Saturday 7 March 2015

राजगड ते तोरणा ट्रेल - ऊत्तरार्ध

सायंकाळ गडावर आपण विचार करतो त्यापेक्षा लवकर पसरते.मी आणि सोनावणे सर झपझप चालत खाली ऊतरत संजीवनीचे टप्पे पार करत होतो, मध्ये पाण्यांच्या टाक्यांचा समुह पार केला.पार टोकापर्यंत गेलो पण वाट सापडेना.अंधार दाटायला सुरूवात झालेली.परत अंदाज घेत घेत वाट शोधण्याचा प्रयत्न चालू होता एका बुरूजावरून खाली गेलो व्याघ्रमुख दरवाजात.पण पुढे फुली मारलेली.परत फिरलो.सोनावणे सरांना वर ईतर मंडळी काय म्हणतात ते विचारायला सांगितले.

मी एकटा परत शेवटच्या बुरूजाकडे निघालो.तेथील निरव शांतता कोणालाही भय वाटावे अशीच होती ,कोणाचीही चाहूल नाही.सर्वत्र ऊंच चिलखती तटबंदी, त्यात आत पडले तर जवळून जाणारया  कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही एवढी झुडूपे माजलेली. रातकिडे व वारा यांचा अंधार गुढ करणारा आवाज,  कोठलेही जंगली श्वापद या बाजूला पाणी प्यायला कधीही येत असेल,मनात वेगवेगळे विचार बाजूला सारत शेवटी पूर्ण अंधारात खूप वेगाने परत फिरलो वर यायला.पण संजीवनी माची किती अवाढव्य आहे याचा पुरेपूर अनुभव येत होता.कसेबसे व्याघ्रमुख दरवाजाच्या बुरूजावरील दरवाजातून थोडे मोकळ्यात ऊंचवट्यावर पोहचलो.छाती 1000 सी सी च्या इंजिनासारखी धडाडत होती.घामाने पूर्ण कपडे ओले झाले होते.नाना ,सोनावणे सर ,किशोर ,प्रशांत कोणीही दिसेना.अजून पुढे गेलो मग जेथे माची चालू होते तेथे गवतात सॅक टाकली थोडे पाणी प्यालो.अंग घामाने डबडबले होते.मोठ्याने हाका मारल्या पण ऊत्तर नाही.15 ते 20 मिनीटे पद्मावतीवर परत जावे का? असा विचार करत अंधारात कुठल्याही टॉर्च शिवाय थांबलो. एवढा भयभीत करणारा एकांत जीवनात फार कमी वेळा अनुभवलाय!

आणि अचानक सोनावणे सर खालून वर आवाज देत आले त्यांचीही परिस्थिती माझ्यासारखीच ,फक्त त्यांचा फोन जो स्मार्ट फोन नव्हता ( स्मार्टनेस बॅटरी चालावी यासाठी वापरण्याची बुद्धी मोबाईल कंपन्याना देव देवो!) चालू होता.मग नानाच्या, किश्याच्या फोनवर कॉल करण्याचा प्रयत्न केला.थोड्या वेळात कोणाचा तरी फोन लागला मग ती मंडळी व्याघ्रमुखापाशी माझ्यासारखीच फुली बघून थांबलीय ते समजले.आता थोडा जीवात जीव आला.

सर आणि मी चर्चा करत खाली ऊतरायला सुरूवात केली.जर रस्ता सापडला नाही तर परत पद्मावतीवर जाऊ हे पक्के करत तेथे पोहचलो.सर्व टेंशनमध्ये आणि याला जबाबदार मी होतो.नानाच्या मनाविरूद्ध मी आणि सरांनी त्याला भरीला पाडले होते.पण त्याने काहीही न बोलता राग व्यक्त केला.रस्ता तोच आहे याची खात्री होत नव्हती आणि त्याला ती फुली कारणीभुत होती.मग शेवटचा ऊपाय म्हणून ओंकार ओकला फोन ट्राय केला त्याने सांगितले की रस्ता तोच आहे ,पण तुम्ही योगेश फाटकांशी ( श्री शिवदुर्ग संवर्धन) बोला. मग नानाने त्यांना फोन करून खात्री केली.मधल्या वेळेत बाकीच्यांची चुळबूळ चालू होती.किशोर थेटे परत जायचे म्हणू लागला.मग नानाने ऊपाय काढला सार्वमत घेतले बहुसंख्येने पुढे जायचे ठरले.नाना पण आता हट्टाला पेटला होता.ट्रॅव्हर्स वरून खाली जंगलात वाट ऊतरत होती.एवढ्या बेमालूम वाटा हेही राजगडाच्या माच्यांचे वैशिष्टच आहे.

