Wednesday 1 April 2020

"नांगरदरा : मोरोशीच्या भैरवाचे तिसरे नेत्र" - भाग २

         

पर्वत चढाई साठी जितके कठीण तितकेच त्यांचे अनुभव कठीण नारळाच्या आतील मऊशार गाभ्यासारखे!
 
सुरुवातीला दिलीपसर आणि संजय एकामागे एक चढाई करत वरच्या बाजूला दोर बांधायची जागा शोधत निघाले पण बराच वेळ त्यांचा आवाज येईना.आता अंधार पण दाटलेला.खरतर आहे ती जागा मुक्काम करायला योग्य होती पण वरच्या बाजूला कुठतरी अजून चांगली जागा मिळते का असा दिलीप सरांचा प्रयत्न असावा.सगळे जण दिवसभराच्या श्रमाने खूप थकलेले आणि अस्वस्थ होते.जेव्हा तुम्ही सलग चालता तेव्हा जेवढे थकणार नाही एवढा दम दोराचे नियोजन करेपर्यंत वाट बघणे, तीही घोड्यासारखी सरळ उभं राहून आणि परत जीव मुठीत घेऊन पुढचा टप्पा गाठणे, जे आधी होतं ते बरं होतं याची जाणीव करुन देणारा याने लागला होता."आगीतून निघून फुफाट्यात" ही म्हण अशाच कुठल्या अनुभवानंतर जन्माला आली असावी.

एकदाचा वरून आवाज आला की दोराला पकडून हळूहळू वर या.आता अंधारात हेडटाँर्च च्या प्रकाशात डावीकडे असणारी दरी जरी दिसत नसली तरी दूरवर लुकाकणारे दिवे आपण कोणत्या उंचीवर आहे याची सतत मनाला भिती दाखवणारी.हातपाय या थोड्या विश्रांती नंतर अजून शिथील झालेले.एक एक जण वर जाताना माझा तणाव अजून वाढायला लागला.पायाखाली घसारा आणि अधूनमधून कातळ आणि जवळजवळ ९० अंशाच्या कोनात वर चढाई! आणि ज्याची भिती होती तेच व्हायला लागले.एका अवघड कातळावर एक जण अडकला.ना खाली ना वर ! कसेबसे एकाने खाली जाऊन त्याला आधार देऊन सोडवल आणि बाजूच्या नाळीत दोघ बसले.मी शेवटी एकटाच खाली!

आता वरून बिले देऊन त्याला खेचून घेणे हेच योग्य होते कारण लोंबकळून त्याच्या हातापायाला क्रँप आलेले आणि या प्रकारात मानसिक  दृष्ट्या तो खचून गेला होता.मग वरुन दिलीपसर स्वतः खाली यायला निघाले पण हा प्रकार बघून मला स्वतः वर असणारा विश्वास डळमळीत झाला.मग मी वर येऊ का? अस विचारून दोर पकडला पण खरोखरच हे अवघड होत.आता मी खाली त्या दोघांपाशी नाळेत जाव अस त्यांना वाटत असावं पण आता जर इथ थांबलो तर कदाचित यांची वर येण्याची मानसिक तयारी होणार नाही हा विचार मनात आला आणि तसच वर निघालो. ठिकठिकाणी नाळीत कड्याला चिकटून जागा मिळेल तस सगळे बसलेले, त्यांना ओलांडून अजून वर जिथे हिरासर आणि परमभैया दोर अँकर करून बसलेले तिथवर पोहचलो.कड्यात कोरलेल्या पायरयांवर कसबस सांभाळून बसलो पण हातपाय हालवायला जागा नाही आहे तसच बसायच नाही तरी समोर आणि डावीकडे असणाऱ्या दरीत एक टप्पा आऊट!

