Tuesday 3 March 2015

राजगड ते तोरणा ट्रेल - पूर्वार्ध

"The real voyage of discovery consists not in seeking new landscapes, but in having new eyes."

Marcel Proust

गुरूवर्य नानांचा नेहमीप्रमाणे अचानक निरोप आला तीन दिवस राजगड ते तोरणा ट्रेक करायचाय मी आमच्या नाशिककर ग्रुपला घेऊन येतो मुक्काम तुझ्याकडे करू आणि पहाटे ऊठून जाऊ.खरतर मुरूमदेवच्या डोंगरावर वसलेला राजगड माझ्या मनात सर्वोच्च स्थान असणारया गडांपैकी याचे कारण महाराजांसारख्या "कतृत्ववान राजाचे गडावर त्याच्या वैभवाच्या काळातले 28 वर्ष वास्तव्य, अवाढव्य पसरलेल्या 3 बुलंद माच्या आणि सर्वांवर खडा पहारा देणारा अभेद्य बालेकिल्ला" सर्व कसे कुठल्याही माणसाचे भान हरपावे असे.दुसरे एक कारण म्हणजे माझ्या गडकिल्ल्यांच्या सफरीची सुरूवात मी याच राजगडापासून केलीय!

नाना, सोऩावणे सर, किशोर थेटे, प्रशांत पवार नाशिकहून आणि किश्या मेस्त्री मुंबईहून मुक्कामास आले.निलेश वाणी आणि चेतन पाटकरही पुण्यात दुसरीकडे मुक्कामाला आले.रात्री जेवण ऊरकून आमच्या नवीन ईमारतीत झोपण्याची सोय केली.दुसरया दिवशी पहाटे चेतन आणि निलेश त्यांची कार घेऊन सुस रोडला पोहचले आम्ही नाशिकहून मंडळी आलेल्या कारने त्यांना घेऊन राजगडच्या दिशेने प्रयाण केले.

सकाळी नसरापुरला चहा घेतला आणि साखर गावाच्या दिशेने निघालो.वाटेत लांबून राजगड दिमाखात ऊभा दिसत होता.

साखर गावातून गुंजवण्याकडे निघालो वाटेत सकाळच्या कोवळ्या ऊन्हातले सुवेळा माचीचे व पद्मावती माचीचे फोटो घेतले यावेळी माझा कॅमेरा नादुरूस्त झाल्याने मोबाईल कॅमेरॅत मी दोन तीन क्लीक्स घेतल्या.

गुंजवण्यात पोहे चहा घेऊन पद्मावतीमाचीकडे कूच केली.मध्यावर पोहचल्यावर ताक घेतले आणि चोरदरवाजाचा रॉक पॅच गाठला थोडे ऊन वाढले होते.हा रॉक पॅच आता रिलींगमुळे सोपा झाला आहे पूर्वी पावसात दोन वेळा कसरत केल्याचे पुसटसे आठवले.

पद्मावती माचीवर प्रवेश केल्यावर छोटासा तलाव आहे त्याला ऊजवीकडे ठेवत वर मंदिरात पोहचलो.पद्मावती देवीचे हे मंदीर महाराजांच्या आगरा सुटकेनंतर त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आहे.

त्याशेजारी किल्लेदाराची कोठी आहे.पिण्याच्या पाण्याची दोन टाकी मंदीरालगतच आहेत.आत सॅक टाकल्या.खालील गावातील काही मंडळी येथे पूर्णवेळ हजर राहून येणारया ट्रेकर्सला खाण्याचे पदार्थ पुरवतात.

तेथे थोडे खाऊन ताजेतवाने होऊन गडफेरीसाठी सज्ज झालो.प्रथम पद्मावतीवरील भोरच्या राजाची सदर बघून त्याखालील टाके बघून 'पाली दरवाजा 'चे अवलोकन करण्यास निघालो.

हातात कॅमेरा नसल्याने नानाचा सहाय्यक म्हणून फ्रेम ठरविण्यासाठी बारीकसारीक गोष्टी बघून सूचना करत होतो.अर्थात नानाच्या फोटोग्राफीचा आवाका म्हणजे अफाट त्याला सूचना म्हणजे सूर्याला मेणबत्तीने प्रकाश दाखवणे पण माझ्यावरचा जीव म्हणा अथवा मोठेपणा आल्यावर आलेली स्थितप्रद्ण्यता म्हणा पण तोही तितक्याच संयमाने त्याकडे लक्ष देऊन वेळप्रसंगी मोजके आणि नेमके विश्लेषण करून मला फ्रेम समजावत होता.