मग माचीच्या ऊंचच उंच तटबंदीला वळसा घालणारी वाट लागली पण मनात तोपर्यंत धाकधूक होती रात्रीचे 9 वाजले होते. रात्रीच्या मंद प्रकाशात आमचा जत्था आता तोरण्याचा रस्ता शोधत निघाला होता.पुढे माचीला पूर्ण वळसा घातल्यावर वाट खाली जंगलात ऊतरत होती व खूप सरळ घसारा होता काळजीपूर्वक आम्ही खाली ऊतरू लागलो.आमच्यातला किश्या मेस्तरी वजन 90 कि.व लिगामेंट डॅमेज, त्यामुळेच नाना टाळाटाऴ करत होता रात्री खाली ऊतरायला.

पण आता मी थोडे धीट होऊन हातात काठी घेतली व कुठल्याही प्रकाशाशिवाय अंधारात वाट दाखवायला पुढे झालो.माझ्याबरोबर सोनावणे सर होते व मागे सगळे.मध्ये दाट जंगलात एक खिंड लागली आणि सरळ पुढे जायचे सोडून आम्ही खाली ऊतरायला सुरूवात केली.मळलेली वाट पुढे दगडधोंड्यांची होत गायब झाली.भोवताली दाट जंगल ,मिट्ट काळोख असेच एका ठिकाणी थांबलो.Gps चालू करून वाट शोधण्याचा प्रयत्न केला तर ती वाट खिंडीजवळून ऊत्तरेकडे जाणारी.मग परत खिंडीत आलो.थोडे बसलो ,खाऊ खाल्ला ,पाणी प्यालो.या भानगडीत जवळ जवळ 2 तास गेले.रात्रीचे 11 वाजले होते.जेवणाचा पत्ता नाही.

थोडे ताजेतवाने होऊन पुन्हा काठी ऊचलली व निघालो पुढे, मोठ्याने आवाज करत चुकून एखादे जंगली श्वापद वाटेत असले तर त्याने वाट मोकळी करून द्यावी हा ऊद्देश!कारवीचे जंगल सर्वत्र डोंगरधारेवर पसरलेले.मध्येच थोडे मोकळे पठार परत जंगल असे करत एका मोकळ्या जागी बसलो थोडे पाणी घेतले.परत चालू लागलो आणि अचानक वाट खाली डांबरी रस्त्याला मिळाली.हीच ती भुतोंडे खिंड.

आता खरच सगळे खूप दमलो होतो आजचा दिवस सुवेळा ,काळेश्वरी,बालेकिल्ला करून संजीवनीच्या दोन फेरया नंतर एवढी चाल! मग सर्वानुमते अजून हाल न करता येथे थांबून मग पहाटे निघू असे ठरवले.नाराज मंडळी या सडकेने जवळच्या गावात जाऊ असे म्हणत होती.पण मग जेवण विसरून तेथेच शेकोटी पेटवून झोपावे असा निर्णय झाला शेकोटी पेटवली तेवढ्यात रात्री 2 वाजता एक टेम्पो भूतोंडेकडे निघाला होता त्याकडे चौकशी करता पालीकडे जाताना 2 किमी वर कातकरी वाडी आहे असे समजले मग अजून धोका न पत्करता तेथे पोहचलो.

कोणी आहे का? आवाजाला खूप ऊशीरा 'कोण हाय?' असे प्रश्नवजा ऊत्तर. आवाज एका माऊलीचा.मग विचारले काही खायला मिळेल का? त्या माऊलीने रात्री 3 वाजता पीठल भात तयार केला.खूप झणझणीत पीठल सर्वांनी हानल्.बाहेर अंगणात प्लास्टीक टाकून भयाण गारव्यात पडलो.अतिश्रमाने झोप लागली व पहाटे राजगड दर्शन करत डोळे ऊघडले.

तयारी केली चहा घेतला व परत खिंडीकडे आलो.नाशिकचा भलामोठा ग्रुप तेथे हजर होता.रात्री तेही तिथेच मुक्कामी होते. मग सगळे निघाले ते पुढे ,आम्ही मागे! थोडे चालल्यावर तोरण्याचे बुधला टोक दिसू लागले.

तोरण्याकडे जाणारा मार्ग म्हणजे रांगडा पण सौंदर्यपूर्ण सह्याद्रीच्या डोंगररांगेवरून जाणारा .डावीकडे भुतोंड्याच्या बाजूला शिवतिर्थ रायगडापर्यंत वेगवेगळ्या डोंगररांगा ,घाटवाटांकडे जाणारी खोरी ,मध्येमध्ये छोट्यामोठ्य़ा टुमदार वस्त्या 'विखुरलेल्या!' ऊजवीकडे पसरलेल्या दरया आणि खोरे तेथेही दूरवर खेड्यामधली घर कौलारू! मागे पाली संजीवनी माची राजगडाच्या राजसरूपाची साक्ष देणारी आणि समोर तोरणा प्रचंड पसरलेला! याला प्रचंडगड का म्हणतात ते येथूनच लक्षात येते.

मागे या मार्गाने भरपावसात सर्वत्र धुक्याचा वेढा असताना घोंगावणार्या जोरदार वार्यात वाकून थांबून बचाव करत बुधल्याच्या रॉकपॅचची शिडी नसतानाची अंगावर येणारी कातळचढाई वानरांच्या टोळीपासून केलेला बचाव एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही मन:पटलावर कायमचा कोरला गेलाय!

हळूहळू बुधल्याच्या कातळाला जवळ करत शिडीमार्ग गाठला.वर जाऊन जरा दम घेतला.तेथून ऊजवीकडे वर आणखी चिंचोळ्या कातऴावरून पुढे सरकलो.समोर कारवीच्या जंगलात सरबत घेतले.भुतोंड्याच्या काकांनी तेथून खालून टाक्याचे मधुर पाणी भरून आणले.

तोरणा चांगला लांबलचक पण माथ्यावर अरूंद! चोहीकडे विहंगम! एखाद्या गरूडाच्या नजरेतून दिसावे असे विस्तीर्ण भूभागाचे दृष्य! खर तर सिंहगड, तोरणा, राजगड हे महाराजांच्या सुरूवातीच्या काळातील सर्वात जवळचे शिलेदार!  या तीन किल्ल्यामुळे किती विस्तीर्ण भूभागावर नियंत्रण ठेवता येत असेल. रायगडाकडे कोकणात ऊतरणारया असंख्य घाटवाटा या किल्ल्यांमुळे नजरेच्या टप्प्यात असाव्यात.

मग मेंगाईच्या अलिकडील बुरूज चढून बुधला राजगड यांचे अवलोकन केले साधारण जवळच्या परिसरातील सर्वात ऊंच शिखर म्हणून बुधल्याची गणना होते. पश्चिमेच्या महादरवाजातून मेंगाई देवीच्या मंदीराजवळ पोहचलो.मेंगाई मंदीराच्या खाली दक्षिणेला पिण्याच्या पाण्याचे सुमधुर टाके आहे.पाणी भरून घेतले. थोडी क्षुधा शांती केली.

थोडे पुढे जाऊन मेंगाई देवीच्या मंदीरात पथारया पसरल्या भरपेट काला खाऊन गडफेरी केली.पाण्याची टाकी मंदीरे बुरूज तटबंदी सर्व फेरी मारून मग ऊतरतीला लागलो.

तोरणा ऊतरायला लय त्रास !घसरडी वाट त्यात एवढी पायपीट झालेली.पण एक सर्वांगसुंदर आणि सर्वांनी एकदा तरी अनुभव घ्यावा असा ट्रेलट्रेक दोन वेगळ्या मोसमात करण्याची संधी मला मिळाली याचे समाधान मनात ठेवून खाली वेल्ह्यात  चहा वडा सॅंपल यावर ताव मारून चेतनने आणून सोडलेली गाडी घेतली व पाबे खिंडीतून राजगड तोरण्याला सायंप्रकाशात निरोप देऊन खानापूरमार्गे पुण्यात परतलो.

भेटूया लवकरच कुठल्या तरी गडावर!

ट्रेक मेटस:  संजय अमृतकर ( नाना); सोनावणे सर, किशोर थेटे, किश्या मेस्त्री, प्रशांत पवार, चेतन पाटकर, तुषार कोठावदे आणि निलेश वाणी.

दिवस:  2 दिवस.मुक्काम राजगड.

कठीणता: मध्यम.पण माहीती असावी.

छायाचित्र: संजय अमृतकर, किश्या मेस्त्री.

No comments:

Post a Comment