दिलीपसर खाली गेले आणि मग हार्नेस बांधून दोघांना वर खेचले.परमभैया हे दोर खेचायचे काम करत होते तेही त्यांच्या पायाखाली अस्थिर दगडं! थोडा पाय हलवला तर १० फूट खाली बसलेल्या कोणाचा तरी दगड पडून कार्यक्रम व्हायचा! खालच्या बाजूला दोघ पोहचले आणि सर परत वर गेले दोर घेऊन! अर्धा तास काही उत्तर नाही.संजय वर गेला तोही उत्तर देईना.माझ्याही वर विजय बसलेला तो अजून अवघडल्या स्थितीत! माझी पण वाटच लागलेली.थोडी चिडचिड होत होती की अजून कस हे लोक वर बोलवेनात! 

मग अचानक संजयने आवाज दिला आता रात्रीचे ९ वाजलेत सर्वांनी आहे त्याठिकाणी थांबायचे.उरलेली चढाई उद्या उजाडल्यावर!  जागेवर दोराला अँकर करा आणि जेवण करुन घ्या.सगळे शांत! पण विजय आणि मी न खाली न वर! मग विजयनेच विचारले मी वर येऊ का? जागा आहे का? संजय म्हटला बरं ये पण जागा कमी आहे.तो दोराला पकडून गेला.परमभैया आहे तिथेच बाजूला हिरा सर जेमतेम नाळीतील कातळाला टेकून उभे! मला जागा नाही. मग मीही वर गेलो.

खरतर त्यावेळी कड्यात खोबण्या पकडून आणि एका हातात दोर गुंडाळून वर जाणे ही कठीण गोष्ट होती पण पर्याय नव्हता.वर पोहचलो तर एक प्रचंड घसारा साधारण १५ फूटाचा आणि त्यानंतर २ फूट कातळाच्या जागेवर तिघ बसलेले.कसबस आहे ती ताकद वापरत दोर ओढून त्यांच्यापाशी पोहचलो.मग त्यांच्या शेजारी जागा करत बसलो आणि मग मलाही त्यांनी दोराला अँकर केले.आज रात्र इथेच बसून काढायची.समोर १८०० ते २००० फूट दरी वर कडा आणि छोटीशी लेज ज्यात दिलीपसर, संजय, विजय आणि मी आमच्या पाठपिशवी सह! दूरवर खाली माळशेजकडे जाणारा महामार्ग आणि गावातील लुकलुकत असणारे दिवे असा नजारा! काही खाण्याची इच्छा मरून गेलेली.काही संत्री खाल्ली आणि पाणी प्यालो.पाठपिशवी मधून विंड शीटर जे मी नेहमी बाळगतो कसेबसे काढून चढवले.स्लिपींग बँग काढून करणार काय? खाली कातळ पार्श्वभागाला टोचत होता आणि पाय दुमडून एका दगडाच्या होल्डवर रुतवून ठेवले होते.अँकर असल्याने खाली पडणार नव्हतो पण झोप येण्याची शक्यता नव्हती.फारतर ग्लानी येऊन डोळे मिटणार! 


दिलीपसर तर एकदम कड्याच्या बाजूला स्लिपींग बँग काढून चक्क झोपले! खाली गावात कोणाचे तरी लग्न असावे त्याचा डीजे चा आवाज कड्यावर दाणदाण आदळत होता परत एकच टोन! हे सर्व रात्री २ ते २.३० पर्यंत चाललेले.मध्येच थोड पुढं सरकूून सू केली ! आता सकाळ होण्याची वाट बघत मध्येच बसल्या बसल्या डुलकी आणि परत जाग यायची! खाली कातळची टोक टोचत असल्याने कधी डावीकडे जोर द्यायचा कधी उजवीकडे! दिलीप सर मात्र गुडूप! संजय आणि विजयही थोड पाय लांब करून झोपलेले.