"पाली दरवाजा" म्हणजे राजगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापैकी एक.त्याची रचना म्हणजे राजगडाच्या ईतर वास्तूंप्रमाणे जागतिक दर्जाच्या वास्तूविशारदालासुद्धा आजही आव्हान वाटेल अशी.खाली पालीगावात महाराजांचे घोडदळ होते व सईबाईंचा निवास आजारपणात पालीतच होता.
ईथे मला विशेष जाणवलेल्या गोष्टी म्हणजे थेट दरवाजा च्या बुरूजातून तटबंदीवरून बालेकिल्ल्याकडे जाणारा पायरयांचा मार्ग, तसेच दरवाजाखालील बुरूजाची रचना म्हणजे हत्तीवर अंबारी ठेवावी अशी.अशीच रचना सुवेळा माचीच्या नेढ्यानंतरच्या बुरूजाचीही आहे.हा योगायोग नक्की नसावा तर अभेद्य बांधकाम करताना कलात्मकता जपण्याचा वास्तूविशारदाचा प्रयत्न असावा.पाली दरवाजातून बालेकिल्ला व त्याची तटबंदी अप्रतिम दिसते.तेथील दरवाजावर कोरलेली काही शिल्पे बघितली.दोन्हीकडे तटबंदी मध्ये पायऱ्या व दरवाजा विलक्षण वास्तूशिल्प डोळ्यात साठवले.

एव्हाना सायंकाळची वेळ जवळ आली होती आणि संजीवनी माचीवरून रायगडाच्या क्षितीजावर मावळतीला जाणारया सूर्यनारायणाला निरोप देण्यासाठी जायचे होते.हळूहळू पाली दरवाजातून वर येऊन बालेकिल्ला डावीकडे ठेवत संजीवनीकडे निघालो.

बालेकिल्ल्याचा घेरा संपताच समोर अवाढव्य पसरलेली "संजीवनी माची "म्हणजे राजगडाच्या वास्तूवैभवाची मोठी ठेव आहे.चिलखती तटबंदीच्या दोन्हीकडे भल्यामोठ्या रांगा पार क्षितीजापर्यंत भिडलेल्या ,अनेक बुलंद बुरूज, टप्प्याटप्प्याने दरयाखोरयात विरणारी माची हे अफाट वैभव अंगाखांद्यावर बाळगणारा राजगड म्हणजे शहरात कितीही मोठे ईमले बांधले तरी आपल्या गावाकडच्या वाड्याबद्दल जे वाटते ती भावना जागृत करणारा, राजांच्या स्वराज्यातील ,कदाचित मनातीलही जवळचा गड असल्यास आश्चर्य ते काय?

वाटते त्यापेक्षाही अंतर खूप असल्याने व पाण्याची बाटली भरून न घेण्याची चूक केल्याने मी थोडे अलिकडूनच सूर्यास निरोप दिला .नानाने मात्र त्याच्या शिस्तीत पाणी घेऊन आल्याने शेवटच्या टोकावरून त्याच्या लॅंडस्केपच्या 'जागतिक ' दर्जांच्या फोटोच्या अफाट संग्रहात आणखी काही फोटोंची भर घातली.

मी मात्र कॅमेराच नसल्याने चिलखती तटबंदीमध्ये पुरातत्व चिन्हांच्या शोधात बरीच शोधाशोध निरीक्षण केले.खोदीव टाक्यांचा समुह, व्याघ्रमुख दरवाजा, तटबंदीवर एका ठिकाणी सिंहाचे शिल्प, तीन टप्प्यात खाली ऊतरणारी व प्रत्येक टप्प्यावर बुरूज दरवाजा अशी रचना असल्याची नोंद घेतली ,पण सायंछायात धडकी भरवणारा एकांत व आवाजही पोहचणार नाही अशी लांबलचक माची त्यात पूर्ण तटबंदीत जंगल माजलेले सर्व अवशेष क्षणोक्षणी आपल्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव करून देणारे. मग आवरते घेऊन परत पद्मावतीच्या दिशेने निघालो.

