल्या पाने यांना जोडणारी तर त्याच्याच उत्तरेकडे निसणी, गायनाळ आणि बोचेघळ या वाटा घाटमाथ्यावरच्या अनुक्रमे चांदर, खानू आणि माणगाव यांना पाने वारंगी यांना जोडणाऱ्या! त्यापैकीच अजिबात वापरात नसणारी गायनाळ आज काका चढणार होते.


"ओ मामा" "ओ मामा" अशा वेळोवेळी हाका देऊनही मामा फक्त येतो असा आवाज द्यायचे.त्यांची चिंता आता सर्वांना लागली.वरच्या खिंडीत जवळजवळ दोन तास अवघड वाट पार करत पोहचल्यावरही मामा येईनात.त्यावरही अजून एक भयावह घसारयाचा टप्पा पार केल्यावरच बोचेघळीतून वर येणाऱ्या वाटेवर पोहचण्याच्या त्यामानाने सोप्या पण लांबलचक वाटेवर पोहचता येणार होते.तरी वरच्या एका टप्प्यावर जिथून खालची खिंड नजरेस पडायची तिथून परत मामांना आवाज दिले.आता मात्र त्यांचा प्रतिसाद येणे बंद झाले. 

खायला काही नाही, पाणी ही नाही त्यात जंगली जनावरांची भिती आणि कोणीही न फिरकणारी वाट! येथे त्यांचे बरे वाईट होऊ शकते या चिंतेने आम्हाला जरा बोचेघळीतून वर येणाऱ्या मार्गी लावून तुम्ही परत मामांना घ्यायला परत जा आणि खाली घेऊन एसटीने बसवून द्या अशी विनंती आम्ही वाटाड्यांना केली.दोघही समजदार होते.ते तयार झाले. बोचेघळीतून वर येणारी वाट येताच आम्ही त्यांना जवळचे काही पाणी आणि खाण्याचे पदार्थ देऊन आणि त्यांची बिदागी देऊन रवाना केले.फोनवर आम्हाला काय झाले ते कळवा हे पण सांगितले. आणि आम्ही ठळक मळलेल्या वाटेने खानूचा डिगा मग रात्री ८ वाजता पायी माणगाव आणि १२ च्या सुमारास घरी पोहचलो.

दोन दिवस त्या वाटाड्यांंचा फोनच लागला नाही. मग दोन दिवसांनी त्यांचा फोन लागला आणि काका सुखरूप असल्याचे कळले.पण त्यांना काकांनी स्वतः सांगितलेली कथा ही भयचकित करणारीच होती.

साधारण दुपारी २ च्या सुमारास जेव्हा आम्ही वरच्या खिंडीकडे जायला निघालो तेव्हा काका जरा थकवा आला म्हणून तिथे बसले.आम्ही त्यांना आवाज देत होतो तेव्हा त्यांची निघायची ईच्छा असूनही हातपाय हलायला तयार नव्हते.सुरुवातीला उन्हाच्या त्रासाने शरीरातील पाणी कमी झाले असे त्यांना वाटले म्हणून त्राण शिल्लक नसावे असेही वाटले.त्यामुळे आमच्या हाकांना प्रतिसाद देऊनही ते हालचाल करत नव्हते.पण अशाच अवस्थेत दोन तीन तास झाले आणि संध्याकाळचे पाच वाजले.आम्ही जसे नजरेआड झालो तसे त्यांना भिती वाटू लागली.
शरीराची हालचाल करायची इच्छा असूनही कसेबसे उठून बसता आले.

सगळीकडे नीरव शांतता आणि कसलाही आवाज नाही. अचानक त्यांना कोणीतरी हाक मारली असे त्यांना वाटले.त्यांनी आम्ही वर गेलोय त्या दिशेने पाहिले पण कोणीही नजरेस पडेना.थोड्या वेळात परत हाक ऐकू आली.आणि अचानक ते उठून उभे राहिले. एवढ्या वेळेत हातपाय हलवण्याचा प्रयत्न करुनही हालचाल होत नव्हती मग अचानक एवढी शक्ती कशी आली असावी याचा ते विचार करत होते.जरा आवाजाचा मागोवा घ्यावा म्हणून ते ईकडेतिकडे बघू लागले आणि आम्ही आलेल्या वाटेच्या अगदी विरुद्ध दिशेला जिकडे १५०० फूट खाली कोसळणारी दरी होता तिथून कोणीतरी त्यांना बोलवते आहे असे त्यांना जाणवले.अनाहूतपणे ते त्या दिशेला जाऊ लागले. हातातील पिशवी त्यांनी खाली दरीत फेकून दिली आणि हळूहळू दरीच्या टोकाकडे ते जाऊ लागले.ते काय करत आहेत याचे भानच त्यांना उरले नव्हते.आणि ते जेव्हा भानावर आले तेव्हा एका अशा अवघड कड्यावर ते पोहचले होते की जिथे दोराशिवाय जाणे अशक्य होते.अजून दोन चार पावले आणि आज त्यांचा अंत अटळ होता.तेवढ्यात आमचे वाटाडे जे अगदी कमी वेळात खालच्या खिंडीत उतरून गेले होते त्यांच्या हाका आल्या ओ पाव्हणं! या हाकेनेच त्यांचा जीव वाचवला होता.

