Monday 6 February 2017

सावळघाट - गाढवलोट - घाटवाटेची रोमांचक भटकंती



"I felt my lungs inflate with the onrush of scenery—air, mountains, trees, people.
 I thought, 'This is what it is to be happy.'"—Sylvia Plath.

२०१६ च्या वर्षाची सांगता महिपत, सुमार, रसाळगडाच्या भन्नाट भटकंतीसोबतच मुंबैकर सह्यमित्रांच्या संगतीतल्या ४ दिवसाच्या  सह्याद्रीमधील अवघड व अनवट भटकंतीसह केल्याने मन प्रसन्न होते.पण त्यासोबतच नवीन वर्षातील भटकंतीची स्वप्न कुठल्याही भटक्याला स्वस्थ कशी बसू देतील? यावेळी आपल्या जवळील ताम्हीणी परिसरातील राहून गेलेल्या दोन घाटवाटा करण्याचे निश्चित केले.सावळघाट ऊतरायचा आणि गाढवलोट चढून अंधारबनातून गाडी पार्क केलेली परातेवाडी गाठायची.सोबतीला आमचे फिटनेसचे आदर्श मिलींद कुलकर्णी ऊर्फ दादू आणि एन डी गवारे दादा, दोघेही मुंबै मँरेथाँन नुकतेच पळून आलेले आणि प्रशांत व नवीन गवसलेला दमाचा भिडू शलभ पारिक!

२१ जानेवारी शनिवारी सकाळी दादूंच्या प्रशस्त चारचाकीतून १०.३० वाजता पाषाणहून मुळशी धरणाच्या सोबतीने ताम्हीनी प्रस्थान केले. निवे कडून लोणावळ्याकडे जाणार्या रस्त्यावर, साधारण २ कि मी अंतरावर डावीकडे परातेवाडी आहे. गाडी गावात एका घरासमोर सुरक्षित पार्क केली. सर्व गोष्टी तपासून सँक पाठीवर टाकल्या.घड्याळात १२.३० झालेले.सूर्य नारायण माथ्यावर तळपत होता.



गावातून ऊत्तरेच्या माळावरून खाली डोकावणार्या भिरा धरणाच्या कडे ऊतरायला सुरूवात केली.
सोनेरी साज ल्यालेले माळरान,ऊजवीकडे सिनेर खिंडीपासून नागशेत पठारापर्यंत जांभळ्या डोंगराच्या साक्षीने ऊभे असलेले घनगर्द वन,खाली कुंडलिका नदीचे खोरे पार भिरेपलिकडे पसरलेले




आणि डावीकडे ताम्हीणी परिसरातील प्लस दरी , त्यामागील ऊठावलेले पर्वत असा नयनरम्य पसारा!



अवचित सावलीत रवंथ करणारी दुभती जनावर बाकी आम्ही पाच वेडे सोडलो तर शांतता!१० मिनीटात ढलप्या डोंगराच्या अलिकडे कड्यापाशी पोहचलो.वाट इथूनच खाली ऊतरणारी असा अभ्यास केलेला.



तेवढ्यात दादू म्हटले अरे ह्या वाटेला सावळघाट म्हणतात होय? मी ३ वेळा वरून ऊतरून परत आलोय आणि ह्याला मी ऊलटा ट्रेक म्हणतो.दादू म्हणजे वेगळे प्रकरण.फास्ट आणि फ्युरीयस ट्रेक म्हणजे त्यांचा आवडता छंद ! ऊदा. के २ एस २.३० ते ३ तासात करायचा, ४ वाजता निघून राजगडचा सनसेट बघायचा व ८ वाजता घरी!!!असो.आम्हाला गाईड मिळाला.



कड्यातून खाली खोदीव पायर्या बघितल्या आणि पूर्वापार चालत आलेल्या वाटेची ओळख पटली.



पुढे पाण्याचे टाकेही!



खरतर आता घरोघरी आलेल्या वाहनांनी लोकांचे जीवन सुसह्य केलेय पण अशा निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या वाटा कालबाह्य होण्याच्या मार्गावर! पण आम्ही सह्यप्रेमी भटके आमच्या परिने ह्यांचे अस्तित्व पुढच्या पिढीने नोंद घ्यावी एवढे तरी असावे या प्रयत्नातून सोशल मिडिया च्या माध्यमातून जपायचा प्रयत्न नक्की करणार!

टाक्यापासून खाली ९० अंशात आणखी खोदीव पावट्या समोरच्या झुडपांनी भरलेल्या घसार्यावर घेऊन गेल्या.



घसारा पार करताच ऊजवीकडे वाट झुडूपातून नाळीतून खाली ऊतरते.