अर्ध्या तासात गजबजलेल्या मंदीर परिसरात येऊन घसा ओला केला.तेथे नानाच्या मार्गदर्शनाखाली आलेला नासिकचा एक मोठा ग्रुप पोहचला होता व त्यांनी सर्वांच्या रात्रीच्या भोजनाची सोय होईल एवढा शिधा एका गाववाल्याच्या सूपूर्द केला मग थोड्या वेळात नाना आल्यावर गप्पाटप्पा करत 25 ते 30 लोक बसलो.रात्रीचे जेवण तयार झाले पोटोबा करून पथारी पसरून झोपी गेलो पण मनातून संजीवनी माचीचे गूढरम्य दृष्य काही हलले नाही.

दुसरा दिवस

सकाळी लवकर जाग आली.सर्वानुमते आज सकाळी सुवेळा माची करायचे ठरले.येऊन मग नाष्टा करावा असे नियोजन केले.पाणी थोडा खाऊ घेतला व निघालो.बालेकिल्ला ऊजवीकडे ठेवत सर्वप्रथम खाली गुंजवणे दरवाजा बघायचा म्हणून खाली ऊतरलो.जाताना पाली दरवाजाच्या वर असणारया दरवाजाप्रमाणे छोटा दरवाजा लागतो व त्यावरही पायरया थेट बालेकिल्ल्याला भिडतात.गुंजवणे दरवाजाला ऊतरताना ऊजवीकडे सुमधुर पाण्याचे टाके आहे.खाली सरळ घसरण असणारा ऊतार! एवढ्या कमी जागेत दरवाजा अप्रतिम बसवला आहे.व 90° वळणारा हा मार्ग पायदळाची छावणी म्हणून असणारया गुंजवण्यात ऊतरतो.पण दोरखंडाशिवाय दरवाजा ओलांडून खाली ऊतरणे थोडे अवघड आहे.तेथून सुवेळा माची ऊगवतीच्या प्रकाशात झळाळत होती.खाली दरीत दाट जंगल पसरले आहे.थोडा वेऴ तेथे वास्तूकलेचे निरीक्षण करून परत वर यायला निघालो.टाक्यापाशी थांबून पालापाचोळा दूर सारत पाणी भरून घेतले व प्यालो.सुवेळेकडे जाताना एके ठिकाणी देवतांच्या मुर्ती आहेत तिथेही छोटा झरा आहे.

बालेकिल्ल्याचा घेरा संपवून पुढे डोंगरधार चालल्यावर एक छोटी टेकडी आहे तिला वळसा घालून सुवेळेत पोहचलो.समोर संजीवनी माचीसारखीच ऊत्तम तटबंदी व ऊत्कृष्ट बुरूज बघितल्यावर डोळ्याचे पारणे फिटते.

थोडे पुढे गेल्यावर नैसर्गिकरित्या तयार झालेले नेढे बघण्यासाठी वर चढलो.तेथून गुंजवणे खोरे पद्मावती माची ऊजवीकडचे भोरच्या बाजूचे खोरे असा नजारा अनुभवला, थोडा नाष्टा केला सोनावणे गुरूंजीचे अहिराणीतील काही किस्से ऐकून मग बुरूजाकडे निघालो.

नाशिककर ग्रुप आधीच सुवेळाच्या बुरूजावर हजर होता.तिथे मंत्रोच्चाराच्या गजरात सगळ्यांनी तो क्षण साजरा केला.थोडे ग्रुप फोटो काढून परतीच्या मार्गाला निघालो.तटबंदीवर एक जुने जाते बघितले व शौचकुप नजरेस पडले.पाण्याची टाकी, जुन्या विटा, नेढ्याच्या अलिकडे खाली एक  मंदीर आहे व ईतर अवशेष न्याहाळले.सुवेळा माचीही राजगडाच्या ईतर अवशेषांप्रमाणे गतवैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगून आहे.

