Wednesday 6 July 2016

सह्याद्री ते हिमालय - एक प्रवास!

   



    सह्याद्रीत भटकंती पूर्ण रूजू लागली की बहुसंख्य भटक्यांना हिमालयातील भटकंतीची ओढ लागायला सुरूवात होते.कुठल्यातरी वेड्या मित्राच्या नादाला लागून चालू झालेला हा प्रवास मोठा विस्मयकारी आहे.

          कॉलेजात प्रवेश होऊन स्थिरावू लागत असताना काही मित्रांच्या संवादात सिंहगड, लोहगड,तिकोना, राजगड ,तोरणा अशी नावे ऐकून ईतिहासाच्या पुस्तकातील तोकड्या माहितीच्या पलिकडे काही अद्ण्यात आहे याची ऊत्सुकता चाळवणारी जाणीव व्हायला सुरूवात होते.खर तर तोपर्यंत राजगड आणि रायगड यातला फरकही बहुतेक माहीती नसतो.मग ऊत्साहाने कॅनव्हासचे शूज खरेदी करून एखाद्या सुट्टीच्या दिवशी आसपासच्या एखाद्या " किल्ल्याचा" पिकनीकवजा ट्रेक आयोजीत होतो.हा ट्रेक पावसाळ्यात असला तर मग सह्याद्रीचे रूप पाहून प्रथमदर्शनी प्रेमात पडण्याची शक्यता जास्त! नाहीतर मित्राला पायपीट करताना शिव्यांची लाखोली वाहत 50% जणांचा हा प्रवास ईथेच संपतो.

जे यातून पुढे जातात ते थोडे वेडे असल्याची खात्री दोन तीन ट्रेक झाल्यावर कॉलेजच्या मित्रांची होते.मग हळूहळू ऐकणारयांच्या भूमिकेतून सांगणारयांच्या भूमिकेत जाणे सुरू होते.सुट्टीच्या दिवशी भूषी डॅमची पिकनीक सोडून तोरण्याला छातीचा भाता फुलवणारया मित्राला पार कामातून गेला, सरळ रस्ता सोडून काय डोंगर चढतो असे कौतुक मित्रमंडळीकडून सुरू होते.बरयाच जणांच्या पालकांना थोडी हौस फिटली की पोरग येईल जागेवर अशी खात्रीच असते.

पण या सह्याद्रीचे अफाट रूप कुठेतरी धुक्यात वेढलेल्या पद्मावतीवर मुक्कामी असताना किंवा भर पावसात बुधला चढताना मोहपाशात खेचते आणि मग एका गिर्यारोहकाचा जन्म होतो.
मग कॉलेजचे वेळापत्रक सांभाळत, घरच्यांना कळत नकळत ट्रेकची संख्या वाढायला लागते.मग हळूहळू हरिश्चंद्रगड, रायरेश्वर असे थोडे लांबचे ट्रेक तसेच राजमाची, भिमाशंकर असे ट्रेल खूप प्रयत्नाने पूर्णत्वास नेले जातात.हऴूहळू मित्रांची लिस्ट बदलते म्हणजे वेडे मित्र वाढू लागतात आणि शहाणे मित्र चांगला होता पार कामातून गेला या भावनेन् सहानुभूतीपूर्वक कमी होतात.

कॅनव्हास शूजची जागा आता अॅक्शन ट्रेकींग घेऊ लागते.आता अनुभवाबरोबर हऴूहळू ईतिहासाच आणि भूगोलाचा मेळ लागू लागतो.स्वारगेटच्या एस टीची वेळापत्रके माहीती होऊ लागतात.अशातच गोनीदा, आनंद पाळंदे, बाबासाहेब पुरंदरे, आप्पा परब अशा दिग्गजांचे दुर्गसाहीत्य वाचनात येऊ लागते.गोनीदांची एखादी वाघरू वाचून राजगड परत बघावा अस वाटायला सुरूवात होते आणि आप्पा परबांच्या भेटीनंतर वर्ष दोन वर्षात पण राजगड समजणार नाही याची जाणीव होते.निनाद बेडेकरांचे एखादे व्याख्यान ऐकण्यात आले की महाराजांबद्दल आपणाला काहीच माहीती नाही असे वाटायला सुरूवात होते.

        आता गिर्यारोहक म्हणून तरूण होण्यास सुरूवात झालेली असते.मग वासोटा, पन्हाळगड, विशाळगड, भैरवगड, अलंग, मदन साल्हेर मुल्हेर असे गड असोत की कळसूबाईसारख शिखर असो वा रायलिंग मोहरीचे पठार असो आवाका वाढलेेला असतो.अशात मग दिग्गज भटक्यांची कुठेकुठे गडमाथ्यांवर कडे कपारीत भेट होत राहते आणि माहीतीचा मोठा खजिना ऊलगडत जातो.यातच मग कोणीतरी विचारते अरे तुझा लिंगाणा झाला का? भोरगिरी भिमाशंकर मस्त आहे.ढाकला शिडीवरून चढायला लागते, नळीच्या वाटेन हरिश्चंद्र चढला का? मग असे प्रश्न डोक्यात घुसले की एक महत्वाची जाणीव होते अरे आपली तर अजून सुरूवातच आहे.

   मग एखादा अवलिया म्हणतो अरे परवा मी आग्या नाळीतून तोरणा रायगड केला.आहुपे घाटातून गोरखगड भारी दिसतो .साल्हेरहून सालोटा आणि मदनवरून अलंगचे फोटो बघण्यात येतात.कळसूबाईवरून दुर्गरत्नांची रांग बघून मन अस्वस्थ होते आणि अलंग मदनचा पॅच काळजाचा ठोका चुकवतो.

हळूहळू मग या वाटा गिर्यारोहकाचे एका जबाबदार गिर्यारोहकात रूपांतर करायला सुरूवात करतात.मित्रांचे चेष्टेचे सूर बदलून कौतुक नजरेत भरायला सुरूवात होते.घरचे लोक कंटाळून जाऊ दे येतो ना परत अशा भूमिकेला पोहचतात.

आणि हळूच मग मनात दडलेल् हिमालयाचे स्वप्न सत्यात ऊतरवण्याची ईच्छा जोर धरू लागते.पण आता प्रापंचिक जबाबदारया, नोकरी धंदा आणि आर्थिक जुळवाजुळव आणि वेळेचे नियोजन असे सर्व अवघड गणित समोर ऊभे राहते.पण तरीही गिर्यारोहकाचे गुण अंगी रूजल्याने कठीणातल्या कठीण अडचणींचा सामना करत हिमालयाचे प्लॅनिंग आकार घेऊ लागते.त्यात गाईड शोधणे, प्रवासाचे नियोजन, आरक्षण, योग्य सिझन ठरवणे असे टप्प्याटप्याने पार पडायला लागते आणि मग एक दिवस सह्याद्रीचा गिर्यारोहक हिमालयातील स्वप्नांच्या प्रवासाला सुरूवात करतो.........

धन्यवाद!






8 comments:

  1. वा रे वा...लई भारी ..सुट आता सुसाट ...

    ReplyDelete
  2. छान लिहीले आहे तुषार दादा

    ReplyDelete
  3. धन्यवाद सुनील, गुरूवर्य नाना, किरणभाऊ !

    ReplyDelete
  4. घर घर की कहाणी....☺️😊 मस्तच! प्रत्येक भटक्यांची कथा मांडली आहे.

    ReplyDelete
  5. खुळा नाद भावा तुझा

    ReplyDelete