कसेबसे करुन दोघांनी मदत करुन त्यांना परत खिंडीत आणले आणि हळूहळू करुन खाली गावात घेऊन गेले.आणि दुसऱ्या दिवशी एसटीने पुण्यात रवाना केले.

सह्याद्रीच्या दरयाखोरयात फिरताना असे अमानवीय अनुभव मला तर कधी आले नव्हते पण ही घटना माझ्या कल्पनेपलिकडची! एखादी जागा आपल्यावर गारूड करते आणि आपण त्या जागेच्या त्या शक्तीच्या अधीन होऊन संमोहित होऊन हे सगळ करतो असा विचार माझ्या मनात आला.अशा शक्ती म्हणजे इथे प्राण गमावलेले मानव असतील की आणखी काही? या संमोहनातून त्यांना बाहेर पडायला कारणीभूत आम्ही काळजीने अर्ध्या वाटेतून नियम तोडून परत पाठवलेले वाटाडे असतील की काही ईश्वरी शक्ती ? आजही गडकोटांच्या पायथ्याशी असणारे गावकरी ह्या शक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांचा आदर करतात हे पण मी अनुभवलेय.आयुष्याची दोरी बळकट असली तर अशा प्रसंगातूनही आपण बाहेर पडू शकतो आणि नसेल तर..।.

मित्रांनो हा अनुभव १००% खरा असून अजिबात काल्पनिक नाही ! त्या काकांचा जीव वाचला आणि ते सुखरुप राहिले याचे समाधान कायम राहील नाही तर आपण यासाठी नकळत का होईना कारणीभूत झालो याची सल कायम राहिली असती. मित्रांनो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना तिथले स्थळविशेष, भौगोलिक, ऐतिहासिक माहिती! तिथली जैवविविधता हे तर महत्त्वाचे आहेच पण असेही काही अनुभव कोणाला आले असतील तर नक्कीच वाचायला आवडेल.

धन्यवाद!







6 comments:

  1. Masta, ekdam उत्कंठावर्धक. फोटोंसह सर्व लिखाण छान. मजा आली वाचताना

    ReplyDelete
  2. वर्णन छान, तुषार! पण काकांच्या या उत्कंठावर्धक कथेने जीवाची उलघाल बराच वेळ चालूच राहिली! ते सुखरूप असल्याचे कळल्यावरच सुटकेचा निश्वास टाकला. 'एकल भ्रमंती' अन ती ही सह्याद्रीत, सह्याद्रीच्या रानवाटांवर.. हे नसते धाडस नि 'अघटिताला आमंत्रणच हा साधा नि बहुमोल नियम आपण विसरून चालणार नाही, ही 'शिकवण'ही यातून दिसून आली!
    😊💞👍

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन उत्तमच��चकवा लागणे हे भितीदायकच आहे.परंतु त्यातून सही सलामत सुटणे हे आपले नशीबच असते.दैवीशक्तीची साथ असते ती. मला अनुभव आहे याचा.काही वर्षे आधी खिरेश्वरमार्गे टोलार खिंडीतून जाताना चकवा लागला होता. वेळ होती पहाटे तीन ते साडेतीन ची. लिडर्सना वाटा माहिती असून देखील सगळ्या वाटा एकसारख्या भासू लागल्या आणि आम्ही पुढे असणारे दहाजण पाऊण तास -पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी फिरू लागलो.काहीतरी गडबड आहे.हे लिडर्सच्या लक्षात आल्यावर सगळयांना थांबवले. ग्रुप मोठा होता. मनात भिती वाटत असून कोणाला ही दाखवून दिले नाही.आणि प्रहर बदलल्यावर त्याच वाटेने पुढे गेल्यावर काहीही अडचण आली नाही.सकाळी सातच्या सुमारास कोकणकडा गाठला. माझा दुसराच ट्रेक असल्याने मला त्यातली अक्कल नव्हती. परंतु ट्रेकमध्ये एकट्याने कधीच पुढे किंवा मागे राहू नये इतके तेव्हाच समजले.सोबतच असावे चकवा तेवढं शिकवून गेला...जगात चांगल्या वाईट सर्व शक्ती अस्तित्त्वात आहेत. सह्याद्रीपुढे आपण खूप किडा मुंगी आहोत.हे विसरून चालत नाही...��☝️��घाबरू नये.शिस्तित जाणार्याला व संयमी असणार्याला सह्याद्री वेगवेगळ्या रूपात साथ देतो. हे मात्र खरे.
    लैच भारी लिहिलंयंस����

    ReplyDelete
  4. एखादी भयकथा वाचतोय असे वाटले. I think it can be associated with hallucinations due to dehydration !
    पण जिवंत चित्रण!👏🙏

    ReplyDelete