जीवनात अनेक अनुभव घेतले पण असा अनुभव आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करुन देणारा ठरला.उजाडताच समोर अफाट प्रदेश दिसायला लागला अगदी आजोबापासून कळसूबाई पर्यंत आणि हरिश्चंद्रपर्यंत! खाली इवलीशी गावे सगळीकडे विखूरलेली.आता येथून आपली सुटका होणार या आनंदात साथीदारांना आवाज दिला."सकाळ झाली रे"चला आवरा! 

परत एकेकाला आम्ही होतो तेथपर्यंत वर घेतले आणि तोपर्यंत मी आहे त्याच जागी! रात्री १० पासून सकाळी ११ पर्यंत! कारण सगळे जसे आले तसे दोर घेऊन दिलीप सर परत वरचा कडा येंगून पुढं! संजय त्यांच्या मागे जरा वरचे नजरेला येईल किंवा त्यांचा आवाज येईल इतका चढला.साधारण २५ फूटाचा कातळ होता पण मागे भयावह दरी आ वासून उभी! चुकीला क्षमा नाही! मग एकंदर लक्षात आले २०० फूट दोर अपूर्ण आहे कारण मध्ये अँकरला जागा नाही. आपण तयारीने गेलो तर कुठली वस्तू उपयोगाला येईल ते सांगता येत नाही. श्रीकांतला आमच्या १० फूटी प्रत्येकी अशा ६/७ स्लींग दिल्या त्याने आपल्या बेसिक माऊंटेनियरींगच्या मध्ये शिकलेल्या "फिशर नाँट"प्रकारच्या गाठी मारून एका मागून एक सर्व दोराला जोडल्या.

मग कुठेतरी सरांनी अँकरला जागा शोधली.दोर जेमतेम कातळाच्या खाली आला.अँकर सेल्फ असेल किंवा साधा बोल्डरही असेल खालून काही कल्पना नाही. म्हणून एक जण वर जायचा तो अगदी ठराविक ठिकाणी पोहचेपर्यंत बाकी थांबून रहायचे असे करत मागे हिरा काका आणि मी राहिलो.मग काका म्हटले तू चल मी तुझ्या मागून येतो.तोपर्यंत काकांच्या प्रोत्साहनाने दोर न पकडता तो कातळ त्यातल्या कोरलेल्या खोबण्या पकडून पण मागे वळून न घेता पार पाडला होता कारण दोरावर वर अजून कोणीतरी असले तर त्याला हिसका बसण्याची शक्यता होती.

वर जाऊन बघतो तर दिलीप सर परत नजरेच्या टप्प्याबाहेर पण दोराच्या मध्येच एका अवघड जागी संजय दिसला.तो एकेकाला पुढे पाठवत होता.मीही हळूहळू त्याच्यापर्यंत पोहचलो आणि वर त्याहून अवघड ७० अंशाची उजवीकडून वळून डावीकडे जाणारी वाट दिसली.पण दोर तर सरळ दरीच्यापासून गेलेला.मग संजय म्हटला भाऊ दोर सोडा आणि उजवीकडून हळू जा! आता बाकी गेले म्हणजे मीही जाणार एवढेच समाधान!पण हे खतरनाक प्रकरण होते.कसेबसे मध्ये एका बोल्डरपाशी पोहचलो. तिथून वर दूरवर दिलीपसर एका मध्यम आकाराच्या बोल्डरला दोर अडकवून तो निघू नये म्हणून त्यावर बसलेले दिसले.मला आहे तिथेच थांबायला लावून मग हिराकाकांना वर घेतले आणि दोर वर खेचून संजय पर्यंत आणला.आता त्या १० मिनिटात मी पुढची वाट कशी चढायची या चिंतेत तर खाली बघायची सोय नाही. पाय जेमतेम रोवलेले.मग इशारा मिळताच वर सरकलो आणि मग शेवटी दोराला पकडतच वर दिलीप सरांच्या मागे जिथे बाकी बसले होते तेथे जाऊन बसलो पण इथेही पाय खाली दगड बघून रोवून बसायला लागले कारण थोडा घसरलो तरी भैरवाच्या पायाशी पण थेट कैलासावर!

मग हिराकाका संजय आले आणि परत वरात उजवीकडे अजून घसारयाचा भाग ओलांडत खिंडी खालच्या नाळीत.पण आता खिंड नजरेच्या टप्प्यात म्हणजे १०० फूट वर होती.हळूहळू सगळे दोर पकडून शेवटच्या ३० फूट चढाईच्या जागी पोहचले आणि मग दोर पकडून चिमणी क्लाईंब करत वर खिंडीत!

तिथून पुढे डावीकडून दौंड्याच्या कड्यातून ट्रँव्हर्स मारत एका अतिसुंदर पाणवठ्यापाशी आणि कोरड्या धबधब्यापाशी थांबून भेळ भत्ता सरबत आणि २ लिटर पाणी असा कार्यक्रम पार पडला.संध्याकाळचे ४ वाजलेले पण आता चिंता नव्हती.आम्ही कसेही करून अंजनावळेपर्यंत पोहचणार याची खात्री होती.दरी आणि जंगलाच्या मधून कोकणाच्या बाजूने नितांतसुंदर वाटचाल करत अंजनावळे पठार गाठले आणि त्याची अंजनावळेकडची एक सोपी वाट उतरत रात्री ८ ला अंजनावळेमधील एका घरात चहापाणी, जेवण उरकले.दरम्यान एक गाडी ठरवली त्याने आम्हाला मोरोशी सोडले.रात्री १२ वाजलेले मग तेथेच आराम करुन सकाळी उठून आपापल्या गावी सगळे रवाना झाले.

जीवनात अनेक ट्रेक केले, अनेक थरारक वाटा केल्या पार मे मध्ये फडताड, माकडनाळ, गायनाळ यासारख्या सुद्धा.पण नांगरदरा उर्फ भिल्लीणीचा पुड ही वाट आमच्या सर्व संयमाची, सहनशीलतेची कसोटी बघणारी होती.शारीरिक, मानसिक क्षमतेचा एक क्रँश कोर्स आम्ही सह्याद्रीच्या विद्यापीठात आज गुणवत्तेसह पूर्ण केला होता.

मित्रांनो खरतर हा अनुभव मी लिहीणार नव्हतो पण आपल्याला सह्याद्रीची शिकवण आहे नितळ आणि स्वच्छ मनाने वाटून टाकण्याची त्यामुळेच हे लिहीतोय.

नांगरदरा किंवा भिल्लीणीचा पूड ही नेहमीची घाटवाट नसून तो एक टेक्नीकल क्लाईंब आहे आणि तोही आपल्याकडे कितीही अनुभवी मार्गदर्शक असतील किंवा साहित्य असेल तरी देवाच्या भरवश्यावर एक एक टप्पा पार करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. कारण अँकरींगला जागा नाही, झाड नाही, कातळ नाही आणि आपली सोबतीण कारवीही नाही असा ६०% भाग आहे.कातळात असणारया पायरया किंवा खोबणी ३/४ ठिकाणी आहेत पण त्या संपूर्ण वाटेच्या ०.०१ टक्का पण नाहीत. 

माझ्या मताने ही वाट करू नये!आणि अगदीच करायचे ठरवले तर सर्व काळजीसह नोव्हेंबरमध्येच करावी कारण तेव्हा गवत असल्याने पाय घसरणार नाहीत. 

दिनांक :
पायथ्याचे गाव :मोरोशी, फांगुळगव्हाण
माथ्यावरचे : अंजनावळे
पाणी: भैरवगड टाक्यानंतर थेट दौंड्या खिंडीत!
श्रेणी : तांत्रिक अवघड
योग्य वेळ : नोव्हेंबर / डिसेंबर
साहित्य : ३०० फूटाचे २ दोर आणि वैयक्तिक सुरक्षा साधने.

