Thursday 21 July 2016

सागरगड ऊर्फ खेडदुर्ग -मागोवा एक अज्ञाताचा!




                 मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना अलिबागचे नाव घेताच नजरेसमोर येतो तो फेसाळता समुद्रकिनारा, अलिबाग, किहीम, काशीद सारखे सागरकिनारे आणि अलिबाग जवळील कुलाबा, खांदेरी ,ऊंदेरी असे सागरी किल्ले ! माझीही स्थिती वेगळी नाही त्यामुळे या रविवारी सागरगड ट्रेक ठरला तेव्हा मनात विचार आला की अलिबागला लागून छोट्याश्या टेकडीवरील साधारण भटकंती असावी.पण सह्याद्रीत फिरताना येथे विखुरलेल्या कुठल्याही गडाला साधारण म्हणून समजण्याची चूक करायची नाही हा धडा मला आधीच मिळालाय त्यामुळे फारशा किंवा अजिबात ऐकिवात नसलेल्या सागरगडाकडे रविवारी पहाटे 5.45 ला निघालो तेव्हा नक्कीच काहीतरी वेगळे बघायला मिळेल या आशेने निघालो आणि या मंथनातून एक रत्न गवसले.



                एक्सप्रेस मार्गाने लोणावळ्यापर्यंत. नंतर खोपोली एक्झीट वरून बाहेर पडून पेणवरून वडखळनाका ( ऊंटाच्या पाठीवरच्या सफरीचा आनंद) आणि अलिबागच्या 4 कि मी आधी सागरगडाच्या पायथ्याच्या खंडाळा गावी पोहचलो.आत विचारून गाडी डांबरी सडकेच्या शेवटी कडेला लावली.जाताना पावसात भिजण्याच्या पूर्ण तयारीने गेलो म्हणजे बदलायला कपडे आणि टॉवेल घेऊन.गाडीतून खाली ऊतरून जोडीदार त्यांची तयारी करेपर्यंत आजूबाजूचा परिसर न्याहाळला आणि दूरवर एक मोठा धबधबा कोसळताना बघून ऊत्साह वाढला.पावसान आल्या आल्या स्वागत केल पाठीवर सॅक टाकली आणि कच्च्या रस्त्यान मस्त सफर चालू झाली.



               कोकणातला ट्रेक म्हणजे पाण्यान भरलेली भात खाचर आणि त्यात भात लावणीसाठी चाललेली शेतकरयांची लगबग ही बघून लहानपणातील अनुभवलेली ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथील आठवण जिवंत झाली.कोकणी माणस तशी निवांत म्हणजे जगात कितीही ऊलथापालथ झाली तरी घराच्या ओसरीत अथवा मंदीराच्या समोरील पारावर गप्पा मारत त्यांच्या मस्तीत जगणारी! कसलीच घाई नाही ( अर्थात काऴानुरूप अपवाद आहेत). धावपळ फक्त भातशेतीची पावसाची वेळ, होळी ( शिमगा) आणि गणपती!
  



               थोड पुढ गेल्यावर डावीकडचा रस्ता सोडून धबधब्याच्या दिशेने एक ओढा ओलांडून सिद्धेश्वर मंदीराची जंगलात घुसणारी पायवाट पकडली.पाणी चिखल चुकवत कुठे तरी अवचित पाय बुडवत दगडी पायरयापाशी पोहचलो.येथून शेवाळलेल्या पायरयांसोबत डोंगरधार चढायला सुरूवात केली.
धबधबा ऊजव्या हाताला मनोहारी दर्शन देत होता.अर्ध्या चढानंतर धबधब्याकडे जाणारी अरूंद वाट लागते.तिथे धबधब्याच्या मागच्या गुहा पण स्पष्ट दिसतात पण गडावर जायचे असल्याने तिकडे जाण्याचा मोह आवरला!






रविवारच्या पिकनीकसाठी आलेल्या तुरळक लोकांची धबधब्याखाली मौज चालली होती.पण  लोक बिनधास्त थेट धबधब्याखाली आणि कड्याच्या टोकावर बघितले तर काही मद्यप्राशन करत होते.कितीही जीव गेले तरी जोपर्यंत स्वत: पर्यंत काही येत नाही तोपर्यंतची ही बेफिकीर वृत्ती मनाला अस्वस्थ करून गेली.




पुढे डोंगरधार संपल्यावर धबधबा कोसळतो त्या ऊगमापाशी सिद्धेश्वराचे मंदीर व मठ आहे तिथे थोडा फराळ करायला थांबलो.छान विहीरीचे ताजे पाणी हापसून हात आणि तोंडावर मारले.कोकणात पावसात पण घामच निघतो राव! वानरसेनेच्या ऊपस्थितीने सावधानता म्हणून मंदीराचे दोर लावून बंद केलेले दार ऊघडून प्रशस्त मंडपात न्याहारी ऊरकली.




पुन्हा दहा मिनीटात बिर्हाड पाठीवर टाकून सागरगडाकडे मार्गस्थ झालो.
पठारावरची सामान्य चाल करून अर्ध्या तासात सागरगडमाची गाठली.पंधरा वीस घरांची वस्ती!
माची ओलांडून छोटी टेकडी ओलांडली की आपण सागरगडाच्या घेरयात पोहचतो.तिथे एक वनदेवतांचे ठाणे ऊनपाऊस झेलत वसलेले आहे.



पुढे थोडा चढ चढलो आणि धुक्याच्या दुलईने पुर्ण हिरवा आसमंत वेढला गेला.एक अनामिकतेकडे, गूढरम्य प्रवास करतोय अस वाटायला लागाव अस वातावरण! 



मध्येच अलिबागचा एक ट्रेक ग्रुप भेटला.त्यांना सह्यांकन 2016 चा आमच्या तरूण मित्राच्या वडिलांची श्री.नंदकिशोर वडेर यांची ओळख सांगितली.काही जुजबी बोलण झाल्यावर त्यांचा निरोप घेऊन पुढे गेलो तर धुक्यात बुरूज आणि तटबंदी दिसली.मला वाटले की ईथे गड संपतोय.मग तटबंदीच्या कडेने वर जाऊन पलिकडे काय दिसते याचा प्रयत्न म्हणून तटबंदीच्या शेजारील ओढ्यातून डावीकडे सरकलो बघतो तर एका ठिकाणी तळ्यासारख पाणी साठलेल आणि झुडप माजलेली! नीट निरखून बघितल्यावर एक खिडकीवजा कमानी झरोका दिसला पण वर जायचे कसे.थोडा शोध घेतला असता त्याशेजारीच पडक्या तटबंदीत वर जायची पायवाट असल्यासारख जाणवल.






मग वर चढलो तर समोर झाडीबाहेर बरयापैकी मोकळे पठार! थोडी तटबंदी बांधकामाचे अवशेष ओलांडताना मंदीराची पत्र्याची शेड दिसली आणि त्याखाली गोमुख असलेल दगडी कुंड! त्यातून निर्मळ पाण्याचा झरा चालू.हे कुंड चार पाच फूट खोल व तेवढ्याच लांबी रूंदीच आहे.



प्रथम गडफेरी करून मग मंदीरात यायचे ठरले.समोर डोंगराच्या दोन सोंडा दिसल्या.वरूणराजाच्या कृपेन धुक्याची दुलई दूर झाली आणि हिरवाकंच गवताचा गालिचा त्यापलिकडे एका सोंडेच्या पुढ असलेला वानरटोक सुळका दृष्टीस पडला.



वा! हेच ते क्षण असतात त्यासाठी जे कुठल्याही छायाचित्रकाराला आणि ट्रेकरला वेड लावतात.काय आणि किती फोटो घ्यावे अस झाल.प्रशांतने तर ऊड्याच मारायला लावल्या.पण वय विसरून फोटोग्राफरसाठी अस करण्यात पण एक वेगळीच मजा येते.



 पुढे एका सोंडेला एक समाधी आणि एक दारूखाना वा तत्सम पडक् बांधकाम आहे.दोन सोंडेच्या मध्ये घळीत थोडी तटबंदी आहे.खाली विस्तीर्ण समुद्रापर्यंतचा परिसर क्षण दोन क्षण दिसला.मग दुसरया सोंडेवर जाऊन वानरटोक सुळका जवळून बघितला.( वानरपाशी असही म्हणतात बहुतेक याला.हा क्लाईंबिंग करतात अस ऐकलय कुठेतरी).



एव्हाना दोन वाजत आले होते मग लगबगीने परत फिरलो.पावसाचीही लक्षण दिसायला लागली.ऊंचवट्यावर मंदीराच्याही वर वाड्यासारखे मोठे अवशेष आहेत व ध्वजस्तंभ आहे.तिथे खाली एक तलावही आहे




.तिथे पोहचून अजून दोन चार क्लिक करेपर्यंत आतापर्यंत आम्हाला सहकार्य करणारया वरूणराजान ताडताड करत आक्रमण केल आणि मग धावतपऴत मंदीराच्या पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला.मग थोडा पोटोबा आणि सोबत विठोबा करून परतीच्या मार्गी लागलो.




परतीच्या वाटेला तटबंदी शेवटच्या टोकापर्यंत चिखल तुडवत चाचपून आलो.सागरगडमाचीपर्यंत त्याच वाटेने झपझप ऊतरलो.तिथे कातकरयांची पोर विहीरीत पोहत होती त्यांनाही प्रशांतने पोझ म्हणून वरून ऊडी मारायला लावली.तिथून मग सिद्धेश्वर मठाकडे न जाता कच्च्या रस्त्यान खाली जिथ जंगलात ओढ्यापाशी धबधब्याकड वळलो होतो तिथ अर्ध्या पाऊण तासात पोहचलो.तिथून गाडीपर्यंत जाईस्तोवर पाच वाजले होते.मग शूज बदलून मुख्य रस्त्याला कोकणकट्टा नामक हॉटेलात सुरमई थाळी सोलकडी पोट फुगेस्तोवर हाणली ( कॅलरीज बॅलन्स करायला) आणि तशा सह्याद्रीच्या डोंगररांगेपासून बाजूला सागराजवळील एका कमी माहीती असलेल्या पण कधीकाळी नक्कीच महत्वाची भूमिका बजावलेल्या गडाचा निरोप घेतला.आजचा दिवस एका अनामिक समाधानाने भरलेला होता.




ऐतिहासिक आणि भौगोलिक माहीती
गडप्रकार  : गिरीदुर्ग
ऊंची  : 1357 मीटर्स
पायथ्याचे गाव:  अलिबागच्या 4 कि मी आधी खंडाळा, जि.रायगड
अंतर:  पुण्यातून खोपोली पेणमार्गे साधारण 150 कि मी.
ऊपयोग:  अलिबाग व धरमतर खाडीवर नजर ठेवण्यासाठी

ईतीहास:  

1660  : आदिलशहाकडून स्वराज्यात.
1665  : पुरंदर तहात महाराजांनी दिलेल्या 23 गडांपैकी एक!
महाराजांच्या आग्रा सुटकेनंतर परत स्वराज्यात दाखल.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सिद्धीने जिंकला.
1698 सरखेल कान्होजी आंग्रेंनी परत ताबा घेतला.
1713 सरखेल कान्होजी आंग्रेंना जहागिरी दिलेल्या 16 गडांपैकी एक.
1818 ईंग्रजांच्या ताब्यात.

स्थळ विशेष:

1.धोंदाणे धबधबा
2.सिद्धेश्वर मंदीर व मठ
3.वानरटोक सुळका
4.तटबंदी व पाच बुरूज असलेला बालेकिल्ला
5.गोमुख असलेले कुंड
6.वाड्यांच्या बांधकामाचे अनेक अवशेष
7.समाधी ( अनामिक)

निरीक्षण :

छत्रपतीं शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला ,  अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला ,
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दीर्घकाळ असलेला हा दुर्ग जरी थोडा अपरिचित असला तरी अनेक 
स्मृती आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे. तटबंदी दगडी बांधकामात असली तरी इतर गडांप्रमाणे 
दगड काढल्यामुळे तयार झालेली   पाण्याची टाकं काही नजरेस पडली नाहीत. जांभ्या दगडातील काही 
बांधकाम अवशेष बहुतेक अठराव्या शतकातील व त्यानंतरचे असावेत. 

ट्रेक सवंगडी:  




.








.
.









दिनांक:  17 जुलै 2016, रविवार.

धन्यवाद परत भेटू नवीन भटकंतीसह!

16 comments:

  1. तुषार ब्लाॅगची नविन मांडणी भावली..मी वर्तमानपत्रातील लेखात अश्या मांडणीचा उपयाेग करत असे..बाकी झक्कास ..

    ReplyDelete
  2. नाना, धन्यवाद! पण तु चुकाच सांगत जा मला म्हणजे अजून सुधारणा करता येईल.

    ReplyDelete
  3. उत्तम लेखन प्रशांत

    ReplyDelete
  4. उत्तम लेखन प्रशांत

    ReplyDelete
  5. या ब्लॉग मधील रचना अति सुंदर !

    ReplyDelete
  6. वा: सुरेख ब्लॉग. फोटोही मस्त हिरवेछान!!

    ReplyDelete
  7. वा: सुरेख ब्लॉग. फोटोही मस्त हिरवेछान!!

    ReplyDelete