परत येताना बालेकिल्ला खुणावत होताच,पण अलिकडेच्या टेकाडाच्या बाजूने पुढे आल्यावर डावीकडे संजीवनीच्या दिशेने नजर टाकल्यावर मध्ये तटबंदी व बुरूज दिसले.सहज नानाचे लक्ष वेधले मग काय ऊतरलो खाली.तटबंदीच्या शेजारून फोटोग्राफी करत करत ऊंच वाढलेल्या गवतातून मार्ग काढत पुढे जाऊ लागलो.एका ठिकाणी पुढे जाण्याचा मार्ग दिसेना मग ऊजवीकडे बालेकिल्ल्याच्या बाजूला वर चढायला सुरूवात केली.एकदम साहसपूर्ण चढाई करावी लागली घसरण आणि ऊभी चढण तयारी नसताना कशीबशी चढून वर आलो.नानासारख्या अनुभवी सुरक्षित अनेक ट्रेक केलेल्या ट्रेकरने त्याची नेहमीची शिस्त मोडली याला राजगडाचे अफाट पसरलेले समृद्ध अवशेष जबाबदार असावेत!वर थोडे ताक घेतले व ताजेतवाने झालो.

पुढे आणखी डावीकडे मी थोडे जाऊन बघत असताना पुन्हा काही अवशेष दिसले परत डावीकडे सर्वजण घुसलो.आणि ही वाकडी वाट आम्हास गडाच्या दक्षिणेकडील "काळेश्वरी बुरूजा"कडे घेऊन गेली. तिथे पडझड झालेल्या मंदीरात अतिशय लक्षवेधक काळ्या पाषाणातील मूर्ती बघून मी जागेवर स्तब्ध झालो.पुरातत्वदृष्ट्या करोडो रूपये मूल्य होईल अशी मूर्ती ईतक्या बेफीकीरीने जतन करत असलेल्या पुरातत्व विभागाचे खास अभिनंदन करावे. मध्यंतरी काही जाणकरांनी दिलेल्या माहीतीनुसार हा परिसर राजगडाच्या स्मशानभूमीचा आहे आणि ती मूर्ती तांत्रिक महत्वाची आहे अशी माहीती मिळाली.( खरे काय मला माहीती नाही)पण एक नक्की येथपर्यंत वाट चुकवून येणारे अगदी मोजकेच असावेत. पण एक मात्र खरे की ती जागा मला जरा वेगळी आणि गुढ वाटली.अशा कोपरयातल्या परिसराला भेट देऊन परत फिरलो.

आता बालेकिल्ला वाट पाहत होता.राजगडावर पूर्वी पावसाळ्यात दोन वेळा बालेकिल्ल्याच्या पाणी वाहत असलेल्या कातळावर चढताना कठीण वाटत असणारी वाट ऊन्हाळ्यात बरीच सुसह्य वाटली.रिलिंगही व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केलाय पण पूर्वी शिकल्याप्रमाणे कोठल्याही आधारावर पूर्णपणे विसंबून राहू नये हे नमूद करावसे वाटते.बालेकिल्ल्याचे अतिभव्य सुस्थित असणारया प्रवेशद्वाराचे मुख पूर्वेस आहे.येथेही वास्तूशास्राचा नियम पाळलाय.

आत प्रवेश करून मोठ्या टाक्याशेजारील बाजारपेठेचा परिसर मंदीर न्याहाळले व वर सदर व राजवाड्याच्या उद्वस्थ अवशेषांकडे पाहून आजही शिवछत्रपतींच्या नावाने राजकीय पोळी भाजून घेणारया पण त्या राजांच्या वैभवशाली ईतिहासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारया राज्यकर्त्यांविषयी मनात तिरस्काराची भावना वाढली. गडकोटांचे हे वैभव काही शिवप्रेमी मावळ्यांच्या वैयक्तिक पातळीवरच्या प्रयत्नांवर कसे जतन होणार? येथे खूप दिवसापासून मनात असलेली एक भावना व्यक्त करावीशी वाटते.तमाम गडसंवर्धन करणारया संस्थांची एक शिखर संघटना असावी व त्यांनी एकत्रीतरित्या वर्षाला एक गडच संवर्धनासाठी निवडावा म्हणजे दृष्य स्वरूपात याचा परिणाम दिसू शकेल व एक मॉडेल तयार झाले तर त्यानुसार मदतीचा ओघ वाढेल व ही विदारक स्थिती बदलू शकेल.असो.