टिम : हिरा पंडीत काका आणि दिलीप झुंजारराव सर, मुंबई
संजय अमृतकर नाना, डॉ. भोजराज गायकवाड, परमजीत भैया, श्रीकांत पाटील, नाशिक
मिलिंद कुलकर्णी, संजयभाऊ शेळके, विजय गुर्जर, तुषार पोमण आणि तुषार कोठावदे, पुणे.

छायाचित्रे : डॉ. भोजराज गायकवाड, विजय गुर्जर, श्रीकांत पाटील आणि तुषार कोठावदे.

विशेष धन्यवाद : हिरा पंडित काका, दिलीप झुंजारराव सर आणि गुरुवर्य नाना!

10 comments:

  1. शारीरिक,मानसिक व सांघिक सामर्थ्याचा कस पाहणारा असा नांगरदार घाट,
    तुम्हा सारख्यांच्या सोबतीने केलेले माकडनाळ,गायनाळ व हा नांगरदार घाटवाट हे माझ्या आयुष्यातील अनमोल असे क्षण आहेत🙏

    ReplyDelete
  2. Farach Awagadh baba... mukkamachi jaga aadhichi wali asti tar nidan rest tari neat zali asti...

    Kamal tumha sarvanchi... Stamina, patience, team work..
    Salute

    ReplyDelete
  3. अहाहा, खूपच जबरदस्त असा अनुभव! मानसिक धैर्याची चाचणी घेणारा! काही ठिकाणं तर हृदयाचा ठोका चुकेल अशीच दिसताहेत. खरं तर अशी वर्णने वाचल्यावर वाट करायची खुमखुमी अधिकच उफाळून येते, पण लगेचच तुषारचे 'मत'ही आठवते. खरं तर पंडित सर आणि दिलीप सर या विख्यात दुकलीबरोबर तुम्हां सर्वांची ही भटकंती झाली, हेच मुळी परमभाग्याचं! दुसरा भाग लगोलग आला, अगदी त्याच दिवशी, ही तर खूपच आनंददायक अशीबाब! संपुर्ण गटाचे खूप खूप अभिनंदन! देव करो नि नांगरदार करायला मिळो, ही ईच्छा मात्र सदैव मनी राहणार..

    ReplyDelete
  4. जबरदस्त...शहारे आले वाचताना...

    ReplyDelete
  5. संजय शेळके कडून हा अनुभव थोडा समजला होता मात्र या ब्लॉग मधून पूर्ण नांगर दऱ्याचा थरार चांगलाच समजला.पण ज्यांनी तो प्रत्यक्ष अनुभवला त्या पूर्ण टीमचे कौतुक .. मस्त लिहला आहे आणि फोटो सुद्धा माहितीपूर्ण .. एक भन्नाट climb ... Jabardast

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सागरभाऊ! खरतर माकडनाळ करताना सरांनी वरच्या मुक्काम करण्याच्या जागेपासून हा फेस दाखवून येथे वाटा आहेत त्या दाखवल्या होत्या आणि बरोबर येऊन दाखवण्याचे मान्य केले होते.पण आमच्या नशीबात ते नव्हते.पण नांगरदरा कधीही खतरनाकच वाट आहे हे नक्की! भेटू लवकर सह्याद्रीत!👍👍

      Delete
  6. 👌👏.अपरिचित मार्ग.मी भैरवगड केला आहे पण समोर हा मार्र्ग आहे हे गेल्यावर्षी वाचनतुन कळलं.असो पण ‌नांगरदार घाट हा मुरबाड मधील दिवाणपाडयावरून वर घाटमाथ्यावरील दरेवाडीला जोडणारा होता असं रमेश खरमाळे यांच्या पोष्टवरून वाचनात आलं आहे.पण कडा कोसळल्याने तो पुर्णपणे बंद झाला आहे.त्यामुळे हा नांगरदार नाही कारण हा घाटमार्ग नाही आहे.

    ReplyDelete
  7. चित्तथरारक.... 🙏

    ReplyDelete