गच्च जंगल दगड गोटे हळूवार पार करत असताना पुन्हा एक थंडगार पाण्याने भरलेले अप्रतिम खोदीव टाके अगदी ऊजव्या कड्याच्या पोटात!



थोडी विश्रांती घेण्यास थांबलो .एव्हाना १.३० तासाची पायपीट झालेली.पांथस्ताला अस सुख देणारे अवचित थांबे हे बहुसंख्य पुरातन घाटवाटांचे वैशिष्ट्य!



आता आरामात छायाचित्र घेत खाली ऊतरत शेवटच्या टप्प्यात पोहचलो.



एक मस्त १५ फूटांचा कोरडा धबधबा ऊतरत १० मिनीटात कुंडलिकेचे पात्र गाठले.




निर्मळ पाण्याने भरलेला डोह बघून पथार्या पसरल्या. ताजेतवाने होऊन घरून आणलेला शिदा सोडून भोजन ऊरकले.वाहत्या निर्झरात पाणी पिऊन खडकावर सर्व वामकुक्षीसाठी पहुडले.



साधारण २.३० तासात परातेवाडीपासून आम्ही सावळघाट ऊतरलो होतो.



आता याच पात्रामधून भिरेपर्यँत जाऊन मुक्काम करावा असे नियोजन होते.३० मिनीटाच्या विश्रांतीनंतर पुढील मार्गास लागलो.



दोन्ही बाजूस घनगर्द वनराजी आणि मध्ये कुंडलिकेचे पात्र.अधून मधून मागे वळून बघता सिनेर खिंड व त्याआधील सुळके विहंगम दर्शन देत होते.






आता जाताना देवकुंड करावे असे ठरविले होते परंतु वाटेत भिरा धरणाच्या अलिकडे धनगराचा वाडा लागतो तेथील पोरास विचारले असता मागूनच जायला लागते असे समजले.





 आणि एव्हाना ऊन कलायला लागले होते साधारण ५ वाजले होते.त्यामुळे देवकुंडला आता नंतर येऊ असे ठरले. पुढे 10 मि.त भिरा धरणाच्या फुगवट्यावर पोहचलो .



भिर्यात मुक्कामी जायचे म्हणून समोरचे लेंड सुळका व त्यामागील डोकावणार्या ताम्हीणी घाटाच्या पर्वतांचे पाण्यातील प्रतिबिंब न्याहाळत पाण्याकाठी विसावा घेतला.




१० मिनीट झाले असतील तेवढ्यात एक धनगर येताना दिसला.त्याला अजून किती चाल आहे याची चाचपणी केली.दादा भिर्यात जायला किती वेळ लागेल? १ तास त्याचे ऊत्तर! आणि वर हिरडीला जायला? १.३० तास! सहकार्यांशी चर्चा झाली आणि निर्णय झाला वर गाढवलोट चढून हिरडी गाठायची.वाट विचारली आणि लगबगीने निघालो.सर्व भिडू तयारीचे असल्याने असा अचानक प्लँन बदलायची हिम्मत केली.आता अंधारापूर्वी वर जाऊन गाव गाठणे क्रमप्राप्त होते.



पहिला टप्पा १५ मिनीटांचा डोंगरधारेच्या धनगरांच्या वाड्यापर्यँतचा! तेथून एक वाट ऊजवीकडे ओढ्यात ऊतरली.ओढ्यातून ऊजवीकडे वर डोंघरधारेकडे चढायचे. एक छोटी चढाई मग परत डावीकडे वर! साधारण तीन छोटे टप्पे चढलो.अंधार दाटू लागला आणि प्रशांतला थोडा त्रास व्हायला लागला मग शलभने त्याला टँग बनवून दिले.त्याच्या कँमेराची बँग मी घेतली.



 दादू आणि एन डी दादा पुढे झाले.आम्ही तिघ थोड सावकाश चढाई करत वरच्या टप्प्यात पोहचेपर्यँत पूर्ण अंधार दाटला.वर थोडी वाट चुकलो पण लगेच लक्षात आले आणि मूळ वाट सापडली.समोर दादू वाट पाहत होते.
मग सर्वांनी आपल्या टाँर्च चालू केल्या.समोर पठाराच्या दिशेने चालायला सुरूवात केली पण गावाची चाहूल लागेना.फक्त अंधारबनाकडची वाट म्हणून काही मार्कींग होती त्या अंदाजाने चालू लागलो.पण गाव काही दिसेना.आता चलबिचल चालू झाली.एका टेकाडावर अंदाज घ्यायला थांबलो तर मागे लाईट चमकले.पण ती दिशा तर दक्षिणेकडची.काय करावे? आज बहुतेक ऊघड्यावर झोपावे लागणार त्यात मग पाऊच मधील लाईटर कापूर अस शेकोटी पेटवायचे साधन असल्याने फार मोठी चिंता नव्हती.ऊद्यासाठीच्या दशम्या, केक असे खाण्याचेही होते. काही नियम कटाक्षाने  पाळायची सवय आता ऊपयोगी पडणार होती.पाणीही होते.
मग प्रशांत म्हटला की आपण पुढे जाऊ ! सर्व तयार झाले . गाव नाही सापडले तर अंधारबनाच्या अलिकडे मिलीयन स्टार रिसाँर्ट मध्ये मुक्काम!! पण धीर धरला तर आपले ध्येय साध्य करता येते. आणि काही मिनीटात आम्ही एका गुगल मँपच्या बाहेरच्या आणि आपले अस्तित्वच धोक्यात असलेल्या गावाच्या वेशीत प्रवेश केला.या गावात फक्त पाच वयस्कर माणस!!

त्यात एकाचा नातू घरी आलेला.मग सँक टाकून जेवण देण्याची विनंती केली मग ७० वर्षाच्या आजी केवळ ही पोर ऊपाशी राहतील म्हणून झुणका भात द्यायला तयार झाल्या.जेवण तयार होईपर्यँत फ्रेश झालो.गावचे अगत्यशील सरपंच मेंगडे यांनी गप्पांचा फड रंगवला लाईट लावला,आजींना स्वयंपाकाला मदतही केली त्यांनी.घड्याळात ८.३० वाजलेले.मग चविष्ट झुणका भात चोपला.वा! काय चव होती!

सरपंचानी मुलांच्या अभावी बंद झालेली शाळा ऊघडून मुक्कामाची सोय केली.क्षणभर  शाळा बघून वाईट वाटले.भिंतींवर महापुरूषांच्या फ्रेमस् मोडकळीला आलेल्या, पण भिंतींवर स्वच्छ अक्षरात विविध स्पेलींग, सुविचार! पण कधीकाळी मुलांच्या किलबिलाटाने नांदती शाळा आता केवळ एक ईमारत!असो.



पथार्या पसरून निद्रा देवीच्या अधीन झालो.

सकाळी उठून आवरले आजींच्या हातचा चहा पिऊन अंधारबनाची वाट जवळ केली.


L to R - Shalabh, Prashant, Namdeo dada, Milind Dada

गावाच्या वेशीवरचे महादेवाचे मंदीर व गायमुख बघितले.मंदीराच्या प्रवेशद्वारावर शिलालेख आहे.



आजोबा आम्हाला वाट दाखवायला पुढपर्यँत आले.

नागशेत पठारावरून तेलबैला, केवणीचे पठार, घनगड, जांभळ्या डोंगर असा विस्तीर्ण नजारा!




डिसेंबर २०१५ मध्ये सह्यांकनला पिंपरी ते एकोले आणि पुढे केवणीचे पठार घोणदांड केली असल्याने पुढची अंधारबनाची वाट ओळखीची होती. अंधारबनात विनीत दाते , जाधव काकांबरोबर  ऊष:प्रभा पागेंची भेट झाली. आठवण म्हणून एक छान फोटो घेतला.



ओढ्यापाशी विसावून न्याहारी ऊरकली मग थेट चालत परातेवाडीच गाठली.घड्याळात १२.३० झालेले.बरोबर २४ तासात एक नितांतसुंदर आणि रोमांचक भटकंती पूर्ण झाली होती.परातेवाडी ते परातेवाडी!



सह्याद्री जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहीजे.






चला मित्रांनो भेटूया परत एखाद्या नवीन भटकंतीसह! 
धन्यवाद!

12 comments:

  1. Khup Chan lihilay blog. Wonderful trek and very informative and interesting blog.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Dineshji! yes information is given with a view to make it useful on the route!

      Delete
  2. छानच! सुंदर शब्दांकन.

    ReplyDelete
  3. Shrikant Oak, Indore MP6 February 2017 at 20:31

    Very romantic description. Legs started itching for the trek with the young brigade. How many kms approx each day?

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Shrikantji! Its comparatively less walk approx 15 km on first day & 10 km on second day with hike!

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  4. Masta zalay blog Dada! Well done and keep it up! Keep writing!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Prashant! Together we will keep doing a lot of next level trekking in future as well!

      Delete
  5. mast ahe blog tum cha amcha group cha night trek asto kundalika dari t ani mg sawalghat var chadhun paratewade t jato amhe

    ReplyDelete
  6. mast ahe blog tum cha amcha group cha night trek asto kundalika dari t ani mg sawalghat var chadhun paratewade t jato amhe

    ReplyDelete