बालेकिल्ल्यावरून नानाच्या फ्रेममध्ये संजीवनी, सुवेळा पद्मावती व ईतर परिसर बंदिस्त होत असताना मीही त्याच्या सोबत फ्रेम मनातल्या मनात विचार करून त्याच्या angle ने जाणण्याचा प्रयत्न करत होतो.बरोबर राहून कळत नकळत माझ्या फोटोग्राफीच्या छंदाला या अनुभवाचा फायदा नक्की होईल.

बराच वेळ झाला आता 3 वाजत आले होते खाली पद्मावतीवर पोहचून आराम करावा असे नियोजन होते.खाली आलो जेवण केले आणि मंदीराबाहेर साक्षात आप्पा परब बसलेले.त्यांचा अवतार बघून कोणीही दुर्लक्ष करेल.पण त्यांचे बोलणे ऐकले आणि कधी त्यांच्यासमोर ऊभा राहीलो ते समजलेच नाही.

त्यांच्या गप्पा ऎकताना त्यांच्या ञषीतुल्य व्यक्तीमत्वाची घडी ऊलगडत होती.आजकालच्या भौतिक जगापासून दूर पण महाराजांनी या तारखेला 4 शतकापूर्वी काय केले याची परिपूर्ण माहीती ठेवणारा 'चालताबोलता संगणक'!
आप्पांनी मी विचारलेल्या दोन तीन प्रश्नांना ऊत्तरे देताना राजगडाविषयी एवढी माहीती कमीत कमी शब्दात दिली की मी वर्षभर गडावर फिरून पण मिळाली नसती.त्यात सुवेळा माचीवरचे भुयारातील दालन, वेगवेगळी चिन्हे त्यांचे कालखंड अर्थ, महाराजांची सदर म्हणून पाटी असलेली भोरच्या राजाची सदर, सईबाई साहेबांची समाधी म्हणून पाटी लावलेली पद्मावती मंदीरासमोरील निळोपंत डबीरांची समाधी आणि बरेच काही.त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला फार भावली की नुसते फिरू नका अभ्यास करा माहीती घ्या हा गड तुमच्याशी बोलेल! हा अवलिया राजगडी 8 वर्ष मुक्कामी होता.त्यांच्या मुलाखतीनंतर माझे राजगडाविषयी प्रेम अजून वाढले.

आप्पांना विचारले तुमची पुस्तके कुठे विकत घेता येतील? त्यांनी दिलेले ऊत्तर आजकालच्या व्यवहारी जगाला अंतर्मुख करावे असे होते." माझी पुस्तके प्रकाशक छापत नाहीत आणि दुकानदार विकत नाही, त्यांना त्यात पैसा मिळत नाही कारण त्यांची किंमत जेमतेम छपाई खर्चाएवढी! ज्या लोकांनी हे वैभव ऊभारण्यास आपले रक्त सांडले त्यांच्या जीवावर आपणास पैसे कमावण्याचा काय अधिकार? आप्पा परब ही व्यक्ती माझ्या मनावर एवढ्या कमी वेळात जीवनभर लक्षात राहतील असे संस्कार करून गेली.त्यांचे नानाने आणि आम्ही पदस्पर्श करून आशिर्वाद घेतले!

हाताशी थोडा वेळ होता अजून राजगडावरून निघून तोरण्याकडे जावे अशी कल्पना सोनावणे सरांनी मांडली पण आमच्याबरोबर असलेल्या सर्वांचा विचार करता नाना तयार नव्हता.मलाही आताच निघावे व सूर्यास्तापूर्वी संजीवनीतून खाली ऊतरावे असे वाटत होते.हो नाही करता करता आम्ही सॅक आवरून तयार झालो.नानाही थोड्या नाराजीने तयार झाला.मी यापूर्वी 22 वर्षापूर्वी सत्यजीत भातखंडे व सुनील पाटील यांच्यासोबत पावसाळ्यात हा मार्ग केला होता पण पहिला ट्रेक असल्याने रस्ता लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले नव्हते.आणि त्यामुळे लवकरात लवकर अंधार होण्यापूर्वी खाली ऊतरण्याचा रस्ता शोधण्यासाठी जलद गतीने सरांना घेऊन पुढे निघालो.बाकी लोक सावकाश मागे येत होते.आणि यानंतर कधीही विसरणार नाही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणार होते. का कुणास ठाऊक तशा  अनामिक भितीने मन ग्रासले होते. .......

पूर्वार्ध समाप्त!

2 comments: