Sunday 22 February 2015

घाटवाट : कुडली भोर आसवले खिंड महादेव मुर्हा ढवळे चंद्रगड ते ऑर्थर सीट

“The world is a book and those who do not travel read only one page.” – St. Augustine

एका व्यस्त आठवड्यात माझे आतेभाऊ व गुरूवर्य संजय अमृतकर(नाना) यांचा निरोप आला "अरे 24 25 आणि 26 जानेवारीला मोकळा आहेस का? "खर तर त्याआधीच्या शनिवारी 'कातराई शंभू डोंगर गोरक्षगड अनकाई टणकाई 'असा मनमाड रेंजचा भन्नाट मुक्कामी ट्रेक झाला होता प्रशांत ( माझा लहान भाऊ आणि ट्रेक लिडर आणि साहेबांच्या भाषेत ई वर्णनासाठी प्रसिद्ध), समीर कदम , विशाल रघुवंशी( गड बडीज्) अमोल चांदूरकर यांच्या सोबत.आता आली का पंचाईत! दोन सलग आठवड्यात मुक्कामी ट्रेक म्हणजे घरच्यांच्या संतापाची 'ऊंटाच्या पाठीवरची शेवटची काठी 'होते की काय ही भिती! पण नानाचे आवतण म्हणजे काहीतरी 'स्पेशलच' असणार आणि बरेच शिकवणारे असणार त्यामुळे लगेच होकार दिला.

नानाचे नेटवर्क म्हणजे अफाट! एक कसे कायचा (whats app) समुह तयार झाला आणि माझे नाव त्यात समाविष्ट झाले.त्यातील नावं अपरिचित कारण तसा मी नवीन आणि लांबून गंमत बघणारा.सुरूवातीलाच त्यांचे खाण्याचे पदार्थ काय न्यायचे याच्यावरची चर्चा बघून व त्याची यादी बघून त्यासाठी 'एक पोर्टर न्यावा काय ?'अशी विचारणा केली.जितेंद्र बंकापुरे( जितुभाई) यांचे ऊत्तर 'अरे भरपूर खायचे आणि भरपूर पायाची रग जिरवायची' ही गुरूंची शिकवण(अजय ढमढेरे सर). परत छानसा गुगल मॅप आला रूटचा ,सगळे बघून मला जमते की नाही ईतके डोंगर चढऊतर करायला ही शंका नानामुळे दडपून टाकली.

ठरल्याप्रमाणे नाना पुण्यात पाषाणला आले 24ला सायंकाळी, बरोबर एक ऩाशिककर गणेश पाटणकर माझ्यासारखाच नानाच्या 'भरोशावर 'आलेला.घरी आईने आणि बायकोने नानासाठी आणि माझ्यासाठी जेवण तयार केले आणि डबा बनवला ट्रेकसाठीचा.फोनाफोनी करून ठरवलेली गाडी किती वाजता येणार आणि कुठे भेटायचे याची विचारणा केली.बंकापुरेंच्या सोसायटीत रात्री 11 वाजता भेटायचे ठरले सगळ्यांनी.प्रशांत सोडायला आला.ईतर मंडळीही हळूहळू पोहचली. थोडा परिचयचा कार्यक्रम झाला आणि  जितुभाईला 'गोड'समज मिळेपर्यंत शांततेचा भंग करीत सर्वांनी गाडीत बॅगा टाकल्या व कुडली भोरच्या दिशेने  ऊत्साहाने निघालो.

वाटेत पंक्चर काढेपर्यंत चहापान केले.रात्री 2 वाजता कुडलीला पोहचलो गाडी वळवून पार्क करेपर्यंत राजाभाऊ आणि मी वर टेकाडावरच्या एकमेव दिसणारया घराच्या दिशेने निवारयाची सोय बघायला गेलो.घरमालकाने थोडी चौकशी करत आणि राजाभाऊच्या गोड बोलण्याला भुलत ओसरीत आत पडायची परवानगी दिली.सर्व जण पटापट झोपले.सकाळी 6 वाजता उठलो पण रात्री कोंबडा सारखी बांग देत होता.बहुतेक आम्ही त्याचे टाईमटेबल बिघडवले होते.



दिवस 1

आजचा मार्ग 'कुडली आसवले खिंड महादेव मुर्हा ते ढवळे 'असा नियोजित होता.निनाद ,ऊत्तम , साईप्रकाश पुढे व नाना ,जितेंद्र, राजाभाऊ मागे ,मध्ये आम्ही बाकी असा ग्रुप करून मार्गाक्रमण चालू केले.डावीकडे अंगावर येणारे रायरेश्वर पठार आणि ऊजवीकडे घनदाट म्हणता येईल असे जंगल असा प्रवास चालू केला.वाटेत जागोजागी जंगली प्राण्यांची विष्ठा दिसत होती मध्ये ओढ्याच्या पाण्याजवळ 'बिबट्याची विष्ठा' दिसली तशी माहीती आमच्यातल्याच एका जाणकाराने दिली. तासाभरात आसवले खिंडीत पोहचलो.तिथे पाण्याचा ब्रेक झाला आणि लगेच पुढे निघालो.



थोड्या अंतरावर गेल्यावर थोडी झाडी कमी झाली आणि समोरचे दृष्य पाहून डोळे विस्मयचकीत झाले डावीकडे मागे रायरेश्वरचे ऊंचच ऊंच नाखिंदी टोक ,थोडे पुढे महादेव मुर्हा, समोर कोकणातील वडघर ,ऊजवीकडे मोहनगड ,थोडा पुढे कांगोरीचा मंगळगड असा नजारा!अशा विहंगमासाठीच ट्रेकर एवढी पायपीट करतो व मिळणारे समाधान अवर्णनीय आहे.ते दृष्य डोळ्यात साठवत खाचखळग्यातून ('वसपटी ' ईतिश्री राजाभाऊ शब्दकोष) ऊतरायला सुरूवात केली.मध्ये एका ओढ्यात पौष्टीक न्याहारी केली.(अहो पौष्टीक म्हणजे अगदी डिंकाचे लाडू, ऊकडलेली अंडी असे पदार्थ).ऊन वाढायला सुरूवात झाली होती ,त्यात अपरांताचा दमटपणा! खाली एका वाडीत पाणी भरून घेतले.समोर मंगळगड खुणावत होता त्यावर जायचे का याची चर्चा झाली, निर्णय होईना मग ठरवले की जाऊ या पण ऊन्हात डांबरी रस्त्याची थोडी पायपीट केल्यावर एका झाडाखाली सिनीअर्सने निर्णय केला की ऊरलेले अंतर बघता मंगळगड पुढच्या वेळेसाठी ( वरंध घाटाच्या कावळ्याकडून) ठेऊ.

मग थोडे लिंबूसरबत आवळा प्राशन करून महादेव मुरह्याच्या ऊभ्या चढाला लागलो. भर दुपारच्या ऊन्हात मध्ये सावली नसताना हा चढ एकदम सरळ आणि  त्रासदायक वाटत होता. पण वर पठारावर गेल्यावर छान माळ लागला व एक झाड लागले त्याखाली सर्व येईपर्यंत थोडे विसावलो.पुढे महादेव मुर्ह्याच्या अलिकडे एक निर्झर व मूर्ती लागल्या त्यातूनच वरच्या वाडीची तहान भागते. मात्र 4 महिने खालून त्यांना पाणी वाहून आणावे लागते."विकासाची गंगा "अजून तरी येथपर्यंत पोहचायला मंत्रालयातील ए.सी.ऑफीसमधून कारभार हाकणारया एखाद्या सायबाला किंवा आश्वासनांची खैरात करून जनतेची दिशाभूल करणारया पुढारयाला किमान एकदा तरी काही न घेता सडे ऊन्हाचे वर चढवायला हवे म्हणजे पाण्याचे ड्रम घेऊन वर चढताना काय हाल होत असतील याची जाणीव होईल असो.



येथून कांगोरीगड समोर एकदम झकास वाटत होता' पुढच्या वेळी मी वाट बघतोय' असे निमंत्रण देणारा.आता पोटात कावळे ओरडू लागले होते तेथे एका घराच्या ओसरीत पथारी पसरून घरून आणलेल्या पदार्थांवर सामुहिक ताव मारला आणि मग वामकुक्षी घेतली.चांगली तासभर डुलकी मारून 4 वाजता ऊतरतीच्या ऊन्हाबरोबर खाली ढवळ्यात ऊतरायला सुरूवात केली.समोर जावळीत प्रतापगड चंद्रगड डोकावत होता.वाटेत खालील खांडजचे मोरे काका भेटले त्यांच्याबरोबर थोडी परिसराची माहीती घेत पीक पाणी व्यवसाय मुल बाळ याबाबत बोलत बोलत कधी खाली ऊतरलो समजलेच नाही.त्यांनी एक छान माहीती दिली की बडोद्याच्या गायकवाडांबरोबर गावातल्या पूर्वजांमधले 60%मोरे आडनावाचे लोक गेले व स्थायिक झाले. काका त्याच लोकांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी.त्यांच्या मालमत्ता गावातच आहेत येऊन जाऊन बघतात बडोद्यातून.आता निवृत्तीनंतर ईथे येऊन राहीलेले.

दहा मिनीटे झाली  पाणी घेतले ,चहा नाकारला. डोकावून अंदाज घेतला तरी माझे साथीदार दिसेनात मग काका म्हटले की बहुतेक ते घसारयाच्या वाटेने गेलेत मग त्यांनी ढवळ्याचा मार्ग दाखवला .मी एकटाच झपझप चालत निघालो ,सायंकाळची वेळ आणि पाखरांचा आवाज सोडला तर निर्मनुष्य रस्त्यावरची निरव शांतता! कोणाचाच आवाज नाही.4 ते 5 कि मी चालल्यावर अंदाजाने समोर ढवळ्याच्या दिशेने कोरड्या नदी पात्रातील दगडगोट्यात ऊतरलो .मध्येच एका डोहाच्या स्थिर पाण्यात सायंप्रकाशातील विविध रंग पसरले होते व  त्याक्षणी मी आणि अफाट सह्याद्री याव्यतिरीक्त थोडी भितीदायक शांतता एवढेच तिथे होतो. थोडे पाणी पिऊन नदीपात्र ओलांडले व समोरची छोटी टेकडी चढून वर ढवळ्यात पोहचलो.


वर मुंबईकर पाव्हणे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाने स्वागत केले तिथे शाळेजवळ तुमची गाडी आली आहे व गावात आज सप्ताह समारोपाचे किर्तन आहे असे समजले.गावातून शाळेकडे गेलो सॅक ओसरीत ठेवून थोडे बसलो. साथीदार 15 ते 20 मिनीटात आले वेगळ्या मार्गाने.किर्तन असलेले मंदीर शाळेशेजारी असल्याने थोड्या अंतरावरच्या बालवाडीच्या ओसरीत मुक्कामाची तयारी केली.स्वयंपाकाचे बघणार तर गाववाल्यांचे प्रसादाच्या भोजनाचे आग्रहपुर्वक निमंत्रणआले.मग तोपर्यंत थोडा नाष्टा व गरम सूप प्यालो.राजाभाऊंनी झकास बनवले होते सूप आणि हा माणूस म्हणजे सतत हसवणारा, शब्दसंग्रह तर अचाट! "सर्व महाराष्ट्राचे पाणी एका बाटलीत! "पुढेमागे कधीतरी फक्त राजाभाऊवर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल.( साई, जितुभाई यांचासुद्धा राजाभाऊंवर लेख येऊ शकतो, ऐकताय ना?).
 प्रवचन संपल्यावर पहिल्या पंक्तीसाठी लाऊडस्पीकरवरून बोलावणे आले.श्लोक म्हणून मस्त 'भात ,डाऴ, भाजी आणि बुंदीचे' जेवण भरपेट केले.सर्वानुमते गावातल्या मंदीरास छोटी देणगी दिली.थोडा वेळ गप्पा टप्पा करून स्लिपींग बॅगमध्ये शिरलो.ऊद्याच्या ऊरलेल्या टप्प्याचे वर्णन ऎकत व आजच्या प्रवासाचे अवलोकन करत निद्रादेवीच्या अधीन कधी झालो ते समजलेच नाही.


दिवस 2
सकाळी ऊठून प्रातर्विधी उरकून पुन्हा राजाभाऊंच्या हातचे पोहे खाल्ले.सॅक आवरून गाडीत टाकली आणि पाण्याच्या बाटल्या सार्वजनिक पाणवठ्यावरून भरून घेतल्या आणि  तयार झालो.निलपंख ( indian roller) व दुरून धनेशांचे ( Hornbill) दर्शन झाले.आजचा दिवस तसा जास्त चढाईचा आणि अवघड होता कारण सर्व करून दिवस मावळण्यापूर्वी ऑर्थर सीट चढून महाबळेश्वर गाठायचे होते.ग्रुप सोडून पुढे जायचे नाही अशी "प्रेमळ" समज जितुभाईने दिली.मग चंद्रगडाच्या ( राजाभाऊंच्या शब्दात " निग्रोगड" कारण कायम काळा ठिक्कर असतो वणव्यांमुळे) दिशेने चालू लागलो.


सुदैवाने चंद्रगड अजून निग्रोगड नव्हता झाला.मध्ये कोळीवाडा लागला, मग गडाची उभी पण झाडीतील चढण लागली.वाटेत जागोजागी' ओम नम: शिवाय 'च्या पाट्या.थोडी झाडी संपल्यावर गड डावीकडे  एकदम छातीवर! सरऴ आणि ऊभी घसारयाची चढण लागली.वाटेत ढवळ्याकडचे खोरयाचे दृष्य सोनेरी प्रकाशात खूप छान वाटत होते.वर एक रॉकपॅच चढून गडावर दाखल झालो.गडावर महादेवाची पिंड व नंदी आणि ऊत्तरेला पाण्याचे टाके थोडी तटबंदी एवढेच शिल्लक आहे पण वरून 'रायरेश्वर बहिरीची घुमटी ढवळे घाट व नदीचे खोरे' असे अप्रतिम दिसते की ध्यान लावून बसून ऱाहवे.तेथून समोरची अजस्र  डोंगररांग बघून मार्ग कसा असावा याचा विचार करत पेयपान ऊरकून मग अनुपने रेकी केलेल्या घसारयाच्या शॉर्टकटवरून ढवळे घाटात ऊतरण्याचे ठरले.

सुरूवातीला रोप लावण्याचा विचार नंतर रद्द करून सरळ 80 अंशात असणारा घसारा फक्त झाडीच्या फांद्यांचा आधार घेऊन ऊतरताना बहुतेकांच्या पार्श्वभागाची चांगली मॉलीश झाली.500 फूट पुढे ही वाट दगडधोंड्यांची झाली व एके ठिकाणी चंद्रगडाला वळसा घालून ऑर्थर सीटला जाणारया ढवळ्या घाटाच्या मुख्य वाटेला मिळाली.वाटेत निरंजनने एका सापाचा फोटो काढला.तिथे थोडा विसावा घेऊन न्याहारी केली.बाकीचे सर्व कसरत करून खाली आल्यावर बहिरीच्या घुमटीकडे मंडळी निघाली.

वाट मळलेली व वृक्षराजीने मढलेली होती पण सुरूवातीला काही ठिकाणी "सुस्कृंत "भटक्यांनी टाकलेला प्लास्टीकचा कचरा बघून बेचैन वाटले.काही अंतरावर ओढा ओलांडताना निरंजनचा तोल जाऊन तो पडला पण सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही मग त्याला धीर देत व चकवा देणारी वाट ढुंढाळत महेंद्र सिंग काका व मी मागच्यां मंडळींना सोपे व्हावे म्हणून जागोजागी खुणा करत हळूहळू बहिरीच्या ट्रॅव्हर्सपर्यंत पोहचलो.तिथून चंद्रगड व पुढची धार अप्रतिम दिसत होती.ऊत्तम आधीच तिथे थांबला होता मग त्याच्या मागे चालू लागलो.सिंग काका ईतरांसाठी व निरंजनसाठी थांबले.पुढे गणेश पाटणकर थकल्यामुळे थांबू लागला पण मी थोडा धीर देत आणि हा मार्ग आधी केलेल्या ऊत्तम भाऊंच्या फक्त 10 मिनीटांचा पॅच आहे यावर विश्वास ठेवत ,बहिरीचा घसारा चढायला प्रोत्साहन दिले.चांगल्या 40 मिनीटांच्या घसारयावर चढून वर गेल्यावर पूर्ण घाट व खोरे यांचे रूप पाहून माझा थकवा पळून गेला.


मग एक अरूंद ट्रॅव्हर्स वरून गणेशला बरोबर घेऊन चालल्यानंतर बहिरीचे मंदीर व झाडाखाली व्यवस्थित रंग दिलेल्या मूर्ती बघून प्रसन्न वाटले.एक अवघड टप्पा 4 ते 5 तासाचा संपला होता.



गणेश आडवा झाला होता कारवीच्या सावलीत.मंदीराच्या अलिकडे कारवीच्या जंगलातून वर गेल्यावर एक मोठा खडक लागला व त्याच्या पोटात 'सह्याद्री मिनरल वॉटर'चा एक मोठा स्रोत आहे मग सॅक ऊतरवल्या व थंडगार पाण्याच्या दोन बाटल्या अंगावर ओतून आणि 1 बाटली पोटात टाकून एकदम ताजातवाना झालो.ईतर मंडळी दूरवर पण दिसेना मग ऊरलेल्या वेळाचे गणित करून ऊत्तमभाऊंनी आणलेल्या अंबाखवा पोळीचे भोजन ऊरकले व मग थोडा विसावलो.थंडगार वारा, समोर जोर खोरे व रायरेश्वर व छान जंगल यांचा आनंद घेत असताना ईतर मंडळी पोहचली.सायंकाळचे 5 वाजले होते.ईतरांनी फ्रेश होऊन साईने आणलेल्या दह्याचा आणि त्यात त्याने स्वत: बनवलेल्या मसाल्याचा आस्वाद घेत ठेपले अंबा खवा पोळ्या असा चौरस आहार घेतला.मग ऊत्तम मी कौस्तुभ निरंजन गणेश ऑर्थर सीटकडे निघालो.



वरच्या गाढवाच्या माळावरून ऊजवीकडे मावळतीच्या रंगाने न्हालेले जावळी खोरे मागे ,प्रतापगड समोर ,ऊभा तासलेला ऑर्थर सीटचा कडा, डावीकडे रायरेश्वर असा नजारा बघून मनातल्या मनात नानाला व ईतर मंडळींना मला या ऊत्सवात सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद दिले.थोडे पुढे घसारा चढून एक रॉक पॅच चढलो व समोरच्या खिडकीतून प्रतापगडाच्या मागे निरोप घेत असलेल्या रविराजाचे नितांतसुंदर रूप डोळ्यात आणि कॅमेरयात बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला.वाटेत एका दुर्दैवी गिर्यारोहकाचे नाव समाधिस्त होते.



समोरच्या ऑर्थर सीटवरून 26 जानेवारीच्या पिकनीकचा आनंद घेणारे लोक जरा विचीत्रपणे आम्हा बावळटांकडे बघत होते.आम्ही मात्र समाधानाने फुललेले चेहरे घेऊन ऑर्थर सीटच्या पायथ्याला सधन संस्कारित लोकांनी केलेल्या कचरयातून मार्ग काढत वर पोहचलो.




जुन्या महाबळेश्वरमध्ये चहापान करून व वाईला बंडू गोरेंच्या खानावळीतील भोजन ऊरकून रात्री घरी पोहचलो.

शिवरायांच्या काळात किंबुहना त्याहूनही आधी वापरात असणारया 135 घाटवाटांमधील ( 18व्या शतकातील नोंदीनुसार) कोकण भूमीला आणि घाटावरचा देश यांना जोडणारा थोडा अवघड पण नितांत सुंदर नियोजनबद्व व्यापारी मार्गाची  सफर घडवणारा जावळी खोर्यातील ढवळ्या घाट मला निसंशय घाटवाटांच्या प्रेमात पाडून गेला.सह्याद्रीची अशी अनोखी रूप वारंवार अनुभवायला मिळावी हि ईश्वरचरणी प्रार्थना करून आणि नानाला मला अशी संधी दिल्याबद्दल धन्यवाद देऊन अल्पविश्राम घेतो.

जय शिवराय!  जय महाराष्ट्र!

ऐतिहासीक महत्व:
ढवळ्या घाट हा जावळी खोरयातील  शेवत्या घाट ते निशी घाट अशा नोंद असणारया ऎतिहासिक घाटवाटेतील 9 घाटांपैकी एक आहे.
 कोंडाईबारी (सुरत ते नवापूर) पासून बोरघाटापर्यंत 25 घाट;  आणि सवाष्णी घाट( तेलबैला ते पौड )ते तुलकूट घाट असे 39 घाट आहेत.

ट्रेक दिवस:  24 जानेवारी रात्री 11 वाजता पुणे सोडले.
                   25 जानेवारी ढवळे मुक्काम
                   26 जानेवारी सायंकाळी 7 वाजता ऑर्थर सीट  
                   रात्री 11 वाजता पुण्यात परत.

ट्रेकर्स:  संजय अमृतकर, जितेंद्र बंकापुरे, महेंद्र सिंग, राजाभाऊ लोकरे, ऊत्तम अभ्यंकर, साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, नितीन तिडके, कौस्तुभ दातार, अनुप अचलारे, निरंजन भावे, योगेश अहिरे, गणेश पाटणकर आणि तुषार कोठावदे.
अंतर:  34 कि.मी.
ऊंची: 1450 मीटर

सूचना
स्वरूप:  जाणकार व मोठ्या ग्रुपबरोबर मध्यम कठीण अन्यथा कठीण.शक्यतो ग्रुपनीच करावा असा.
पाणी या ठिकाणी भरून घ्यावे: वडघर, महादेव मुरहा, ढवळे, चंद्रगड, बहिरीची घुमटी .चंद्रगड ते बहिरी पाणी नाही त्यामुळे कमीत कमी 3 लि.पाणी कायम असावे. घसार्‍याची खूप ठिकाण असल्याने काठी आणि शुज ऊत्तम प्रकारचे न घसरणारे असावेत.

आभार:  प्रोत्साहीत करून मार्गदर्शन करणारे प्रशांत कोठावदे, साईप्रकाश बेलसरे आणि गुरूवर्य संजय अमृतकर

7 comments:

  1. काेठावदेंच्या घरातले सनई चाैघडे निनादू लागले रे..!
    माझ्या मामाचे नांव अटकेपार ..!
    वा..बहाेत खूब..! तुषार
    तुझ्या व्यक्तीमत्वाला साेनेरी वर्ख चढू लागलाय..मित्रा..
    मागे वळून बघू नकाेसं ..चल पुढे...

    ReplyDelete
  2. नाना, तुझा हात असाच राहू दे! मी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मनाला जे जाणवले ( माझ्या नजरेतुन) ते मांडण्याचा प्रयत्न करतोय.ब्लॉगलाच नाही तर ईतरही बाबतीत अजून मी बालवाडीतच आहे.पण नक्की मी हा प्रयत्न पुढे करत राहीन.कृपादृष्टी अशीच राहू द्या.

    ReplyDelete
  3. मस्त आणि आटोपशीर वर्णन… छान…

    ReplyDelete
  4. पहिल्याच बॉलवर सिक्सर!!!
    मस्त वर्णन..
    एक महिन्यापूर्वीच ट्रेक झाला असला, तरी ट्रेकचे बारकावे वाचताना आठवणींना उजाळा मिळाला...
    आता, सातत्याने ट्रेक्स आणि लिखाण घडो, अश्या शुभेच्छा! :)

    ReplyDelete
  5. क्या बात है..
    भरपूर खायचे आणि भरपूर पायाची रग जिरवायची ..
    मस्त ..सतत भटकंती आणि लिखाण चालू ठेव ....!

    ReplyDelete
  6. दादा जबरदस्त ट्रेक आणि लिखाण …
    खरच miss केला मी हा ट्रेक …

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर शब्दांकन तुषार ! ट्रेक न करूनदेखील तुझा अनुभव मात्र मला स्पर्श करून गेला. असंच लिहत रहा...

    ReplyDelete